सोबती
शाळेकडे जाणाऱ्या त्या जंगलातील वाटेवरनं अज्या व परश्या आनंदात बोलत बोलत चालले होते. परश्या म्हणजे परशुराम एक ९-१० वर्षांचा चुणचुणीत हुशार मुलगा होता. तर अज्या म्हणजे अजय थोडा गबाळा, ढगळ कपडे असलेला. परश्याचे आई-बाबा चांगल्या कंपनीत नोकरीला होते, तर अज्याच्या आगे-पिछे कुणीही नव्हते. दोघे एकमेकांचे गाढ सोबती होते. पाठीवरील बैग सांभाळत परश्या पुढे चालत होता, मागुन अज्या चालत होता. पक्ष्यांचा किलबिलाट, ओढ्याचा खळखळाट ऐकत दोघेही ती वाट तुडवत होते.
"ए परश्या चल मी तुला आज नवीन गंमत दाखवतो." मागेच थांबत अज्या बोलला.
शाळेला उशिर होईल म्हणुन परश्या घाई करत होता.
"नको रे अज्या शाळेला उशीर होईल."
"हत एवढा घाबरतोयस? अरे मी आहे ना? बघतो काय करायचं ते"
मग परश्या मुकाट्याने अज्याच्या मागुन निघाला. दोघेही चालत एका छोट्या टेकडीवरून खाली उतरुन ओढ्याजवळ आले. जंगलातल्या त्या वाटेवरुन जाताना अज्याने त्याला बऱ्याच गमती जमती दाखवल्या होत्या. कधी आवळे-चिंचा काढणे, पोकळ बांबुचे फटफट असे आवाज काढणे , कधी पोळ्यातुन मध काढणे. अज्याची एक लकब होती, तो आपल्या गळ्यातील मारुतीची गदा असलेले छोटे लॉकेट बोटात पकडुन भिंगरीसारखे गोल गोल फिरवत असे.
"काय करणार आहेस अज्या?"
थोडावेळ ओढ्याच्या शांत प्रवाहाकडे पाहत तो बोलला.
"परश्या आज आपण मासे पकडायचे."
बाजुच्या मोठ्या खडकावर थपकल मारता मारता परश्या बोलला.
"अरे पण मासे पकडण्यासाठी आपण काही आणलेय कुठे?"
"ह्यां काय कशाला पाहिजे, बघ तुला मासे पकडुन दाखवतो."
म्हणता म्हणता अज्याने एक युक्ती वापरुन हातानेच काही लहान मोठे मासे पकडुन किनारी टाकले. परश्या तर खुशच झाला. अज्याने मग आसपासची सुकी काटकी आणुन गारगोटीच्या दगडाने जाळ केला, आणि त्यावर अज्याने पकडलेले मासे खरपुस भाजले. दोघांनी त्यावर यथेच्छ ताव मारला.
ओढ्याचे थंडगार पाणी ओंजळीने पिताना परश्या अज्याच्या कामगिरीवर खुश झाल्यागत बोलत होता.
"वा अज्या तुला असे पण मासे पकडता येतात?"
हातातले लॉकेट बोटाच्या भिंगरीने गोल गोल फिरवत अज्या बोलला.
"मग, उगाच नाय मला उस्ताद म्हणतात."
"अज्या तु ते लॉकेट सारखं गोल गोल का फिरवतोयस रे?"
तसा परश्याकडे पाहत अज्या हसुन बोलतो.
"आरं हे साधसुधं लॉकेट नाय. ही बघ तेच्यात मारुतीची गदा हाय."
अज्याचा थोडासा मुड झाला होता.
"मारुती?"
"हां व्हय. रामाचा भक्त मारुती. खुप बलवान होता. त्याने असे मोठे मोठे पर्वत आपल्या पंजात उचलले."
अज्या तिथलाच एक छोटा दगड उचलत त्याला दाखवतो.
मनातल्या मनात मारुती कसा असेल याची गाल फुगवुन परश्या कल्पना करु लागला.
"बघ माझ्या दंडातील बेटकुळी, उगाच नाय आहे." अज्या त्याला चिडवतो. परश्या पण मग आपले दंड पाहतो आणि काहीसा नाराज होत बोलतो.
"ए मग मी सुध्दा असं लॉकेट फिरवलं तर माझे पण दंड तुझ्यासारखे होणार?"
मघापासून दाबुन ठेवलेले हसु अज्याच्या तोंडुन पटकन निसटते.
"आरं असं लॉकेट फिरवुन कोणाचे दंड तयार होत नाही परश्या. त्यासाठी व्यायाम करायला पाहिजे."
थोडासा रुसुन परश्या तोंड फिरवुन बसतो.
"रागावला बघ रागावला. आरं मैत्रीत थोडाबहुत मजाक बनता है."
अज्याला अधुनमधुन हिंदी बोलण्याची हुक्की येत असे. परश्या मग उठतो, आणि हवेत तलवार फिरवल्याचा खोटा खोटा अभिनय करतो. त्याचे ते ध्यान अज्या पाहत असतो.
"मी पण आहे शुरवीर राजा. प्रधानजी माझा मुकुट आणा.'
कौतुकाने अज्या परश्याला हुजरा करतो आणि कागदी मुकुट तयार करुन परश्याच्या डोक्यावर ठेवतो.
"हो हो राजे, तुम्ही महान शुरवीर आहात."
त्यांचा हा खेळ चाललेला असतो तेवढ्यात पटकन कपाळावर हात मारत परश्या पुटपुटतो.
"अरे अज्या आपल्या या खेळापायी शाळा राहिली बघ. चल चल उशिर झालाय."
तसे दोघे भराभर एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवुन शाळेची वाट तुडवु लागतात. त्यांचे असे रोज खेळ चालायचे कधी सुरपारंब्यांचा खेळ, कधी झाडावरुन चिमणीचं घरट काढणे, कधी चिंचा आवळे करवंदे काढणे.
पंधरा मिनिटांची वाट अवघ्या पाच मिनिटात पार करुन ते शाळेजवळ पोहोचले.
"अज्या बराच उशिर झाला रे आज काय मार चुकणार नाही."
"अरे काळजी करू नको मैतरा. "
अजा परश्याला आपली योजना सांगुन त्याला तिथेच थांबवतो.
"पण अजा......."
"पण नाय आणि बिण नाय, चल जातो मी."
म्हणत अजा तडक वर्गात शिरतो. परश्या बाहेरच्या व्हरांड्यात कुणाला दिसणार नाही असा भिंतीआड लपुन राहतो. बाई उशिरा आल्याबद्दल बिचाऱ्या अजाला छडीचा प्रसाद देतात. तेवढ्यात गुपचुप परश्या आत येत आपल्या जागेवर बसतो. पोरांची तोंड बंद राहावी म्हणुन अजाने सांगल्याप्रमाणे त्यांना मुठ भरुन भरुन आवळे चिंचा देतो. हात चोळत चोळत अज्या मागच्या बेंचवर बसतो. त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य जराही कमी होत नाही, पण आपल्यासाठी अज्याने मार खाल्ला हे पाहुन परश्याच्या डोळ्यांतुन पाणी आलेले असते.
संध्याकाळी शाळा सुटल्यावर परश्या अजाला विचारतोच.
"अजा तु का माझ्यासाठी रोज मार खातोस रे? माझ्या वाट्याचा मार मला मिळु दे."
अजा परश्याच्या खांद्यावर हात ठेवतो.
"आरं नाय रं. परश्या तु माझा मैतर हायेस. तुझ्यासाठी मार काय जान भी हाजिर है."
अज्या स्वतःच्याच वाक्यावर बराच वेळ हसत राहतो, पण परश्या मात्र बैचेन होतो. दोघेही घराकडची वाट चालु लागतात. जंगलाची रोजची वाट येते. दोघेही आपल्या आवडीच्या जागी म्हातारीच्या खडपा कडे येतात. तिथुन ओढा खुप शांत दिसत असतो. मावळतीच्या सुर्याला पाहुन अज्या परश्याशी बोलत असतो.
"परश्या तो बघितलास, मावळतीचा सूर्य. दिसभर सगळ्या जगाला प्रकाश देऊन मावळतीला चाललाय. परश्या तुला बी या सुर्यावानी जगाला प्रकाश देणार व्हायच आहे."
परश्याला अजाचे बोलणे समजत नव्हते, पण तो त्या सुर्यबिंबाकडे टक लावुन पाहत होता. काळोख होऊ लागला तसे दोघेही भरभर करत वस्तीवर आले.
"परश्या चल उद्या भेटु."
नकळत परश्या अजाला मिठी मारतो, आणि दोघेही घराच्या दिशेला वळतात.
परश्या घरी येतो. त्याचे बाबा बाहेरच्या व्हरांड्यात बसलेले असतात. तर आई देवाजवळ दिवा लावत असते. धुपाचा मंद सुगंध दरवळत असतो.
"काय रे परश्या आज शाळेतुन यायला एवढा उशीर?"
परशुरामने चोरट्या नजरेने आईकडे पाहिले आणि तो सरळ आत गेला. पाठीवरची बैग सवयीप्रमाणे सोफ्यावर टाकली.
"परशुराम हात- पाय धुवुन देवाच्या पाया पड."
आई आत वळत वळत बोलते.
"या मुलाचे काही खरे नाही बघ. अगं कुण्या अजय नावाच्या उनाड मुलाशी मैत्री आहे म्हणे."
अस्पष्ट असे ते बोलणे परश्याच्या कानावर पडते तसा बाहेर येणारा परश्या मनगटाने डोळे पुसत तसाच धावत घरात जातो. आपल्या मैतराला उनाड म्हटलेले त्याला आवडलेले नसते.
"काय रे परश्या अरे येथे काय करतोयस? चल देवाच्या पाया पड."
अचानक भानावर येऊन तो आईकडे पाहतो.
"आई अज्या खुप चांगला आहे गं. तो उनाड नाहीये. तु सांग ना बाबांना."
"हो मी सांगते. चल आधी देवाच्या पाया पड पाहु."
परश्या थोड्या रागातच जाऊन देवाच्या पाया पडतो.
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे शाळेत जाताना तो अज्याला हाक मारतो, तसा ऐटीत अज्या घराबाहेर येऊन चालायला लागतो. वाटेत त्याच्या गमतीजमती सुरु होतात, पण त्याच्याकडे परश्याचे लक्ष नसल्याचे त्याच्या ध्यानात येते.
"काय रं परश्या. असा गप गप का? कुणी काही बोललं का?"
परश्या खाली मान घालुन अंगठ्याने माती उकरत बोलतो.
"अजा बाबांनी तुला उनाड म्हटलं, आणि तुझ्याशी गट्टी फु करायला सांगितलय. तु तर माझा मित्र आहेस ना बेस्टवाला. तर मी तुझ्याशी गट्टी फु कसा करेन?"
दुरवर वाहणाऱ्या ओढ्याच्या पाण्याकडे गंभीरपणे पाहत अज्या बोलतो.
"परशा ते तुझे बाबा आहेत. ते तुला काय बी चुकीचं नाही सांगणार. ते पहिले, नंतर आपली मैत्री."
"पण अजा मला तुला सोडायचं नाही."
अजा परश्याकडे पाहत बोलतो.
"आरं ये बाबा, तुला काय वाटलं, मी तुला सोडेन होय. आरं तुझी मैत्री ह्योच माझ्या जगण्याचा आधार. पण पहिली तुझी फैमिली आणि तुझं शिक्षण महत्वाचं हाय."
अजा उंच आकाशात उडणाऱ्या घारीकडे पाहतो.
"ती पाहिलीस अजा, घार. तुला बी असचं आकाश गाठायचं हाय. "
परश्या डोळे किलकिले करुन ती घार पाहण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याला ती दिसत नसते.
"काय बघतोस रं. चल या वक्ताला शाळेला लेट करुन चालणार नाही मित्रा. रोज रोज बाईंचा मार चुकवता येणार हाय होय?"
परश्या मुकाट्याने अजा मागोमाग चालु लागतो. म्हातारीचा खडप पार करुन ते जांभळीच्या झाडाखालुन जात असतात, एकाएकी परश्या ओरडतो.
"अजा चल पळ लवकर."
अजाला काही समजत नाही. परश्या त्याला हाताला धरुनच पळत सुटतो. कोणातरी वात्रटाने जांभळीच्या झाडावरील मधमाश्यांचे मोहोळ उठवलेले असते. परश्या व अजा मधमाश्यांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी पळत असतात, ओढा येतो. परशा काहीतरी विचार करतो, आणि झटकन अजाला ओढ्याच्या प्रवाहात ढकलुन देतो. आता मधमाश्या परश्याकडे आपला मोर्चा वळवतात.
"परशा अरं ये तु पण ये लवकर."
पण असं म्हणेपर्यंत मधमाश्यांनी आपले काम केलेले असते. परश्याला जागोजागी डंख लागलेले असतात. ओढ्याबाहेर येत अजा त्याची अवस्था बघतो. आपला मैतर आपल्यासाठी धावला हे पाहुन त्याला रडु कोसळते. पण मनावर ताबा ठेवत तो परश्याला उचलतो आणि तसाच वस्तीवर येतो. परश्याच्या घरी जाईपर्यंत अनेकांच्या नजरा त्याच्यावर खिळलेल्या असतात. पण त्याला परश्याची काळजी असते. तो परश्याच्या घराजवळ येतो, परश्याचे आई-बाबा कामाला जाण्याच्या गडबडीत असतात. अजा बाहेरुनच त्यांना हाका मारतो, तसे गडबडीत परश्याचे आई- बाबा बाहेर येतात. अजाच्या खांद्यावर परश्याला पाहुन परश्याची आई घाबरते.
"अहो काय झालं माझ्या परश्याला?"
अजा खांद्यावरुन अलगद आपल्या मैतराला उतरवतो. त्याला व्हरांड्यात आणले जाते. मधमाश्यांच्या डंखांनी तो पुर्ण सुजलेला असतो, आणि बेशुद्ध झालेला असतो.
परश्याचे बाबा त्याही अवस्थेत अजाकडे वळून त्याला बोलायची संधी सोडत नाहीत.
"तुच ना रे तो अज्या. परश्याला मी कैक वेळा सांगितले तुझा नाद सोडुन दयायला, पण नाही. निदान तुला तरी कळायला पाहिजे? कोण कुठला तु आणि परश्याला आपल्या नादी लावतोस. बघ त्याची अवस्था बघ."
"साहेब, परश्या माझा चांगला मैतर हाय. त्याचं वाईट व्हावं असं मला का वाटेल?"
"बघ बघ कसा तोंड वर करुन बोलतोय ते. इथपर्यंत परश्याला आणलसं ते ठिक आहे. यापुढे त्याच्या सोबत दिसायचं नाही, चल निघ."
काही न बोलता परश्याकडे पाहुन मुकाट्याने अजा निघुन जातो. डॉक्टर येतात, परशाला तपासतात. त्याच्या अंगातील काटे बाहेर काढले जातात. दोन दिवसांनी परश्याला पुर्ण बरे वाटते, तो शुध्दीवर येतो.
"अजा" परश्या शुध्दीवर येताच ओरडतो, तसे त्याचे आई बाबा धावतच त्याच्याजवळ येतात.
आई परश्याला कुरवाळते.
"बाळा शुध्दीवर आलास तु? बरं झालं देव पावला."
पण परश्याची नजर कुणाला तरी भिरभिरत शोधत असते.
"आई अजा कुठे आहे गं, मला त्याला भेटायचं आहे."
"बाळा अरे आधी तु काही खाऊनपिऊन घे, बघ कसा झालायस तो."
"नाही मला अजाला भेटायचय....."
"काय सारखं अजा, अजा करतोयस परश्या. तुला सांगितलं ना तो चांगला मुलगा नाहीये म्हणुन." बाबा आत येत बोलले.
"नाही बाबा असं नका बोलु."परश्याचा आवाज कापरा बनत होता.
"काय नको म्हणु? त्याच्यासारख्या मुलाच्या संगतीला लागुन बघ काय अवस्था झालीयं तुझी? तुला सहामाही परिक्षेत कमी मार्क्स मिळाले."
परश्या बेडवरुन उठतो.
"बाबा तुम्हाला माझा मित्र वाईट वाटतो ना. त्याने माझी किती मदत केली पाहायची आहे."
परश्या आपली बैग आणतो, आणि आपल्या होमवर्कच्या वह्या समोर ठेवतो. बैगेत चित्रांचे एक पुस्तकही असते. परश्याची आई ते उचलुन पाहते, तर बाबा वह्या उघडतात.
"बाबा, सहामाही परिक्षेला घरच्या तुमच्या भांडणात माझा अभ्यासच झाला नव्हता, अजाने माझ्यासाठी कसातरी होमवर्क केला. तोच अभ्यास करुन मी निदान परिक्षेत पास झालो."
बाबा त्या सगळ्या वह्या पाहतात, आता त्यांना अजयबद्दल थोडी आस्था वाटु लागते. परश्याची आई चित्रांचे पुस्तक पाहता पाहता रडत असते, पण डोळे पुसुन तिच्या चेहऱ्यावर हसणे उमललेले असते. कारण अज्या-परश्याच्या आठवणी त्यात बंद असतात.
"मला जायला पाहिजे बाबा. अजा माझी वाट पाहतोय."
म्हणत मागेही न पाहता तो तडक घराबाहेर पडतो.
"अजा, अजा कुठ आहेस तु?"
परश्याच्या हाका ऐकुन दामल्यांचा पुष्या बाहेर येऊन त्याच्या हातात एक चिट्ठी देतो. चिट्ठी उघडुन परश्या वाचु लागतो. ती अजाची चिट्ठी असते.
माझ्या प्रिय मैतरा,
तुझी माझी सोबत म्हणजे माझ्या जिंदगीचा सुखाचा काळ. आपली ही मैत्री खुप खास होती रं. तो सुरपारंब्यांचा खेळ, ते आवळा चिंच काढणं, पतंग उडवण नायतर झाडावर चढुन पक्ष्यांची घरटी काढणं. परश्या दोस्ता तुझी सोबत बरचं काही देऊन गेली रे. पण दोस्ती उपर आपली जिंदगी असते, ती घडवायची जबाबदारी आपली स्वतःची असते. मित्रा तुझ्या माझ्या दोस्तीखातर उंच आकाशात भरारी घेशील ना?
तुझा मैतर
अज्या
परश्या चिट्ठी खिशात ठेवतो, आणि धावतच माळरानाकडे जातो. वावटळ उठत असतं. मागुन परश्याचे आई बाबा पण येत असतात.
ओढ्याकडे त्याला बरीच गर्दी दिसते. अजाची नजर त्यात अजाला शोधत असते, तेवढ्यात त्याच्या कानांवर गर्दीची कुजबुज येते.
"आरं ह्यो तर तो अजा नव्ह?"
परश्याच्या काळजात धस्स होते. गर्दी फोडत तो आत शिरतो. समोर ओढ्याच्या पाण्यातुन अजाचा म्रुतदेह बाहेर काढुन ठेवलेला असतो. कुणीतरी बोलत असते.
"हा असा मी चाललो होतो गावात तेव्हा कोणतरी तरंगताना दिसलं, पाहिलं तर हा"
दोन दिवस पाण्यात राहिल्याने प्रेत फुगले होते. परश्या अजाकडे पाहुन ओरडतो.
"अजा........"
पण तितक्यात त्याचे आई बाबा त्याला सावरुन धरतात.
"अनाथ होता बिचारा, आत्महत्या केली असेल" गर्दीचा आवाज येत असतो.
परश्याचे डोके भणभणते. आपल्या मैतराच्या चेहऱ्याकडे पाहत तो धपकन खाली गुडघ्यावर बसतो.
"अजा उठ ना रे. काय झालय तुला, अजा......."
त्याचे ते केविलवाणे रडणे पाहुन एका म्हाताऱ्याचे काळीज हलते, त्याच्या खांद्यावर हात ठेवत तो बोलतो.
"बेटा, तो आता देवाघरी गेला रं. पुन्हा कधी परत येणार नाही."
परश्या वेड्यासारखा अजाला पाहत राहतो. एकदम त्याला त्याच्या बंद मुठीत काहीतरी दिसते. अजाचे लॉकेट, आणि मारुतीची गदा.
परश्याचा अश्रूंचा बांध फुटतो.
"नाही अजा तु मला सोडुन देवाघरी जाऊ शकणार नाही, अजा......."
सगळेच निस्तब्ध राहतात. काळही निस्तब्ध होतो.
"तु जाणार ना रं त्या घारीसारखा उंच आकाशात?"
परश्याला ते सर्व आठवत असते. अखेर अजाचे कलेवर उचलले जाते.
"परश्या मी कुठंबी गेलो, नसलो तरी कायम हसत राहायचं. वचन दे मला."
अजाचा तो चेहरा परश्याच्या नजरेसमोरून धुंद होत जातो. भानावर येताच तो पाहतो त्याचा सोबती त्याला सोडुन जात आहे. अंत्ययात्रेच्या मागुन तो त्याला थांबवायला धावत असतो, पण आता काळही त्याला थांबवायला असमर्थ असतो.
दमुन भागुन छोटा परश्या त्याच जांभळीच्या झाडाखाली धपकन बसतो. झाडावर दोन माकडं खेळत असतात, अचानक त्यातल्या एकाचा हात सुटतो, आणि तो खाली पडणार एवढ्यात त्याचा मैतर त्याचा हात पकडतो.
"अजा मित्रा, मला सोडुन जाऊ नको रे.....मला सोडुन जाऊ नकोस."
अजा त्या देहाच्या आवरणातुन मुक्त झालेला असतो, पण त्याच्या आत्म्याची सोबत अजुनही परश्यासोबत असतेच. मैत्रीचा झरा आटलेला नसतो.
------------------------------------------------------------------
मैत्री ही चिरंतन गोष्ट आहे. मैत्रीच्या झऱ्याने अनेकांच्या ह्रदयात प्रेमाचे उदयान फुलवता येते.
---------------------------------------------------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा