उत्सवांचे बदलते स्वरुप
---------------------------------------------------------------------------------
आपला भारत एक संस्कृतीप्रधान
देश आहे. वेगवेगळे सण, उत्सव व परंपरा इथे जपल्या व
पाळल्या जातात. सगळे धर्म, पंथ इथे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. भारत देशाची
उत्सवाची परंपरा फार जुनी आहे. हिंदू धर्मात प्रत्येक महिना हा वेगवेगळे सण घेऊन
येत असतो. जानेवारी महिन्यात मकर संक्राती , फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्री,
मार्च महिन्यात होळी, एप्रिल महिन्यात गुढीपाडवा, रामनवमी, अक्षय तृतीया, जुन
महिन्यात वटपौर्णिमा, नंतर नागपंचमी असो वा चतुर्थी आणि दिवाळी. प्रत्येक महिन्यात
उत्सवांची रेलचेल चालूच असते.
प्रत्येक सणाचे स्वत:चे असे काहीतरी वेगळेपण असते, जे आपल्या संस्कृतीने
जपून ठेवलेले आहे. देवांच्या जत्रा असो वा देवळातले धार्मिक कार्यक्रम हा ही
उत्सवांचाच एक भाग. मकर संक्रातीला तिळगुळ देऊन वर्षभरातील गोडवा जपण्याचा संदेश
दिला जातो. तर होळी, रंगपंचमी हा रंगांचा सण साजरा करुन आनंदाची उधळण केली जाते.
मराठी नववर्षाची सुरवात घरावर गुढी उभारुन, गुढीपाडवा साजरा करुन केली जाते. तर
रामनवमी दिवशी श्रीरामांची पुजा-अर्चा केली जाते. जून महिन्यातील वटपौर्णिमा हा तर
नवरा-बायकोच्या नात्याचा सण. जुलै मधील नागपंचमी दिवशी नागोबाच्या मुर्तीची पुजा
केली जाते, अष्टमी ला श्रीकृष्णाची तर चतुर्थीला गणेशाची. त्यानंतर नवरात्रीला
देवीची पुजा करुन विजयादशमी साजरी केली जाते. दिवाळी हा दिव्यांचा सण साजरा करुन
घरी आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य केले जाते, व त्यांना पोहे, उसळ वगैरे नाश्ता
दिला जातो. नरकासुराच्या वधाचे निमित्त म्हणून कारटे फोडून पहाटे अभ्यंगस्नान केले
जाते. डिसेंबर महिन्यात दत्तजंयती उत्सवानंतर हिंदूंचे सण नसतात. त्यानंतर
प्रत्येक गावातील जत्रोत्सवांना सुरवात होते.
जत्रोत्सवात प्रत्येक गावाच्या जत्रेत एक वेगळेपण असते, वैविध्य असते.
कोकणातील जत्रोत्सवात तर दशावतारी नाटक हमखास असतेच. आपल्या परंपरेत उत्सवांचे
स्थान खुप मोठे आहे. लग्नसराई हा ही एक उत्सवाचाच भाग असतो. काळानुसार हे सण-उत्सव
साजरे करण्याची पध्दत बदलत चाललेली आहे. आता त्याच्यात दिखाऊपणा, फॅशनने शिरकाव
केला आहे. लोकमान्य टिळकांनी सर्वधर्मसमभाव जाणून गणेशोत्सवाची सुरवात केली होती. निसर्गात
पिकणारे धान्य, फळे किंवा कंदमुळे गणेशाच्या माटीला बांधून एकप्रकारे
गणेशपुजनासोबत निसर्गाचीही पुजा केली जात असे. घरात धान्याची आबाळ कधी होऊ नये,
यासाठी ही परंपरा होती. पण सध्याच्या काळात मात्र बाजारात मिळणारी प्लॅस्टिकची फळे
माटीला बांधली जातात. पुर्वीच्या काळी गणेशाचे विसर्जन साध्या पध्दतीने केले जाई.
लेझीम, ढोल ताशांची मिरवणूक व भजन-आरत्या करुन मिरवणूक होत असे, पण आता डिजेचा
कर्णकर्कश आवाज घुमु लागला आहे. त्या डिजेच्या आवाजाने भक्तीमय वातावरण निर्माण
होण्याऐवजी फक्त ध्वनीप्रदुषण होत आहे. आजच्या काळात गणेशोत्सवाच्या निमित्ताने
मोठमोठे देखावे करुन जो तो स्पर्धा करु पाहत आहे. मकरसंक्रातीचा उददेश आयुष्यात
गोडवा आणणे आणि सौभाग्याचे वाण म्हणून काहीतरी वस्तु देणे हा आहे, पण सध्या फक्त
डामडौल दाखवण्यासाठी महागडया वस्तु वाटल्या जातात. होळीच्या दिवशी रंगांचा सण
साजरा केला जातो. पण पाण्यात विरघळून जाणारे नैसर्गीक रंग न वापरता रसायन मिश्रित
रंग वापरले जातात, त्यामुळे त्वचेला अपाय होतो. दहीहंडी दिवशी सुध्दा मोठमोठया
आवाजात डिजे लावून, बॅनरबाजी करुन उंचच्या उंच मनोरे रचून दहीहंडी फोडली जाते. यात
बरेच वेळा लोक जखमी पण झाले आहेत. काहींना अपंगत्व आले आहे. पुर्वीच्या काळात दोन,
तीन किंवा चार थर लावून दहीहंडी फोडली जाई. सणाचं महत्व पाळलं जाई, परंतु ते
कालौघा नुसार कमी होत चालल आहे.
सण साजरे
करताना काही अपवाद वगळले तर सण, उत्सव, परंपरा आपली ओळख टिकवून आहेत. जत्रोत्सवात
होणारी गर्दी, चेंगराचेंगरी यांमुळे कधीकधी यांना गालबोटही लागते आहे, परंतु आपण
शिस्त पाळली, नियम बनवले तर असे अनुचित प्रकार घडणार नाहीत. डामडौल, भंपकपणा
बाजूला ठेवला तर सणांचे महत्व टिकून राहिल. काळानुसार काही गोष्टी बदलतात, हे
मान्य केलं, तरी सण-उत्सवांचे पावित्रय जपणे आपल्याच हाती असते. उदाहरणच दयायचं
झालं, तर लग्नसराईमध्ये पुर्वीच्या काळी जेव्हा घरी लग्नं व्हायची, तेव्हा जो थाट होता,
जेवणाच्या पंगतीची जी मजा होती, ती आता असते का? त्यामुळेच उत्सवांचे रुप बदलले, तरी
त्यांचे महत्व, त्यांचा उददेश टिकवून ठेवणे हे आपणा सगळयांचे नैतिक कर्तव्य आहे,
हे लक्षात ठेवायला हवे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा