आदिशक्ती

 

         


               दुर्गा आणि पार्वती दोन्ही जुळ्या बहिणी. राजापुरमधील आनंद देशमुख यांच्या मुली. आनंद देशमुख एक सरकारी निव्रुत्त अधिकारी.

         दुर्गा स्वभावाने खुप कडक तर पार्वती मवाळ, पण दोन्ही एकञ चालु लागल्या की पाहणाऱ्यांना ओळखणं कठीण होई.
         दोघीही कॉलेज पुर्ण करुन एकञच एमबीए ची तयारी करत होत्या.
वेळ- सकाळी १०.०० - आनंद देशमुख यांचे घर
    "दुर्गा, दुर्गा उठ. कॉलेजला जायचं नाहीये का?" पार्वती बेडवरून तिला उठवत होती.
"काय गं मला झोपु पण देत नाहीस." डोळे न उघडताच दुर्गा बोलली.
"अगं दुर्गे आज तो येणार आहे म्हटलं." पार्वती ने असं म्हणताच दुर्गा दचकत खाडकन बेडवर उठुन बसली.
"काय? यु मीन तो?" पार्वती मान डोलवते.
        तो. त्याच्या बोलण्यातच एक रुबाब आहे. तो ज्याच्यावर सगळ्या मुली लट्टु व्हायच्या. तो अगदी हैंडसम हंक, डॅशींग पण तेवढाच सगळ्यांना हवाहवासा वाटणारा शिवा. शिवा प्रतापराव पवार.   
            दुर्गा झटपट तयार झाली. पार्वती दुरुनच तिला पाहत होती. खरंतर तिचं मन अनावर शिवाकडे ओढ घेतं होतं, पण दुर्गा वेड्यासारखी शिवासाठी झुरत होती.
"कशी दिसतेय मी?" दुर्गा च्या प्रश्नावर पार्वती भानावर आली.
"तु काय सुंदरच आहेस दुर्गा. मेकअप केलास काय, ना केला काय." पार्वतीने हसुन म्हटले. खरंतर पार्वती ही सुंदर होती, पण गव्हाळ रंगाची. दुर्गा एवढी सुंदर नव्हती, पण तिचे साधे सोज्वळ रुप देखणे दिसायचे.
"अहाहा काय ही स्तुती माझी. माझी बहिणाबाई ती..." पार्वती चे गालगुच्चे घेत दुर्गा हसली आणि कलकलत बाहेर पडली.
"अग दुर्गे या पार्वतीलाही घेऊन जा की." आई ओरडली.
"नाही आई मी नंतर जाते, जाऊ दे तिला." पार्वती बोलली, तसे खांदे उडवत दुर्गा बाहेर पडली.
"किती अनलकी आहे मी, कॉलेजात जो तो या दुर्गेच्या मागे. मला कोणीच का पसंत नाही करत?" खट्टु होत पार्वती मागोमागच बाहेर पडली. पार्वती असा विचार करत होती, पण कोणीतरी तिच्यावर नजर ठेवुन होते.
"वा!काय सुंदरता आहे. काय तिची चाल, काय कंबर! अहाहा...." एक जाडा माणुस दुबिर्णीतुन पाहत हसत बोलला.
"अरे दे मला पाहु दे." एक रागीट चेहऱ्याचा माणुस खेकसत बोलतो.
       तो जाडा माणुस दुर्बीण देतो.
"हां, मस्त मस्त. त्या लाल पंजाबी ड्रेस मध्ये तर एकदम कडक दिसते बघ." महिष्वर चं लक्ष पार्वती वर असते.
"मालक किती दिवस असं आडुन आडुन बघणार? जावा आणि मागणी घाला की तिला!"
"ते तर मी करणारच हाय सर्जा." मिशांवरून पालथी मुठ फिरवत महिष्वर बोलतो आणि गालातच हसतो.
"मग माशी शिंकते कुठे?"
"सर्जा. अरे पहिलं नजरसुख तर घेऊ दे. अरे ही पार्वती आणि ती दुर्गा ओळखायला पण येत नाहीत, पण एक माञ खाञीनं सांगतो आपण पार्वती वरच नजर ठेवुन आहोत."
"ते कसं काय?"
"आरं दुर्गा कायम फिरत असते पुरुषांची कापडं घालुन. पण पार्वती आहाहा काय ते सौंदर्य. " महिष्वरच्या तोंडातुन लाळ टपकु लागते.
"मालक......" सर्जा तंद्रीत गेलेल्या महिष्वरला जागं करतो.
"हं हं . तर काय सांगत होतो?"
"पार्वती."
"हां पार्वती. अरे या महिष्वरला पाहिजे ती मुलगी मिळु शकते. ही पार्वती तर काय." सर्जा व महिष्वर हसु लागतात.
        दुर्गा कॉलेजला पोहोचलेली असते.
"दुर्गा...." तिची मैत्रीण विशाखा हाक मारते. दुर्गा थांबते तशी विशाखा जवळ येते.
"कायं गं दुर्गा, पार्वती कुठे आहे?"
"ती? येतेय मागुन?"
"मागाहून येतेय?पण का? काही झालयं का?"
"काही व्हायला कशाला हवं? तिची इच्छा नसेल माझ्यासोबत यायची. एनी वे विशाखा शिवा आलाय का गं आज?"
"शिवा......." विशाखा विचार करत पाहते. दुरवर मिञांच्या घोळक्यात तिला शिवा दिसतो.
"हे तो बघ शिवा....." विशाखा बोट दाखवते. समोरुन व हॅंडसम हंक शिवा पवार येत असतो.
"शिवा......" विशाखा हाक मारते.
"हे विशाखा....." हसतच शिवा विशाखा समोर येत शेकहैंड करतो.
"शिवा ही दुर्गा. माय फ्रेंड. हिला तुला भेटायचं होतं." दुर्गा डोळे वटारत विशाखा कडे पाहत तिला दटावते.
"ओह दुर्गा. नाईस नेम. बाय द वे का भेटायचं होतं मला?" शिवा हाताची घडी घालत बोलतो.
"ना.... नाही ते...." एवढी डॅशींग दुर्गा देशमुख ततपप करत असते.
"नाही ते काय? काही सांगायचं आहे का? " शिवा विचारतो.
"ते मला......."
"हे राहुल, " तो दुरवर एका तरुणाला हात दाखवत हसतो.
"मे आय...?" शिवा विचारतो. दुर्गा मान डोलवते, तसा तो निघून जातो.
"व्हॉट द हेल दुर्गा. अगं काय ते बोलायचं ना! " दुर्गा तशीच तरतरत क्लासरुमकडे निघून जाते.
        आपल्याच तंद्रीत पार्वती चालत असते. वाऱ्यावर तिचे केस भुरुभुरु उडत असतात, त्यामुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत असते, पण कोणीतरी तिचा पाठलाग करतेय हे तिला माहीत नसतं. पार्वती कॉलेजला पोहोचते. कोणाचे साधे लक्षही तिच्याकडे नसते. पण तिला त्याची पर्वा नसते‌. तिची नजर एकसारखी शिवासाठी भिरभिरत असते. पण ती खाली मान घालून जात असते. पाठलाग करणारा लपुनछपून तिला पाहत पुढे येत असतो.
"अं काय? कोणाचा पाठलाग चाललाय?" शिवा अचानक त्या माणसाला आडवा येतो. तसा तो माणूस घाबरुन पळतो.
"ए थांब....." शिवा दटावतो , आणि मागे वळत दूर जाणाऱ्या पार्वती कडे पाहतो.
"एक्सक्युज मी!" शिवा हाक मारतो तशी पार्वती दचकुन मागे पाहते. समोर शिवा उभा असतो. शिवाला पाहुन पार्वती लाजते. शिवा ही पार्वती च्या सोज्वळ रुपाकडे पाहतच राहतो.
"मघापासून एक माणूस तुमचा पाठलाग करतोय." शिवा बोलतो. तशी पार्वती चकित होते. शिवा दुरुनच तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहत असतो. तो जवळ जातो.
"दुर्गा?" तो तिला नीट पाहताच दचकतो.
"नाही पार्वती." पार्वती खट्टु होत जायला निघते.
"ओह. आय एम सॉरी. " पार्वती पुन्हा वळुन शिवाकडे पाहते.
"त्यात सॉरी कशाला म्हणायला हवं? असा गोंधळ खुप जणांचा होतो." पार्वती रागाने म्हणाली. ती रागावलेली पाहुन शिवाला हसु येत होते. पार्वती माञ उगाचच रागावल्यासारखे करत शिवाला न्याहाळत होती. आपलं प्रेम समोर उभं असलेलं बघुन तिच्या मनात काहुर माजलं होतं. शिवाही तिच्याकडेच पाहत उभा होता. थोड्यावेळाने दुर्गा चा विचार पार्वतीच्या मनात आला, आणि ती मागे वळली.
"ओ हैल्लो मिस......."
"पार्वती. पार्वती देशमुख नाव आहे माझं." ती पुन्हा वळत बोलली.
"हां तर मिस पार्वती. तुमच्यात मदत करणाऱ्याला थैंक्स म्हणायची पध्दत नाहीये वाटतं?" शिवा हसला.
"ओह सॉरी..."
"आं......" शिवा कान देतो.
"थैंक्स." पार्वती हसत निघून जाते. शिवा ही मागे वळत निघुन जातो.
        पार्वती कॉलेजच्या बाथरुममध्ये आरशासमोर उभी राहुन स्वतः ला न्याहाळत बोलते.
" का मी शिवाला खरंच आवडते? पण त्याला तर माझं नाव ही माहिती नाही." एकाएकी तिला आरशात दुर्गा दिसु लागते.
"पार्वती शिवा फक्त माझा आहे, माझा. बहिण म्हणुन त्याला तुझ्याशी शेअर नाही करु शकत मी." पार्वती डोळ्यांवर हात ठेवत दु:खावेगाने मागे वळते.
"पार्वती व्हॉट हॅपन्ड?" तिची मैञिण केतकी विचारते.
"काही नाही गं." म्हणत पार्वती निघुन जाते.
-------------------------------------------------------
     एके दिवशी महेष्वरची गाडी आनंद देशमुख च्या समोर उभी राहते. ऐटीत एखाद्या राक्षसासारखा धिप्पाड, द्रुष्ट चेहऱ्याचा महेष्वर उतरतो. तंबाखुची पिचकारी टाकत तो व त्याचा जोडीदार सर्जा आत जातात. सोफ्यावर दुर्गा -पार्वतीची आई बसलेली असते. खोटं हसत महेष्वर हात जोडतो.
"नमस्कार आईसाहेब, नमस्कार." पार्वती ची आई उभी राहते.
"तुम्ही? कोण आहात तुम्ही? आत कसे आलात?" ती थोडीशी घाबरत, दटावत बोलली.
"आईसाहेब अहो थोड्या दिवसांनी जावयी होणार आहे मी तुमचा. जावयाशी असं बोलतात का? काय रं सर्जा?" महेष्वर कपटीपणाने हसतो.
"कुणाशी लग्न करणार तु? कोणाचा जावयी?" रागाने ती बडबडते. तेवढ्यात आनंदराव बाहेर येतात.
"नमस्कार आनंदराव."
"कोण महेष्वर तु? का आलायस इथे?" आनंदरावांचा आवाज चढतो.
"तु... तुम्ही ओळखता याला? " पार्वती ची आई विचारते.
"ओळखतो म्हणजे काय चांगलाच ओळखतो." संतापाने आनंदराव महेष्वर कडे पाहतात.
"आनंदराव, अहो एवढा संताप बरा नाही जिवाला."
"तु का आलायस इथे ते बोल, नाहीतर निघ इथून." आनंदराव खडसावत बोलले.
"तुमची मुलगी. पार्वती हो. आमच्या मालकास्नी पसंद पडली हाय." सर्जा हसत बोलतो.
"पार्वती, तुझ्यासारख्या रानरेड्याला पसंत पडली आहे? हं.........अरे ती कुठे आणि तु कुठे? माझ्या मुलीच्या वाटेला जाऊ नकोस, चल निघ."
"आनंदराव......" महेष्वर आवाज चढवतो.
"मी विचारत नाहीये, सांगायला आलोय पार्वती मला आवडते आणि काही झालं तरी ती माझीच होणार."
"मुडद्या." पार्वती ची आई महेष्वरच्या जोरदार थोबाडीत मारते.
"चालता हो इथुन. माझी मुलगी काय रस्त्यावर पडली नाही."
"आनंदराव, या महेष्वरवर हात उचललायस तु. लक्षात ठेव याचे परिणाम वाईट होतील." महेष्वर तिरमिरीत बाहेर निघून जातो.
"तुला काय गरज होती त्याच्यावर हात उगारायची?" आनंदराव तिडकीने बोलले.
"अहो पण......."
"शांत रहा. तुला माहित तरी आहे का? तो कसल्या लायकीचा माणुस आहे?" पार्वती ची आई शांत राहते.
"आता काय होतयं ते बघु."
-------------------------------------------------------
"मालक, ओ मालक. थांबा की.." सर्जा हाक मारत असतो.
"माझ्यावर हात उगारते, माझ्यावर? महेष्वर आहे मी. "
"हो हो मालक. जरा सबुरीने घ्या. "
"मला सबुरीने घ्यायला सांगतोयस? नाही त्या पार्वती ला आपली बनवली तर बघचं तु." सर्जा हैराण होऊन पाहत राहतो.
"काय करणार मालक तुम्ही?"
"काय करणार? बघच तु." तरातरा महेष्वर निघून जातो.
-------------------------------------------------------
"अरे यार, किती वेळ वाट बघायची? आला कसा नाही तो?" दुर्गा चुळबुळ करत शिवा च्या येण्याची वाट पाहत होती.
"ए तो बघ आला." विशाखा बोट दाखवते, तशी दुर्गा उगाच मुरडते. शिवा येत असतो हसतच, तेवढ्यात समोर पार्वती जाते.
"हे पार्वती तु?" तो बोलतो.
      पार्वती घुटमळते.
"काय मग आज नाही कुणी पाठलाग केला?" शिवा हसतो. पार्वती ही हसते.
"ओह ही पार्वती कुठुन टपकली मध्येच? सगळ्यात हिची लुडबुड. पण हा शिवा का भाळलाय एवढा तिच्यावर? तिच्यापेक्षा मी किती सुंदर दिसते. तिला तर कोणी पसंतही करत नाही. सावळी कुठली." दुर्गा तडफडत असते.
"रिलॅक्स दुर्गा." विशाखा तिची समजुत काढते.
"रिलॅक्स? हं येऊ दे त्याला मग बघ विचारते कसं." संतापत दुर्गा बोलते.
"ए शिवा आला." विशाखा बोलते.
"हे गर्ल्स व्हॉट्स अप?" शिवा हसतो. दुर्गा दुसरीकडे नजर फिरवते.
"कोणाशी बोलुन झालं आहे की बोलायचं आहे?" रागाने दुर्गा विचारते.
"ओह तवा खुपच तापलेला दिसतोय बुवा. " शिवा खळखळून हसतो.
"शिवा.......मी इथे असताना तु त्या पार्वती शी एवढा काय गुलुगुलु बोलत होतास?"
"पार्वतीशी? ओ कम ऑन दुर्गा. अगं काय गुलुगुलु करणार आहे तिच्याशी?" शिवा बोलत होता, पण नजरेसमोर सावळ्या सुंदर रेखीव पार्वती चा चेहरा येत होता, तिचे मोकळे सोडलेले केस.......
"शिवा......." दुर्गेच्या हाकेने तो भानावर येतो.
"हां काही म्हणालीस का?" शिवा भांबावतो.
"लक्ष कुठे आहे तुझं? " दुर्गा रागाने बोलली.
"सॉरी दुर्गा जस्ट वन मिनिट." शिवा तसाच धावत जातो . एके ठिकाणी पार्वती उभी असते. तिचे दुसरीकडेच लक्ष असते. शिवा एकटक तिला, तिच्या कानातल्या कुड्यांना पाहत राहतो, आणि आपल्या केसांवरुन हलके हात फिरवत स्माईल करत निघून जातो.
        दुरवर उभी राहुन दुर्गा सगळं पाहत असते. ती पार्वती जवळ जाते.
"काय काळी जादू केलीयस तु?" दुर्गा रागाने विचारते.
"काय?काळी जादू?"
"उगाच वेड पांघरु नकोस पार्वती. मला काय म्हणायचे आहे तुला चांगलंच माहीत आहे, नसेल माहित तर माहिती करुन घे." रागाने तणतणत दुर्गा क्लासरुमकडे निघून जाते.
"ही अशी का बोलली?" काहीच न समजल्याने पार्वती अपसेट होते. त्यावर तिला आठवलं काही वेळापूर्वी ती व शिवा एकञ होते.
"म्हणजे ही मला शिवासोबत पाहुन चिडली आहे?" पार्वती विचार करत निघून जाते.
-------------------------------------------------------
          संतापलेला महेष्वर पोलिस चौकीत जातो. सगळे अदबीने उभे राहत पाहु लागतात.
"अरे महेष्वर साहेब......" चौकीचा इन्स्पेक्टर साबळे उभा राहत हात जोडतो. महेष्वर समोरच्या खुर्चीला संतापाने लाथ मारतो.
"महेष्वर साहेब......."
"अरे साहेब, साहेब काय करतोयस?" महेष्वर ओरडत बोलला.
"अहो काय झालं महेष्वर?" इन्स्पेक्टर साबळे काकुळतीला येत बोलला.
"काय झालं, कसं झालं नंतर सांगतो. त्या आनंद देशमुख आणि त्याची ती बायको दोघांना तुरुंगात टाका."
"काय? तुरुंगात? अहो पण का? काय केलंय त्यांनी?" साबळे घाम पुसत बोलतो.
"काय केलं? हात उचलला माझ्यावर?"
"काय? तुमच्यावर हात उचलला?"
"हे बघ साबळे त्याला दाखवुन दे मी एकदा मनात आणलं ते करुनच दाखवतो."
"स.... साहेब तु..... तुम्ही बसा, आपण बोलु." साबळे घाबरत बोलला. चौकीतल्या बाकीच्या सगळ्यांना फेफरं यायची वेळ आली होती.
"हं..... बसायला आलो नाही मी. लवकर ऍक्शन घ्या त्या आनंद देशमुख आणि त्याच्या बायकोवर." तणतणत महेष्वर सर्जाला घेऊन बाहेर पडला. साबळे व चौकीतल्या बाकींनी सुटकेचे श्वास घेतले.
"हुश्श....... बापरे!" साबळे खुर्चीवर बसतो, आणि समोरच्या ग्लासातलं पाणी गटागट पितो. जिवात जीव आल्यावर तो हवालदार कामतेला बोलवतो.
"कामते, चला आनंद देशमुख च्या घरी जायचं आहे." हवालदार कामते व इन्स्पेक्टर साबळे निघतात.

"अहो पण साहेब आम्ही काही नाही केलयं, कुठे नेताय आम्हाला?" हवालदार कामते नी आनंद देशमुखांचा हात पकडला.
"काय केलं? ते चौकीत गेल्यावर कळेल." इ.साबळे आनंदराव व त्यांच्या पत्नीला घेऊन जातात. दुर्गा व पार्वती कॉलेजला असल्याने त्यांना या घटनेची माहिती नसते.
"साहेब अहो काय झालं ते सांगा." आनंदराव हात जोडत बोलतात.
"अहो यांनी कुणाचं कधी वाईट चिंतलं पण नाही आणि तुम्ही त्यांना.." आनंदरावांची पत्नी मध्येच बोलली.
"हे बघा तुमच्या विरोधात महेष्वर साहेबांची तक्रार आहे मारहाणीची."
"अहो पण आम्ही काही नाही केलयं."
"मग मी खोटं बोलतोय काय?" इ. साबळेने आवाज चढवला.
"साहेब, साहेब अहो तो महेष्वर....."
"अं..काय म्हणालात?" इ. साबळे चिडला.
"सॉरी महेष्वर साहेब आमच्या घरी येऊन माझ्या मुलीला पार्वतीला मागणी घालत होते स्वतः साठी." आनंदराव हतबल होत बोलले.
"मग? त्यात काय चुकलं त्यांचं?"
"साहेब......." आनंदरावांची पत्नी ओरडली.
"काय चुकलं म्हणून विचारताय?"
"अं.... आवाज खाली बरं का मिसेस. देशमुख." इ. साबळे दरडावत बोलले.
"अहो तो माणुस....आय मिन महेष्वर साहेबांचे लग्न झालेलं आहे, वयही किती जास्त. अशा माणसाशी लग्न लावून देऊ माझ्या मुलीचं?"
"मग काय झालं? अहो राणी बनुन राहेल ती महालात." इ. साबळे व हवालदार कामते हसतात.
"साहेब........"
"ए आवाज चढवायचा नाही हं." तेवढ्यात महेष्वर आत येतो.
"ए साबळे अरे दमानं घे होणारे सासरेबुवा आहेत ते." महेष्वर व सर्जा हसतात.
       आनंदराव व त्यांच्या बायकोची नजर खाली झुकते.
"काय आनंदराव? पाहिलीस ना माझी वट? आता काय करशील?" महेष्वर संतापत बोलला.
"माझी चुक झाली महेष्वर साहेब. माझ्या पत्नीच्या वतीने मी माफी मागतो. अहो तुम्हाला पार्वती पेक्षाही चांगल्या मुली मिळतील. अहो तिचं कॉलेजही पुर्ण झालेलं नाहीये." गयावया करत आनंदराव बोलतात.
"दुसऱ्या मुली? हं...... मला पार्वती चं पाहिजे." महेष्वर ठामपणे बोलला.
       आनंदराव व बायकोने महेष्वर समोर हात टेकले. इ. साबळे ने त्या दोघांना घरी सोडले.
         खोलीत एकटीच बसलेली पार्वती शिवाच्या विचारात होती. दुर्गा माञ नट्टापट्टा करुन बाहेर गेली होती. आनंदराव व बायको हताशपणे बाहेरच्या खोलीत बोलत बसले होते.
"आता काय करायचं?" बायको बोलली.
"काय करणार आरती. महेष्वर शी सामना करणं मला तरी शक्य नाही."
"अहो पण पार्वती. तिच्या आयुष्याचा सौदा करताय तुम्ही." तेवढ्यात पार्वती बाहेर आली.
"अरे पार्वती बेटा..." आनंदराव बोलले. पार्वती उदास होती.
"काय गं काय झालं?" आरतीने विचारलं.
"आं......काही नाही आई." पार्वती बोलली. आनंदराव व आरतीला कसं बोलावं सुचत नव्हतं.
"बेटा एक गोष्ट बोलायची होती तुझ्याशी." आनंदराव चाचरत बोलले.
"हम्म..." पार्वतीने होकारार्थी मान हलवली.
"तुला आज संध्याकाळी तयार होऊन राहायचं आहे, तु.... तुला मुलगा पाहायला येणार आहे." पार्वती डोळे वटारत वर पाहते.
"कायं गं, अशी का पाहतेयस?" आरतीने विचारलं.
"अं...काही नाही."
"मग होशील ना तयार?" आनंदरावांनी पुन्हा विचारले.
        पार्वतीने मान डोलावली व ती आत निघुन गेली. दुर्गा माञ स्वतः च्या भावविश्वात रममाण होती. पार्वतीने माञ नकळतपणे आपल्या प्रेमाची तिलांजली द्यायचं ठरवलं. नकळतपणे एक चिट्ठी लिहुन तिने उशाखाली ठेवली.
         संध्याकाळी दुर्गा घरी आली. तिला सगळी लगबग दिसली.
"आई- बाबा काय हे ? आज कसलं फंक्शन आहे काय?"
"हो. आज मुलगा पाहायला येणार आहे पार्वतीला." आनंदराव हताशपणे बोलतात.
"काय? आपल्या पारु ला." दुर्गा हसते व सरसर वर जाते‌.
"पारो ए पारो. कुठे गेलीस?" दुर्गा तिला शोधु लागली.
"कुठं गेली ही मुलगी?" अचानक उशाखालची चिट्ठी तिच्या पायाजवळ पडली.
"हे काय आहे?" म्हणत दुर्गा ने चिट्ठी उचलली व उघडुन वाचायला सुरुवात केली.
"आज मी ही चिट्ठी लिहीत आहे कारण......कारण मला माहित नाही. ते शोधण्याची गरजही वाटत नाही. शिवा माझं प्रेम होतं, मरेपर्यंत ते दुसऱ्या कुणाचं व्हावं ही अपेक्षाही मनात नव्हती. पण त्या शिवापेक्षाही दुर्गेचं सुख महत्वाचं आहे. शेवटी आपल्या माणसासाठी त्याग करण्यात लाज कसली?आई- बाबांनी माझं लग्न ठरवलं आहे. कोणाशी! तर त्या महेष्वर शी. याला माझं प्राक्तन म्हणावं की कमनशिबीपणा, पण हा घोट घेण्यापेक्षा कुठेतरी दुर निघुन गेलेलं काय वाईट."
         दुर्गेचे डोळे पाणावतात. आपण जिच्यावर जळत होतो तिनेच स्वतः हुन दुर्गेला वाट करुन दिली होती. दुर्गेने टेबलवरील विवाह पञिका पाहिली. तिने मनाशी एक निश्चय केला.
"पार्वती तयार झालीस की नाही?" आरती खोलीत येत विचारु लागली.
"हं......" पार्वतीने मान डोलावली.
"चल खाली चल. ते आलेत पण." आरती चेहऱ्यावर कसनुसं हसु आणत बोलली. आरती खाली गेली. दुर्गा ने आरशात पाहिले, पार्वती सारखं दिसण्यात आपण कुठे चुकले तर नाही ना हे ती पाहत होती. पण जिथे आईला समजु शकले नाही तिथे तो हपापलेला रानडुक्कर काय ओळखणार होता.
       पार्वती जिना उतरुन खाली उतरु लागली. महेष्वर लाळ टपकवत तिला पाहु लागला. मोकळे सोडलेले केस, गव्हाळ, सावळा रंग तो तिला पाहतच राहिला.
        आनंदराव व आरतीला माञ त्याची नजर आवडली नाही. पण करणार काय? पार्वती समोर पायावर पाय रेलुन सोफ्यावर बसली.
"अगं सारखी बस...." आरती तिला सांगत होती.
"असुदे असुदे. बसु दे तिला, अशीच." हपापल्यागत महेष्वर बोलला आणि सर्जा कडे पाहु लागला.
"अगं दुर्गा कुठे आहे?" आनंदरावांनी विचारलं, तशी पार्वती च्या रुपातली दुर्गा दचकली पण क्षणभरच. तिने स्वत:ला सावरले.
"ती कुठेतरी बाहेर गेली असेल."
"अगं पण आत्ताच आली आणि......"
"काय करावं या मुलीचं , काय माहित?" आरती वैतागत बोलते.
     दुर्गा निराश होते. पण तिला पार्वती ची चिंता लागलेली असते. महेष्वर माञ वासनेने तिच्याकडेच पाहत असतो.
------------------------------------------------------
         कॉलेजमध्ये शिवाची नजर पार्वती ला शोधत असते.
"एक्सक्युज मी?" पार्वती ची खास मैञिण कमला थांबते.
"अगं पार्वती दिसली होती का कुठे?"
"पार्वती? म्हणजे तुला माहित नाही."
"काय?"
"अरे तिचं लग्न ठरलं आहे. "
"काय?" पार्वती चं असं अचानक लग्न. शिवा गोंधळतो‌ .
"दुर्गा कुठे आहे?"
"दुर्गा तर आलीच नाही. तीही कदाचित घरी असेल."
        शिवा तसाच धावत जातो.
-----------------------------------------------------
"हा हा हा हा पार्वती अखेर तुला माझी बनवली की नाही?" महेष्वर हसतो.
"आपल्याला मानपानाचं काही सांगायचं असलं तर...." आनंदराव हताशपणे बोलतात.
"हं..... मानपान वगैरे काही नकोय मला. ही मला हवी आहे आत्ताच. आत्ताच लग्न करणार आहे मी हिच्याशी."
"आत्ताच?" आनंदराव व आरती चकित होतात.
"हो, आत्ताच." दरडावत महेष्वर बोलतो.
            सगळ्यांत चलबिचल होते.
"मला जरा वॉशरुमला जायचं आहे." दुर्गा उठत आत जाते.
"छे पार्वती कुठे आहेस तु? कशी आहेस?" दुर्गा टेन्शनमध्ये येते.
"हां शिवा, त्याला फोन करते." दुर्गा शिवाचा फोन नंबर शोधुन कॉल करते. शिवा तडकाफडकी दुर्गा च्या घरी यायला निघालेला असतो, तो मध्येच थांबून कॉल रिसिव्ह करतो.
"शिवा......"
"दुर्गा.......अगं कुठे आहेस तु? आणि..... आणि पार्वती...."
"ती घर सोडून कुठेतरी गेलीये रे." दुर्गा मटकन खाली बसते. आसवांचे ओघळ वाहु लागतात.
"का.....काय? कुठे.....कुठे गेली? तिचं तर लग्न ठरलं होतं ना?
"लग्न? हं...... लग्न कसलं ते. सौदा ठरला होता तिचा त्या महेष्वरशी."
"मी मी येतोय तिकडे, आ...आपण बोलुया."
"नाही नको तु इकडे नको येऊस. तु पार्वतीला शोध. न जाणो तिने जिवाचं काही बरं वाईट केलं असेल तर....? दुर्गा च्या अंगावर काटा उभा राहतो.
"पार्वती......" खालुन हाक येते.
"हो हो आ.....आले." दुर्गा गडबडीने कॉल कट करते.
"हॅलो हॅलो, शीट..." शिवा मोबाईल बंद करतो, व पार्वती ला शोधायला निघतो.
-------------------------------------------------------
     दुर्गा खाली जाते.
"काय गं किती वेळ?"
"ते ते....मी आई...."
"आता लवकर चल. त्यांच्यासोबत हॉलवर जायचं आहे आत्ताच." आरती बोलते.
"काय?" दुर्गा चकित होते.
"मला जास्त वेळ वाट पाहायला लावणार आहेस काय?" महेष्वर बोलतो आणि बाहेर पडतो. आनंदराव, आरती दुर्गा ला सोबत घेऊन मागोमाग जातात.
            शिवा वेड्यासारखा पार्वती ला शोधत असतो. ती कुठे गेली असेल त्याचा अंदाज बांधत असतो.
"घरापासून जास्त दुर तर नाही गेली असणार, मग कुठे जाईल?" तो विचार करु लागतो.
"ड्रीम पार्क. ती तेथेच गेली असणार. " शिवा ड्रीम पार्क कडे जातो.
-------------------------------------------------------
"हां आता कशी नव्या नवरीसारखी दिसते." महेष्वर दुर्गेच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो, आणि हसत बोलतो. दुर्गा स्तब्ध राहते. आनंदराव व आरती हतबल असतात.
"काय आनंदराव, आता आम्ही जावयी झालो तुमचे. काय रे सर्जा?" महेष्वर हसतो, सर्जा ही सोबत हसु लागतो.   दुर्गा माञ चिंतेत असते.
          दुसरीकडे ड्रीम पार्क मध्ये शिवा पार्वती ला शोधत असतो. एके ठिकाणी बेंचवर बसलेली पार्वती त्याला दिसते.
"पार्वती....." अचानक शिवा ला समोर पाहून पार्वती दचकते व उठून जाऊ लागते.
"पार्वती थांब...." शिवा जवळ येतो.
"तु का आलायस इथे शिवा? तुझ्यासाठी दुर्गा जास्त योग्य आहे. माझं काय मी राहु शकते एकटी नाहीतर नाहीतर त्या महेष्वरची बायको बनुन." मोठ्या कष्टाने पार्वती बोलते.
"खुप मोठा त्याग करतेयस तु पार्वती, पण का? कशासाठी? मला तु आवडतेस. अगं रंग रुपावरुन माणसाची किंमत करायची नसते." पार्वती चे डोळे पाणावतात.
"हे बघ पार्वती. तु घरातुन निघुन जाण्याने प्रॉब्लेम सुटणार आहेत का?"
"नाही, प्रॉब्लेम तर सुटणार नाही. पण दुर्गेच्या मार्गातुन मी बाजूला होईन."
"आणि मग तिचं काय?"
"तिचं.....काय!" काहीशा आश्चर्याने पार्वती विचारते.
     शिवा काही वेळापुर्वी दुर्गा शी झालेलं सगळं बोलणं तिला सांगतो.
"म्हणजे दुर्गा त्या महेष्वरशी......."
"होय पार्वती, तुझं संकट तिने आपल्यावर घेतलंय. आपल्याला लवकर निघायला हवं." पार्वती आणि शिवा लगबगीने बाहेर पडतात.
           महेष्वर दुर्गेला घेऊन आपल्या बंगल्यावर येतो.
"हा हा हा हा अगं पार्वती आता तु माझी झालीस, माझी." वासनांध नजरेने पाहत तो दुर्गेच्या खांद्यावर हात ठेवतो,व हळुहळु खाली स्तनांना ही स्पर्श करतो. दुर्गेला भयंकर किळस वाटते. एक सणक तिच्या मस्तकात उठते.
" सर्जा सामान नेऊन आत टाक. अरे आज सुहागरात आहे आमची."
     तो नीच वासनांध माजलेला रानरेड्यासारखा महेष्वर खदाखदा हसत बोलतो. याआधी अशा कित्येक बायकांच्या शरीराचे त्याने लचके तोडलेले असतात, आणि आपली भुक भागवलेली असते.
        महेष्वर मागोमाग दुर्गा घरात प्रवेश करते. घर कसलं जणु महालच. उंची झुंबरे, मखमली गालिचे, उंची फर्निचर सगळ्या सुखसोयी हात जोडून उभ्या होत्या.  दिवाणखान्यात मधोमध एक उंच धिप्पाड अशी असुराची मुर्ती होती. बहुधा महिषासुराची असावी. त्याच्या एका हातात तलवार होती. डोळे तांबडे भयंकर वाटत होते. इतर कुठेही देवघर नव्हते, पण मोठ्या भिंतीवर प्राण्यांची मुंडकी माञ टांगलेली होती. समोरच्या भिंतीवर म्यान करुन ठेवलेल्या लखलखणाऱ्या तलवारी दिसत होत्या.
"अगं ये अशी पाहतेस काय? काय हवं ते मिळेल तुला. हा हा हा हा........"
       दुसरीकडे शिवा व पार्वती घरी पोहोचतात.
"पार्वती तु......? अगं पण तु आत्ताच महेष्वर सोबत......"
"ते मी नंतर सांगेन बाबा. आधी सांगा महेष्वरचा बंगला कुठे आहे?" पार्वती बोलते. आनंदराव तिला पत्ता सांगतात. मागे वळून न पाहता शिवा व पार्वती लगबगीने निघतात.
         इकडे महेष्वर दुर्गेला खसकन आपल्याकडे ओढुन घेतो. दुर्गेला तिडक मारते, ती संतापाने महेष्वरला पाहते.
"अगं अशी का रागाने पाहतेस तु पार्वती? तु तर माझी लग्नाची बायको आहेस." महेष्वर दुर्गेला पकडतो. दुर्गा धक्का देते.
"नीच माणसा, माझ्या बहिणीच्या जिवाशी खेळणार होतास? पण मी असताना तुझं हे स्वप्न कधीही पुर्ण होणार नाही."
"म्हणजे? को....कोण आहेस तु? पार्वती......."
"नाही. मी पार्वती नाही. तिची बहीण दुर्गा आहे दुर्गा."
       महेष्वरवर वीज कोसळते.
"दुर्गा.....!"
"होय दुर्गा. तुझ्या पापांचा अंत करायला आलेय मी." दुर्गा संतापाने बोलते.
"हा हा हा हा हा माझ्या पापांचा अंत? आणि तु करशील? थांब दाखवतोच तुला." महेष्वर दुर्गेवर झडप घालतो. दुर्गा नेम चुकवते, तशीच पळत ती बाहेर जाते.
"थांब कुठे पळतेयस? " महेष्वर तिच्या मागुन धावतो. दूर्गा भिंतीवर टांगलेल्या तलवारीतील एक तलवार खसकन बाहेर काढते.
"नीच माणसा, हा बघ तुझ्या पापाचा अंत." दुर्गा खसकन महेष्वरच्या पोटात तलवार खुपसते. भयंकर ओरडत महेष्वर खाली कोसळतो. तेवढ्यात सर्जा आणि काही गडी धावत येतात, पण तेवढ्यात शिवा येत त्या एकेकांना लोळवतो व पार्वती सह दुर्गे जवळ पोहोचतो.
"दुर्गा......" पार्वती हाक मारते.
          दुर्गा भावुक होत पाहते. शेजारी उभ्या शिवा कडेही पाहते.
   पार्वती धावत जात दुर्गेला मिठी मारते.
"दुर्गा अगं माझ्यासाठी तु हे......"
"शु बोलु नकोस. अगं तुला काय वाटलं, तुझी ही बहिण एवढी स्वार्थी आहे की स्वतः चा विचार करेल?" पार्वती चे डोळे पाणावतात. महेष्वर विव्हळत खाली पडलेला असतो. दुर्गा क्रोधाने त्याच्या जवळ जात त्याच्या छातीवर पाय ठेवते.
"महेष्वर बघ आज तुझा आणि तुझ्या वासनेचा कसा अंत झाला तो?" महेष्वर डोळे मिटतो.
      शिवा दुर्गा जवळ येतो. दुर्गा पाणावलेल्या डोळ्यांनी शिवा चा हात पार्वती च्या हातात देते, आणि काही न बोलता बाहेर पडते.
       बाहेर पडताच एक उमदा सा तरुण तिला पाहत समोर येतो.
"एक्सक्युज मी, मिस दुर्गा देशमुख?"
      दुर्गा नुसती मान डोलवत आश्चर्याने पाहते.
"मी श्रवण. श्रवण कुमार. खरतरं कसं सांगु कळत नाहीये." दुर्गा अजुनही चकित होते.
"मला तुमच्या पोस्ट खुप आवडतात, मी तुमची एक एक पोस्ट जपुन ठेवलीय, ही पाहा." तो कोटातुन एक पुस्तक काढतो, त्यात दुर्गेच्या तारीखवार सगळ्या पोस्ट चिकटवलेल्या असतात. दुर्गा भावुक होते.
"या पोस्ट?"
"हो, मला तुमचं लेखन, तुमच्या कविता आ... आणि..."
"आणि....."
"आणि तुम्ही सुध्दा." श्रवण पटकन बोलतो, पण नंतर जीभ चावतो.
"सॉरी......."
"का सॉरी का?"
"ते......मी तुला आय मिन तुम्हाला सांगितलं तुम्ही आवडता मला म्हणुन." चाचरत तो बोलतो. दुर्गेला त्याचं हे चाचरणं भावतं, आणि ती मोठमोठ्याने हसु लागते. तसा श्रवणही हसु लागतो. हसता हसता दुर्गा श्रवणच्या मिठीत सामावते. आयुष्याचा जोडीदार तिला मिळालेला असतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

द डायरी ऑफ लोस्ट व्हिलेज

क्रुपासिंधु