आठवणीतला पाऊस

                                         



                                          "पाणी झरत चाललं,वर आभाळं फाटलं

                                             पावसाने पावसाला वर नभात गाठलं" 

         बालपणी ऐकलेले हे गाणे आजही रोमांचित करणारे आहे. वैशाख वणवा त्यात अंगावरुन ओघळणारे घामाचे ओघळ अणि अशातच वातावरणात बदल व्हायला लागतो. अंधार दाटुन येतो, आकाशात काळेकुट्ट ढग दाटीवाटी करु लागतात. जोराचा वारा वाहु लागतो, आणि कोसळणाऱ्या जलधारा धरतीला त्रुप्त करतात. 

      "चंचल वारा, या जलधारा, भिजली काळी माती

          हिरवे हिरवे प्राणकशी ही रुजुन आली पाती" 

     कवी मंगेश पाडगावकर यांच्या गाण्यातल्या या ओळी आठवु लागतात. अनेक कथा- कवितांमधला हा अल्लड हिरो नेमक्या वेळेलाच आपली एंट्री करत असतो. कधी सौम्य तर कधी उग्र बनुन तुटुन पडतो. मग केव्हातरी वाटते, अरे काय हा वेडा झाला की काय? सारखा कोसळतो आहे. पण कधीकधी तिन चार दिवस नोकरीवर कर्मचारी कसा दांडी मारतो तसा गायबच होतो. तेव्हा पुन्हा त्याची मनधरणी करावी लागते. 

       चित्रपटातील पावसाची पण खरी गंमत असते. अगदी अंधार दाटुन येतो, आकाशात विजा चमकु लागतात आणि एखाद्या हिरोसारखा जोरदार पाऊस कोसळु लागतो. माझ्या आयुष्यात अनेक पावसाळे मी पाहिले, अनुभवले. पण साधारण मी तिसरी-चौथीत असताना ची आठवण अजुनही मनात ताजी आहे.

       मी कोकणवासी. नारळी- पोफळीच्या बागा, सुंदर किनारे याबरोबरच धुवांधार पाऊस हे कोकणचे वैशिष्ट्य. तर अशा या कोकणातील एक असाच पावसाळा. साधारण मी तेव्ह‍ा‍‍ तीसरी चौथीत असेन, बघता बघता भर सकाळच्या वेळी अंधार दाटुन आला.  सोसाटयाचा वारा सुटला आणि आकाशात जोरजोरात विजा चमकायला सुरवात झाली. अगदी फिल्मी माहौल तयार झाला. मी बापुडा घरात जाऊन गुपचुप लपलो, आणि तो आलाच.  अगदी वाजतगाजत एखादया नव-यासारखा. काय तो पाऊस! पक्का आठवणीत राहिलेला तो एक पावसाळा होता. त्यानंतर शाळेत, हायस्कुलमध्ये जाताना छत्री सांभाळुन चालताना उडणारी त्रेधातिरपीट आठवली की हसु येते.  रिपरिप करणारा पाऊस, त्यात पावसातुन चालताना चपलांचा होणारा सपसप आवाज आणि थंडीने कुडकुडणारे आम्ही छत्र्या सांभाळत शाळेत पोहोचायचो.  पावसातुन चालताना मस्त भिजलेल्या मातीचा सुगंध घेत आणि त्यात भरीस भर म्हणजे तरारुन आलेले कोंब पाहण्यात जी गंमत येई ती औरच.

                    भाजलेले काजु आणि भाजलेली मक्याची कणसे  ही अजुन एक पावसाळी आठवण. त्यावेळी धों धों पाऊस कोसळुन गेला की, घरात माझे बाबा भाजलेले काजुगर देत असायचे. कधीकधी हा पाऊस सलग तिन चार दिवस न थांबता पडत राहायचा. मग या पावसात कागदाच्या बोटी करुन सोडणे, चिखलाच्या पाण्यात मस्ती करणे असे खेळ सुरु व्हायचे.

                    रम्य ते बालपण, आणि रम्य तो पावसाळा.  एकदा तर मी पहिलीत का दुसरीत असताना धों धो पडणा-या पावसामुळे आलेल्या पुरात मी वाहुनच जाणार होतो.  एक एक पावसाळा बरेच अनुभव शिकवत गेला. त्यानंतर 2010 मध्ये जेव्हा मी शासकीय सेवेत रुजु झालो, त्यावेळी माझ्याकडे स्वत:ची दुचाकी वगैरे नव्हती. एसटी झिंदाबाद! पण ती ही कुठेतरी एखादी असायची, आणि ती चुकली की मग कुठेतरी मिळेल त्या बसने अर्ध्यापर्यंत जावे लागायचे. अशीच एक पावसाळी संध्याकाळ. बस तर चुकली होती, मिळेल त्या बसने अर्ध्या पर्यंत आलो, तिथुन माझे गंतव्य ठिकाण साधारण 8-09 किलोमिटरवर होते. पाऊसही भरुन आलेला, हातात छत्री. जाणार कसं? कुठली बसही नव्हती, ना ही रिक्क्षा, मग काय पटापट घाई करुन एका बाईकवाल्याला सोडायला सांगितले, आणि बसलो बाईकवर.  बाईकवरुन जाताना देवाची आळवणी करतच होतो, की तो आलाच एखादया अल्लड मुलासारखा. आणि जाईपर्यंत माझी मनसोक्त आंघोळ झाली. हा ही माझ्या आठवणीतला पाऊस म्हणावा लागेल.

                   "गार वारा हा भरारा, नभ टिपुस टिपुस."

   त्यानंतर तर पावसाळे येतच गेले, कधी चांगले तर कधी वाईट. पण जसा आंब्याचा सिझन असतो, तसा तेव्हा पावसाळयाचा सिझन होता. मात्र आता तर अल्लड मुलासारखा पाऊस वर्षभर नुसता पडत राहतो. उग्र रुप घेऊन भातपिकांचे नुकसान करत राहतो.  सगळीकडे तळयात मळयात करुन टाकतो.   

      पावसाची अशी अनेकविध रुपे कधी मनाला मोरपंखी स्पर्शाची अनुभुती देतात, तर कधी तांडव करणाऱ्या शिवाची. पाऊस तेव्हाही पडायचा, आताही पडतोय. पण आताचा पाऊस गावेही उध्वस्त करतोय. मनाला वाटेल तसा, वाटेल तेव्हा कोसळतो.  आपला हा आवडता पाऊस असं का करतो? या प्रश्नाचे उत्तर शोधताना असे दिसुन येते की आताचे निसर्गाचे वेळापत्रक बिघडलेले आहे, मनुष्याने स्वतः च्या हव्यासापोटी पर्यावरणाची खुप मोठी हानी करत ग्लोबल वॉर्मिंग वाढवले आहे. त्यामुळे आठवणीतला हा सुखद पावसाळा आज मात्र नकोसा वाटतोय.  माणसाने निसर्गाशी खेळ करायचा, आणि दोष मात्र निसर्गाला, पावसाला दयायचा हे गणित चालत आले आहे.

       १९९० च्या दशकात पाऊस म्हणजे काप्या फणसाचा वास, उगवलेले ओल्या काजुचे कोंब, दाटुन आलेले आभाळ आणि कालचक्राप्रमाणे पडणारा पाऊस. ही समीकरणे आजच्या आधुनिक फास्ट फुडच्या काळात कुठे राहिली आहेत? 

       त्यामुळेच तो आठवणीतला पाऊस अनुभवायचा असेल तर माणसाने निसर्गाशी चालवलेला विनाशी खेळ थांबवायला हवा. निसर्गाचे बिघडलेले वेळापत्रक संतुलित ठेवायला हवे. आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन पावसाळ्या आधी तिन- चार महिने अगोदर केले पाहिजे. तरच आपला लाडका पाऊस मनाच्या एका कप्प्यात दडुन राहिलेल्या त्या मोरपंखी आठवणी पुन्हा घेऊन येईल, आणि मन भुतकाळात जात बालक होऊन म्हणेल,

"ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा

पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा".


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ये रिश्ता क्या कहलाता है!

अवंतिका एक छोटीशी प्रेमकथा