दहशतीच्या छायेखाली

                                                             



                                   दहशतीच्या छायेखाली

         विरार रोड वर नेहमीप्रमाणे वर्दळ होती. कुणी कार्यालयीन कामासाठी धावपळ करत होते, कुणी स्टेशनवर ट्रेन मिळावी म्हणून धावपळ करत होते. एक अंधारी जागा मात्र सुरक्षित होती. कुणाला सहजासहजी लक्षात येणार नाही, अशा ईमारतीत तळघरात एक व्यक्ती खुर्चीत पाठमोरी बसली होती. डोक्यावर फेल्ट हॅट व काळा कोट. हातातला सिगारेटचा पाईप मध्येच तोंडात कोंबून ती कुणाच्यातरी येण्याची वाट पाहत होती. तेवढयात अंधारात खुडबुड झाली.

"जावेद, मला वाटलचं होतं तु येशील."

"बॉस, प्लॅन रेडी आहे. तुम्ही एकदा ऑर्डर दिली की लगेच निघू."

"गुड. ईशाद, नजीम आणि दाराला सांग तयार राहायला."

" जी बॉस."

            जावेद निघून जातो. काळया कोटातून मोबाईल बाहेर काढून ती व्यक्ती नंबर डायल करते, पलिकडून फोन उचलला जातो.

"काही काम नाही म्हणून बोअर होत असेल ना कदम?"

         इन्सपेक्टर कदम त्या आवाजाने चकित झाले.

"कोण बोलतयं?"

"कदम, एवढयातच विसरलास?"

"तु?" आश्चर्यचकित होत इन्सपेक्टर कदम खुर्चीतुन उठून उभे राहतात.

"पण तु तर त्या स्फोटात मेला होतास."

"कदम ते जगासाठी. तुझ्या हातून मरायला मी काही तुझा चेला नाहीये."

" तुझी ती इच्छा पण मी नक्की पुर्ण करतो, फक्त समोर येऊन बोल."

         ती व्यक्ती गडगडाटी हसते.

"वेळ आल्यावर मी येणारच आहे कदम, पण त्याआधी तुझ्या शहरातल्या लोकांना वाचव."

"म्हणजे?"

"म्हणजे? आमच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी आम्ही इथलं काहीही लुटू शकतो, काहीही. स्टेशन, मॉल नाहीतर बँक. तुच शोधुन काढ."

"हॅलो हॅलो...." फोन कट होतो. इन्सपेक्टर कदम आलेल्या कॉलचा ट्रेस लावण्याचा प्रयत्न करतात, पण तो लागत नाही.

"त्याने सांगितलं, त्याच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी तो काहीही लुटू शकतो."

"साहेब, मॉल असू शकेल." हवालदार साबळे बोलतो.

"नाही साबळे, तो मॉलमध्ये जाण्याची रिस्क नाही घेणार. आय थिंक तो बँक लुटणार आहे, बी एलर्ट."

           इन्सपेक्टर कदम यंत्रणेला कामाला लावतात.

"कदम, तुझ्या यंत्रणेला आणि तुला माझ्या पायाकडे नाही आणलं तर लक्षात ठेव." ती व्यक्ती संतापाने बोलत असते.

            सुधीर शहा, तसा म्हणायला गेलं तर एक साधा अकाऊंटंट. जिगर मात्र वाघाची. काही महिन्यांपासून तो सारखा विरारच्या देना बँकच्या चकरा मारत होता.

"आज तरी हे काम झालचं पाहिजे." सुधीर सरळ बँकेच्या मॅनेजरना कॉल करतो. पलिकडून कॉल उचलला जातो.

" हे बघा, यावेळी जर माझं लोन ॲप्रुव्ह नाही झालं तर मी वरपर्यंत जाईन हं."

"सर तुम्ही या, यावेळी तुमचं काम नक्की होईल."

         सुधीर कॉल कट करतो.

"काय झालं रे? बँकेने काय सांगितलं?"

"नेहमीचचं उत्तर. या तुमचं लोन नक्की ॲप्रुव्ह होईल."

" देवा, एकदाचं होऊ दे बाबा हे काम."सुधीर ची बायको मालती देवाला हात जोडते.

            सुधीर लोन ची फाईल घेऊन निघून जातो.

          इन्सपेक्टर कदम आपल्या सुत्रांकरवी विरारमधील प्रत्येक बँकेवर निगराणी ठेवायला सांगत स्वत: जातीने लक्ष ठेवून असतात. सुधीर लोन फाईल घेऊन देना बँकमध्ये शिरतो. थेट मॅनेजरच्या केबिनमध्ये जात तो लोनची फाईल टेबलवर आपटतो.

"आज काहीही झालं तरी हे लोन ॲप्रुव्ह झालचं पाहिजे, मि.समर."

"सर बसा तुम्ही, तुमचं काम नक्की होईल. बँकेला काही प्रोसिजर्स कराव्या लागतात, त्या पुर्ण झाल्यात की मग ओके."

"हे बघा मी......"

           सुधीरच्या मागे पाहत मॅनेजर एकदम हात वर करत उभा राहतो. तेवढयात सुधीरच्या कनफटीवर गनची नळी टेकलेली असते. सुधीर घाबरुन हळूच पाहतो.

"ए, चल तिकडे." म्हणत ईशाद सुधीर आणि मॅनेजरला तसचं बाहेर घेऊन येतो. बाहेर सगळीकडे सन्नाटा असतो. दारा आणि नजीम हातात मशिनगन्स घेऊन उभे असतात. बँकेतील लोकांना व ग्राहकांना एका लाईनमध्ये खाली बसवलेलं असतं.

"हे बघा तुम्हांला पैसे पाहिजे असतील, तर इथले वाटतील तेवढे पैसे घेऊन निघून जा, पण आम्हांला सोडा." एक साधारण पन्नाशी पार केलेला गृहस्थ मध्येच बोलतो. नजीम त्याच्याजवळ जात मशिनगनची नळी त्याच्या डोक्यावर टेकवतो.

"खुप पैसे आहेत का तुझ्याजवळ? मग दे ना." तो म्हातारा थरथर कापत गप्प बसतो. तेवढयात मोठया थाटात फेल्ट हॅट आणि लांब ओव्हरकोट घातलेला इसम आत येतो. ईशाद आणि दारा त्याच्याजवळ जातात.

"बॉस, प्लॅनप्रमाणे सगळं चाललयं. आता फक्त तुम्ही ऑडर्स दया."

           सिराज समोरच्या काऊंटरकडे चालत जातो, आणि आपली फेल्ट हॅट काढून काऊंटरवर ठेवतो. तोंडातला सिगारेटचा पाईप तसाच ठेवून तो मोबाईल वर कदमला कॉल करतो.

"कदम, तुला मी सांगितलं होतं की मी तुझ्या यंत्रणेला नक्की कामाला लावेन."

"सिराज, हे बघ. तुझी दुश्मनी माझ्याशी आहे ना, तर मग या निष्पाप लोकांना कशाला त्रास देतोयस?" इन्सपेक्टर कदम कॉल ट्रेस करायला सांगतात.

"माझ्या भावाने पण तुझं काय बिघडवलं होतं कदम? हा त्याचाच बदला समज."

          तेवढयात बँकेचा सिक्युरिटी गार्ड लक्ष नाही असं पाहून पाठीमागून आपली रायफल सिराजवर ताणतो की सिराज ओव्हरकोटात दडवलेली गन काढून मागे न पाहता सिक्युरिटी गार्डच्या सरळ कपाळात गोळी झाडतो. सिक्युरिटी गार्ड उभ्या उभ्या खाली कोसळतो.

"आवाज ऐकलास का कदम? एकदम ओरिजनल आवाज आहे नाही?"

"सिराज, तु कितीही काहीही कर, पण माझ्या हातून वाचणार नाहीस."

       सिराज कॉल कट करतो आणि मागे वळतो.

"ईशाद, नजीम, दारा एकालाही बँकेतून बाहेर जाऊ देऊ नका. कुणी कितीही गयावया केली तरी."

           सिराज मॅनेजरच्या केबिनमध्ये जात त्याच्या खुर्चीवर बसतो.

     इन्सपेक्टर कदमला बँकेचे लोकेशन समजते, आणि तो आपल्या टिमसह तिथे पोहोचतो. एक सीआरपीएफ जवान धावतच कदमांजवळ येतो.

"सर त्यांनी बाहेरच्या दरवाजावर बाँब प्लँट केला, बाँब डिफयुज करण्याचा प्रयत्न केला तर स्फोट घडेल."

"ओ डॅम ईट!" इन्सपेक्टर कदम वैतागतात. तेवढयात त्यांचा मोबाईल वाजतो.

"आलास कदम. गुड! पण आत कसा येणारेस तु? मला वाटतं तुला या आतल्या लोकांची काही पडलेली दिसत नाहीये."

"सिराज, कोणाच्या केसाला जरी धक्का लागला ना तर......."

"नजीम....." सिराज एका बाईकडे इशारा करतो.

"ए चल.........." नजीम जात एका गर्भवती बाईचया केसाला धरुन तिला ढकलत सिराजसमोर फेकतो.

"तिला सोडा हो, ती प्रेगनंट आहे."

"अच्छा म्हणजे माझ्या काही कामाची नाही." नजीम हसतो आणि तिच्या पोटावर गन ताणतो. ती स्त्री रडत गयावया करते, पण तोपर्यंत ठो..........गोळीचा आवाज, आणि त्या महिलेचे पोट फुटून आतडे बाहेर येतात.

"सिराज.............." इन्सपेक्टर कदम तो आवाज ऐकून संतापतात. सिराज मोठयाने हसतो.

"हा तर फक्त ट्रेलर आहे कदम. आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर यातला एकही जण इथून जिवंत बाहेर पडणार नाही."

"काय मागण्या आहेत तुझ्या? पैसे............!"

"पैसे तर घेणारच, पण त्याआधी तुझ्या ताब्यातील एकजण पाहिजे."

"कोण?"

"याकुब..."

"नाही, नाही. याकुबला मी सोडवू शकत नाही. त्याने कित्येक लोकांचे प्राण घेतले आहेत."

"त्याला नाही सोडलं तर मी या सगळयांचा जीव घेणार आहे हे लक्षात आहे ना?"

"तु असं काहीही करणार नाही आहेस." तेवढयात कॉल कट होतो.

"त्याने कॉल कट केला."

"सर आपण त्याची मागणी पुर्ण केली पाहिजे." सब कॉन्स्टेबल चितळे बोलतात.

"चितळे, ते शक्य नाही. तुम्हांला माहितीच आहे ना की याकुब केवढा मोठा क्रिमिनल आहे."

"मग आता काय करायचं?"

           इन्सपेक्टर कदम बँकेची सगळया बाजूने पाहणी करायला सुरवात करतात. कुठूनही आत जाण्याचा मार्ग नसतो.

"आतमध्ये काय चाललयं काही कळायला मार्ग नाही चितळे."

                  इन्सपेक्टर कदम हताशपणे बँकेतुन कोणी बाहेर येईल याची वाट पाहत राहतात.

  " तुम्ही चुकीचं करताय?" सुधीर झेप घेत उभा राहतो.

"काय बोललास?" ईशाद ची गन त्याच्या कपाळावर टेकली जाते, तशी सुधीरला आपली चुक समजते.

"म्हणजे, तुम्ही त्या बाईला उगाचचं मारलं. प्रेगनंट बाईला मारुन तुमचा काय फायदा?'

"मग काय तुला मारायला पाहिजे होतं का?" ईशाद असं बोलताच त्याचे साथीदार हसू लागतात.

"नाही, तसं नाही."

          सुधीरला कुठलीही चुक महागात पडणार होती, त्यामुळे तो गप्प बसतो.

"हे बघा.........." एक म्हातारा माणूस बोलतो. सगळे त्याच्याकडे पाहतात.

"मला किडनीचा त्रास आहे हो, प्लीज मला एकदा बाथरुमला जाऊ दया."

"इथेच कर." नजीम गनची नळी म्हाता-यावर रोखत बोलतो.

"काय? इथे सगळयांसमोर?" म्हातारा केविलवाणा चेहरा करतो.  

             सिराज म्हाता-यासमोर जातो.

"हो इथेच कर, आम्हांलाही बघू दे, काय रे ईशाद?"

         ईशाद आणि त्याचे साथीदार मोठयाने हसू लागतात. म्हातारा रडकुंडीला येतो.

"कर." म्हणत सिराज हवेत गोळी झाडतो. आवाजानेच म्हाता-याची पँट ओली होते.

            सिराज आणि त्याचे साथीदार पुन्हा हसू लागतात.

"म्हातारा टरकला बघ." ईशाद हसत हसत बोलतो.

"हे बघा, तुम्ही पुन्हा चुकताय?" मध्येच सुधीर सिराज ची पर्वा न करता बोलतो.

"तुझ्या तर........" ईशाद त्याच्यावर गन रोखतो.

"ईशाद थांब." सिराज सुधीर कडे जातो.

"खुप पुळका यायला लागलाय का रे तुला? नाव काय आहे तुझं?"

         सुधीर घामाघुम होत सिराज कडे पाहू लागला.

"अरे नाव काय तुझं? मराठी येत नाही का?"

"सु....सु.......सुधीर."

"सुधीर. म्हणूनच धीर नाही तुला." सिराज असं बोलताच त्याच्या साथीदारांत हशा पिकतो. बाकीचे लोक मात्र गर्भगळीत झाल्यासारखे दोघांकडे पाहत असतात.

"हे काय आहे?" सिराज हातातील गन दाखवतो.

"गन.." सुधीर सहज सांगतो.

"अं हं. गन इंग्रजीत, मराठीत याला घोडा म्हणतात, काय म्हणतात?"

"घोडा."

"एकदा का घोडा लागला ना, की भलेभले बिथरतात, समजलं?" सिराज गन नाचवत बोलतो.

           सुधीर थरथरत मान हलवतो.

"बॉस, हा जरा आगाऊच दिसतोय. सरळ याला गोळीच घालतो." नजीम बोलतो.

"अरे कशाला गोळी वाया घालवतोयस? त्यापेक्षा एक काम कर. आमच्या कदम साहेबांना कलिंगड ज्युस खुप आवडते, ते दे पाठवून."

        नजीम आश्चर्याने पाहतो.

"अरे वेडया, या माणसाचं रक्त पाठवून दयायला सांगतायेत ते." दारा बोलतो. नजीमला समजते, तेव्हा तो मोठयाने हसतो. सुधीरचे मात्र रक्त गोठते. नजीम लागलीच खिशातून छोटा चाकू काढतो, सगळया उपस्थितांच्या अंगावर सरसरुन काटा उभा राहतो.

     सुधीर कावराबावरा होत पाहतो, आता काय करावं हा प्रश्न सगळयांच्याच मनात येतो.

"चल हात दे."

"मी काय म्हणतो, तुम्ही असं करुन काही होणार नाही. तुमचा वेळ वाया जाणार, त्यापेक्षा आम्ही तुमच्यासाठी काही करु शकत असलो तर सांगा ना." बचावाचा कुठलाच मार्ग नसलेला सुधीर बोलतो. खरेतर त्याची नजर दरवाजाच्या बाजुला लागलेल्या त्या तारांच्या भेंडोळयाकडे असते. एकदा त्यातल्या तारा मोकळया केल्या, की पोलिसांना आत यायला सोपे होणार होते.

"हो का? तु काय करणार आहेस आमच्यासाठी?" सिराज गनच्या नळीने केस खाजवतो.

"बराच वेळ झालाय काही मनोरंजन नाही झालं, काय रे ईशाद?"

"आहा! बॉस एकदम झकास आयडिया." ईशाद हसला, सुधीरला काही कळत नव्हते, तेवढयात सिराज एका बाईकडे आला.

"ईशाद, नजीम. ही साडी कशी आहे?"

         मस्तकावर कोणीतरी आघात करावा असे त्याचे बोलणे ऐकून सगळयांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. सुधीरची तर कपाळावरची धमनी थडथडत होती. समोरची ती बाई हमसून रडू लागली.

"सिराज..." सुधीर ओरडला.

"अं........काय बोललास?"   

"मी.....मी हवं ते करायला तयार आहे, पण....पण त्या बाईला सोड."

"ठिक आहे, सोडतो." सिराजने सगळयांदेखत त्या बाईची साडी झटकन खाली ओढली. सिराजचे साथीदार सोडले तर सगळयांच्या डोळयांवर हात गेले. सुधीर हतबल होऊन पाहत होता. ईशाद, नजीमने सिराजचे उरलेले कामही पूर्ण केले. दोघांनी आळीपाळीने त्या बाईच्या अब्रुचा गैरफायदा घेतला. सगळेच घाबरुन ओरडू लागले.

"ए गप्प. गप्प बसा. ही आयडिया कुणाची होती? याचीच ना?" सिराज सुधीरकडे इशारा करतो. सुधीर थिजल्यासारखा उभा असतो. आपण खरचं काहीतरी चुक केली याची जाणीव त्याला होऊ लागली. सिराजने साडी सुधीरकडे फेकली. ती बाई आपले शरीर दोन्ही हातांनी झाकत खाली बसून होती. कुणाला तिच्याकडे पाहवत नव्हते.

"ए चल नेस साडी, आणि कर डान्स. नजीम वाजवं गाणं."

          ईशादच्या बोलण्यावर नजीम मोबाईलमध्ये गाणं वाजवतो.

"मुन्नी बदनाम हुई, डार्लिंग तेरे लिये....." नाईलाजाने सुधीर ती साडी नेसून नाचायला लागतो. सिराज व त्याचे साथीदार मोठमोठयाने हसायला लागतात.

"अरे वा! ही मुन्नी तर कमाल आहे." सिराज बोलतो तेवढयातच त्याचे लक्ष सुधीरकडे जाते.

"ईशाद पकड त्याला." ईशाद सुधीरकडे पाहतो. दरवाजाकडे जाऊन तारांचं भेंडोळं सोडवण्याचा त्याचा प्लॅन ईशादला समजताच तो झटकन आपल्या हातातील सुरीने त्याचा एक हात पकडून सुरीने सपकन वार करतो. सुधीर किंचाळतो.

"ए शहाणा बनतोस? आता जो पर्यंत आम्ही सांगत नाही तोपर्यंत नाचायचं. ओरडायचं नाही." सुधीरचा हा प्रयत्न फसतो. रक्ताचं थारोळं एका ग्लासात घेऊन ईशाद उभा राहतो.

"वा! कलिंगड ज्युस तयार झालं." सिराज हसतो.

"पण त्यावर सजावटीसाठी काहीतरी हवं असं नाही वाटतं का तुला ईशाद?"

        ईशाद स्मितहास्य करतो, आणि नाचणा-या सुधीरच्या तळहाताची एक करंगळी झटकन कापतो. सुधीर ओरडू नये म्हणून त्याचे तोंड उघडताच तो बंदुकीची नळी त्याच्या तोंडात कोंबतो.

"गप्प बस. नायतर तुझा मेंदु बाहेर येईल." जखमी विव्हळणारा सुधीर तशाही अवस्थेत नाचत असतो.

"ए ईशाद, काय मस्त सीन आहे रे? जरा थांब." म्हणत सिराज मोबाईलवरुन इ.कदम ना व्हिडीओ कॉल करतो. कदम कॉल उचलतात, आणि पाहतात तो एक माणूस साडी घालून नाचत आहे. एका कोप-यात एक नग्न अवस्थेत बाई बसलेली आहे, आणि एका हातात रक्ताचा ग्लास घेऊन ईशाद उभा आहे.

"सिराज............." डोक्यात कळ गेल्यासारखे कदम ओरडतात.

"काय कदम, एवढचं पाहून घाबरलास? अरे कसला पोलिस तु?"

"सिराज, त्या निष्पाप लोकांनी तुझं काय बिघडवलयं?"

"त्यांनी काही बिघडवलं नाहीच आहे, बिघडवलं तु आहेस. मी फक्त त्याची फळे यांना देतोय."

"हे बघ याकुबला सोडून तु दुसरं काहीही माग, मी दयायला तयार आहे."

"काय खेळ चाललाय इथे? मला याकुबच पाहिजे. हवं तर मी तुला पैसे देतो, आमच्यात ये. ऐश करशील ऐश."

"सिराज....." तेवढयात कॉल कट होतो. इ. कदम संतापाने दगडावर मुठ आपटतात. त्यांचा हात रक्तबंबाळ होतो.

"साला नीच, हरामखोर. त्याच्या भावाला मारलं म्हणून त्याचा बदला तो असा घेतोय." एवढयात बँकेच्या दरवाजाजवळ कोणाचीतरी हालचाल जाणवते, तसे कदम सावध होतात.

"कोणीतरी येतयं." इन्सपेक्टर कदम व त्यांची टिम गन रोखते. एक घाबरलेला माणूस हातात एक काचेचा ग्लास घेऊन बाहेर उभी असते.

"सर, दरवाजा उघडा आहे आपण आत जाऊ शकतो का?"

"नाही चितळे, ती बघा ती बंदुकीची नळी दिसतेय?" चितळे बारकाईने पाहतात, खिडकीतून एक रायफलची नळी बाहेर आलेली असते.

"सिराज खुप धुर्त आहे, तो कसलाही धोका पत्करणार नाही." हातात काचेचा ग्लास घेतलेला तो माणूस इन्सपेक्टर कदम कडे तो ग्लास सोपवतो आणि काही न बोलता मागे फिरतो.

"ए थांब." कदम ओरडतात, पण तो मागे वळून पाहत नाही. दरवाजा पुन्हा बंद होतो. कदम तो ग्लास हातात घेत पाहतात, त्यांना किळस येते. तोपर्यंत परत मोबाईल वाजतो.

"कदम आवडलं का कलिंगड ज्युस? अरे गरम झाला असशील म्हणून खास पाठवलं."

"सिराज, अरे एकदा हिंमत असेल तर मोकळया मैदानात येऊन बघ. तुझ्यासकट तुझ्या माणसांचं चांगलं ज्युस बनवतो."

"पोकळ धमक्या देऊ नकोस रे. तुला अजून ज्युस हवंय का? पाठवतो हं."

"सिराज....सिराज..." कॉल कट होतो. कदम दातओठ खात बँकेच्या बंद दरवाजाकडे पाहत राहतात. क्षण दोन क्षण ते इमारत न्याहाळतात, आणि पटकन त्यांच्या मेंदुत काहीतरी क्लिक होते.

"चितळे, तुम्ही माझ्यासोबत या."

           बँकेत जायला एकच दरवाजा असला तरी आजुबाजुच्या झाडीतून निट पाहिलं, तर एका ठिकाणी तळघराच्या खिडक्या दिसत होत्या. ज्या गच्च बंद होत्या. झाडीमुळे आणि मातीच्या भरावामुळे सहजासहजी त्या कुणालाच दिसल्या नसत्या, पण कदमांनी नीट पाहिले होते.

"चितळे, जेव्हा सरळ रस्ता मिळत नसेल तेव्हा वाट वाकडी करावी लागते." इन्सपेक्टर कदम आपल्याकडच्या काही साथीदारांना घेऊन मातीचा ढिगारा खोदायला सुरवात करतात. ती जागा सिराजच्या नजरेच्या बाहेर असते.

              बँकेत सिराज मात्र मनोमन खुश होत असतो. आपल्या मागण्या मान्य करीपर्यंत तरी तो तिथल्या सगळयांनाच वेठीस धरणार होता. इन्सपेक्टर कदम बिथरुन काहीतरी चुकीचं पाऊल उचलेल, आणि मग त्याला आपण संपवून टाकू असा आशावाद त्याने बाळगला होता, पण सकाळची संध्याकाळ होत आली तरी त्याच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे तो चिडला होता.

"ए ईशाद बंद कर त्याचा डान्स." ईशाद सुधीरला थांबवतो.

"ए चल, जाऊन चुपचाप बस." ईशाद त्याच्या मस्तकावर गन टेकवत बोलतो.

"अरे त्याला गप्प करुन काय उपयोग? तो कदम ऐकत नाहीये."

"ऐकणार बॉस." नजीम बोलतो, तसा पाठमोरा सिराज मागे वळतो व नजीमवर गन ताणतो.

"तुझा सासरा आहे काय रे तो? ऐकणार म्हणे. मी ओळखतो त्या कदमाला. सुंभ जळला तरी त्याचा पिळ जाणार नाही."    

        सिराज हवेत फायरींग करतो. तिथे जमलेले सगळे त्या आवाजाने घाबरतात. ईशाद, नजीम आणि दारा त्या सगळयांना खुराडयात जशा कोंबडया भरतात तसे पकडून बांधून टाकतात. सगळयांसोबत सुधीरही बांधला जातो.

"आता बस." सिराज ईशाद च्या हातातील रायफल घेतो आणि त्या बांधून ठेवलेल्या लोकांवर रोखतो. सगळे भितीने ओरडू लागतात, पण सुधीर मात्र खंबीर असतो. सिराज गोळी चालवणार एवढयात तो ओरडतो.

"थांबा." सिराज सुधीरकडे पाहतो.

"आम्ही सगळे मरायला तयार आहोत, पण एकदा आमची शेवटची इच्छा तरी विचारा."

"शेवटची इच्छा!" सिराज गडगडाटी हसतो, त्याचे साथीदार ही त्यात सामील होतात. दुसरीकडे इन्सपेक्टर कदम बँकेच्या तळघरातून पाय-या चढून जात असतात.

"बोल, काय आहे तुझी शेवटची इच्छा? पटकन बोल."

      सुधीर बाजुच्या लोकांना पाहून नजरेने काहीतरी इशारा करतो, जो सिराजला समजत नाही.

"तुम्ही आम्हांला इथे कोंडून ठेवलंत, आमच्यातल्या काहींना ठार केलतं. खरोखरच तुम्ही खुप मोठे क्रिमिनल आहात."

"काय म्हणालास?" सिराज ओरडला.

"म....म्हणजे. तुमच्यासारखा परफेक्ट प्लॅन कोण बनवू शकतं, बरोबर ना?"

"मुददयाचं बोल."

"आम्हाला तुमच्या पाया पडायचं आहे, साष्टांग दंडवत घालायचा आहे."

"काय!" सिराजच्या आनंदाला पारावार राहत नाही.

"बॉस, हा याचा काही प्लॅन..." ईशाद बोलणार तेवढयात सिराज त्याला थांबवतो.

"ईशाद लक्षात ठेव, यांनी काही दगा करण्याचा प्रयत्न केला तर आपण आहोतच की."

       नजीम व दारा त्या सगळयांना सोडतो. सुधीर मुददामच डोळयांची बुब्बुळे फिरवत रांगत जाऊ लागतो. सगळयांना त्याचे इशारे समजत असतात, त्यामुळे त्याच्यासोबत जाणारेही एकमेकांकडे पाहत असतात. ईशाद, नजीम आणि दारा सगळयांवर गन रोखून असतात. सुधीर सिराजच्या पायावर पडतो.

"तुम्ही आमचे मालक आहात, खरचं." तो सिराजच्या पायांना धरतो, आणि एकदम झेप घेत बेसावध सिराजच्या हातातील गन खेचतो आणि सिराजला घटट पकडून त्याच्या कनफटीवर टेकवतो. ईशाद, नजीम आणि दारा सुधीरला पकडायला धावतात.

"ए दूर व्हा, दूर व्हा. नाहीतर गोळी घालीन हां या तुझ्या बॉसच्या डोक्यात."

        सुधीर धाडसाने बोलतो, पण सिराज शांत असतो. ईशाद, नजीम व दारा त्याच्या जवळ येऊ लागतात.

"मी खरचं गोळी घालेन हं." सिराज आपल्या साथीदारांना हाताचा ईशारा करत थांबवतो.

"तुला माहिती आहे का, तु कोणाशी पंगा घेतो आहेस?" सिराज विचारतो.

"ए गप. एका असहाय बाईच्या अब्रुचा फायदा घेणारे तुम्ही. आमच्यासारख्या साध्याभोळया माणसांना इथे कोंडून स्वत:ला मोठे मास्टरमाईंड समजता. अरे गन हातात घेतली की सगळेच वाघ होतात."

"याचे परिणाम तु मघाशी पाहिलेच असशील, मला वाटतं तुला मरायची खुप घाई झालीय."

"मी नाही, तु मरणार. आपल्या साथीदारांना हत्यारे खाली टाकायला सांग." सुधीर डेअरींग दाखवतो, तसे ईशाद, नजीम व दारा हत्यारे खाली ठेवतात. त्यासरशी जमलेले लोक त्या तिघांवर तुटून पडतात. तिघांना बेदम मारुन तिथल्या रस्सीने बांधून ठेवतात.

"सिराज, आता तु काय करणार आहेस?"

        तेवढयात फरशीचा सरकण्याचा आवाज ऐकून दचकलेला सुधीर मागे पाहतो. तशी संधी साधून सिराज त्याला धक्का देत आपली गन सुधीरच्या हातातून खेचतो.

"जा मर आता माझ्या हातून." सिराज गोळी चालवणार एवढयात इ. कदम त्याच्या हातावर गोळी झाडतात. सिराजच्या हातातून गन खाली पडते.

"सिराज, तुला सांगितलं होतं ना, मी आत आल्यावर तुझ्यासकट सगळयांचं ज्युस बनवणार आहे."

"कदम......." सिराज इ. कदम वर हल्ला करतो. इ. कदम त्याचा प्रतिकार करतात. दोघांमध्ये झटापट होते, आणि अचानक एक गोळी सुटते. इन्सपेक्टर कदम विस्फारलेल्या डोळयांनी पाहत राहतात, त्यांच्या पोटाला रक्त लागलेले असते. पण तेवढयात समोर उभा सिराज धपकन खाली कोसळतो. इ. कदमची गोळी त्याचं आतडं फाडून बाहेर आलेली असते, आणि सिराज इ. कदमांसमोर उताणा पडतो.

"सिराज, पापाचा अंत शेवटी असाच होतो."

         इन्सपेक्टर कदम व चितळे आपल्या टिमसह बँकेतल्या कर्मचारी व ग्राहकांना तिथून सोडवतात. ईशाद, नजीम व दारा ला अटक केले जाते. इन्सपेक्टर कदमना सुधीरच्या धाडसाचे कौतुक वाटते. दहशतीच्या छायेखाली असताना त्याने दाखविलेले धाडस खरचं वाखाणण्याजोगं असतं.

"सुधीर शहा. तुमच्या धाडसामुळेच आम्ही आज एका कुख्यात गुन्हेगाराचा खात्मा करण्यात यशस्वी झालोत. आम्ही सरकारकडून तुम्हांला पारितोषिक मिळण्यासाठी शिफारस करु."

"पारितोषिकाची रक्कम काय असेल पण?" रोजच्या सवयीप्रमाणे सुधीर विचारतो, तसे इ. कदम हसतात.

"त्यातुन तुम्ही तुमचं थकलेलं घराचं काम पुर्ण करु शकता."

           इन्सपेक्टर कदमच्या स्पष्टोक्तीने सुधीर शहा खुश होतो, तसे कदम त्याच्या पाठीवर थाप मारुन निघून जातात.

--------------------------------------------------------समाप्त----------------------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ये रिश्ता क्या कहलाता है!

अवंतिका एक छोटीशी प्रेमकथा