एक अनुभव असाही
"बीप बीप" असा कुठूनतरी आवाज
ऐकु आला, आणि मन पटकन भुतकाळातील एका कटु अनुभवाकडे वळले. २०२१ मधील सप्टेंबरची ३०
तारीख. मला आठवतो तो दिवस, गोपाळकाला होता त्या दिवशी. सुटटी असल्याने मी घरीच
होतो. मी पंचायत समिती कुडाळमध्ये कर्मचारी असल्याने कुडाळातच भाडयाने राहत होतो. काहीतरी
काम आलं म्हणून मी लगबगीने खाली गेलो, काम आटोपलं आणि वेगाने जिना चढत रुमकडे आलो.
अचानक काय झालं काही कळलं नाही. छातीत प्रचंड वेदना जाणवल्या, पाठीत पण खुप दुखु
लागले. कसाबसा मी खाली झोपलो , पण कळा थांबत नव्हत्या. माझी दोन्ही लहान मुलं,
त्यांना काही कळालं नाही. त्यांनी माझ्या बायकोला बोलावलं, तेव्हा लगेच मला
हॉस्पीटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं.
निदान झालं, मला सौम्य ह्रदयविकाराचा झटका आला होता. माझं वय ३२. सगळेच
अवाक झाले. एवढया लहान वयात हार्टअटॅक. कोणी काही, कोणी काही बोलत होतं. शेवटी
डॉक्टरांच्या सल्ल्याने मला तातडीने कोल्हापूरच्या ॲपल सरस्वती हॉस्पीटलमध्ये शिफट
करण्यात आलं. मनात काहीशी धाकधुक होती, की काय होणार माझं. कोल्हापूरच्या
हॉस्पीटलमध्ये अँजियोग्राफी करण्यात आली, आणि माझ्या बायपासवर शिक्कामोर्तब झालं.
मन घाबरलं, कधी हॉस्पीटलची सवय नव्हती. आणि आता थेट ऑपरेशन. किती दिवस त्या
हॉस्पीटलच्या बेडवर मरणासन्न राहावं लागणार होतं. पण माझ्या बायकोने, जवळच्या
लोकांनी धीर दिला. शेवटी मनाचा सारा धीर एकवटला, आणि येणा-या संकटाला तोंड
देण्यासाठी तयार झालो. तारीख ठरली ६ सप्टेंबर २०२१. हॉस्पीटलचे कपडे अंगाला
चिकटल्यासारखे वाटत होते, तरीही मी तयार होतो. ऑपरेशनला नेण्याच्या अगोदर ह्रदयात
धडधड वाढत चालली होती. काय होणार, ऑपरेशन यशस्वी होणार ना! पण शेवटी भितीवर मात
करत ऑपरेशनला सामोरा गेलो. ऑपरेशन यशस्वी झालं. त्यानंतर डॉक्टर जे जे उपचार करतील
त्याला न घाबरता धीराने तोंड दिले. मनात भिती वाटायची, पण मी दिर्घ श्वास घेऊन ती
भिती दूर सारायचो. छातीतून मरणाच्या कळा यायच्या, पण काहीही करुन मला बरं व्हायचं
आहे हा चंग मनाशी बांधून स्वत:च्या मनाला तयार करायचो. त्यामुळे वेदना सहन
करण्याची ताकद मिळत गेली.
माझ्या
बेडच्या आजूबाजूच्या बेडवर तर काही म्हातारी माणसं होती. त्यांच्याकडे असलेली
सहनशक्ती पाहून मलाही वेदना सहन करण्याचं बळ मिळत गेलं. हॉस्पीटलमधून मला घरी
आणण्यात आलं. तेव्हा कसोशीने स्वत:ची तब्येत जपण्यासाठी मी चालणे, फिरणे असा
व्यायाम करत राहिलो. ज्याच्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केला होता. आता मला साधं
जेवण चवीचं वाटू लागलं. त्यावेळी केले तसे जिभेचे चोचले आता मला नाहीसे करायचे
होते, म्हणून आहे ती परिस्थिती स्विकारली. आहारावर व वजनावर नियंत्रण मिळवले. नेहमीचे
व्यायाम चालूच होते. त्यामुळे तब्येतीत बराच फरक पडू लागला. एकदम अगतिक झालेले
माझे मन आणि शरीर हळूहळू भक्कम बनत गेले. आता दोन वर्षानंतरही मी माझ्या आहारावर
नियंत्रण ठेवले आहे, व्यायाम चालु ठेवला आहे. कारण शारीरिक आजारपणावर मात
करण्यासाठी मन आणि शरीर दोन्ही सशक्त राहिली पाहिजेत. सोबतच डॉक्टरांच्या
सल्ल्याने औषधे गोळया याही चालूच आहेत.
बायपासच्या
ऑपरेशनने मला हे दाखवून दिलं, की कठिण परिस्थितीतही आशावादी राहिलं तर आपण
कोणत्याही शारीरिक आजारपणावर मात करु शकतो. त्याचबरोबर जास्त ताण न घेणं, बाहेरचं
जंकफुड टाळणं आणि नियमित व्यायाम या गोष्टीही गरजेच्या आहेत.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा