द डायरी ऑफ लोस्ट व्हिलेज
आज मी लिहायला बसलो आहे, पण काय लिहायचं हा प्रश्न मनात येतो आहे. माझ्या २५ वर्षांच्या सरकारी नोकरीत मला बरेच चांगले वाईट अनुभव आले, ते मांडायचे का? पण मन भुतकाळात शोध घेऊ लागले. तेव्हा मला सापडले असे एक गाव ज्याच्याविषयी लिहावेसे वाटेल.
मी राजाराम म्हात्रे. मुंब ईत महानगरपालिकेत अधिकारी आहे. माझ्या सोबत माझे खास सहकारी दामोदर देशमुखही होते. तसं सरकारी असुनही आम्ही शक्य तेवढ्या जलद कामांचा निपटारा करत असे. एकदा आमच्या विभागात एक नवीन अधिकारी बदलून आला, सोमनाथ कुलकर्णी. अतिशय शिस्तबद्ध आणि रेखीव काम व नवनवीन सुधारणांवर त्याचा भर होता. आमचं हळूहळू त्यांच्याशी जमत होतं. त्यांच्याकडुनच समजलं की ते ज्या गावातून आले तिथे तर काम करण्याची, एवढचं काय बाकीच्या गोष्टीही जगापेक्षा भारी व वेगळ्या आहेत. त्या गावाचं नाव होतं नवेगाव.
ते गाव मुंब ई पासुन १०० एक किलोमीटर वर होतं. साहेबांकडून त्याच्याविषयी ऐकताना तिकडे एखादी सहल काढावी असा विचार मनात येत होता. पण आमच्या विभागात कामाचा उबगच एवढा होता, की तो विचार कोणालाच परवडणारा नव्हता. एक दिवस आमच्या विभागातले काणे माझ्या टेबलपाशी येऊन म्हणालेही होते.
"म्हात्रे या जन्मात तरी तुम्हांला नवेगाव ला जायला मिळेल असे वाटत नाही."
त्याच्या या बोलण्याने मी आणि देशमुख अस्वस्थ होत असू. पण म्हणतात ना की कोणत्याही गोष्टीची मनापासून कामना केली की ती पुर्ण होते. साहेब असेच एकदा केबिनमध्ये बसले होते, बराच उशीर झाला होता. ऑफिस ची वेळ कधीच होऊन गेलेली असते, पण आमचं काम काही आटोपलेले नसते. तेवढ्यात साहेब बेल वाजवताच साहेबांचा शिपाई महादेव निरोप घेऊन आला.
"म्हात्रे साहेब, चला, तुम्हांला साहेबांनी बोलावलयं."
मी चमकुन त्याच्याकडे पाहत जागेवरुन उठलो. माझ्यासारखं देशमुखांनाही आत बोलावलं होतं. असेल काहीतरी काम म्हणून लगबगीने आत गेलो. देशमुख मला पाहून चमकले. साहेबांनी आम्हांला समोर बसायला सांगितलं. विषयाला मीच सुरवात केली.
"साहेब, एवढ्या तातडीने बोलावलतं?"
आमच्या दोघांच्या चेहऱ्यावर बैचेनी पसरलेली पाहून साहेब हसले. माझ्याकडे पाहत बोलु लागले.
"म्हात्रे एवढे बैचेन का झालात? तसं काही मोठं घडलं नाही."
आमच्या दोघांच्या जीवात जीव आला. पलिकडे खिडकीचा पडदा पंख्याच्या वाऱ्यामुळे हेलकावे घेत होता. साहेबांनी कपाटातील एक फाईल बाहेर काढून समोरच्या टेबलवर ठेवली, आणि मला पाहत बोलु लागले.
"आमच्या विभागाकडून संपूर्ण राज्यभरात एक मोहीम राबवायची आहे. त्यासाठी तुम्हा दोघांना एके ठिकाणी जाऊन काही कागदपत्रांचे काम पुर्ण करायचे आहे."
मी व देशमुखांनी एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहिले. साहेब पुढे बोलत होते.
"म्हात्रे, देशमुख तुम्हांला नवेगावला जाऊन तेथे काही कागदपत्रांचे काम पुर्ण करायचे आहे. त्यासाठी कार्यालयाकडून तुम्हांला सात दिवसाची भरपगारी रजा, जाण्यायेण्याचा प्रवासखर्च यांची तरतूद केलेली आहे."
मी व देशमुख आनंदातिशयाने खुर्चीवरून कोलमडायच्या बेतात होतो. पण आमचा आनंद साहेबांना न दाखवायचा असे ठरवून मीच पुढे बोलु लागलो.
"साहेब पण नवेगाव इथुन १२० कि.मी वर आहे. एवढ्या दूर आपलं कसलं काम आहे?"
साहेब थोडेसे निराशेने मला पाहू लागले. माझं मलाच कसतरी वाटतं होतं.
"म्हात्रे, तुम्हांला जायचं नसेल तर मी दुसरा माणुस पाहु का?"
अरे बापरे, हातची संधी जाणार होती, म्हणुन साहेबांसमोर मी सरळ शरणागती पत्करली.
"माफ करा साहेब. आम्ही जायला तयार आहोत."
साहेबांनी देशमुखांकडे पाहिले, तेव्हा त्यांनीही मानेनेच होकार दिला.
केबिनमधून बाहेर पडता पडता देशमुखांशी मी बोलत होतो.
"चला देशमुख साहेब. एकदाचं कसंही का होईना नवेगावला जायला मिळणार."
माझ्यासोबत देशमुखही खुश होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.
"हो ना म्हात्रे. साहेबांनी जणू आमच्या मनातील एक इच्छाच पुर्ण केली."
मी हसलो, साहेबांनी नवेगावला जाऊ देणे हा कदाचित योगायोग होता. घरी आलो, तेव्हा मला खुश बघून आमची 'ही' काय ते समजली.
"काय हो, कोणतीतरी गुड न्युज आहे वाटतं?"
जवळ जात तिला पाहत मी बोलु लागलो.
"बरं ओळखं पाहू."
माझी पत्नी मालिनी माझ्यापेक्षा हुशार होती, तिने पटक्यात सांगितलं.
"तुम्ही नवेगावला जाणार आहात. होय ना?"
अरेच्चा हिला कसं समजलं? काय मनातलं जाणते की काय ही." मी मनातच पुटपुटलो. तेव्हा मला भानावर आणत हीच बोलली.
"अहो तुम्ही सारखा सारखा नवेगावचा विषय काढायचात ना, म्हणून मला वाटलं, तुम्हांला तिकडेच जायला मिळणार आहे."
मालिनीचे मुख ओंजळीत धरून मी हसत हसतच तिच्याशी बोलत होतो.
"अगदी बरोबर मालिनी. ऑफिसातुन कुठेतरी जायला मिळणार म्हणुन नव्हे. तर माझी ओढ मला त्या गावाकडे ओढतेय."
त्या रात्री मी अगदी शांत झोपी गेलो.
२.
दुसऱ्या दिवशी अगदी पहाटेच जाग आली. हा त्या गावात जाण्याच्या विचाराचा परिणाम असावा. मी घड्याळात पाहिले. बरोबर सव्वा सहा वाजले होते.
"अरे आजच तर जायचयं नवेगावला. चला आवराआवर करायला हवी."
मी धडपडत बेडवरुन उठलो. मालिनीने माझ्या आधी उठून सगळी आवराआवर केली होती. मी तिला हाक मारली, तशी हातातलं काम टाकून ती आली.
"अगं मला उठवायचं नाही? आज जायचं आहे नवेगावला. माझी बैग भरायची आहे."
मालिनी हसली. माझ्याजवळ येत माझ्या हातात चहाचा कप देत बोलली.
"अहो काल रात्रीच तुमच्या सामानाची आवराआवर केलीय मी. चला नाश्ता करा."
मी पाहिलं तर बैग तयार होती. पण मला आधी ऑफिसला जावं लागणार होतं. कालच देशमुखांचा फोन आला होता, तिथुन काय काम असेल ते आवरुन निघायचं ठरलं होतं.
मी पटापट नाश्ता आटोपुन तयार झालो. मालिनीने हातात बैग देत म्हटले.
"तुमचं काम झालं, की जास्त उशिर करु नका. आणि मला फोन करत जा."
मी तिचा हात हातात घेतला, आणि तिच्याकडे हसून पाहत बाहेर पडलो. सकाळचे ८.०० वाजले होते. थंडीचा मोसम असल्याने वातावरणात अजूनही गारठा होता. मला ऑफिसला पोचायला बरोबर ९.००-९.१५ वाजणार होते. देशमुखांनी ट्रेनचे तिकिट काढले होते, म्हणून मी थोडा निर्धास्त होतो. पण नवेगाव सारख्या गावात रेल्वे स्टेशनपण असेल याचे मला राहून राहून आश्चर्य वाटत होते.
नेहमीप्रमाणे ८.१५ वाजता बस आली. बसमध्ये नेहमीप्रमाणे गर्दी होतीच. त्याच चेंगराचेंगरीत बसमध्ये शिरलो. बस चालु झाली, आणि एक जोरदार गचका बसला. बस खड्यातुन जात होती. मी वैतागत स्वतः शीच बोललो.
"शी......काय हे मुंबई चे रस्ते, आणि त्याच्यावरचे खड्डे."
बाकीचे लोक ही माझ्या वाक्याशी सहमत होत होते. हलत डुलत एकदाचा तो प्रवास आटोपला, आणि नेहमीप्रमाणे हैराण होत मी ऑफिसमध्ये शिरलो. देशमुख माझी वाटच पाहत होते.
"शी काय हो ही बसची गर्दी? बरं देशमुख तुम्ही केव्हा आलात?"
देशमुख खुर्चीवरुन उठत बोलले.
"आत्ताच १५ एक मिनिटे झाली असतील."
मी आणि देशमुख थोडा वेळ गप्पांमध्ये रंगलो.
"काही म्हणा देशमुख. पण हे गाव काहीतरी वेगळं असणार."
"कशावरुन म्हणताय तुम्ही म्हात्रे? अहो गाव काय गावासारखचं असणार. त्यात एवढं विशेष काही असेल असं मला वाटत नाही."
अशा आमच्या बराच वेळ गप्पा चालल्या. तोपर्यंत महादेवने दिलेल्या गरमागरम कॉफीचा आम्ही आस्वाद घेतला.
"बरं तिथे आठवडाभर राहायचं आहे. पण त्या ठिकाणी राहायची सोय आहे ना?" मी म्हात्रेला विचारलं.
"काही काळजी करु नका, म्हात्रेसाहेब. अगदी चांगल्या राहण्याची सोय आहे तिथे."
एकुण देशमुखांनी त्या गावाची बरीच माहिती केलेली होती. गप्पांंच्या ओघात १०.०० वाजले. साहेब ऑफिसात आले. काही थोडी कामे राहिली होती, ती आटोपून आम्ही बाहेर पडणार होतो. दु.१२.३० ची ट्रेन होती. कामाचा उबग आटोपता आटोपता १२.०० वाजुन कधी गेले ते मलाही समजले नाही आणि देशमुखांनाही. अचानक भानावर आल्यासारखे देशमुख ओरडतात.
"अहो म्हात्रे साहेब, आपली ट्रेन? आपल्याला जायचं आहे की नवेगावला?"
एकदम मलाही आठवल्यासारखे होते. घड्याळात १२.०५ झालेले असतात. स्टेशनवर पोचायला १५-२० मिनिटे तरी हमखास लागणारी असतात. आमची प्रलंबित कामे जवळजवळ आटोपलेली असतात, त्यामुळे साहेब आम्हांला जाऊ देतात.
"चला, चला देशमुख. ट्रेन चुकेल. उशीर होईल."
मी काही विचार न करता भरभर पळत जात होतो, तर माझ्या मागे देशमुखही पडत धडपडत धावत होते. सगळं दिव्य पार करुन शेवटी कसेबसे आम्ही स्टेशनवर पोहोचलो. मी पळतच स्टेशनमास्तरांकडे चौकशी केली. दुर्दैवाने ट्रेन पाच मिनिटांपुर्वीच गेली होती. मी आणि माझे सहकारी देशमुख हताश झालो. पण चौकशी केली तेव्हा समजले दुसरी ट्रेन बरोबर २.३० वाजता आहे. जवळजवळ २ तास बसावे लागणार होते. गार वारा सुटला होता, एका रिकाम्या बाकड्यावर आम्ही चांगले रेलुन बसलो होतो. समोरच एका गाडीवाल्यात आणि गिर्हाईकात बाचाबाची सुरु होती, ती मी ऐकू लागलो. तो गाडीवाला सांगत होता,
"साहेब इथुन विरार खुप लांब आहे जवळजवळ ७०-८० कि.मी. २५०/- रुपये होणारच. अहो पेट्रोल डिझेल किती महाग झालयं."
पण तो गिर्हाईक मानायला तयार नव्हता. माझ्या काळजात एकदम धस्स झाले, अजून दोन तासानंतर ट्रेन आली नाही, तर......असेच पैसे मोजावे लागणार. नवेगाव इथुन आहे १०० किलोमीटरवर, मग गाडीचे किती भाडे होईल? मी देशमुखकडे पाहिले. तर तो मस्त मजेत चणे खात बसला होता. जवळजवळ १५ एक मिनिटे झाली असतील, एक गाडीवाला मोठमोठ्याने ओरडत होता.
",चला, चला नवेगाव फक्त १५०/- रुपये."
मी जागेवरच उडालो. ऐकण्यात काहीतरी गफलत झाली असेल म्हणून पुन्हा लक्षपूर्वक ऐकू लागलो, पण यावेळीही तो नवेगाव १५०/- रुपये असाच दर सांगत होता. मी देशमुख ला हळुच कोपरखळी मारली. तसा तो माझ्या कडे पाहू लागला.
"अरे देशमुख, चल, तिकडे बघ फक्त १५०/- रुपयात नवेगावला जायला मिळणार."
काहीसा चकित होऊन देशमुख बोलला.
"अरे पण ट्रेन येणार आहे ना आपली? शिवाय तिकिटही काढले आहे."
मी त्याला बळेबळे हाताने उठवत बोललो.
"अरे राहू दे ते तिकिट. तिकिटाचे पैसे मी देतो. लवकर जायचं आहे ना आपल्याला? मग त्या गाडीवानाला विचारायला काय हरकत आहे?" लगबगीने आम्ही त्या गाडीवाल्याकडे आलो. मीच त्याला विचारायला सुरवात केली.
"काय हो. खरोखरचं फक्त १५०/- रुपयात नवेगावला घेऊन जाणार आहात काय?"
माझ्या या प्रश्नावर तो खळखळून हसला. माझ्याकडे व देशमुखकडे आळीपाळीने पाहत तो बोलला.
"नवेगावला पहिल्यांदाच जाताय वाटतं? अहो पेट्रोल- डिझेलचे दर वाढले तरी नवेगावला आम्ही अत्यल्प दरातच गिराईकाला पोहचवतो. अहो ग्राहक हा राजा नव्हे का?"
मला त्याच्या बोलण्याचे कौतुक वाटले. देशमुख मात्र काहीसा विचारात दिसला मला.
"पण तुमचं बाकीच्या गाडीवानांशी पटतं कसं?" देशमुख विचारत होता.
तो गाडीवान देशमुखला आपादमस्तक न्याहाळत बोलला.
"साहेब जमवून घ्यावं लागतं, चांगल काम करायचं असेल तर."
आम्ही मुकाट्याने त्याच्या गाडीत बसलो. गाडी चांगली मोठी, ऐसपैस होती. अगदी ए.सी ची सोय होती त्यात. मनाला खुप चांगले वाटत होते.
"काय हो. तरी किती वेळ लागेल नवेगावला पोहचायला?" मी सहज म्हणून विचारले. मुंबईत ले रस्ते, त्यावरील खड्डयांचा मला अनुभव होता, शिवाय ट्रैफिक जैम वगैरै.
"तिन तास लागतील बघा."
मी आणि देशमुखने एकाचवेळी त्याच्याकडे पाहिले.
"साहेब मला माहीत आहे, तुम्ही काय विचार करताय तो? गावातले रस्ते कसे असतील? खड्डे, स्पीडब्रेकर इ.इ. पण साहेब आमच्या नवेगावला जाणाऱ्या रस्त्यावर तुम्हांला एकपण खड्डा मिळणार नाही, पैज लावतो."
आम्ही त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होतो. गाडी सुरु झाली, आणि नवेगावच्या दिशेने आमचा प्रवास सुरु झाला.
३.
गर्द हिरव्या वनराजीतुन गावच्या रस्त्यावरुन आमचा आरामात प्रवास चालला होता. अजिबात कुठला त्रास होत नव्हता. खड्डयांची कटकट नव्हती. खरोखरच संस्मरणीय वाटला मला तो प्रवास. देशमुख तर चक्क घोरत होता. नवेगाव कसं असेल? खरोखरचं ते एका गावासारख असेल की शहरासारखं याचा मनाशी विचार चालु होता. एका ठिकाणी गाडी थांबली.
"चला साहेब नवेगाव आलं पाहा."
मी देशमुखला झोपेतुन जागं केलं. अक्षरशः जाबडत तो झोपेतुन जागा झाला, त्याला हसत हसत मी विचारलं.
"काय देशमुख स्वप्न वगैरे पडलं होतं काय?"
माझ्याकडे हसून पाहत तो जागचा उठला. आम्ही सामानाच्या बैगा घेऊन खाली उतरलो. एव्हाना त्या ड्रायव्हर चे नाव मला माहीत झालं होतं.
"सदाशिवराव प्रवास बाकी खुप चांगला झाला हं."
सदाशिवराव मनमुराद हसत होते. त्यांचे गाडीभाडे देऊन आम्ही चालायला लागलो. तसे मागुन सदाशिवरावांनी आम्हांला हटकले.
"साहेब इकडे कुणाकडे जाणार आहात तुम्ही?"
मी गावाच्या दिशेला नजर टाकत बोललो.
"पाहुया मामलेदार कचेरीत काम आहे? ते आटोपलं की राहायचं पाहता येईल."
मी गावाकडच्या वाटेवर उभ्या असणाऱ्या सुंदर नक्षीदार कमानी पाहत होतो. दुपारची वेळ असुनही एक सुगंधी हवेचा दरवळ तेथे दरवळत होता. पाना- फुलांनी केलेली तोरणे कमानींच्या वर सजवलेली होती. पाहून मनाला प्रसन्न वाटले. सगळा ताण दूर झाला, आपण येथे सरकारी कामासाठी आलो आहोत या गोष्टीचा विसर पडला. मी सदाशिवरावांकडे पाहिले, ते अजून तिथेच उभे होते. मला वळलेले पाहून ते बोलू लागले.
" साहेब काय पाहताय? अहो ही सजावट गावात कायमच केलेली असते. गावात येणाऱ्या पाहुण्याला गावाची ओळख व्हावी, त्याचा लळा लागावा हाच उद्देश असतो बघा."
मी आणि देशमुख कमानींचे प्रवेशद्वार ओंलाडून गावात प्रवेश केला. सात- आठ दिवस तेथे राहावे लागणार होते. राहण्याची व्यवस्था आहे की नाही याची मला व देशमुखला काही माहीती नव्हती. कामाच्या व्यापात साहेबांशीही बोलता आलेले नसते. तितक्यात माझ्या मघाच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला सदाशिवराव पुढे आले.
"साहेब राहायची चिंता करताय की काय? मुळीच चिंता करु नका. अहो या गावात एकापेक्षा एक चांगले लॉज कमी किमतीत उपलब्ध आहेत. सगळ्या शहरातल्या सोयींनी युक्त."
मी व देशमुखाची चिंताच मिटली. या अशा गावात खरोखरच असे लॉज वगैरे असतील असे वाटले नव्हते. मी सदाशिवरावांजवळ गेलो, आणि त्यांचेशी विनंतीवजा भाषेत बोलु लागलो.
"सदाशिवराव, खरचं तुम्ही एक चिंता मिटवलीत, पाहा."
सदाशिवरावांनी थोडे पुढे मागे पाहत म्हटले.
"पण साहेब तुम्ही आमच्या घरी या राहायला."
आम्ही सदाशिवरावांकडे पाहतच होतो की त्यांनीच स्पष्टीकरण केले.
"नाही म्हणजे तुमचा आणि आमचा चांगला परिचय झाला आहे. आणि तुम्हांला आमचं गावही जवळून पाहायचं आहे, म्हणून म्हटलं."
देशमुख काहीसा गोंधळला. पण मी मात्र हसून मान डोलावली, तसा तो ही तयार झाला. सामान घेऊन आम्ही निघालो. वडाचा पार आला, एक सुंदर पाणपोई तिथे होती. उदबत्ती चा मंद सुगंध दरवळत होता. मी आजुबाजुला पाहत होतो, ते हेरुन सदाशिवराव विचारते झाले.
"काय साहेब, काय पाहताय?"
थोडसं हसत हसत मी बोलू लागलो.
"उदबत्ती चा छान सुगंध दरवळतोय, तर मी म्हटलं की जवळपास कुठे मंदिर वगैरे आहे की काय?"
माझा हा प्रश्न अपेक्षित होता, पण सदाशिवरावांनी आपले बोट तडक दाटीवाटीने उभ्या असलेल्या व्रुक्षराजीकडे दाखवले.
"ते पाहा तेच आमचे मंदिर."
मी व देशमुख आश्चर्याने पाहु लागलो. मी म्हणालो.
"आं...कुठं आहे मंदिर?"
" अहो ती काय व्रुक्षराजी. हा निसर्ग म्हणजे देवच नाही का? "
आम्ही त्याच्या विधानावर सहमत झालो. पक्ष्यांचा मंजुळ नाद ऐकु येत होता. वडाच्या पारासमोर सर्कशीतल्या तिकिट काउंटर सारखे काऊंटर पाहुन देशमुख व मी हपापलो. सदाशिवरावांनी आमच्या चेहऱ्यावरच्या रेषा ओळखल्या, आणि ते बोलु लागले.
"घाबरु नका म्हात्रे साहेब. या गावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची या ठिकाणी नोंद घेतली जाते. हे गावाच्या आणि गावात येणाऱ्या पाहुण्याच्या सुरक्षिततेसाठी असते."
तोच काऊंटरजवळ चा तो माणुसही मध्ये पडला. त्याचे नाव होते दिनु. स्वच्छ सुंदर धोतर, सदरा असा पोशाख होता त्याचा.
"साहेब, मुंबईतुन आलात?"
मी "हो" म्हटले. मग मी व देशमुखने आमची ओळख करुन दिली. तसा दिनु बोलु लागला.
"साहेब, आमच्या गावात पशुपक्षी, फुले , झाडे यांचीही नोंद केली जाते बरं का."
मी सदाशिवरावांकडे पाहिले, तसे आपली टोपी सावरत सदाशिवराव बोलु लागले.
"तर आपणच निसर्गाचं संवर्धन नाही केलं, तर कसं होईल? आपला गाव त्यासाठीच तर आहे ना?"
दोघांनी मान डोलवली. असा विचार प्रत्येक गावाने, शहराने केला तर ग्लोबल वॉर्मिंग ची समस्याच उद्भवणार नाही.
"चला साहेब."
सदाशिवराव चालु लागले. त्यांच्यामागोमाग आम्ही चालत होतो. देशमुख त्या गावातल्या शिस्तबद्ध इमारती पाहत होता. तर मी काटकोनात छेदणारे रस्ते व कमालीची स्वच्छता. जी माझ्या आजवरच्या आयुष्यात अन्यत्र कोठेही मला पाहायला मिळाली नव्हती.
चौकाचौकातुन सुंदर प्रशस्त पण जुन्या गावाची आठवण करुन देणाऱ्या इमारती पाहत आम्ही सदाशिवरावांच्या घरासमोर उभे राहिलो. सदाशिवरावांनी आम्हांला घरात घेतले. अतिशय प्रशस्त व भव्य वास्तू होती ती, पण त्याला ग्रामीण जिवनाचा एक स्पर्श होता. सगळीकडे कमालीची स्वच्छता होती, आणि मुख्य म्हणजे सुबक अंगणाच्या बाहेर एक छानसी कचराकुंडी ठेवलेली होती. घराच्या जरा दूर एका ओळीत लावलेले खैर, साग, जांभुळ असे व्रुक्ष होते, आणि तिथे लागुनच गुरांचा प्रशस्त असा गोठा होता. विशेष म्हणजे गोठा जवळ असुनही कोणत्याही प्रकारचा दुर्गंध येत नव्हता किंवा मच्छर वगैरेचा त्रास होत नव्हता.
आम्हांला पाहून एक म्हातारीशी बाई बाहेर आली. वयाने साधारण साठीची असावी, तिने आमच्याकडे पाहत स्मितहास्य केले. सदाशिवरावांनी ओळख करुन दिली.
"ही माझी आई . निर्मलादेवी हिच नाव."
आम्ही दोघे त्यांच्या वाकून पाया पडलो. म्हातारीचे डोळे पाणावले, ती सदाशिवरावांना पाहत म्हणाली.
"सदाशिवा पाहुणे खरचं संस्कारी आहेत हो. आपली मातीची नाळ जाणणारे आहेत. आपल्या बाकीच्या परिवारालाही भेटव यांना."
मी सहजच विचारले.
"अजून कोण कोण राहतं तुमच्या सोबत?"
आजींना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर सदाशिवरावांनी दिले.
"आमचं एकत्र कुटुंब आहे. माझे दोन भाऊ, दोघांची लग्ने झालेली. माझे वडील काही वर्षांपूर्वी वारले. "
मला आश्चर्य वाटत होते. आत्ताच्या काळात शहरात असो वा गावात एकत्र कुटुंंबपध्दती कुठे शिल्लक राहिलीय? मी देशमुखकडे पाहिले, तो सारखा अंगणात रेखाटलेल्या सुबक रांगोळीकडेच पाहत होता. सदाशिवराव सांगत होते.
"आजच्या काळात एकत्र कुटुंंबे राहिलीयं कुठे? पण कोणीतरी पुढाकार घ्यायला हवा. आमच्या गावाने तो आदर्श पाळलाय. वर कोणत्याही प्रकारे भांडण तंटा होऊ न देण्याचा आमचा प्रयत्न असतो."
मी ऐकत होतो. संसार , कुटुंबसंस्थेत जमिन, एकत्र राहण्यावरुन भांडण तंटे, वाद- प्रतिवाद होतात, आणि हा ग्रुहस्थ मला आमच्या गावात तशा प्रकारची भांडणे होत नाही हा दावा करत होता. मी सदाशिवरावांची फिरकी घ्यायची ठरवली.
"पण अजिबातच भांडणं नसतील काय?"
तेव्हा माझा फिरकी घेण्याचा मुड पाहून सदाशिवराव बोलले.
"खरयं साहेब.संसार म्हटला की छोटी मोठी भांडणे होणारच. रुसवे फुगवे होणार, पण ते सर्व विसरून वावरायचं असतं. साहेब हेच आम्ही करतो. इथे पोलिस स्टेशनमध्ये कुठेतरी एक दोन किरकोळ गुन्ह्याच्या तक्रारी सोडल्या तर बाकी काही नाही. हवं तर तुमची इथल्या इन्सपेक्टर मानेंशी भेट घडवून आणतो. अहो जमिन जुमल्यासाठी खुन, अपहरण नाहीतर मुलींशी वाईट वागणूक असल्या प्रकारांना आमच्या गावात थाराच दिला जात नाही. माणसाने माणसाशी कसं वागावं याचं प्रशिक्षण देणारे वर्ग तुम्ही पाहिले, किंवा ऐकले आहेत का?ते वर्ग साहेब या गावात भरतात. अहो ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी च्या १६ व्या अध्यायात म्हटले आहे, दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य आणि अज्ञान या सहा गुणांच्या समुहाला आसुरी संपत्ती म्हणतात. काम क्रोध लोभ ह्या त्रिकुटामुळे अशुभ गोष्टींचा फैलाव होतो."
मी एकेक नवलच ऐकत होतो. सदाशिवरावांची वाचनाची आवड आणि अभ्यास लक्षात येत होता. पण या नादात आम्ही बरेच लांबून आलो हे कोणाच्याच लक्षात राहिले नव्हते. आजींनी दुधाचे ग्लास आणि दोन नाचणीच्या भाकऱ्या आमच्या समोर ठेवल्या तेव्हा आम्ही भानावर आलो. देशमुख चुळबुळ करत पाहू लागला. आम्हांला चहाची तलफ आली होती, पण इथे तर दुध भाकरी समोर होती. शेवटी देशमुखने कसेबसे तोंड उघडले.
"ते तुमच्याकडे चहा मिळत नाही का?" देशमुख एवढचं बोलुन गप्प झाला.
सदाशिवराव हसले. माझ्या कडे व देशमुख कडे पाहत बोलले.
"साहेब बरोबर आहे. चहा-कॉफीची तलफ येणारच. पण ही तलफ तात्पुरती असते. चहा-कॉफी कितीही झाली तरी क्षणिक उत्तेजना देणारी पेये आहेत. त्याच्या आहारी का जावं? मुळात कोणत्याच व्यसनांच्या आहारी का जावं? दारू, तंबाखू, सिगारेट सगळी व्यसनेच. व्यवस्था कशीही असो, आपण थांबलं पाहिजे ना?"
"पण हा तुमचा विचार झाला सदाशिवराव. या गावात अन्यत्र कुठे चहा वगैरे पित असतील ना?" माझा अपेक्षित असलेला प्रश्न आला.
तेवढ्यात खंडो सुतार दुरुनच सदाशिवरावांना हाक मारत आला.
"ओ सदाशिवराव. काय कसं काय? बरं आहे ना? केव्हा आला मुंबई वरंन?"
सदाशिवराव दुरुनच खंडेरावांकडे पाहत नमस्कार करतात. खंडोबा उंबरा ओलांडून आत येत सोफ्यावर बसतो.
"आजच आलो बघ खंडोबा. बाकी काय? तुझं बरं आहे ना?"
खंडो सुतार आमच्याकडे एकटक पाहत होता. वळून त्याने सदाशिवरावांना विचारले.
"हे मुंबईतुन आलेत वाटतं? "
तेवढ्यात मी हसुन त्याला माझी व देशमुखची ओळख करुन दिली. आजीबाईंनी मघासारखाच दुधाचा ग्लास खंडो सुतारा समोर धरला. खंडो सुताराने एका दमात ते पिऊन टाकले. मी आपला सदाशिवरावांच्या चेहऱ्याकडे पाहत होतो, तोच त्यांनी बोलण्यास सुरवात केली.
"बरं का खंडोबा, आमच्या पाहुण्यांना चहा हवी होती."
एकदम नकारदर्शक मान हलवत खंडो सुतार बोलला.
"या गावात तुम्हांला चहा - कॉफी पिणारे असले कोणी भेटणारच नाही. एवढचं काय कोणाला विडी- काडीचेही व्यसन नाही."
मी थबकलो. मोठे डोळे करत बोललो.
"आश्चर्य आहे."
सदाशिवराव परत बोलायला लागले.
" साहेब यात आश्चर्य कसले? तुम्हाला वाटलं असेल की गावात इतर ठिकाणी चहा- कॉफी घेतली जात असेल? पण साहेब एकदा माणुस व्यसनाच्या आहारी गेला की गेला, त्याला म्रुत्युच बाहेर काढु शकतो."
"पण जर कोणी काही व्यसन केलं तरं?"
खंडो सुतार चमकुन सदाशिवरावांकडे पाहतात, आणि बोलतात.
"तर त्याचे हातपाय तोडून वडाच्या झाडाला उल्टं लटकवतो आम्ही.
अहो ज्ञानेश्वरी च्या ३ऱ्या अध्यायात म्हटलेच आहे, मनुष्याने इंद्रियांचे लाड पुरवु नयेत. सहज खेळताना आग लागली आणि भडकली तर ती आवरता येत नाही. तसेच इंद्रियांचे लाड पुरवले तर मनुष्य इंद्रियांच्या स्वाधीन होतो आणि मग त्याला स्वतःला आवरणे कठीण होऊन बसते. "
मी व देशमुख घाबरलो. खरचं साहेब सांगतात, त्यात काही वावगं नव्हतं. या गावचं पाणी काही वेगळचं होतं, पण आजच्या काळातल्या प्रत्येक घटकावर चपराक ओढणारं होतं. सदाशिवराव खंडो सुतारकडे पाहून बोलत होते.
"अरे काय काम काढलसं, ते सांगतलं नाहीस."
खंडो सुतार आपल्या कापडी पिशवीतुन एक सभापत्रिका समोर करत सदाशिवरावांशी बोलु लागला.
"सदाशिवराव प्राणीमेळा भरणार आहे, त्याची संध्याकाळी ५.०० वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे चावडीवर."
देशमुख तिकडे पाहत बोलला.
"अरे वा. सभेची विषयपत्रिका? पण तुमच्या गावात अशी सगळ्यांना विषयपत्रिका दिली जाते?"
"मग काय? सभा कशावर आहे, त्यात प्रमुख विषय कोणते ते वैयक्तिक सगळ्यांना कळायला हवेत की नको? बाकी सभेत प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याची संधी असते." खंडो सुतार खुर्चीवरून उठत उठत बोलला.
"सदाशिवराव आम्ही पण येणार हां सभेला. तुमच्या गावातल्या इतर सदस्यांचीही ओळख करुन घेता येईल."
खंडो सुतार निरोप घेऊन बाहेर पडतो. दुपारचे २.०० वाजलेले असतात. आजी आम्हांला जेवणासाठी बोलवते.
"चला म्हात्रे साहेब, देशमुख साहेब. आता जेवायला चला. तुम्हांला खुप काही चांगलं पाहायला मिळेल या गावात राहून."
आम्ही आमच्या बैठकीवरुन उठलो, आणि सदाशिवरावां सोबत डायनींग हॉलकडे निघालो. डायनिंग टेबलवर सर्व मंडळी गोलाकार बसली. अतिशय शिस्तबद्ध रितीने जेवण वाढणे चाललं होतं. शुद्ध शाकाहारी जेवण होतं. मुख्यत्वे तेलाचा व खोबऱ्याचा वापर कमी केला होता. असे पौष्टिक अन्न यापूर्वी कुठे खायला मिळाले नसेल. देशमुख थोडासा हिरमुसला होता, त्याला वाटलं चांगली मेजवानी असणार. जेवण आटोपुन आम्ही बाहेरच्या सोफ्यावर बसलो. सदाशिवरावांनी बडिशेप आणुन दिली. मी आपला स्वस्थ बसलो होतो, पण देशमुख बोलता झाला.
"आम्हाला वाटलं मटण- चिकनचा बेत असेल?" मी चमकुन देशमुखकडे पाहिले, तो हळुच डोळा मारत होता.
"कसं आहे साहेब. चिकन मटण जेवढं चांगलं तितकच वाईट असतं बघा. तुम्हांला पाहिजे तर मी आणू शकतो. पण शाकाहार हा शुद्ध सात्विक आहार आहे, बरोबर ? ज्ञानेश्वर १७ व्या अध्यायात म्हणतात,
सत्वगुणी आहारामुळे देह निरोगी राहतो. राजस आहार मानवी देहामध्ये निद्रिस्त अवस्थेत असलेल्या रोगांना जागं करतो."
आम्ही मान डोलवली. सदाशिवराव पुढे बोलत होते.
"शिवाय हे चायनीज, तेलकट तळलेले पदार्थ हेच ह्रदय विकार, ब्लडप्रेशर, किडनी खराब होणे, पोटाचे आजार अशा रोगांना निमंत्रण देतात. यावर तुमचं काय मत आहे?"
मी वळून देशमुख कडे पाहिले. देशमुख समोरच्या वाटीतील बडिशेप खात होता. सदाशिवराव हसले, मला कससचं वाटलं. पण त्यांनीच पुढे बोलायला सुरवात केली.
"साहेब, वाईट वाटुन घेऊ नका, तुम्हाला मी एकेक सांंगतोय म्हणून? पण जे सत्य आहे तेच मानुन पुढे जातो आम्ही. ज्ञानेश्वरांनी ४थ्या अध्यायात म्हटलेच आहे ज्ञानाइतकी पवित्र वस्तू या जगात नाही. त्याच्या अंगी उत्तम सामर्थ्य आहे. ज्ञानापुढे मनातील अज्ञान टिकत नाही."
मला या गावातील माणसे कुठल्या मातीने बनलेली आहेत, ते पाहायचं होतं. शेवटी मी व देशमुख विश्रांती साठी आतल्या खोलीत निघून गेलो. संध्याकाळी सदाशिवरावांसारखे बरेच असामी भेटतील या जाणीवेने मन उत्साहीत होत होते. सायंकाळचे ५.०० वाजत आले. सदाशिवरावांनी आम्हांला झोपेतून जागं केलं. देशमुख आणि मी जांभ ई देत उठलो. सदाशिवराव तयारच होते. आम्ही आमची तयारी करुन त्यांच्यासोबत घराबाहेर पडलो.
मधला विस्तीर्ण चौक ओलांडून आम्ही पुढे जात होतो. गावात अतिशय स्वच्छ अशी सार्वजनिक शौचालये उभारण्यात आली होती. कचराकुंड्या ठेवण्यात आलेल्या होत्या. पाण्याची सोय करण्यात आली होती. बंदिस्त गटारे होती. सर्व पाहत पाहत आम्ही चावडीवर आलो. बरोबर ५.०० वाजता सभेला सुरवात झाली. गावातले सगळेजण त्या सभेला हजर होते. सदाशिवरावांनी आपली जागा पकडली. मी व देशमुखही एका ठिकाणी बसून सभेचे कामकाज पाहू लागलो. अध्यक्षस्थानी गावाचे पाटील विश्वास राव होते. विषयपत्रिकेप्रमाणे कामकाज सुरु झाले. प्राणीमेळा विषयावर बऱ्याच जणांनी आपल्या सुचना मांडल्या. गावातल्या ग्रंथालयात नवीन लेखकांची पुस्तके अल्प किमतीत देण्याचा विषय घेण्यात आला. त्यानंतर गावमहसुलाचे नियोजन, इतर कामांचा आढावा घेण्यात आला. सायंकाळी ६.०० वाजता सभा संपली, तसे सदाशिवरावांनी आपल्या काही खास माणसांशी आमची ओळख करुन दिली. त्यात पाटीलही होते. आम्ही त्यांना आमची ओळख करुन दिली. पाटील बोलले.
"काय साहेब, कशी वाटली आमची सभा?"
" एकदम चांगली व शिस्तबद्ध. आमच्या येथे तर एखाद्या विषयावर खडाजंगी केली जाते."
"साहेब, तंटे उकरुन काढायला कारणं लागत नाहीत. एखाद्या विषयाची गरज लक्षात घेऊन काम केलं पाहिजे. आमच्या गावात खरीखुरी लोकशाही नांदते, कसं ते पाहा."
पाटील व्यासपिठाच्या समोर ठेवलेला लेटर बॉक्स उघडून दाखवतात. त्यात सुवाच्य अक्षरात अनेक व्यक्तींची पत्रे असतात.
"साहेब, गावच्या, शहराच्या विकासात लोकांचा सहभागही तितकाच महत्वाचा आहे ना. उगाचच पदाचा आव आणुन आपलचं घोडं दामटणं यामुळे खरी कामे बाजुलाच राहतील. या लेटर बॉक्स मध्ये शेतकरी असो, सुतार असो की अधिकारी सर्व स्तरातील पत्रे असतात."
मी तो लेटर बॉक्स कौतुकाने पाहत होतो. आजच्या ई मेल, व्हॉटस अप च्या काळात त्या गावाने पत्रांचे महत्त्व जपले होते.
"पण अशी पत्रे शिक्षित लोकांकडुनच येतील, बाकी अशिक्षित लोकांच काय?"
पाटील मिशीवरुन मुठ फिरवतात.
"साहेब, कोण अशिक्षित असलं तर दाखवा."
मी आणि देशमुखने त्यांच्याकडे पाहिले.
"शिक्षणाचं महत्व आम्ही जाणतो साहेब. त्याहीपेक्षा एखाद्याच्या कर्तृत्वाला महत्व आहे. या गावात दोन उच्च शिक्षण देणारी कॉलेज आहेत. परदेशातील शिक्षण ऑनलाईन व दुरस्थ पध्दतीने दिले जाते. त्यासाठी मुला मुलींना शहराची वाट धरावी लागत नाही."
"पण नोकरी धंद्यासाठी जावं लागत असेलच ना?"
पाटील गावकऱ्यांकडे पाहत असतात. तेवढ्यात गणोबा नावाचा माणूस समोर येतो.
"अहो गावातच रोजगार उपलब्ध असताना शहरात का जायचं?"
आम्ही चमकुन त्याच्याकडे पाहिले. पाटील बोलत होते.
"हो साहेब. सगळेच जण शिकुन शहराकडे जायला लागले, तर गावं ओस पडायची. आपला देश गावात वसतो, जर इथे चांगले रोजगार उपलब्ध झाले, तर शहरातला लोंढा कमी होईल. शिवाय सुशिक्षित बेकारही राहणार नाहीत."
"पण पाटील. विविध क्षेत्रात शिक्षण घेणारे विद्यार्थी त्या पेशासाठी बाहेर जाणारच ना?"
"ते बाकी खरं. आमच्या गावातुन एमपीएससी/ युपीएससी मध्ये किमान दोन तरी विद्यार्थी प्रत्येक वर्षी निवडून येतात. शिवाय इतर वेगवेगळ्या क्षेत्रात आमच्या गावातली मुले चमकत आहेत. पण या सर्वांना या गावच्या मातीने आपल्याशी बांधून ठेवलं आहे."
तेवढ्यात देशमुखने मला घरी जायला उशीर होत असल्याची जाणीव करुन दिली. सदाशिवरावांनी सर्वांचा निरोप घेतला. पाटीलांनी सगळ्या गावकऱ्यांना पाहत पुन्हा एकदा सांगितले,
"चला, यावेळचा प्राणीमेळा दरवर्षी प्रमाणे यशस्वी करुया."
सगळे गावकरी पाटलांचा निरोप घेऊन आपापल्या घरी गेले. सदाशिवरावांसोबत आम्ही आमच्या घरी आलो. मनात पाटलांचे विचार घोळत होते. खरचं गावात ग्रामीण जिवनावर रोजगार उपलब्ध झाले तर शहरात अवास्तव वाढलेली लोकसंख्या, बकाल वस्ती आणि परराज्यातील कामगारांचे अतिक्रमण या सर्व समस्या थोड्या तरी दूर होतील. आपण मराठी माणसं हा विचार का करत नाही?
सायंकाळचे साडे सहा- सात वाजत आले होते. गावातला पहिलाच दिवस मुंबईतील शहरीपणाची आठवण विसरवून देणारा होता. खोटे मुखवटे घेऊन वावरताना सत्याकडे डोळेझाक करणाऱ्या आमच्यासारख्या सुशिक्षित माणसांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे काम एक गाव करत होते. सदाशिवराव एकटेच गोठ्यात आपल्या बैलांना गोंजारत होते. चांगली खिल्लारी बैलांची जोडी होती. देशमुख दमला होता. तो आत जाऊन खोलीत बसला. मी उठलो, आणि गोठ्यात गेलो. मला पाहताच बैलाच्या पोळ्यावरुन हात फिरवणारे सदाशिवराव थांबले.
"अरे म्हात्रे साहेब. या . गोठा पाहायला आलात?"
"नाही हो. या गोठ्यापेक्षा गोठ्यातील जनावरं आणि त्यांना माया लावणारे मालक बघायला मिळणं ही धन्यता."
सदाशिवराव हसले.
"लाख बोललात साहेब तुम्ही. आमच्या गावचा गुण म्हणायचा हा."
मी व सदाशिवराव दोघे हसू लागलो.
"साहेब मुक्या जनावरांना माया लावली की ती आपली होतात. माणसांना मात्र काही वेळा मायेपेक्षा स्वार्थ महत्वाचा वाटतो. त्यांची हाव कधीच संपत नाही. म्हणुन तर देवाला पुढं करुन कोंबडया मारल्या जातात, बकरे कापले जातात. नाहीतर गावपारध करुन डुकराची शिकार केली जाते. ज्ञानेश्वर सातव्या अध्यायात सांगतात, स्वतः चे भले व्हावे म्हणुन भक्त देवाकडे येण्याचा प्रयत्न करतात. पण गाय ज्याप्रमाणे वासराला आपण होऊन दुध देते तसे ज्ञानी भक्तांना देव आपण होऊन प्रेम देतो. त्याने त्यासाठी कोणत्याही कर्मफलांच्या आकांक्षाचे ओझे धारण केलेले नसते."
मी सुन्न झालो. काही गावात देवाला बोकड, कोंबे देण्याची पध्दत होती. पण बिचाऱ्या त्या जनावरांच काय पाप? असं मलाही वाटायचं. पण शास्त्रापुढे मी हतबल होतो. इथे एक गावातला माणुस मला भूतदया समजावत होता. क्षणभर मला संत एकनाथांची आठवण झाली.
"साहेब, कुठे हरवलात? चला, माझी बडबड काही थांबायची नाही. आता घरात जाऊया."
मी मुकाट्याने सदाशिवरावांच्या मागुन घरात शिरलो.
४.
रात्रीचे ९.०० वाजले . जेवणाची वेळ झाली, नेहमीप्रमाणे हसत खेळत आमची जेवणं आटोपली. बराच वेळ मला झोप येत नव्हती, म्हणुन मी माझ्या बायकोला मालिनीला फोन लावून तिच्याशी बोलत होतो. एवढ्यात सदाशिवरावांच्या आई बाहेर येऊन बसल्या. मी फोन ठेवून दिला, आजीबाई माझ्याशी बोलत होत्या.
"काय साहेब १०.०० वाजत आलेत, अजून झोपला नाहीत? अहो लवकर निजे, लवकर उठे त्याला दिर्घायुष्य लाभे अशी उक्ती आहे नाही का?"
मी सावरुन बसलो, आणि बोलु लागलो.
"बरोबर आहे आई तुमचं. पण आज जरा झोप येत नव्हती."
आजीही माझ्याशी पुढे बोलु लागल्या.
"साहेब आमचं गाव कसं वाटलं तुम्हाला?"
मला त्यांनी साहेब म्हणण मला कससचं वाटू लागलं.
"आई मला प्लीज साहेब नका म्हणू. अहो तुमच्यापेक्षा खुप लहान आहे मी."
आजी माझ्याकडे पाहत राहिल्या.
"आई, मी सदाशिवरावांच्याच वयाचा आहे. तुम्ही मला राजाराम म्हणा."
आजीबाई हसतात.
"ठिक आहे, राजाराम."
आता मलाही त्यांचेशी खुप बोलावसं वाटु लागलं.
"आई बाकी आवडलं हं तुमचं आदरातिथ्य, आणि हे गावही."
"घरी आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य ठेवणे ही तर आपली परंपराच आहे. मातीचे संस्कार विसरुन कसे चालतील? 'उतु नको मातु नको घेतला वसा टाकु नको' या उक्तीप्रमाणे जायचं असतं."
"खरं आहे आई. आजच्या काळात गावचं गावपण हरवत चाललय. पण ते जपलय तुमच्या गावात. राळेगण सिध्दीचा रोल मॉडेल आहे असं वाटतं."
आजीबाई काहीशा उदास होतात.
"मुला, विकासाचे रोल मॉडेल समोर ठेवुन विकास होत नसतो. त्यासाठी ती ठिणगी प्रथम पडावी लागते, तरच हा विकासाचा, बदलाचा वणवा पेटत जातो."
मी हैराण झालो. एवढी विचार करण्याची कुवत या माणसांकडे येते कुठून? मला प्रथमच माझे शिक्षण बेगडी वाटु लागले. विषय बदलत मी विचारले.
"आई, सदाशिवराव ही अगदी तुमच्यासारखचं बोलतात. बोलणं ऐकत राहावसं वाटतं. किती शिक्षण झालयं त्यांच?"
आजीबाई खिन्नपणे हसतात.
"सदाशिव चे वडिल तो लहान असतानाच वारले. त्यानंतर गरीबीचे चटके आम्हीही सहन केले. पण सदाशिवने हार नाही मानली. या गावची माती कोणाला हतबल बनवु देत नाही. मेहनतीने त्याने ही गाडी घेतली, आता त्या व्यवसायात चांगली कमाई होते त्याची."
"पण आई शिक्षण.....?"
"सदाशिवचं फक्त दहावीपर्यंतचे शिक्षण झालयं, पण अजुनही त्याची शिकण्याची ओढ कायम आहे. जसा वेळ मिळेल तसा वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन करत असतो. ती त्याची भुकच आहे म्हणा ना."
थंडी वाढत होती. अचानक दरवाजाकडे पायांचा आवाज आला. बराच वेळ झाला, म्हणुन सदाशिवराव बाहेर आले होते.
"चला साहेब, आता झोपा. खुप उशिर झालाय. आई तु पण जा झोपायला."
मी मांड्यावर थाप मारत उठलो, आणि आत गेलो. शेवटी अश्वत्थाम्यालाही पिठाचे दुध प्यावे लागले होते, ती कथा आठवली. देशमुख केव्हाच डारडुर झोपला होता. मी त्याच्या बाजुला पहुडलो, बघता बघता माझा डोळा लागला.
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच मला जाग आली. देशमुख अजुनही झोपेतच होता. सदाशिवराव व त्यांची आई तर उठून सर्व आवराआवर करून नाश्त्याच्या तयारी ला लागल्या होत्या. आज मला मामलेदार कचेरीतले काम करायचे होते. काल एका दिवसात प्रवास, त्यानंतर गावातल्या एकेक गोष्टी यामुळे काम तसेच राहिले होते. मी माझे आवरले. तोपर्यंत देशमुख ही उठून बसला होता.
"काय देशमुख राव चांगली झोप लागली की नाही काल?"
देशमुख प्रसन्न मनाने हसत होता.
"अरे एवढ्या लवकर उठलात म्हात्रे. काय कुठे जायचं आहे की काय?"
मी हसलो. आपादमस्तक त्याला न्याहाळत बोलु लागलो.
"देशमुख. आपण इथे पिकनिक ला आलो नाही आहोत. साहेबांचं काम नको का करायला?"
"अर्..........म्हात्रे साहेब. साहेबांचा फोन आला होता मला काल सागायचच राहिलं."
मी चकित होत देशमुखला पाहिले.
"काय.......?काय सांगत होते साहेब?"
"काही नाही, व्यवस्थित प्रवास झाला का? गावं कसं वाटलं ते विचारत होते."
मला साहेबांच नवल पण वाटत होतं आणि कौतुकही. असा साहेब मिळणे हे आमचं भाग्य होतं. कारण येणारा प्रत्येक साहेब, तुम्ही पडा किंवा मरा काम झालं पाहिजे असचं म्हणत असायचा. पण साहेबांनी आपल्या कामासोबत माणसांना पण जिंकलं होतं. नाश्ता करुन मी बाहेर पडलो. देशमुख माझ्यासोबत येण्याचा आग्रह करत होता, पण मी त्याला थांबवुन सांगितले.
"तुझी काही गरज लागली, तर सांगेनच. मी जाऊन येतो."
खरंतर मला त्या गावात अजुन काही ठिकाणी जायचं होतं. देशमुख उगाचच कां कु करणार होता, म्हणुन मीच एकटा बाहेर पडलो होतो. सकाळचे वातावरण थंड होते. धुक्याची दुल ई अजुन निवळली नव्हती. फाईल घेऊन मी आपला भरभर चालत होतो, की तेवढ्यात दामोदराव सोबत आले. दामोदर बने. बिचारा पायाने अधु होता. सदाशिवरावांनी त्याच्याबद्दल मला सांगितले होते. सहज म्हणून मी हाक मारली.
"ओ दामोदरराव. काय कुठे चाललात?"
दामोदरराव एका हाताने काठीचा आधार घेत माझ्याजवळ आले.
"अरे म्हात्रे साहेब. काय नाही, जरा मामलेदार कचेरीत चाललो होतो."
"मग चला माझही काम आहे, निघुया."
मी आणि दामोदर बने चालु लागलो. मला त्याची परिस्थिती माहिती होती, म्हणुन मी बोलायला लागलो.
"दामोदरराव, खुप वाईट झालं हा तुमच्यासोबत. भातपिकाचं, गोठ्याचं नुकसान झालं. काय नुकसानभरपाई वगैरै मिळाली की नाही?"
दामोदरराव खिन्नपणे हसले.
"नुकसानभरपाई? हो मिळाली ना. चार वेळा हेलपाटे मारावे लागले, कलेक्टर ऑफिसात. "
"पण तुमच्या गावात तर म्हणे कामांचा निपटारा जलद केला जातो."
"खरयं साहेब, पण ती सवय सगळीकडेच भिनली आहे, असं कुठाय? साहेब आमच्या गावात ही सवय अंगी बाणवली आहे, नाही, अंगी बाणवली जाते."
"म्हणजे?"
"साहेब, कुठल्याही सरकारी कचेरीत तुम्हाला काय अनुभव मिळतो? एकतर काम होत नाही, नाहीतर अधिकाऱ्यांचे खिसे गरम करावे लागतात. काही मोजकेच त्याला अपवाद असतात."
"म्हणजे इकडे हे असं काही होत नाही?"
मी हा प्रश्न विचारणार हे दामोदररावांना अपेक्षित होते.
"तर असं करायची हिंमत तरी होईल का? अहो आमच्याकडे पदाधिकाऱ्यांच वर्चस्व नाही, पण जनता या सरकारवर लक्ष ठेवते. प्रत्येक कर्मचारी अधिकारी यांनी किती व कशाप्रकारे काम केले त्याचे डे बुक असते, आणि सामान्य जनतेतील कोणीतरी माहितगार या डे बुकची पडताळणी करु शकतो. काही तपशील आढळला, हयगय आढळली तर सरळ डिसमिस."
"काय?" मी चमकलो.
"तर काय? संधीचं सोनं आपण करायचं असत साहेब. जनतेची, लोकांची कामे वेळीच व्हायला हवीत, तरच खरा विकास होईल."
मी दामोदररावांचे तत्वज्ञान लक्ष देऊन ऐकत होतो. तोच पिंपळाचा पार आला. गावातले बरेच वयस्क ग्रुहस्थ, तरुण व बरीच लहान मुले तिथे चक्क पुस्तके वाचत होती. दामोदररावांनी तिकडे बोट दाखवले.
"साहेब ही आमची पुस्तक चावडी."
"पुस्तक चावडी?"
"मग? या दाखवतो."
मी दामोदररावां सोबत पिंपळाच्या पाराजवळ आलो. अनेकविध विषयांची पुस्तके तेथे ठेवली होती. काही म्हातारी माणसं व लहान मुलेही पुस्तके वाचत होती. मला त्यांच कौतुक वाटत होतं.
"अरे वा दामोदरराव. या लहान मुलांना आतापासूनच वाचनाची गोडी दिसते."
"साहेब ती गोडी लावावी लागते. आमच्या गावात हीच आमची मनोरंजनाची, ज्ञान प्राप्तीची साधनं आहेत."
"म्हणजे तुमच्या गावात टिव्ही, मोबाईल पाहिले जात नाहीत?" मला आश्चर्य वाटत होते.
दामोदरराव हसतात.
"साहेब तंत्रज्ञानाचा उपयोग चांगल्यासाठी होत असेल तरच त्याचा उपयोग आहे ना? उद्या मुले मोबाईलवर तासनतास गेम खेळत बसतील, इंटरनेटवर नको ते चैटिंग करत बसतील . टिव्हीवर सुध्दा नको तेच जास्त दाखवले जाते. भंपकपणा, शहरी डामडौल, विवाहबाह्य संबंध, देहप्रदर्शन सगळचं थिल्लर. मुलं चांगलं काही पाहणार नाही, व काही घेणार नाही. शहरातली दिखाऊ झगमग त्यांना आकर्षित करणार. साहेब, इतर गावातल्या पारांचा वापर कशासाठी होतो, तुम्हीच आठवुन बघा."
मी दिडःमुढ झालो. गावाचं चित्र माझ्या नजरेसमोर आलं. बऱ्याच लोकांचा पारावर बसुन चकाट्या पिटण्याचा धंदा चालत असे. नशिबाचे गाणे गात ते सकाळ संध्याकाळ त्या ठिकाणी घालवत असत. पण येथे गौतम बुध्दांसारखी झाडाखाली ज्ञानप्राप्ती चालली होती. एक म्हातारे ग्रुहस्थ ज्यांना दोन्ही डोळ्यांनी दिसत नव्हते, त्यांना एक छोटा मुलगा एक पुस्तक वाचुन दाखवत होता. त्या आजोबांची वाचन जिज्ञासा आणि त्या मुलाचा उत्साह आजच्या टेक्नोसॅव्ही च्या डोळ्यात चांगले अंजन घालणारा होता. मी दामोदररावां सोबत त्या आजोबांजवळ आलो. त्या मुलाचे लक्ष जराही विचलित झाले नाही. दामोदरराव त्या आजोबांच्या पाया पडले. तशी हाताच्या बोटांनी चाचपडत आजोबांनी दामोदररावांना स्पर्श केला.
"कोण दामोदर, तु?"
"होय आजोबा. आणि मी एकटाच नाही. हे मुंबई चे साहेब आले आहेत."
आजोंबा सोबत असलेल्या त्या चुणचुणीत मुलाने हसुन आपली ओळख करुन दिली. तेव्हा मी सहजच त्याला विचारलं.
"बाळा, तुला काय खायला आवडतं, चॉकलेट्स की चिप्स?"
या प्रश्नावर कित्येक बालकांचे चेहरे खुलले जातील, एवढी अपेक्षा होती. पण त्या गावातले जाणते माणुस असो की मुल कोणीच कमी नव्हतं.
"मला यातलं काही आवडत नाही."
मी निशब्द होऊन दामोदरकडे पाहिले. तेवढ्यात पिंपळाच्या पारावर बसलेली एक बुटकी स्त्री पुस्तक मिटत आमच्या रोखाने पाहत बोलु लागली.
"साहेब. इथे चॉकलेट्स, चिप्स मिळत असतील तर आवडणार ना? आम्ही लहानपणापासून मुलांना या गोष्टींपासून दूरच ठेवत आलोय. अहो ५ रुपयांचे चिप्स, ५ रुपयांची चॉकलेट एकदा चांगली लागली की मुलांना पौष्टिक खाण्यापेक्षा असलचं खावसं वाटणार. अहो शेतकरी काळ्या मातीत घाम गाळून जे पिकवतो, तेच अन्न सगळ्यांना उपयुक्त नाही का?"
मी दामोदरावांकडे पाहून भुवया उंचावून पाहिले.
"या आमच्या गावातल्या अन्नपूर्णा नथीबाई. शाळेतल्या मुलांना पौष्टिक डबा याच बनवून देतात."
"चुप रे दामोदरा. म्हणे अन्नपूर्णा. अरे लहान मुलांना, लोकांना अन्न देणं हे तर पुण्याचं काम."
दामोदराव हसुन माझ्या कडे पाहतात.
"बघा साहेब. आतासं लोकांना कौतुकही नको झालयं."
आम्ही दोघेही हसलो, आणि त्या चावडीचा निरोप घेऊन मामलेदार कचेरीकडे वळलो.
अपेक्षेप्रमाणे माझं मामलेदार कचेरीतील काम झटपट आटोपलं. तिथे बैंका सारखी टोकन व्यवस्था होती. आणि खरोखरच प्रत्येकाचे वेगवेगळे डे बुक होते. कोणाचे कुठलेही काम कागदपत्रे पुर्ण असल्यानंतर अडत नव्हते. फायलींचा ढिग, अस्वच्छता असे कुठेही तिथे दिसत नव्हते. सगळीकडे संगणकीय प्रणाली. कचेरीच्या बाहेर कलेक्टर पासुन ते गावच्या सुतारापर्यंतच्या सेवा देणाऱ्यांचे नंबर. मला एक एक नवलच वाटत होते. काम झाल्यावर मी फोन करुन देशमुखला कळवले. ओळख पाळख, वशिला, टेबलाखालून देणे असलं काहीच तिथे आढळलं नव्हतं. सगळीकडे सुसज्ज कार्यालये व सीसीटीव्ही लावलेले.
दामोदररावांचेही काम झाले होते. मी व दामोदरराव एकदमच बाहेर पडलो. मी दामोदररावांना विचारत होतो.
"खरचं इतर सरकारी कचेऱ्यांपेक्षा वेगळं वाटलं मला इथे. पण दामोदरराव कलेक्टर, तहसीलदार यांचे नंबर ठिक पण गावातल्या कुंभार, वायरमन, प्लंबर, सुतार यांचेही नंबर?"
दामोदरराव हसतात.
"साहेब हे सगळेच सर्वंट आहेत. जनतेची कामे करतात. केव्हाना केव्हा त्या सगळ्यांची गरज भासतेच ना?"
"पण हे सुतार, प्लंबर वगैरे आपली कामे वेळीच करतात?" मला चार चारदा बोलवुनही घरी न येणारा प्लंबर आठवला.
"तसं त्यांनी काम केलचं पाहिजे. चार चारदा फोन करून सांगायला ते काय आमचे मालक नाहीत."
मला अचंबा वाटला, पण मनातुन आनंदही झाला. चला उद्या काही प्लंबिंगचं वगैरे काम निघालं तर इथल्याच प्लंबरला सांगायचं. आम्ही जातच होतो की तेवढ्यात गावच्या शाळेचे गुरुजी येताना दिसले. दामोदररावांनी नमस्कार केला, मी ही त्यांना नमस्कार केला. दामोदरराव बोलत होते.
"अहो गुरुजी, आज इकडे कुठे?"
"दामोदर, अरे शाळेत मैदानी प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम होणार आहे ना परवा, त्याचीच तयारी चाललीय."
"बर का साहेब हे आमचे श्यामकांत गुरुजी. अतिशय उत्कृष्ट शिक्षक आहेत. अहो इंग्लिश मिडियम ला मागे काढेल असा नावलौकीक आहे शाळेचा."
श्यामकांत गुरुजी आपली गांधीटोपी व्यवस्थित ठेवत बोलतात.
"हे कोण रे दामोदर?"
"अरे ओळख करायची राहूनच गेली. गुरूजी हे राजाराम म्हात्रे साहेब. मुंबईत महानगरपालिकेत अधिकारी आहेत. शासकीय कामासाठी गावात मुक्कामाला आहेत आपल्या सदाशिवरावांकडे. बरं म्हात्रे साहेब, मी निघतो. तुम्ही बोला गुरुजींशी."
मी हातातील फाईल सावरत त्यांच्याजवळ आलो.
"गुरुजी इंग्रजी शाळेला मागं काढील अशी म्हणजे?"
"अहो आपण शहरातील माणसं, किंवा गावातील माणसं मुलांना खोट्या प्रतिष्ठेपायी भरपुर डोनेशन भरुन इंग्रजी शाळेत घालतो. पण तेथे काय होतं, मुलांना असं एक कॉर्पोरेट वातावरण देऊन त्यांच्या भाषेची आणि आपल्या खऱ्या ज्ञानार्जनाची वाट लावली जाते. "
"म्हणजे? "
"साहेब, मुलांना चांगलं शिक्षण म्हणजे काय? फक्त पुस्तकात आहे ते देणे, की फक्त नोकरी मिळवून देण्याइतपत शिकवणं?"
मी काहीच बोललो नाही.
"साहेब, आजच्या कॉर्पोरेट जगात फक्त शहरी ग्लोबल शिक्षण दिलं जातं आणि त्यातुन पोपटपंची करणारे कावळे तयार केले जातात. डिग्री, सर्टिफिकेट केवळ भिंतीवर चिकटवण्याइतपतच राहते. मुलांना व्यवहारज्ञान माहित नसते. रोजगार मिळवून स्वतः च्या पायावर उभं राहण ही जमत नसतं. तेव्हा फक्त गटांगळ्या खात मुले इकडेतिकडे भरकटलेल्या नावेसारखी वागू लागतात. वैफल्यग्रस्त होतात. आत्महत्येसारखा पर्याय निवडतात. किंवा नशिबाला दोष देत जगत राहतात. मुळात आत्महत्या हे कुठल्याच समस्येचे समाधान नसते. पण साप गेल्यावर नुसतीच काठी जमिनीवर बडवावी, तसं करण्याशिवाय पर्याय राहत नाही. म्हणुनच या मुलांच्या उर्जेला एक निश्चित दिशा द्यावी लागते."
मी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो, आता मला ती शाळा पाहावी असेही वाटू लागले. दुपार झाली होती, मी घरी आलो. सदाशिवराव बाहेर एकटेच बसले होते. शास्त्रीय संगीताचे मधुर सुर ऐकु येत होते. मला आलेलं पाहताच सदाशिवराव सावरुन बसले.
"बराच वेळ झाला, तुम्हांला? कचेरीत वेळ लागला काय?"
"नाही, अहो वाटेत दामोदराव भेटले होते."
सदाशिवराव उठून उभे राहिले.
"दामोदर काय सांगत होता?"
"काही नाही, त्याचेही जमिनीचे काम होते, म्हणून मामलेदार कचेरीत जात होता. मोठा धिराचा माणुस."
"साहेब, खरचं धिराचा. त्याचा मुलगा एमपीएससीत नापास झाला तेव्हा जीव द्यायला निघाला होता. मरेस्तोवर अभ्यास करुन परिक्षेत अपयशी झालो, म्हणून तो निराश झाला होता. तेव्हा त्याच्या बापानं या दामोदरनं ओढत त्याला समोर आणलं, आणि सरळ सांगितलं.
जीव द्यायचा असलं तर खुशाल दे, पण या गावात नको. तुझ्यामुळे या गावाला काळिमा लागलेला मला चालणार नाही. अरं जीव देऊन काय होणार आहे? बापाने त्याचे डोळे उघडले आज तो जरी एमपीएससीत अधिकारी नसला तरी स्टेट बैंकेच्या परिक्षेत पास होऊन अधिकारी बनलाय. साहेब या गावात एकवेळ अपयश पचवलं जातं, पण अशी भाकडगिरी, गावच्या नावाला काळिमा अशा गोष्टी कधीच चालत नाही आणि चालणारही नाही. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीच्या ९व्या अध्यायात सांगतात, कमळ चिखलात उगवते, फुलते आणि त्याचा सुगंध सगळीकडे पसरतो. त्याचप्रमाणे ज्ञानरुपी मधातून मिळणाऱ्या आनंदाचा शोध जे लोक स्वतःच्या ह्रदयात घेत नाहीत ते हा संसार सागर कधीच पार करु शकत नाहीत."
सदाशिवराव घरातुन थंड पाणी आणून देतात, थोडी हुशारी येते. मी थांबुन त्यांना विचारले.
"मघाशी तुम्ही शास्त्रीय संगीत ऐकत होता ना?"
मी विषय बदललेला पाहुन सदाशिवरावांनीही आपले संभाषणाचे रूळ बदलले.
"हो मला आवडतं, शास्त्रीय संगीत ऐकायला. मनाला प्रसन्न करते बघा हे संगीत."
"पण मला मात्र त्यातलं जास्त काही कळत नाही हां. नाही म्हणायला चांगली मराठी गाणी आवडतात."
"साहेब आवड कशाचीही असो, पण ती पुर्ण करता आली पाहिजे, बरोबर ना?"
तेवढ्यात जेवणाची वेळ झाली. देशमुख आतल्या खोलीत 'माझी जन्मठेप' वाचत बसला होता. आम्ही नेहमीप्रमाणे डायनिंग टेबलपाशी बसलो, आणि गप्पांच्या संगतीने जेवणाचा आस्वाद घेऊ लागलो. मी संध्याकाळी शाळा पाहायला जाणार असल्याचे सुतोवाच मी सदाशिवरावांपाशी केले. सदाशिवरावांनी देशमुखला घेऊन जाण्याबाबत सांगितले. मी देशमुखला पाहताच त्यानेही होकार दिला.
सायंकाळी ४.०० वाजता आम्ही घरातुन बाहेर पडलो. मनात अजुन एका नव्या भेटीची ओढ होती. गावात राहून हरवलेले एक गाव आणि खराखुरा शाश्वत विकास अनुभवता येत होता. मी व देशमुख शाळेच्या आवारात पोहचलो, आणि थक्क झालो. खरचं एखाद्या इंग्रजी मिडियमच्या इंटरनैशनल स्कुल ला मागे काढावं अशी ती वास्तु होती. पण त्यावर ग्रामीण जिवनाचा साज होता. काही ठिकाणी मुले मैदानी खेळात मग्न होती. काही मुले गुरुकुला सारखे अध्ययन करत होते. आम्ही ते पाहत पुढे जाऊ लागलो. शाळेचं विस्तीर्ण पटांगण त्यात समोरच सुंदर स्विमिंग टैंक पाहून तर मन समाधान पावले. लहान मुले लगोरी, कैरम, विटी दांडू असे खास देशी खेळ खेळत होती. मोबाईलच्या आहारी कोणीच गेलं नव्हतं. पायऱ्या चढून आम्ही वर येऊ लागलो. सुसज्ज ग्रंथालयाचे दर्शन झाले. बरीच मुले दाटीवाटीने बसुन तिथे पुस्तकं वाचत होती. आम्ही तसेच वरच्या मजल्यावर आलो. समोरच संगणक कक्ष होता. काही मुले तिथे होती. आम्ही हळूच पाहिले, ती मुले खेळत तर नाहीत ना? पण समोरचं द्रुश्य पाहुन तर माझा पायच उचलेना. मुले हसत खेळत संगणकीय संकल्पना, वेगवेगळे विषय यांवर चर्चा करत होती. खालून वर येताना एके ठिकाणी मुलांनी टाकाऊ कचऱ्याचा वापर करुन केलेली सुरेख चित्रनिर्मिती पाहिली. तसेच जलस्त्रोतांचे व्यवस्थापन करुन केलेली शेतीही पाहिली. गावची ओळख करुन देणारी जिवंत वाटावीत अशी चित्रे त्या वरच्या मजल्यावरील भिंतींवर लटकवलेली होती. तेवढ्यात श्यामकांत गुरुजी आले. त्यांनी आमच्याकडे पाहिले.
"काय आवडली का शाळा?"
मी हसून मान डोलवली. देशमुख मात्र मंत्रमुग्ध करणाऱ्या सुरांकडे कान लावुन होता. त्याची बैचेनी पाहून श्यामकांत गुरुजी आम्हांला तिकडे घेऊन गेले. ते संगीत विद्यालय होते.
"या ठिकाणी सरस्वती ची आराधना केली जाते. विद्यालयाच्या भेटीसाठी अनेक थोर संगीततज्ञ येत असतात. त्यांच्यासाठी खास व्हिजिट बुक ठेवलं आहे."
मी व देशमुख भान हरपुन गाणं शिकणाऱ्या त्या विद्यार्थ्यांना पाहत होतो. एके ठिकाणी तबला, पेटी अशा वाद्यांबरोबरच ग्रामीण वाद्ये पखवाज, हलगी हे ही शिकवले जात होते.
"या माझ्या मागोमाग."
आम्ही भारावले गेल्यागत गुरुंजी पाठोपाठ चालत होतो. गुरुजींनी अभिनय विद्यालय, न्रुत्य वर्ग तसेच जोडकाम, हस्तोद्योग शिकवणारे वर्ग यांचेही दर्शन करवले. काही ठिकाणी मुले बसली होती, आणि हसत खेळत मन लावुन गोष्टी ऐकत होती. ते पाहून मला आजीच्या दुलई ची आठवण झाली. तोच उबदारपणा मला तिथे जाणवु लागला. बाजुच्या वर्गातुन जोर आणि दंडबैठकांचे आवाज घुमत होते. मध्येच बलोपासनेचेही सुर ऐकु येत होते.
"सुद्रुढ शरीरातच सुद्रुढ मन शोभते. मुलांना वाचनासोबत व्यायामाचे आणि बलोपासनेचेही महत्त्व समजले पाहिजे."
आम्ही अजुन एके ठिकाणी थांबलो तो लैंगिक शिक्षण देणारा वर्ग होता. गुरुजी खिन्नपणे म्हणाले.
"साहेब आपल्याला लैंगिक शिक्षणाचा विषयजेवढा गंभीरपणे घ्यावा तसा घेतला जात नाही. अहो जे लपवावं ते लपवलं जात नाही, आणि जे उघड करावं त्याला आपण लाजतो, घाबरतो. चित्रपट, इंटरनेट वरुन अश्लील,अश्लाघ्य गोष्टींचे प्रदर्शन केले जाते. मुलांच्या कामवासना चाळवल्या जातात. या असल्या विक्रुतींवर सरसकट बंदी का नाही आणत. अशा गोष्टी चालु ठेवुन मुलींना केवळ शोभेच्या बाहुल्या बनवल्या तर मुलींवरील, स्त्रियांवरील अत्याचार थांबणार कसे? स्त्रियांकडे आदराने पाहण्याचा द्रुष्टिकोन का नाही विकसित केला जात? आमच्या कडे हेच शिक्षण दिले जाते, माणुस म्हणुन माणसाशी वागण्याचे."
मी शांतपणे ते ऐकत होतो. आम्ही एवढे प्रगत झालो, स्वतःला आधुनिक समजू लागलो, तरी स्त्रियांना वागणूक कशी द्यावी, त्यांना आदर कसा द्यावा हे शिकवावे लागते. दुरदर्शन, इंटरनेट या गोष्टींचे अतिरंजीकरण करुन दाखवत असते. ज्यातुन मुले वाममार्गाला लागु शकतात. त्याचा विचार आपल्या व्यवस्थेत होत नाही.
गुरुजींनी आम्हांला पलिकडची महाविद्यालयाची इमारतही दाखवली.
"आमच्या कॉलेजात मुलांना परदेशातील विद्यापीठाचे शिक्षण माफक फी मध्ये उपलब्ध करुन दिले जाते. शिवाय व्यावसायिक शिक्षण, स्पर्धा परिक्षांचा अभ्यास वेगळ्या पद्धतीने करुन घेतला जातो. "
मी आणि देशमुखने दुरुनच पाहिले. काही परदेशी प्राध्यापक तिथे लेक्चर्स साठी आले होते. शाळेच्या पायऱ्या उतरून खाली येता येता मी गुरुजींना सहज प्रश्न केला.
"पण गुरुजी. शाळेत या सगळ्या सोयी करावयाच्या म्हणजे अनुदान असावं लागतं ना?"
देशमुखने चमकुन मला पाहिले. गुरुजींना माझ्या प्रश्नाचा रोख समजला.
"बरोबर आहे साहेब. अनुदान. आमच्या शाळेसाठी सरकारी अनुदान येतेच, पण आम्ही तेवढ्यावरच अवलंबून आहोत असे नाही. अहो चांगलं काम करायचं असेल तर देव सुध्दा मदत करतो. कधी स्वतः चा पगार घालून तर कधी विविध संस्था, व्यक्ती आणि लोकसहभागातून आमची शाळा, कॉलेज दिमाखात चालत आहेत. साहेब, डोनेशन च्या नावाखाली मुलांकडून, तरुणांकडून बराच पैसा उकळला जातो, खरतर हा सरस्वती चा अपमानच आहे. पुढे हीच मुले, तरुण नोकरी धंद्यासाठी मागतील तेवढे डोनेशन, लाच देतात त्यासाठी झटपट पैसा मिळवण्याच्या मागे लागतात आणि आपले हात पोळून घेतात, हे चक्र असचं चालु राहतं. पण यामुळे देशाचे भविष्य म्हणवणारी चांगली पिढी कशी निर्माण होईल?"
आम्ही अंतरबाह्य विचारात गढलो, पण शाळेची प्रगती पाहून शुध्द मनाने खाली उतरलो. तिथून काही मुले वटवृक्षाखाली सुर पारंब्यांचा खेळ खेळत होती. तिथुनच ग्रंथालय आम्हांला खुणावत होते. तसेच ग्रंथालयात गेलो. अतिशय भव्य, सुसज्ज असे ते ग्रंथालय होते. विद्यार्थ्यां सोबत जनतेला ही ते खुले होते. त्याप्रमाणे वेळा ठरलेल्या होत्या. मी हरखुन गेलो, पण तेवढ्यात देशमुखने मला हाताने खुण करुन काहीतरी दाखवले. ग्रंथालयाच्या एका खिडकीतून ग्रामीण जिवनाचं दर्शन करवणारी शिल्पे तयार केली होती. त्यात गांधीजींचा खेड्याकडे चला हा संदेश देणारा पुतळाही होता. आम्ही भान हरखुन ते पाहतच होतो, की तेवढ्यात सदाशिवरावांनी देशमुखला फोन करुन घरी येण्यास सांगितले व फोन ठेवून दिला. काहीतरी झालं आहे, हे आमच्या दोघांच्या लक्षात आलं. म्हणुन आम्ही लगबगीने तिथुन काढता पाय घेतला, व झपझप शाळेच आवार ओलांडून जाऊ लागलो. त्या तेवढ्या क्षणीही माझी नजर एका छोट्या मुलावर पडली. त्याच्या हातात छोटी पाण्याची झारी होती, आणि समोरच्या जमिनीत एक नवांकुर उमलला होता. तोच नवांकुर उद्या व्रुक्ष बनुन जगाला सावली देणार होता.
घरी आलो. सदाशिवराव गोठ्यात उभे होते. जनावरांचे डॉक्टर धवळ्या बैलाला तपासत होते.
"मी पट्टी बांधली आहे, पण काळजी घ्यायला हवी." डॉक्टर म्हणाले व निघुन गेले.
"काय झालयं ढवळ्याला ?" मी गोठ्यात पाय ठेवता ठेवता विचारलं.
"काही कळत नाही हो, अचानक याच्या पायाला ही जखम झाली. म्हणून तुम्हाला फोन केला."
मी त्या मुक्या जनावराजवळ आलो, आणि त्याच्या पाठीवर थाप दिली. दोनच दिवसात त्या जनावरांनी मला लळा लावला होता. हा कदाचित त्या गावच्या मातीचा गुण होता. पण आता सदाशिवरावांना प्राणी मेळ्याला जाता येणार नव्हते. रात्री जेवणाचा चांगला बेत होता. नाचणीची भाकरी, कांद्याचा ठेचा आणि मिरचीचा खर्डा पाहुनच तोंडाला पाणी सुटले होते. सदाशिवराव याही अवस्थेत आमचा विचार करत होते. जेवता जेवता ते म्हणाले.
"साहेब, आज पहिल्यांंदाच मला प्राणीमेळ्याला जाता येणार नाही बघा. पण तुम्ही नक्की जाऊन या."
"पण ढवळ्या......?
"त्याची काळजी करु नका. तुम्ही मायाळु आहात, तुमच्या आशीर्वादाने होईल तो बरा. तुम्ही जा."
आमची जेवणं आटोपली. आज दिवसभर फिरल्यामुळे अंथरुणात पडल्या पडल्या झोप आली.
५.
आज आमचा या गावात तिसरा दिवस होता. प्राणीमेळा पाहण्याची उत्सुकता आम्हा दोघांनाही स्वस्थ बसु देत नव्हती. तसे आजवर मी अनेक क्रुषिमेळे पाहिले होते. पण गावात भरणारा असा प्राणीमेळा प्रथमच पाहणार होतो.
सकाळीच तयारी करुन दोघेही बाहेर पडलो. गावात इतर वेळी असलेली वर्दळ आज कमी होती. एक भव्य मंडप उभा होता, पानाफुलांचे आकर्षक तोरण येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. गावकरी धावपळीत होते. सगळे नियोजन त्यांनीच तर केले होते. प्रवेशद्वारातून आत जाणाऱ्या प्रत्येकाची नाव नोंद केली जात होती. त्यांना गुलाबाचे फुल व हातावर अत्तर लावले जात होते. हा त्यांचा स्नेह होता. वाहनांची सुसज्ज पार्किंग व्यवस्था दूरवर करण्यात आली होती. कुठेही गडबड, गोंधळ नव्हता. गावचे पाटील जातीने येण्याऱ्यांचे स्वागत करत होते. मला व देशमुखला पाहताच हसुनच मला विचारले.
"काय म्हात्रे साहेब. आमचे सदाशिवराव आले नाहीत."
मग मी त्यांच्या जवळ जात त्यांना कारण सांगितले.
"काही हरकत नाही. तुम्ही हक्काने आलात बरं वाटलं बघा." पाटीलांनी माझा हात हातात घेतला. तो स्पर्श मला आपुलकीचा वाटत होता. आम्ही आत प्रवेश केला, आणि प्राणीमेळा पाहू लागलो. गावकऱ्यांनी आपल्या जनावरांचे संगोपन करत त्यांना विविध आजारांपासून दूर ठेवणे, व नवनवीन क्रुषिविषयांची माहिती मिळणे यासाठी हा मेळा भरवण्यात आला होता. मेळ्यात दुरदुरचे तज्ञ डॉक्टर प्राण्यांची काळजी घेत होते. चारा पाणी वैरण यांची माहिती देत होते. शेतीचे अधिकाधिक नवीन प्रयोग याची प्रात्यक्षिके दाखवत होते. मी आणि देशमुख एका एका ठिकाणी थांबुन पाहत होतो, की तेवढ्यात एक माणुस माझ्याजवळ आला, व नमस्कार करत म्हणाला.
"राम राम हो साहेब. मी दिनकर बनके. तुम्ही ते सदाशिवरावांकडे आलात तेच ना?"
"हो."
"तुम्ही मुंबई महानगरपालिकेत अधिकारी आहात ना?"
मी आपलं सहज हो म्हटलं, तसा तो तोंड वेंगाडत निघून गेला. मला व देशमुखला काहीच समजेना, की आमचं काय चुकलं. पण तेथुनच जाणाऱ्या महादेव शेतकऱ्याने हसतच मला सांगितले.
"साहेब, त्या बनकेच्या वागण्याचं एवढं मनावर घेऊ नका. अहो पाची बोटे तुपात असुन कसं चालेल, काही वेळा अशा कडु माणसांशीही भेट गाट होते."
"म्हणज महादेव, मी समजलो नाही."
"साहेब त्या बनकेला सरकारी नोकर म्हटलं की त्यांची चिड येते. तो म्हणतो सरकारी नोकर म्हणजे भ्रष्ट, धेडगुजरी राजकारण चालतं. सगळे अधिकारी पदाधिकारी, राजकारणी अप्पलपोटी, स्वतः ची पोळी भाजण्यात गुल असणारे. साहेब तुम्हीच सांगा या गावात तरी असं काही आहे का?"
मी सुन्न झालो. एका अर्थी बनकेचं चिडणं मी समजु शकत होतो. उगाच खोटी आश्वासने देऊन गावांकडे ढुंकुनही न पाहणाऱ्या राजकारण्यांचा राग येणेही स्वाभाविक होते. पण माझ्या साहेबी कोषाच्या मनाला त्याचे वागणे थोडे खटकले होते. पण मी तिकडे दुर्लक्ष करत महादेव सोबत त्या मेळाव्यात फिरु लागलो. हिरडा बेहडा सारख्या औषधी वनस्पती, शेतीतील पालेभाज्या, कंदमुळे, रानमेव्याची रेलचेल होती . वेगवेगळ्या पाळीव प्राण्यांची छोटी पिल्ले दाटीवाटीने उभी होती. मी व देशमुख मेळा पाहण्यात मश्गुल होतो. एवढ्यात बाहेरुन एक माणुस धावतच आत येत पाटलांकडे पाहत ओरडू लागला.
"पाटील, अहो लवकर चला. लवकर चला. म्युझियम ला आग लागलीयं."
ते ऐकुन सगळेच घाबरले. पळापळ सुरु झाली. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात राहिला नाही. मी आणि देशमुख महादेवसोबत तिथुन बाहेर पडत म्युझियम कडे आलो. गावातले जुना वारसा जपणारे, संस्कृती जपणारे ते म्युझियम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. गावकरी जिवाच्या आकांताने आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. त्यात दोघा तिघांचे हात गंभीररित्या पोळले होते. अग्निशमन दलही पराकाष्ठा करत होते. एका ठिकाणी एक बाई जोरजोरात रडत ओरडत होती.
"अहो कोणीतरी माझा हा खजिना वाचवा हो, या.......या."
मी गोंधळलो आणि धडपड करणाऱ्या महादेवला पाहिले.
"साहेब ती बाई दिसते ना तिने आपले सर्वस्व दिलय त्या म्युझियम साठी. गावचा अमुल्य वारसा, ३०० वर्षांपुर्वीचे काही प्राचीन ग्रंथ ,शोध आणि आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले प्राण वेचले अशी क्रांतीकारकांची शिल्पे हा सगळा खजिना नाही तर काय? याची किंमत पैशापेक्षा अधिक नाही का?"
मी सद्गगदित झालो. आजच्या काळात जिथे समाजसुधारक, युगपुरुषांचे पुतळे बनवुन त्यांच्याकडे लक्षही दिले जात नाही. उगाच अमाप पैसा ओतुन भवने उभारली जातात. तिथे खराखुरा खजिना जपुन ठेवणारी ग्रामीण लोकं आणि त्यांची तळमळ पाहायला मिळाली. सदाशिवरावांनी वाचायला दिलेल्या ज्ञानेश्वरी तील ११ वा अध्याय आठवला. भगवंत ज्यात नाही अशी कोणतीच वस्तू नाही. तो वायु, यम,प्राण्यांची चेतना, वरुण, सोम सर्वात आहे. पाहायला गेलं तर या म्युझियम मधल्या प्रत्येक वस्तुत आहे. उशिराने आग आटोक्यात आली. आग लागण्याचे कारण कोणालाच समजत नव्हते. आगीत काही महत्वाचे प्राचीन ग्रंथ, शोध भस्मसात झाले होते. हे नुकसान भरुन येणे खुप कठीण होते. पाटलांनी तात्काळ गावकऱ्यांची सभा बोलावली. मेळाही व्यवस्थित चालु ठेवणे गरजेचे असल्याने पाटलांनी काही माणसे तिथे ठेवली. पण बरीचशी गर्दी सभेला जमली होती. मघाशी रडत ओरडत असलेली ती बाई पिंपळाच्या पारावर बसुन होती. बनकेही आला होता, कुत्सित नजरेने मला पाहत तो एका जागी जाऊन बसला. कुठुनतरी सदाशिवरावांना ही बातमी समजली होती तसे ढवळ्याला सोडून ते तिथे आले होते. मी त्यांना नजरेनेच चापले, तसे माझ्याकडे येत ते बोलु लागले.
"काळजी नको. ढवळ्या आता बरा आहे. आई आहे तिथे."
माझी पाठ थोपटुन ते देशमुखच्या बाजुला बसले. पाटलांनी आगीचे कारण शोधण्यासाठी म्युझियम च्या व्यवस्थापक, इतर कामे करणाऱ्यांकडे चौकशी केली. पण कुणालाच कारण समजत नव्हते. सभा सुरु झाली, पाटील बोलत होते.
"गावकरी बंधु आणि भगिनींनो, गावातील ३०० वर्षांचा ऐतिहासिक व ग्रामीण जिवनाचा वारसा जपणारे आपले म्युझियम आज अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. म्युझियम मधील काही जुने शोध निबंध, ग्रंथ व शिल्पं यांच यात बरचं नुकसान झाले आहे. सुदैवाने आग आटोक्यात आल्याने अतिरिक्त नुकसान टळले आहे. पण आता काय करावे हे तुमच्याकडून समजणे गरजेचे आहे."
"पहिल्या प्रथम म्युझियम ची तपासणी करुन फायर ऑडिट झाल पाहिजे."
सर्वांनी त्याला दुजोरा दिला. पाटलांनी मान हलवली.
"ते बरोबर आहे. पण झालेले नुकसान भरुन यायला बराच वेळ लागणार आहे."
" माझी संपत्ती, माझा हा अनमोल ठेवा मला नाही वाचवता आला पाटील, मला माफ करा." ती मघाची बाई रडत होती. काही बायका तिचे सांत्वन करत होत्या.
"रडू नका पार्वतीबाई. या गावाने अशी किती वादळे परतवून लावली आहेत. लोकहो झालेल्या नुकसानीवर काय करता येईल?"
पाटील सगळ्यांना विश्वासात घेऊन सभा चालवत होते. पुरुष असो, स्त्रिया असो कोणताही भेदभाव केला जात नव्हता. नाहीतर काही सभांमध्ये कोणीतरी एक पक्ष आपलीच मते मांडतो, आणि असं करता येईल, तसं करुया अशा मुळमुळीत कागदी घोड्यांना पुढे करुन सभा संपत असे. पण या गावाचं तसं नव्हतं. गावाचं गावपण जपण्यासाठी ते कुठलीही किंमत मोजायला तयार होते. उद्याचा मामला सैतानाचा, जे काय असेल ते आज, हे त्यांनी मनावर बिंबवले होते.
सभेत एका दोघांनी बैंकेच कर्ज घेऊन प्राथमिक डागडुजी करण्याचं मत मांडलं, एकाने गावातल्या सहकारी संस्थेच्या मदतीने हे काम होईल असे मत मांडले. पाटील गावकऱ्यांची मते नोंदवत होते. तेवढ्यात त्या गावच्या जाणत्या नथीबाई उठल्या. पाटील म्हणाले.
"बोला नथीबाई तुमचं काय मत आहे?"
"पाटील म्युझियम मध्ये आपल्या खुपच महत्वाच्या वस्तु, शिल्प यांच नुकसान झालं आहे, त्यांची विगतवारी करुन पुरातत्व विभागाकडून त्या वारसांचे संवर्धन होईल असे नियोजन करावे."
सदाशिवराव काहीतरी बोलणारच होते, तेवढ्यात मी उठलो. मला उठलेले पाहताच सगळेच चकित झाले. पण माझी नाळ त्या गावाशी घट्ट होत चालली होती, त्यामुळे मला ही काहीतरी करावेसे वाटत होते. बनके मात्र उपरोधिक नजरेने मला पाहत होता.
"बोला साहेब, तुम्हाला काय सांगायचं आहे."
"पाटील. म्युझियम हा ऐतिहासिक वारसा आहे. ते या गावचं भुषणच आहे. आगीमुळे जे नुकसान झाले आहे त्याचं आमच्या महानगरपालिके कडून योग्य ते सर्वेक्षण करुन मदत मिळवुन देण्याची जबाबदारी मी घेतो."
तेवढ्यात बनके उठला.
"मदत मिळवुन देण्याची जबाबदारी घेताय? पाटील अहो ही सरकारी माणसं चालढकल करण्यात दिवस घालवतात, वर फक्त आश्वासनांचे गाजर दाखवतात. मुंबई महानगरपालिका आणि आपलं गाव किती अंतरावर आहे? पाटील, यांच्यावर किती विश्वास ठेवायचा तुम्हीच ठरवा."
"बनके खुप बोललास. साहेब या गावचे पाहुणे आहेत. आणि एवढया सरकारी योजना, एवढी कामे आपल्या गावात यशस्वीपणे कार्यान्वित आहेत. कुठे प्रशासनाने खो घातला असं तुला दिसलं का?"
"पण ते आपल्या गावात. इतर ठिकाणी मात्र राजकारणच चालतं." बनके खोचकपणे म्हणाला.
"साहेब चांगले आहेत. कुलकर्णी साहेब पण तिथे आहेत. कुण्या एकामुळे पुर्ण सरकारी व्यवस्थाच कामचुकार आहे, असं म्हणता येणार नाही. साहेब तुम्ही तुमच्याकडून जे होईल ते करा, आम्ही आहोत तुमच्या सोबत."
बनके मात्र रागाने तिथुन उठून निघून जातो. सभा संपते. मी आणि दामोदर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले ते म्युझियम पाहत असतो. ग्रामीण जिवनाचं दर्शन घडवणारी अनेक कलात्मक शिल्पे तिथे असतात. बैलगाडी तुन शेतावर जाणारे शेतकरी, औताने जमिन नांगरणी करताना शेतकरी, जुना वडाचा पार. माझं मन त्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या काही सुंदर शिल्पांकडे पाहून हेलावले. मी देशमुख सोबत त्या जागेच्या सर्वेक्षणाला सुरवात केली. आता उशिर करुन चालणार नव्हता.
तो दिवस असा गेला. संध्याकाळी घरी परतताना आम्ही पार्वतीबाईंच्या घरासमोर आलो. पार्वतीबाई बाहेर आल्या.
"अरे या ना साहेब. या बसा."
आम्ही समोर ठेवलेल्या लाकडी खुर्च्यांवर बसलो. पार्वतीबाई बोलु लागल्या.
"खुप चांगलं वाटलं मला साहेब तुमची या गावाप्रती असलेली तळमळ बघून. सगळेच काय तुमच्यासारखे प्रामाणिकपणे काम करणारे नसतात."
"अहो ते मी माझे कर्तव्य मानतो, पार्वतीबाई. पण तुमचं म्युझियम प्रती, ग्रामीण वारसा जपण्याप्रती असलेले प्रेम त्याहून मोठं आहे."
"साहेब, हे म्युझियम, ही स्मारके, हे रस्ते कोणा एका गावाचे किंवा शहराचे नसतात. ती राष्ट्रीय संपत्ती आहे. आपली संपत्ती आपणच जपायला हवी, पण बरेच ठिकाणी रस्त्यांची दुर्दशा दिसते, तुंबलेली गटारं दिसतात, भर पावसाने भरणारी शहरे दिसतात. स्मारके उभारली जातात, युगपुरुषांचे पुतळे उभारले जातात. पण त्यांची हवी तशी देखभाल घेतली जाते का?"
"बरोबर आहे पार्वतीबाई तुमचं."
"साहेब मी कोणाला बोल लावत नाही. पण हे ऐतिहासिक धरोहर प्राणापलिकडे जपणे हे आपलं कर्तव्य आहे."
काही वेळ असाच जातो, आणि तेवढ्यात एक माणुस आतुन उकडलेली मक्याची कणसं आणि गुळाच्या दशम्या घेऊन येतो.
"घ्या साहेब. नाश्ता करा. अहो तुम्ही पाहुणे आहात या गावचे."
पार्वतीबाईंंनी आग्रह करुन करुन आम्हांला नाश्ता करवला, एक निर्धार मनात घेऊन तिचा निरोप घेत आम्ही घरी परतलो. सदाशिवरावांनी आधीच आमच्याबद्दल घरी आईला सांगितले होते. सदाशिवराव आणि आई बाहेरच्या सोफ्यावर बसले होते. आम्ही घरी पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे सात वाजले होते.
"काय म्हात्रे साहेब, झाली का पाहणी म्युझियम ची?"
"हो. आता काही नकाशे मी साहेबांना पाठवले आहेत. एक दोन दिवसात मंजुरी येईल. मग हे काम होऊन जाईल."
"साहेब खरचं तुम्ही गावाबद्दल एवढा विचार करता......"
मी सदाशिवरावांचे बोलणे मध्येच तोडले.
"सदाशिवराव अहो ऐतिहासिक वारसे, राष्ट्रीय संपत्तीचे जतन करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य नाही का?"
सदाशिवरावांचे त्या बोलांनी समाधान झाले.
"बरं आमचा ढवळ्या कसा आहे, बघायचा होता."
सदाशिवराव उठत गोठ्यात जातात. आम्हीही मागाहून जातो. ते मुके जनावर आमची चाहुल लागताच उठून उभे राहिले.
"ढवळ्याला तुमची सवय झालीय साहेब. मघाशी कडबा खाऊ घातला तरी पण घेईना. सारखा गोठ्याच्या बाहेर पाहुन डुरकायचा. तुमचीच वाट पाहत होता."
मी ढवळ्याला थोपटले. त्या आपुलकीच्या स्पर्शाने त्याची लव शहारली. आपल्या लिबलिबित जिभेने तो माझा हात चाटू लागला.
"साहेब उद्या सकाळी शंभु महादेवाच्या मंदिरात जाऊया. अहो आयुर्वेदिक औषध आणि देवाच्या आशिर्वादाने ढवळ्या बरा झालाय."
मी मान डोलावली. नकळत मनातल्या मनात मी ही देवाच्या पाया पडलो.
दुसरा दिवस उजाडला. आज देशमुखही माझ्या सोबत येणार होता. त्याला गावातल्या शेतांवर, बांधांवर फिरायला आवडत असे. सगळी तयारी करुन मी व देशमुख सदाशिवरावां सोबत बाहेर पडलो. मंदिर १०-१५ मिनिटांच्या अंतरावर होते. निळे आकाश धुक्याची चादर हळहळु दूर करत होते. कोवळी सुर्यकिरणे धरतीला स्पर्शत होती. आम्ही शेताच्या बांधावरुन चाललो होतो. मी विचारले.
"सदाशिवराव ही शेते कोणाची?"
"हे तिकडे आहे ते किसनचं, आणि ते बाजुला रखमाबाई चं."
मक्याची सुंदर कणसे, ज्वारीचे पोस दिसत होते. सुजलाम सुफलाम भुमीचे दर्शन होत होते. देशमुख तर हरखुन ते वैभव पाहत होता. शेतीमधील जलव्यवस्थापन व नवीन प्रयोग त्याला आकर्षित करत होते. मी सदाशिवरावांना विचारले.
"शेतीत या सुधारणा हे बदल करण्यासाठी बराच खर्च येत असेल ना?"
"हो खर्च तर येतो. आमच्या शेतीत रासायनिक खतांचा वापर न करता निसर्गात तयार होणाऱ्या खताचाच वापर केला जातो. शेवटी उत्पन्न वाढीसाठी लोकांच्या जिवाशी खेळ करुन चालणार नाही. शेती ही प्रयोगशील असते. पण तसे नवीन प्रयोग करता आले पाहिजेत. नाहीतर उत्पन्न मिळत नाही म्हणून लोक शेती विकतात. परिणामी आर्थिक नुकसानच त्यांना सहन करावे लागते. शेती विकल्यावर पैसा तर मिळतो, पण त्यानंतर कुणा धनिकाच्या शेतात शेतमजुर, गडी म्हणुन काम करत राहतात. यामुळे खरा शेतकरी 'राजा'कसा बनेल? आणि तो राजाच असा असेल तर प्रजा तरी सुखात, वैभवात कशी राहणार? म्हणुनच शेतीसाठी खर्चाची भरघोस तरतुद आमच्या क्रुषि सहाय्य संस्थेकडून होत असते. फक्त शेतीच नाही, शेतीपुरक उद्योगही. त्याच शेती व पुरक उद्योगांमुळे आमची औद्योगिक वसाहतही विकसित झाली. अहो आपला देश क्रुषिप्रधान, हरीत क्रांती, धवल क्रांती या देशात झालीय. मग त्यात आपण मागे राहून कसं चालेल."
"पण सदाशिवराव या मालाला चांगला भाव मिळतो?"
"मग तो मिळवावा लागतो. साहेब शेतीत नुसतं उत्पन्न झालं म्हणून भागणार आहे का? त्याला चांगला भावही हवाच. शिवाय उत्पन्न आणि भावात समतोल साधता आला पाहिजे. त्यासाठीच शेतीमाल चांगल्या ठिकाणी विकावा लागतो, शिवाय त्याची गुणवत्ताही महत्वाची आहे ना? साठवणुकीसाठी पुरेशा सोयींनी युक्त गोदामे असायला हवीत. धान्याला किड मुंगी लागु नये किंवा उंदीर घुशींनी त्रास देऊ नये याचीही व्यवस्था करावी लागते. त्यासाठी स्वच्छ वातावरण असलेली गोदामे सीसीटीव्ही यंत्रणेसह येथे उभी आहेत. सेंद्रिय पावडरींचा वापर करुन किड मुंगीचा बंदोबस्त केला जातो. बाजारमंडीत मालाची गुणवत्ता तपासली जाते. काय आहे, आजकाल भेसळीचे प्रमाण खुप वाढलयं हो. धान्य असो, कडधान्य असो, पालेभाजी , भाज्या कशात म्हणु नका ही भेसळ सरसकट केली जाते. निष्पाप जनतेच्या जिवाशी खेळ आहे हा. यामुळे गावाची ओळख कशी राहेल? आणि ती ओळखच नसेल तर मालाला योग्य भाव कसा मिळेल, आणि शेतीला चांगले दिवस कसे येतील?"
मी अजुन एक फिरकी घेण्याचे ठरवले.
"ठिक आहे. पण गावात शेतीच्या वाटणीवरुन, जमिनीवरुन भांडण-तंटे होतात. मारामारी, खुन केले जातात त्याचं काय?"
सदाशिवराव प्रथमच गंभीर होतात.
"साहेब. तंटे करणे, किंवा उद्भवू देणे शहाणपणाचे असते का? अहो ही काळी आई सगळ्यांचीच आहे. ती कोणाला ठरवून काही देत नाही. जो तिला माया लावतो, मेहनत घेतो, त्याला ती भरभरुन देणार. नव्हे त्याला ते भरभरुन मिळाले पाहिजे. तरच शेतकऱ्यांची गरीबी दूर होऊन देशात आर्थिक संपन्नता येईल. नाहीतर शेतकऱ्यांच्या घरात पैशांवरुन भाडणं होत राहतील आणि त्यांना शेतीच नकोशी वाटेल. अन्नदाता नाराज झाला तर जनता काय खाणार? या गावात आजपावेतो जमिनीच्या वाटणीवरुन कोणीही तंटामुक्ती कडे गेला, किंवा मारामारी, खुनापर्यंत प्रकरण गेले असे झालेले नाही, ते घडू दिले नाही. जी तुरळक प्रकरणे होती ती सामोपचाराने मिटवण्यात आली. इथे ज्याला शेतीची आवड आहे अशांसाठी खास संरक्षित क्षेत्र तयार केलं आहे. पण तेथे मेहनत मात्र पाहिजे."
मी निरुत्तर होऊन देशमुखकडे पाहिले. गाव हे शेतात वसते ही उक्ती हे गाव सार्थ ठरवत होते. पण त्याहीपेक्षा सदाशिवरावांना एवढं बोलायला सुचतं कसं हा प्रश्न मला सतावत होता. दहावी पास या माणसाकडे पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाची शिदोरी होती. तशी सदाशिवरावांसारखी गावातल्या इतर लोकांत पण एकवाक्यता होती.
शेवटी इंग्रजांनी १५० वर्षे आपल्यावर राज्य केले कारण आपल्यात ,आपल्या विचारांमध्ये एकवाक्यता नव्हती. शंभु महादेवाचे मंदिर आले. त्याच्या बाजुलाच देवी लक्ष्मी चेही मंदिर होते. अतिशय सुंदर कमानी आणि ग्रामीण शैलीत बांधलेले ते महादेव मंदिर गावची शोभा वाढवत होते. कौलारु छप्पर , समोरच्या प्रवेशद्वारासमोर ब्रहमा, विष्णु महेश यांच्या कोरीव शिल्पाकृती आणि दुसऱ्या बाजूला जैन व बौध्द धर्मातल्या तथागतांच्या मुर्त्या. मी चकित होत पाहत होतो. वरच्या बाजुला येशु ख्रिस्त आणि शिख गुरुंच्याही प्रतिमा होत्या. सर्वधर्म समभाव त्या मंदिरातुन दिसत होता. देशमुखचे लक्ष दूरवरच्या शेतमळ्याकडे लागले होते. तिथे गर्दी जमली होती. जवळच पाणवठ्यावर गावकरी पाणी भरत होते. समोरच विस्तीर्ण अशोक व्रुक्षाच्या शेंड्यावर तुरेवाल्या सर्पगरुडांची जोडी बसली होती. दुरवर सुर्याची सोनेरी किरणे शेतावर पसरली होती. मला ते सगळ चित्रातल्या सारखे वाटत होते. सदाशिवराव कुणाबरोबर तरी बोलत होते. तेवढ्यात तो माणुस निघून गेला, आणि सदाशिवराव माझ्याकडे वळले.
"चला साहेब, आत जाऊया. तो सहदेव भेटला होता, माझ्या ओळखीचा. खंडो सुतार त्या दिवशी म्हणे खुप भाजला म्युझियम ची आग विझवताना. "
"होय? आता बरा आहे ना? आणि त्याच्यावर उपचार कुठे गेले?"
"अहो एवढं मोठं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे गावात. चला."
या गावात काहीही अशक्य नाही हे मला एव्हाना समजून आले होते. देशमुख त्या शेतमळ्याकडे जाण्यासाठी मला खुणावत होता. पण मी त्याच्या हाताला धरुन त्याला मंदिरात घेऊन गेलो. मंदिराच्या भव्य मंडपात प्राचीन शिलालेख, बायबल, कुरआन मधील आयते ही कोरण्यात आली होती. मी आता काही विचारणार त्याआधी सदाशिवराव बोलु लागले.
"साहेब. सर्वधर्म समान आहेत, हीच शिकवण आम्ही आमच्या क्रुतीतुन दाखवण्याचा प्रयत्न करतो. अहो, काही विशिष्ट वर्गांनी आपल्या सोयीसाठी हा हिंदू, हा मुस्लिम, हा ख्रिश्चन, हा शुद्र जातीचा अशी विभागणी केली. देवांनाही आपापसात वाटुन घेतले. अहो देव तर एकच आहे, तर धर्म, जातीची लेबलं लावून आपण का वावरतोय? अहो या जाती-पातीच्या,धर्माच्या विभागणीमुळे गुणवत्ता असलेल्या लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत. कुठेही कोणत्याही लाभाच्या वेळी जात आडवी येते. देवाच्या नावाखाली व्यापार चालतो. माणसा माणसात भेदभाव केले जातात."
मला एकदम मंदिरांंसमोरची गर्दी आठवली. देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना लवकर दर्शन मिळावे, म्हणुन काही ठिकाणी पैसे घेऊन मंदिरात सोडले जात असे. खरचं देव तर खऱ्या भक्तीला पावतो, तिथे असा व्यापार का?
आम्ही महादेवाला मनोभावे वंदन केले. तिथला मुख्य पुजारी महेश सदाशिवरावांना हाक मारुन सांगत होता.
"सदाशिवराव पुढच्या आठवड्यात देवाचा उत्सव आहे. कुठे मुंबई ला वगैरे जाणार नाहीत ना?"
सदाशिवराव हसले. त्यांनी नकारार्थी मान हलवली. तेवढ्यात माझं लक्ष गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजुस लावलेल्या संत तुकाराम, ज्ञानेश्वर आणि ख्रिस्ती धर्मोपदेशकांच्या प्रतिमांकडे गेले. मी एकटक तिकडेच पाहतोय असं पाहून पुजारी महेश बोलु लागला.
"साहेब, या देवालयात किर्तनकार, बुवांचे सत्संग, प्रवचन असतात. ख्रिस्ती धर्मोपदेशकांचीही व्याख्याने असतात. अहो हे संत, युगपुरुष, धर्मोपदेशक यांनी माणसाला खरा धर्म दाखवला. माणसातला देव ओळखायला शिका अशी शिकवण दिली. त्यांनी कुठल्या जाती धर्मापुरते आपले ज्ञान मर्यादित ठेवले नाही. साहेब शिक्षण शाळेतुन मिळते, पण मानवधर्म या देवालयातुनच शिकता येतो."
मी सदाशिवरावांना पाहिले. लिनतेने ते पुजारी बुवांना पाहत होते. देशमुख ची मात्र घाई चालली होती. म्हणुन प्रसाद घेऊन आम्ही बाहेर पडलो. लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन देवीचेही दर्शन घेतले. तिथेही स्त्रियांच्या विविध रुपातील चित्रे होती. स्त्रियांबद्दलचा आदर प्रतीत होत होता. आपण देवाला एका मूर्त रुपात पाहणे पसंत करतो. पण तोच देव आपल्या आचार विचारात असतो, हे मात्र विसरतो. जुन्या परंपरांना कवटाळून बसतो. पण या गावाने धर्म, परंपरांची एक नवी ओळख तयार केली होती.
मी देशमुख व सदाशिवरावां सोबत पाणवठ्याच्या बाजुला असलेल्या शेतमळ्याकडे आलो. आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची शेती कशी असते, याचं काही तरुण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. समोर सुंदर बहरलेली औषधी वनस्पती, फळांची बाग होती. त्याच्या बाजुच्या शेतमळ्यात एका वेगळ्या जातीच्या फळाची लागवड केली होती, 'जोजोबा' असं नाव होतं त्याचं. सदाशिवराव माझ्या कडे पाहून बोलत होते.
"बरं का साहेब. हा आयुर्वेद च आपल्या वैद्यक शास्त्राचा पाया आहे. हजारो वर्षांपासून या आयुर्वेदाने माणसाला नवसंजीवनी दिली आहे. आजचे प्रगत वैद्यकीय विज्ञान पण यांच्याच सल्ल्याने जात असते. ढवळ्या ला पायाची जखम झाली, तेव्हा आयुर्वेदिक औषधानेच त्याला गुण पडला. इथे आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे जवळच तुम्हांला दाखवतो."
"पण आयुर्वेदा बरोबर महागडी औषधे, उपचारही करावे लागतात."
"बरोबर आहे साहेब. शेवटी आयुर्वेद आणि ऐलोपैथी यात समन्वय ठेवला पाहिजे. "
माझ्या मनाला कुठेतरी सदाशिवरावांना आपली गोष्ट पटल्याचा अभिमान वाटु लागला. पण तरी खरं कौतुक त्यांच, या गावकऱ्यांचं वाटत होतं. आजकाल चित्रपटातील अभिनेते- अभिनेत्री, क्रिकेटर यांचा उदोउदो केला जातो, त्यांना रोल मॉडेल बनवले जाते. पण युगपुरुष, शास्त्रज्ञ चांगले समाजकारणी यांचा कोण आदर्श घेतो. वर्षानुवर्षे गाव कसं असतं, असावं याची चित्रे डोळ्यांसमोर उभी केली जात आहेत. पण गावातही माणसं राहतात, बदलाची नांदी तेही करु शकतात, हे आपण लक्षात घ्यायला हवं. मी आणि देशमुख जोजोबा फार्मिंग करणाऱ्या रामा शेतकऱ्याला भेटलो. तिथून सदाशिवरावांनी आम्हांला आपल्या शेतावर नेले. बांधावरुन जाताना चिखलात देशमुखचा पाय रुतला, तरी त्याचा उत्साह कायम होता. मक्याची कणसे, जोंधळे, हुरडा आणि दुरुन दिसणारी अभयारण्याची वाट. मन प्रसन्न होत होते. आम्ही सदाशिवरावां सोबत खुप फिरलो.मक्याची कणसे, हुरडा यावर ताव मारला. खास फडातला ऊस खायला मिळाला. सदाशिवरावांनी बैलगाडीचीही सफर घडवली. पक्ष्यांचे अनेकविध आवाज घुमत होते, त्यावरून तो कोणता पक्षी असणार हे सदाशिवराव सांगत होते. या माणसाला पक्ष्यांची भाषा अवगत आहे की काय असे मला व देशमुखला वाटले. पण सदाशिवरावांनी अभयारण्याच्या वाटेवर पक्ष्यांची कशी नोंद ठेवली जाते त्याची डिरेक्टरी दाखवली. जंगलाचे कायदे कडक होते. प्राण्यांना, झाडांना इजा झालेली त्यांना अजिबात चालत नसे. खास फुलपाखरां साठीचे उद्यानही सदाशिवरावांनी दाखवले. विविधरंगी फुलपाखरे पाहताना मन बालक होऊन गेले.
दुपार होऊन गेली होती. अभयारण्याचा काही भाग पाहून आम्ही घरी परतलो. एका लाकडी साकवावरुन आम्ही पुढे आलो. थंडी पडायला सुरुवात झाली होती. साकवाच्या पलिकडे कोणाचेतरी शाकारणी केलेले घर दिसत होते. दुसऱ्या बाजुला माडांची बाग होती. संध्याकाळ च्या धुसर प्रकाशात त्यांच्या सावल्या दिसत होत्या. त्या घरासमोर एक माणुस स्वेटर, कानटोपी घालुन समोरच्या शेकोटी ची उब घेत होता. सदाशिवरावांना पाहताच त्याने हाक मारली.
"ओ सदाशिवराव आज कुणीकडे वाट चुकलात?"
"काही नाही रे सदया. या साहेबांना शेतं दाखवायला घेऊन गेलो होतो."
तेवढ्यात कुठूनतरी बनके तिथे आला.
"दाखवा, दाखवा साहेबांना सगळं दाखवा. शहरात तरी त्यांना हे कुठं पाहायला मिळणार. शहरात कसं सगळं पॉश, चकचकीत."
"ए बनके लेका तुला काय काळ वेळ आहे की नाही? काहीही बोलतो. ओ साहेब या इकडं शेकोटी घ्या."सदया बोलला.
माझे थंडीने दात वाजत होते. सदाशिवराव,देशमुख आणि मी शेकोटी समोर बसलो. बनकेही आला.
"सदाशिवराव हे घर कुणाचं?"
सदाशिवरावांनी सदया आणि बनकेकडे पाहिले.
"रमाबाईंंचं"
"मग त्या आता येथे राहत नाहीत का?"
सदाशिवराव खिन्न होतात.
"साहेब, जिवंत माणसाला घर हवं असतं, मेलेल्या माणसाला सहा फुट जागाच महत्वाची."
"म्हणजे?"
तेवढ्यात बनके बोलला.
"आता म्हणजे? अहो रमाबाई या जगात नाहीत."
"अरे अरे" मी हळहळलो.
"साहेब, एके काळी तिच्या नाचणीच्या भाकऱ्या गावात प्रसिद्ध होत्या. पण स्वभावाला बेरकी होती. तिचा नवरा मुंबईत मिलमध्ये कामाला होता. तिथेच काम करताना एका अपघातात मरण पावला. रमाबाई ने मात्र हार मानली नाही. पोटाला चिमटा काढून पोराला म्हणजे नामदेव ला शिकवलं. चांगला एम.ए पर्यंत. पण म्हणतात तसं, नोकरी नाही. बेकार राहिला. रमाबाईंनी असलेला नसलेला पैसा शेतीत ओतला. नामदेव शेतीत उतरला. पण उत्पन्न मिळत नव्हते. एकतर नोकरी नाही, शेतीत उत्पन्न नाही याचा धसका घेतला त्यानं. त्याच मळ्यात आत्महत्या केली. रमाबाई ला तर वेडचं लागलं. त्याच मळ्यात ती रात्री अपरात्री एकटीच जाऊन बसु लागली. तिला शेवटपर्यंत काही बरं होता आलं नाही पहा. एक दिवस तिथेच बाजूच्या झाडीत छिन्नविच्छिन्न अवस्थेत तिचा म्रुतदेह आढळला."
सदाशिवरावांच्या डोळ्यात पाणी आले. माझेही डोळे पाणावले. तेवढ्यात विषय बदलत सदया बोलु लागला.
"ते जाऊ दया साहेब. तुम्ही गावात आल्यापासून एक विचारायचं राहिलचं"
"काय?"
"तुम्ही महानगरपालिकेत कोणत्या विभागात आहात?"
"अरे कोणत्याही विभागात असले तरी सरकारीच ते. टेबलाखालूनच कामे होत असतील." बनके खोचक बोलला.
"तु गप्प रहा रे बनके. च्यायला रोज तुझं तेच." सदा बडबडत होता.
"तर मग . अहो गावात इतके प्रश्न आहेत. शेतकरी, कामगार मरतायेत. सरकारनं तेव्हा एवढं काय केलं गावासाठी? आम्ही उठून स्वतः च तयार झालो, म्हणून एवढ्या तरी सुधारणा आहेत."
बनके चिडतच बोलतो.
"अरं पण या गावचा विकास एका सरकारी अधिकाऱ्याच्या प्रेरणेतूनच झालाय, हे का लक्षात घेत नाहीस तु? आणि साहेबांनी एवढं म्युझियमचं कामही हाती घेतलयं." बनके शांतपणे उठला आणि निघाला.
"बरं मी चलतो आता."
मी बनकेच्या पाठमोऱ्या आक्रुतीकडे पाहत राहिलो. मघाशी सदाशिवरावांनी कोणत्या सरकारी अधिकाऱ्याच्या प्रेरणेने हा विकास झाला ते विचारणार तेवढ्यात सदा बोलला.
"साहेब मघाच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही"
"मी शहर विकास विभागात आहे."
"वा चांगलं आहे की. आम्ही कधी तिकडे आलो तर ओळख ठेवा."
"ते ठेवतील ओळख. बरं चला साहेब निघुया ,खुप अंधार झालाय." मी , देशमुख आणि सदाशिवराव उठलो, आणि चालायला लागलो. मन उगाच काहीसे अस्वस्थ झाले होते.
सदाशिवरावांनी आयुर्वेदिक औषधोपचारांचे हॉस्पिटल ही दाखवले. देशमुख तर जंगलात फिरुन आल्यामुळे पिसारा फुलवुन नाचणाऱ्या मोराप्रमाणे थुईथुई करत होता. त्याने गावाचा, जंगलाचा असा अनुभव पहिल्यांदाच घेतला होता. संध्याकाळ चे सहा वाजले होते. अशावेळी घराकडे आल्यावर साहजिकच घरातील जाणती व्यक्ती चिडणार हे साहजिकच होते. पण आईंनी उलट हसुनच सदाशिवराव आणि आमचे स्वागत केले. मस्त ज्वारीची भाकरी आणि मिरचीचा ठेचा हातावर ठेवला. मक्याची कणसे, हुरडा आणि रानमेवा खाऊन भरलेली आमची पोटे त्या प्रेमाच्या शिदोरीने त्रुप्त झाली, पण त्या दिवशी सदाशिवरावांना काही विचारायचे होते ते विसरून गेलो.
थोडावेळ विश्रांती घेतल्यानंतर सदाशिवराव बाजारमंडीकडे जायला निघाले.
"साहेब दमला असाल. आराम करा. मी जरा बाजारमंडीतलं काम आटोपुन येतो."
"छे हो दमलो कुठे? चला मीही येतो."
सदाशिवराव हसले. देशमुख मात्र समाधानाने झोपला होता. आम्ही शेताच्या रस्त्याने दहा मिनिटात बाजारमंडीत पोहोचलो. प्रत्यक्षात अतिशय भव्य व सुसज्ज अशी इमारत पाहून माझे डोळे दिपले. प्रशस्त लॉन, फुलांनी व पानांनी सुशोभित केलेले कुंपण, वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था. बाजारमंडीचे वेगवेगळे विभाग होते. शेतमालाच्या बाजाराला मंडी म्हणत असत. गावातल्या गावात बहुतांश शेती पिकवली जात असे, बाहेरच्या व्यापाऱ्यांकडून काही प्रमाणात मालाची आयात होई. पण त्या मालाची, पिकणाऱ्या शेतीची व कडधान्ये, दुध, फळफळावळ सगळ्यांची गुणवत्ता व भेसळ तपासणी होत असे. त्याची वेगळी प्रयोगशाळा होती. मालाची किंमत ठरवण्यासाठी ग्रामस्तरावर किंमत निर्धारण समिती होती. उगाचच भाववाढीने बेजार करुन लुटमार होऊ दिली जात नव्हती. किंमत वाढली तरी त्याचे ग्रामसभेत सखोल स्पष्टीकरण करावे लागे. कपड्यांसाठी, भांड्याकुंड्यां साठी, जिवनावश्यक वस्तुंचे वेगळे बाजार होते. त्या सर्वांवर बाजार सनियंत्रण समिती देखरेख करत होती. देशी वस्तुंचाच तिथे बोलबाला चालत होता. अगदी इतर कुठे न मिळणारी देशी उत्पादने. देशमुख असता तर नक्कीच थोडा खिसा हलका झाला असता. मी सगळीकडे फिरत होतो. खोट काढावी असं काही नव्हतं. पण मानवी स्वभावच तसा असतो, की त्याला सगळचं चांगले चाललेले पाहवत नाही.
सदाशिवरावांनी माझी ओळख बाजार समितीच्या व्यवस्थापकांशी करुन दिली. त्यांना मी विचारले.
"रागावू नका. पण येथे ही सर्व तपासणी वगैरे शिस्तबद्ध होते की नाही हे कसं कळणार? आणि इतर शेतकऱ्यांप्रमाणे येथेही मालाला योग्य किंमत न मिळण्याचे प्रकार घडत असतीलच."
"बरोबर आहे साहेब तुमचं. मालाला योग्य किंमत न मिळाल्याच्या अनुभवातुन आम्ही ही गेलो आहोत. शेतमालाला योग्य किंमत मिळावी यासाठी शेतमाल तपासणी करुन ऑनलाइन पध्दतीने विविध ठिकाणी निर्यात केला जातो. गुणवत्ता व दर्जा महत्त्वाचा. मालाला योग्य किंमत मिळावी यासाठी पाठपुरावा केला जातो. सरकार दरबारी समितीची काही माणसं विगतवारी करुन एका विशिष्ट दिवशी शेतकऱ्यांची मुलाकत थेट मंत्र्यांशीही करुन देतात. तिथे मालाच्या योग्य परीक्षणानंतर किंमत दिली जाते. यात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार चालत नाही. अहो शेतकरी हा अन्न दाता. त्याच्या हातात पैसा असला, घरात सूखे असली तरच तो भरभरून देणार आणि तेव्हाच आमच्या गावाचे नाव राखले जाणार. साहेब, तुमच्याकडील शहरी लोक, गावातील शेतकरी कसे आत्महत्या करतात ते टीव्हीवर पाहणार,काही काळापुरती हळहळ व्यक्त करणार. पण साहेब हे शेतकरी सुध्दा माणुसच आहेत याचा विचार कोणी करत नाही. त्यामुळे त्यांच्या ही काही मागण्या लक्षात घ्यायलाच हव्यात. साहेब, घरात खायला मांडे असताना आश्वासनांचे कागदी घोडे नाचवून काय उपयोग? पण एक मात्र आहे, आंदोलन करताना शेतकरी टोमॅटो, दुध या सारख्या मालाची अक्षरशः नासाडी करतात. बैंकेचे, एसटीचे लोक आंदोलने करताना असं कधी केलेले पाहिले आहे का? त्यांनीही रस्त्यावर पैसा टाकावा, गाड्या तोडून टाकाव्यात. अहो आत्महत्या करुन फक्त कागदावरचे आकडे फुगत जाणार. नाही नुसत्या फुकाच्या बोलांनी किंवा तत्वज्ञानाची मुळी पाजळुन शेतकऱ्यांचे प्रश्न खचितच सुटणार नाहीत. त्याला प्रत्यक्ष क्रुतीची सांगड घातली पाहिजे. तरच गुण येणार. पण तो गुण मिळवणे हे शेतकरी लोकांच्या आणि जनता जनार्दनाच्या हातातच आहे. साहेब, आमच्या मंडीत शेतकरी वर्गाच्या भावना आम्ही जाणतो, पण गुणवत्ताही महत्वाची आहे. त्यामुळे इथे ही तपासणी करावी लागते. आणि राहिला प्रश्न इथल्या तपासणी पध्दतीचा . तर हे बघा सगळीकडे कुठल्याही परिस्थितीत चालु राहणारे सीसीटीव्ही आहेत. शिवाय संगणकीय प्रणाली एवढी काटेकोर ठेवलीय की कोणतीही चुक होऊ नये. आणि अहो एवढंही असलं तरी लोकांची ती मानसिकता ही पाहिजेच ना. आमच्याकडे सुदैवाने ती मानसिकता टिकून आहे. पाहा तुम्ही."
खरोखरच या चार दिवसांत मला तो अनुभव आला होता. बाजारातील प्रत्येक जण आपल्या कामात बुडून गेलेला होता. एके ठिकाणी सदाशिवरावांनी मला टाकून दिलेल्या टोमॅटो, दुध किंवा पालेभाज्या यांचा पुनरवापर करुन त्यापासुन नवीन देशी काही बनवणेचे प्रकल्पही दाखवले. खजिना शोधायचा असला तर तो राखेतुनही मिळतो. एखाद्याने एखाद्याला कितीही मोडायचे ठरवले, तरी त्याने मोडुन गेलं तर पाहिजे ना? आम्ही मात्र सुसंस्कृत पणाचा, सभ्यतेचा बुरखा घालुन वावरतो, पण एक तलफ चहाची, चायनीज ची आम्हांला येतेच की.
आपला व्यवहार आटोपुन सदाशिवराव बाहेर पडले, मागोमाग मी बाहेर पडलो. खंडो सुतारला मला भेटायचं होतं, म्हणुन उशीर झालेला असताही सदाशिवरावांना आग्रह करुन मी तिकडे जाण्याचे सांगितले. झपझप चालत आम्ही खंडो सुतारच्या घराकडे पोहोचलो, तेव्हा ७.०० वाजून गेले होते.
सारवलेले अंगण व त्यावर शिंपडलेला सडा आणि वर पत्र्याचे छप्पर. घर अतिशय साधे होते. आम्ही गेलो, तेव्हा खंडो सुतारच्या बायकोने आमचे स्वागत केले, आणि आम्ही बाहेरच्या ओसरीवर बसलो. थोड्या वेळाने सावकाश पावले टाकत खंडो सुतार आला. त्याच्या हातांना भले मोठे बैंडेज गुंडाळले होते. आम्ही हातानेच त्याला इशारा केला, व आतल्या खोलीत आलो. खंडो सुतार बाकावर बसता बसता म्हणाला.
"खुप बरं वाटलं साहेब, तुम्ही भेटायला आलात ते पाहून."
"खंडोबा, आता बरं वाटतयं ना?" मी विचारले. तेव्हा माझा हात हातात धरुन तो बोलु लागला.
"साहेब, गावातल्या म्युझियम साठी तुम्ही काम करता असं ऐकलं आणि सगळं दुखणं दुर झालं बघा."
माझं मन भरुन आलं.
"खंडोबा त्या म्युझियसाठी तुम्ही तुमचा जीव धोक्यात घातलात, त्या मानाने मी काहीच नाही."
"असं बोलु नका साहेब. अहो आपले जवान आपल्यासाठी सिमेवर लढतात, गोळ्या झेलतात. तर मग आपली ही राष्ट्रीय संपत्ती, हे धरोहर वाचवण्यासाठी जीव धोक्यात आला तर काय बिघडलं?"
मला अभिमान वाटला. सदाशिवरावांनी ही खंडो सुतारकडे प्रसन्नपणे पाहिले, आणि बोलले.
"पाहिलतं साहेब असा विचार करणारी माणसे कमावणे ही आमच्या गावाची शान आहे. आम्ही उगाच बढाया मारुन, डांगोरे पिटुन सांगत नाही. तर प्रत्यक्ष क्रुतीतुन ते सिद्ध करतो."
"अशा माणसांचा तर सत्कार व्हायला हवा."
"हो नक्कीच करुया. चांगल्या कामासाठी प्रोत्साहन दिलेच पाहिजे. आपण उद्या सरपंचांना भेटुया, पाटीलांशीही बोलुया."
मी हसलो. सदाशिवराव आणि मी खंडो सुतारला काळजी घ्यायला सांगत उठलो, आणि बाहेर पडणार एवढ्यात त्याची बायको खास शिकरण घेऊन आली. आम्ही चकित झालो. मी म्हणालो,
"राहू दे खंडोबा, पुन्हा केव्हातरी."
खरतर आजारी माणसाकडे जास्त वेळ राहणे ठिक नव्हते. पण खंडो सुताराने बराच आग्रह केला, तेव्हा त्याचे मन मोडवेना. थोडासा नाश्ता करुन आम्ही बाहेर पडलो. रात्री ८.१५ वाजता आम्ही घराचा उंबरठा ओलांडला. देशमुख आईंशी काहीतरी बोलत बसला होता. आम्ही येताच ते दोघे उठले.
"काय? कसल्या एवढ्या गोष्टी चालल्या होत्या?" मी हसत हसत विचारले. तेव्हा आई म्हणाली.
"काही नाही हो, हे देशमुख मला जंगलात प्राणी कोणते असतात? शेतीत तुम्ही असे चांगले चांगले प्रयोग कसे करता? ते विचारत होते."
"मग सांगितलं का आमच्या साहेबांना?"
आई हसत हसत म्हणाल्या.
"हो हो सांगितलं की."
मी देशमुखकडे पाहत होतो. तोही खुश दिसत होता. एकाएकी हसता हसता आईंना जोराचा ठसका लागला. मी आणि सदाशिवराव पटकन तिच्याजवळ आलो. देशमुखही घाबरुन पाहू लागला.
"आई बरं वाटत नाही का?" सदाशिवरावांनी विचारलं.
"काही नाही रे जरा खोकला झालाय, काढा घेतला की वाटेल बरं."
"काही नको आई आपण डॉक्टर ना बोलवुया." मी काळजीने म्हणालो.
सदाशिवरावांनी लगेच डॉक्टर ना फोन करुन बोलवले. काही वेळातच डॉक्टर आले, आणि आईला तपासून औषध देण्यात आले.
"डॉक्टर काही काळजीचं कारण नाही ना?" सदाशिवरावांनी काळजीने विचारले.
"काही नाही. मी काही औषधे, गोळ्या लिहून दिल्यायेत. होईल कमी."
डॉक्टर निघुन गेले. रात्रीचे ९.०० वाजले होते. आई सदाशिवरावांना सांगत होती.
"अरे सदाशिवा, उद्या त्या जनार्दन चं लग्न आहे ना?"
सदाशिवराव काहीसं आठवून बोलले.
"अरे हो की विसरलोच. उद्या सकाळी १०.०० वा.आहे ना ते? पण तुझी तब्येत बरी नाही."
"अरे आहे मी बरी, तु नको काळजी करुस. या साहेबांनाही घेऊन जा."
"काही नको मी राहतो इथे. सदाशिवराव तुम्ही देशमुख ला सोबत घेऊन जा."
तेवढ्यात देशमुख बोलला.
"म्हात्रे साहेब. जा तुम्ही,आईची काळजी मी घेईन. शिवाय त्यांच्याशी बरचं काही बोलायचं आहे. "
मी आईंकडे पाहिले. त्यांनी हसूनच मला जाण्यासाठी विनवले.
"देशमुख आईंना जप. जास्त काही त्यांना विचारु नकोस."
आम्ही आमची जेवणं आटोपली. आईंकडे एकदा पाहून मी पलंगावर पहुडलो.
६.
आजचा आमचा पाचवा दिवस होता. सदाशिवरावांच्या आईंची तब्येत बरी नसल्याने मनात घालमेल होत होती. सदाशिवरावांनी सर्व तयारी केली. निळा सदरा आणि पांढरी विजार यात ते रुबाबदार दिसत होते. जाताना एकदा त्यांनी आईच्या तब्येतीची विचारणा केली. तिने हसुनच त्याला आश्वासन दिले.
"चला म्हात्रे साहेब, आई हसली म्हणजे फुल परमिशन." सदाशिवराव हसले. मी देशमुखला परत एकदा आईंना नीट पाहण्याबददल सुचना केली, व आम्ही लग्नासाठी बाहेर पडलो.
एक अतिशय सुंदर पानाफुलांनी सजवलेला मंडप उभा होता. उगाचचा भरमसाठ खर्च करुन केलेली क्रुत्रिम रोषणाई किंवा सजावट नव्हती. वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग होते. गणपतीची सुरेख मुर्ती मंडपाच्या आत मध्यभागी ठेवलेली होती. सगळीकडे कमालीची स्वच्छता, कचराकुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. प्रवेशद्वाराकडे लग्नासाठी येणाऱ्या माणसांना गुलाबाचे फुल, सुगंधी तयार अत्तर व रंगीत कागदी फुलांची छोटी पुडी देण्यात येत होती. लग्नासाठी काही खासच लोक आले होते. तिथे उगाचची गर्दी नव्हती. त्या रंगीत फुलांबद्दल मी सदाशिवरावांना विचारले.
"वधु वरांना शुभार्शिवाद देण्यासाठी. अहो अक्षता म्हणुन वधु वरावर तांदूळ टाकले जातात. त्याची नासाडीच होते. ही कागदी फुले खास कागदापासून बनवली आहेत. पण यासाठी व्रुक्षांची कटाई होत नाही. शिवाय प्रदुषण ही होत नाही."आम्ही लग्न मंडपात आलो. वधू वरांचा पुण्याहवाचन विधी सुरु होता. निसर्गातील तत्वे व त्याच्या विविध रुपांच्या प्रतिमा यांचे पुजन करण्यात आले. शिव- गौरी आणि देवी लक्ष्मी चे स्तवन व पुजन करण्यात आले. पुण्याहवाचनाचा विधी संपन्न झाला. शिव- गौरी मध्ये चराचर जग सामावले आहे. देवी लक्ष्मी वैभवाचे प्रतिक, निसर्गाच्या प्रत्येक रुपात देव आहे म्हणून त्याची पुजा केली होती.
मंगलाष्टकाच्या मधुर सुरात लग्नाला सुरवात झाली. अंतरपाटापलीकडे दोघेही उभे होते. नवरा-नवरीचा वेश साधा, गावाला व लग्नाला साजेसा होता. सन ईचे मंजुळ सुर कानी पडले. दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात हार घातले. नंतर नवऱ्या मुलाने मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. त्याचे काही विशेष नव्हते. पण नवऱ्या मुलीनेही मुलाच्या गळ्यात घालणेसाठी समोर मंगळसुत्र धरले. मी चकित झालो, पण बाकीचे आनंदी होते. मुलीने मुलाच्या गळ्यात मंगळसुत्र बांधले, आणि ती ते समोर करुन दाखवू लागली. मंडपात स्टेजवर असलेल्या बायकांनी पटापट फोटो काढले. मला काहीसे वेगळं वाटत होत, म्हणून मी सदाशिवरावांना हळूच विचारले.
"मग त्यात काय एवढं? अहो सगळी बंधन, सगळे रिती रिवाज बायकांनीच पाळायचे. पुरुषांनी का पाळू नये. बायका व्रत वैकल्ये करतात, आणि पुरुष मात्र खाऊनपिऊन बाजुला राहतात. आमच्या गावात पुरुष वटपौर्णिमेचे व्रतही धरतात, आणि उपासही करतात. अहो हे सर्व केल्यामुळे काहीतरी चांगलं होईल वगैरे अंधश्रद्धा आहेत. पण जिवंत पणी जे पती पत्नीचे नाते जोडले जाते, त्यातील प्रेम, परस्परांचा आदर कायम राहतो. हां आता तो आदर कसा ठेवावा, हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे."
मला नवीन काहीतरी समजले असा माझा चेहरा झाला. खरतर आपली पुरुषी मानसिकता अजुनही स्त्रियांना दुय्यम लेखण्याची आहे. लग्नानंतर त्यांनी आपले सगळं केलं पाहिजे, रिती रिवाज पाळले पाहिजेत, हे पुरुषच ठरवतात. मुलीला लग्न करुन सासरी जावं लागतं, तिथलं सगळं करावं लागतं. मग जर मुलाला लग्न करुन सासरी जावं लागतं असेल तर? तिथे पुरुषांचा, समाजाचा इगो दुखावला जातो.
लग्न झालं, आम्ही स्टेजवर जाऊन जनार्दन ला भेटलो. तो व त्याची पत्नी खुश होती. जनार्दन ची आई तर सुनेचे कोडकौतुक करत होती.
"पहा साहेब, सासु सुनेचं नातही प्रेमाचं पाहिजे. दोघांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. दरवेळी फक्त मीच का समजून घेऊ, सामंजस्याने वागु असं केलं तर वाद व्हायला वेळ लागणार नाही. ही कसरत फक्त नवऱ्या मुलीच्या बाबतीतच नाही, मुलानेही करायची आहे. तरच कुटुंबातील समानता, प्रेम टिकून राहेल."
जनार्दन नेही हसून मान डोलवली, अहेर म्हणुन किचन सेट आणला होता, तो देऊन आम्ही लगबगीने घरी जाण्यासाठी बाहेर पडलो. दोघांनाही आईंची काळजी वाटत होती. तसा मी देशमुखला फोन केला होता, तेव्हा ती बरी असल्याचे त्याने सांगितले होते. पण आम्हांला घरी गेल्याशिवाय चैन पडणार नव्हती. दुपारचे बारा वाजले होते. शेताच्या बांधावरुन आम्ही पुढे आलो. अशोक ,खैर, साग असे मोठमोठाले व्रुक्ष उभे होते. त्यांच्या सावलीतुन जाताना बरं वाटत होतं. मध्येच एखाद्या पक्ष्याची तान त्याच्या अस्तित्वाची जाणीव करुन देत होती. प्राजक्त, चंपा- चमेलीचा संमिश्र सुगंध दरवळत होता. आम्ही घरी पोहोचलो, तेव्हा समोर नथीबाई आईंच्या जवळच्या खुर्चीवर बसल्या होत्या. आम्हाला पाहून त्या उभ्या राहिल्या. इथे आल्यापासून त्यांच्या हातचं जेवायची इच्छा राहिली होती.
"नथीबाई तुम्ही इथे ? सगळं ठिक आहे ना?" मी विचारले. तशी चेहऱ्यावरची निराशा लपवत नथीबाई बोलल्या.
"काही नाही साहेब. सहजच आले होते. तुम्हाला माझ्या हातचं काहीतरी पाहिजे होतं ना, ते घेऊन आलेय."
नथीबाई खोटचं हसल्या. त्यांचं कोंदटलेलं मन किती केल्या लपु शकत नव्हतं. मी समोरचा डबा उघडला, आणि त्या वासानेच पोटातील भुक खवळली. नथीबाईंंनी भोपळ्याचे घारगे, ज्वारीची भाकरी आणि वालाची उसळ आणली होती. वर मिरचीचा ठेचाही होता. मला आणि देशमुखला भुक आवरेना. आम्ही त्यावर तुटून पडलो, पण नंतर आमची आम्हांलाच लाज वाटली. एकतर आईंची तब्येत ही मी विचारली नव्हती, वर सदाशिवराव समोर होते. त्यांना खाण्याचा आग्रह केला नव्हता. मी ओशाळून म्हटले,
"माफ करा आई, सदाशिवराव. आल्यावर मी आईची तब्येत ही विचारली नाही. आणि तुम्ही समोर असताना हे असं खाण्यावर तुटून पडलो."
सदाशिवराव व आई हसले. नथीबाईंंच्या चेहऱ्यावर ही हसु होते. आई बोलल्या.
"असु द्या हो साहेब. माझी तब्येत आता बरी आहे. आणि खाण्यावर तर तुटुनच पडायचं असतं, जे तुम्ही केलत. असल्या लहान सहान गोष्टींवरुन मनात राग कसला धरणार?"
मी वरमलो. माणसाचे मन हे असे रबरासारखे असते. अबोला धरला, राग केला की ते ताणत जाते. पण प्रेमाच्या, आपुलकीच्या भावनेने ते मन स्थिर व शांत राहते. गावात येऊन मला चारच दिवस झाले होते, पण सदाशिवराव, खंडो सुतार, महादेव, नथीबाई असे कितीतरी स्नेही जमले होते. आईने तर गावातील आपली सभ्यता, संस्कृती जपली होती, व कुरकुर न करता त्या आमच्या आदरतिथ्य करत होत्या. नथीबाई ची उदासी माझ्या नजरेतुन काही जात नव्हती. मी आपुलकीने तिला विचारले.
"नथीबाई तुम्ही खरचं काहीशा उदास दिसताय. काय झालं ते सांगणार नाहीत का?"
माझ्या या आपुलकीच्या बोलांनी नथीबाई विरघळली. डोळे पाणावले, व ती बोलु लागली.
"काय सांगु साहेब, आपल्या भाळी काय आहे ते टळत तर नाही ना?"
"म्हणजे? " मी न समजून विचारले.
"साहेब यांना काल खुपच पोटात दुखतं होतं, आमच्या हॉस्पिटलमध्ये तपासणी केली, आणि.....आणि."
"नथीबाई आणि काय?"
"कैंसर. यांना आतड्याचा कैंसर आहे." नथीबाई हुंदके देत रडत होत्या. मी त्यांचे सांत्वन करण्यासाठी काहीतरी बोलणारच होतो, की पुढे त्याच बोलु लागल्या.
"पण साहेब, हिंमत हरुन चालणार नाही. अशी वादळे आयुष्यात येतातच, पण त्यामुळे उध्वस्त होऊन चालणार नाही. या गावच्या मातीने मला हे शिकवलं आहे."
मला नथीबाईंचा खुप अभिमान वाटला. माणसाला नियतीने कितीही मोडायचं ठरवलं, तरी पाय देऊन उभं राहायचं असतं. नथीबाई उठल्या. मी, देशमुख आणि सदाशिवरावांनी काय लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले. मला म्युझियम च्या काही भागांचे सर्वेक्षण करायचे होते. जवळजवळ ७० % काम पुर्ण झाले होते. साहेबांचीही या कामी मदत झाली होती.
"अरे, या सगळ्यात मला म्युझियम कडे जाऊन यायचं राहिलयं. शिवाय सरपंचांना व पाटलांनाही भेटायचं होतं ना?" मी सदाशिवरावांकडे पाहत विचारले.
"हो हो आपण जाऊया संध्याकाळी. आता मी जरा शेतावर जाऊन येतो." सदाशिवराव आम्हा तिघांकडे हसत पाहत बाहेर पडतात. तो गेल्यावर आईही उठते.
"चला मी जेवणाची तयारी करते."
"पण आई तुमची तब्येत?"
"बरी आहे. चला जाते मी." म्हणत आई किचनमध्ये जातात. देशमुख आणि मी बोलत बाहेर बसलो. देशमुख चं हे एक बरं होतं, त्याला जास्त फिरायला, कुणाशी जास्त बोलायला आवडत नसे. दिवसभर तो मासिके, पुस्तके वाचत आणि शेतांचे व पक्ष्यांचे निरीक्षण करत असे.
अर्ध्या एक तासाने आईने आम्हाला जेवायला बोलावलं. सदाशिवराव अजून आले नव्हते, म्हणून मी थांबून होतो. पण आईंनीच आग्रह करुन जेवून घ्यायला सांगितले. आम्ही आमची जेवणं आटोपली. मला डुलकी आल्यासारखी वाटत होती, म्हणून मी खोलीत गेलो. तर देशमुख बाहेर सोफ्यावर आईसोबत मासिक वाचत बसला. जुनी मराठी गाणी मोबाईलवर लावून मी ऐकु लागलो, की तेवढ्यातच माझा डोळा लागला. जाग आली, तेव्हा आई समोर होत्या. मला पाहताच हसुन म्हणाल्या.
"काय? डोळा लागला होता वाटतं?"
"होय हो. बरं वाजलेत किती? आणि सदाशिवराव आलेत की नाहीत?"
"आता चार वाजलेत. सदाशिव कधीचा जेवून खावून पुस्तक वाचत बसलाय. तुमचे मित्र देशमुख आत्ताच बाहेरच्या सोफ्यावरच झोपले."
मी उठलो. सदाशिवराव खुर्चीत बसुन पुस्तक वाचत होते,'माझी जन्मठेप'. मी हसुन त्यांना विचारले.
"वा सदाशिवराव वाचन चाललयं वाटतं?"
सदाशिवरावांनी मान वर केली.
"साहेब, या. अहो पुस्तक वाचन माझी आवडच आहे. त्यात अशा महान लोकांची पुस्तके वाचणे म्हणजे काहीतरी शिकण्यासारखेच असते की."
मी हसुन मान डोलवली. ते पुढे बोलु लागले.
"अरे आपल्याला सरपंचांना भेटायला जायचं होतं ना?"
"नाही, नको तुम्ही पुस्तक वाचताय ना?"
"अहो हे पुस्तक मी वाचलं आहे, पण यांचं जिवनच असं होतं की पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते."
सदाशिवराव तयार झाले. मीही तयार झालो. देशमुखला उठवून काहीतरी सांगणार होतो, तोवर आईंनी रोकले. आईंचा निरोप घेऊन आम्ही ग्रामपंचायतीच्या दिशेला निघालो. जवळचे अंतर होते, म्हणून पायीच निघालो. या गावात आल्यापासून वाहनाचा वापर केला नव्हता. मुळात इथले लोक जवळचे अंतर पायीच कापत. एवढंच काय अगदी १-२ किलोमीटर चालत जात. शिवाय पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. जिवनावश्यक वस्तू ही प्रचंड महाग झाल्या आहेत. खरतर कारणं काही असो, अमेरिका, जपान सारख्या श्रीमंत राष्ट्रांना लागु पडणारे धोरण भारताला लागु पडणार आहे का? आपल्या देशात गरीब, मध्यमवर्गीय लोकच जास्त. त्यांच्या हातात सदैव पैसा थोडाच खुळखुळत राहणार आहे, आणि दुसरं म्हणजे आधीच आपल्याकडे वस्तुंच्या किमती जास्तच आहेत. मग आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाची किंमत वाढली किंवा बाकीच्या वस्तुंची किंमत वाढली म्हणुन आपल्याकडे भाववाढ होते ही सबब योग्य वाटते का? असो, मी तो विचार तिथेच सोडून दिला. आम्ही ग्रामपंचायतीच्या प्रशस्त गेटकडे आलो. बाहेरच्या बाजुला रस्त्यावर गुलमोहोर बहरला होता. त्याचे सौंदर्य न्याहाळत आम्ही आत प्रवेश केला. समोर व्हाईट हाउस लाही मागे टाकेल अशी पांढऱ्या रंगातील इमारत उभी होती. ती पाहून सदोदित मनात असणारी ग्रामपंचायतीची प्रतिमा पुसुन गेली. विविध आकाराची, सुंदर शोभेची झाडे प्रागंणात लावली होती. रंगीबेरंगी पाण्याचा कारंजा लक्ष वेधून घेत होता. गप्पी मासे पैदास केंद्र आणि घनकचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प समोरच उभे होते. पाणपोई ची सोयही करण्यात आली होती. वाहनांचे स्वतंत्र पार्किंग होते. इमारतीच्या बाजुला तलाठी कार्यालय व पोस्ट ऑफिस होते. पोस्टाची पोस्ट पेमेंट बैंकही तिथे उभी होती. मी व सदाशिवराव पायऱ्या चढून आत आलो. प्रवेशद्वाराजवळचे वेलकम सॉंग लागताच मी दचकुन आजुबाजुला पाहिले. बाहेरच्या हॉलमध्ये प्रतिक्षा कक्ष होता. तिथे सोफे वगैरे ठेवले होते. अनेकविध फुलांचा संमिश्र सुगंध दरवळत होता. हॉलच्या भिंतींवर युगपुरुषांचे, क्रांतीकारकांचे फोटो लावलेले होते. त्याखाली नाव व त्यांची संक्षिप्त माहिती होती. सुदैवाने सरपंच महोदय आपल्या कक्षात होते. सदाशिवरावांनी मध्येच भेटून त्यांना माझ्याविषयी सांगितले असावे.
आम्ही आत जाताच हसुनच त्यांनी आमचे स्वागत केले. सरपंच पदाला शोभेल असा कक्ष होता. भिंतीवर विविध योजनांची माहिती सांगणारे डिजिटल बोर्ड होते. मी आणि सदाशिवराव समोरच्या खुर्चीत बसलो, व त्यांना विषयाची कल्पना दिली.
"बरोबर आहे साहेब तुमचं. खरतर त्याच दिवशी सत्कार करणार होतो त्यांचा. पण त्याचवेळी ग्रामपंचायतीत एक महत्त्वाचे काम निघालं. आज संध्याकाळी सभा लावुन टाकु, त्यात सत्कारसमारंभ पार पाडुया."
मी थांबलो, आणि थोड्या वेळाने म्हणालो.
"बाकी ग्रामपंचायत चांगली आहे, आणि गावही खुप चांगला व आदर्श वाटला. तुम्हाला आदर्श ग्राम पुरस्कार मिळाले असतील ना?"
सरपंच साहेब हसले.
"त्याचं कसं आहे साहेब. पुरस्कार मिळाले, सत्कार मिळाले म्हणजे इतिश्री झाली असं समजणं चुकीचं आहे. अहो आजकाल पुरस्कारांचे पेव फुटले आहेत. चांगल्या कामाचा सन्मान जरुर करावा, पण त्यात राजकारण, स्पर्धा असु नये. तसं पाहिलं तर या गावातील प्रत्येक व्यक्ती सन्मानाला पात्र का ठरु नये?"
मी काहीच बोललो नाही. सरपंच पुढे बोलत होते.
"साहेब, काय जास्त बोललो असेन तर माफ करा. पण सत्कार पुरस्काराचं म्हणत असाल तर कोणाचे मुल्यमापन पुरस्कारावर केले जाऊ नये. आमच्या गावातुन अनेक लोक अनेकविध क्षेत्रात नाव कमवत आहेत. सोबत दुसऱ्यांनाही मार्गदर्शन करत आहेत, एक चांगला नागरिक बनवणे हाच आमच्यासाठी पुरस्कार नाही का?"
तेवढ्यात खास सरपंचांनी आवळा सरबत मागवले. गावातील विविध क्षेत्रातील व्यक्तीच्या कामांची डिरेक्टरी ही पाहिली. जी वाचून इतरांनाही काहीतरी करण्याची, बनण्याची प्रेरणा मिळुन जाईल. पण या गावात त्या प्रेरणांना गती देण्याचं कामही होत होतं. सरपंचांनी खास माझ्या सोबत फोटो काढला. निरोप घेऊन आम्ही निघालो. रस्त्यावरुन चालत जात असताना एका घराच्या परसदारात अळंबी लागवड केलेली दिसली, म्हणून माझी पावले तिथेच रेंगाळली. सदाशिवरावांनी माझे भाव ओळखले व ते बोलु लागले.
"हे घर कल्पना ताईंचं. कल्पना सगुणे. हिचे मिस्टर राम सगुणे पुण्यात फार्मास्युटिकल कंपनीत चांगल्या पदावर आहेत. ते महिन्यातुन एक दोनदा येतात. हिचा मुलगा अमेरिकेत होता. हॉवर्ड विद्यापीठात मेडिकलचे पुढील शिक्षण घेत होता. दुर्दैवाने मागील वर्षी नवेगावजवळच्या सरोवरात पोहायला गेले असताना त्याचे अपघाती निधन झाले. आता ती आपली मुलगी सायली सोबत राहते. अळंबी प्रोजेक्ट चं काम पाहणारे रामजीकाका जवळच्या आऊटहाऊसमध्ये राहतात."
सदाशिवरावांनी थोडक्यात ओळख करुन दिली. आम्ही फाटक उघडून आत गेलो. कल्पना ताईंना सदाशिवरावांनी हाक मारली, तशा त्या बाहेर आल्या . सदाशिवरावांनी माझी ओळख त्यांना करुन दिली. कल्पना ताईंनी उभारलेला अळंबी लागवड प्रकल्प छान होता. शिवाय विविध औषधी वनस्पती त्यांनी आपल्या बागेत लावल्या होत्या. विशेष म्हणजे जैविक पद्धतीने उगवलेले बियाणे ते आपल्या बिज विक्री केंद्रात विकत असत. कल्पना ताईंनी बऱ्याच औषधी वनस्पतींची आम्हाला ओळख करुन दिली. त्यांचा पेहराव ग्रामीण पण मुख्यत्वे खादीचा होता. सहज म्हणून त्या माझ्याशी बोलत होत्या.
"साहेब, आपली दुःखे कोणाला सांगत बसायची नसतात. उलट ती संधी समजुन काम करायचं असतं. अळंबी लागवडीतुन म्हटलं तर ६० ते ७० हजाराची वार्षिक कमाई होते. गावात अशा प्रकारचे २५ तरी प्रकल्प आहेत."
मी समाधानाने तो प्रकल्प पाहत होतो. कल्पना ताईंनी खास आम्हांला भेट म्हणून अळंबी दिली. आम्ही तेथून निघालो. सदाशिवराव घरी परत गेले, तर मी म्युझियम कडे माझा मोर्चा वळवला.
मी म्युझियमकडे आलो. मध्यान्हीचा सुर्य बराच वर आला होता. शेताच्या लांबच लांब रांगा नजरेत येत होत्या. दुरवर शिवमंदिराचा कळस उन्हात चमकत होता. मी माझ्या कामाला लागलो. तितक्यात माझे लक्ष म्युझियम च्या एका कडेच्या भग्नावशेषाकडे गेले. एक छोटेसे आंब्याचे कलम त्या भगदाडीत बहरुन आले होते. ते पाहून मला उगाच वाटलं, की माणुसही नशिबावर विसंबुन न राहता काम करत राहिला, तर प्रतिकुल जागेत, प्रतिकुल परिस्थितीतही बहरुन येऊ शकतो. मी माझे काम अर्ध्या एक तासात पुर्ण केले, आणि घरी आलो.
घरी आल्यावर एक अनपेक्षित माझ्यासमोर होते. आईंची तब्येत अचानक बिघडली होती, व सदाशिवराव तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले होते. देशमुख एकटाच माझी वाट पाहत होता, मी त्याला फैलावर घेतले.
"अरे एवढी तब्येत खराब झाली, मला फोन करुन सांगायचस तरी?"
"सॉरी म्हात्रेसाहेब. पण सदाशिवरावांनी व आईंनीही मला मना केले होते. तुम्ही कामात असाल, तुम्हांला उगाच वारंवार त्रास नको, असे ते म्हणत होते."
नकळत माझ्या डोळ्यात पाणी आले. दुःखे ही कुणाला सांगायची नसतात. मी देशमुखला घेऊन तडक हॉस्पिटलमध्ये आलो. अतिशय सुसज्ज दहा मजली हॉस्पिटल होते ते नाव होतं डॉ.दातार हॉस्पिटल. खालच्या कौन्सिलिंग कक्षात चौकशी केली तेव्हा आईंना पाचव्या मजल्यावरील आयसीयु वॉर्ड मध्ये शिफ्ट केल्याचे समजले. मी आणि देशमुख लिफ्टने तिथे पोहोचलो. सदाशिवराव बाहेरच उभे होते. मी येताच सदाशिवरावांनी हळुच बाहेरुनच आम्हाला आईंना दाखवले.
"आता कशा आहेत त्या?" मी विचारले.
"बऱ्या आहेत. डॉक्टर आत्ताच राऊंडला येऊन गेले."
आम्हांला रुग्णाच्या सुरक्षिततेसाठी आत सोडले नव्हते. मी आणि देशमुख सदाशिवरावांसोबत बाहेरच्या सोफ्यावर बसलो.
"हॉस्पिटल बरचं मोठं आहे की?"
सदाशिवराव नेहमीप्रमाणे काहीतरी सांगणार अशी माझी अपेक्षा होती, पण खिन्नपणे हसत ते बोलले.
"साहेब कदाचित पाच सहा वर्षांपूर्वी इथं आला असता तर ते ही नव्हते."
"म्हणजे?" मी गोंधळून विचारले.
"साहेब, हे हॉस्पिटल, ही गावाची सुधारणा एका रात्रीत झालेली नाही. त्यासाठी बरेच मोल चुकवावे लागलेत आम्हाला. साहेब, आजकाल तर लोकांना सगळचं झटपट हवं असतं. "
सदाशिवरावांनी आता आपली चिलखते उतरवुन द्यायला सुरवात केली होती.
"या गावात सुमारे पाच सहा वर्षांपूर्वी असं काही नव्हतं. इतर गावांप्रमाणे किंबहुना त्यांच्यापेक्षा वाईट स्थिती होती. शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत होते. सुशिक्षित बेकारांचे तांडेच्या तांडे शहरांकडे धाव घेत होते. नोकरी नाही तर चांगली बायको नाही. काहीना कुठेतरी छोटी मोठी नोकरी मिळत होती. तर बाकीचे निराश होऊन गावात परतुन शेती करत होते. नैराश्याच्या गर्तेत सदानंद नावाच्या एका उमद्या सुशिक्षित तरुणाने आत्महत्या केली होती. व्यवसाय करायला भांडवल , पैसा उपलब्ध होत नव्हता. लोक असे भजन, किर्तन करण्यात नाहीतर दारुच्या गुत्त्यांवर दारु पिण्यात रमुन जात. एकदा नवटांग टाकली, की मग बस. ही स्थिती अशीच राहिली असती. पण काही काळीज हादरवणाऱ्या घटना घडल्या. रमाकांत शेतकरी , बैंकेकडून घेतलेले कर्ज वेळीच चुकते न केल्याने बैंकेने त्याच्या घरावर जप्ती आणली होती. त्यातच त्याने व त्याच्या बायकोने आपल्या दोन लहान मुलांसोबत आत्महत्या केली होती. सदोबा कुंभारकाम करायचा, चांगली मडकी बनवायचा, पण नोकरी नसल्याने त्याच्या मुलाने गळफास लावुन जीव दिला, आणि त्या धक्क्याने तो वेडा झाला. एके दिवशी त्याची डेडबॉडी गावाजवळील धरणात सापडली. मग मात्र गावकऱ्यांना वाटु लागलं, की काहीतरी आपणच करायला हवं. यात आम्हाला बहुमुल्य साथ मिळाली ती आयुक्त कार्यालयात त्यावेळी उच्च पदावर अधिकारी असणाऱ्या श्रीकांत देशमुख साहेबांची. देशमुख साहेबांनी आमच्या गावातील परिस्थिती उघड्या डोळ्यांनी पाहिली. पहिले पहिले काही लोकांच्या आडमुठेपणामुळे देशमुख साहेबांना काम करणे कठीण जात होते. जास्त कठोर वागुनही उपयोग नव्हता. पण काही समंजस गावकऱ्यांच्या मदतीने त्यांनी विविध क्लुप्त्या लढवल्या. एकदा तर लोकांचे दारुचे व्यसन सुटावे म्हणुन गावात भुत फिरते आणि ते दारु पिणाऱ्या माणसाच्या मानगुटीवर बसते अशी हुल उठवली होती. उद्देश एकच, लोकांनी व्यसनांपासून दुर राहावे. अहो एरवी तेरवी भुतखेत, तारण मारण, बुवाबाजी,देवदेवस्की चालते, तर मग त्यांंचा सदुपयोग होत असेल तर ठिक आहे,नाहीतर या निव्वळ अंधश्रद्धा किंवा लोकांना त्रास देण्याच्या गोष्टी ठरतील. लहान मुलांच्या सवयी बदलणे तर कठीण काम. पण या सगळ्या वादळांवर मात करत पुढे गेलो. संघर्षाचे मुळ प्रेरणेच्या बिजातुनच उगवते. अहो ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी च्या १८व्या अध्यायांत म्हटलच आहे, कर्माची उभारणी मनापासून सुरू होते. मनामध्ये प्रथम संकल्पांचा जन्म होतो. मन आपला संकल्प बुध्दीला कळवतो. बुद्धी इंद्रियांना कर्माचा रस्ता दाखवते आणि त्या मार्गाने कर्म होते. पण वाईट एवढचं वाटतय की हे कर्म, या सुधारणा फार पुर्वीच झाल्या असत्या तर किती लोकांना वाचवता आलं असतं."
मी थक्क होऊन ऐकत होतो. कुठलीही गोष्ट सहज मिळत नसते हे यातुन प्रतीत होतं होतं. खरी माणुसकी, प्रेम गावात जिवंत होतं. एवढ्यात आईवर उपचार करणाऱ्या डॉ. अवस्थींची भेट झाली. आजची एक रात्र आईंना ठेवावे लागणार होते. मी राहणार होतो, पण सदाशिवरावांनी प्रेमळपणे माझ्या पाठीवर हात ठेवला.
"साहेब, मी आहे. काळजी करु नका. आणि दुसरं म्हणजे संध्याकाळी सत्कार समारंभ आहे. तिथे तुम्ही जायला हवं."
नाईलाजाने मी हो म्हटलं. दुपारची जेवणाची वेळ झाली होती. त्याच मजल्यावर कैंटिन होते. तिथे खास रुग्णांसाठी कमी तिखट, कमी मिठ असलेले जेवण होते. आम्ही आईंसाठी ते जेवण पाठवले. आणि त्याच कैंटिन मध्ये पोळी भाजीचा नाश्ता केला. अतिशय कमी तेलात चांगल्या प्रकारे तयार केलेला नाश्ता होता तो. आम्ही उठलो. मी व देशमुखने एकदा काचेतुन आईंना पाहिले. सदाशिवरावांचा हात मी गच्च पकडला. थोड्या वेळाने माझा हात आपल्या हातातून सोडवत त्यांनी आम्हाला जायला सांगितलं.
घरी पोहोचुन कपडे बदलुन समारंभाला जायची तयारी केली. सदाशिवरावांनी मला कोणाला काही न सांगण्याविषयी बजावलं होतं.माझ्या सोबत देशमुखही बाहेर पडला. सायंकाळचे ४.०० वाजले होते. ग्रामपंचायतीच्या मुख्य सभागृहात समारंभ होता. स्टेजवरील मेजावर स्वच्छ सुंदर टेबलक्लॉथ घातला होता, त्यावर सुंदर पुष्पगुच्छ ठेवण्यात आले होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी गावातले एक नामवंत व्यक्ती होते. बरीच गर्दी जमली होती, पण व्यवस्थापकांनी त्याचे नियोजन खुबीने केले होते. उद्घाटन सोहळा पार पडला. पाटील , सरपंच आणि अध्यक्षीय भाषण झाले त्याला २० मिनिटाइतका वेळ लागला. त्यानंतर सत्काराचा मुख्य सोहळा संपन्न झाला. खंडो सुतारचा सत्कार होताच मला भरून आले. त्याने अगदी माझ्यासमोर येऊन मला आदराने नमस्कार केला, व आपल्याला मिळालेल्या सत्कारावर माझाही हक्क आहे, असे सांगु लागला. सगळ्या सभागृहाने टाळ्यांचा कडकडाट करुन मलाही सन्मान दिला. पाटील मला स्टेजवर बोलवत होते, पण मी हाताने खुण करत त्यांना नकार दिला. त्या गावात येऊन मला पाचच दिवस झाले होते, पण त्या लोकांचे प्रेम ,त्यांंचा आशिर्वाद मला मिळाला होता. गावाच्या संस्कृती ची ती एक ओळख होती. पण राहून राहून माझ्या मनात सदाशिवराव व आईंचे विचार घोळत होते. सायंकाळी ५-५.३० च्या सुमारास तो कार्यक्रम संपला. तेव्हा लोकांच्या गर्दीतून बाहेर पडत देशमुख सोबत मी हॉस्पिटल गाठले.
मला पाहताच सदाशिवरावांनी हसुनच आमचे स्वागत केले. मी आईंच्या तब्येतीविषयी विचारले.
"आता बरी आहे. डॉक्टरांना आजच्या रात्रीत तसं काही जाणवलं नाही तर ते डीसचार्ज देणार आहेत. बाकी कसा झाला सत्कार सोहळा?"
मी त्यांना सगळं सविस्तर सांगितले. लोकांनी टाळ्या वाजवून मला सन्मान दिला हे ऐकुन तर त्यांचे मन भरुन आले. खरचं ही माणसं माझी कोण होती? पण पाच दिवसांत यांनी मला वेडं केलं होतं. तसा मी होतो एक अधिकारी, पण अधिकाराचा अहंकार या गावच्या मातीने कधीच मातीमोल केला होता. ध्येयप्राप्तीसाठी झटणारी, परी अम्रुतातही पैजा जिंके हा बाणा असणारी ही माणसं खरोखरच अतुल्य अशीच होती.
ती एक रात्र मला सरता सरत नव्हती. माझे लक्ष सदाशिवराव व आईंकडे लागलेले होते. आम्हांला स्पेशल रुम देण्यात आली होती. तिथे सगळ्या सोयी होत्या. रात्री ९.०० वाजता आईंना जेवण देऊन सदाशिवरावांनी आम्हाला जेवण आणले होते. वरण-भात, नाचणीची भाकरी, कांद्याच्या पातीचा झुणका, मिरचीचा ठेचा, आख्खा मसुर, हिरवी पालेभाजी आणि तोंडी लावायला काकडी-कोशिंबीर, कंदमुळे, दही व ताक असा जेवणाचा थाट होता. पण आमचं जेवणात लक्ष नव्हतं.
आमची जेवणं आटोपली, तेव्हा दहा वाजले होते. मला झोप येत नव्हती. सदाशिवराव आणि देशमुखही जागेच होते. मी एकटाच रस्त्या जवळच्या खिडकीकडे बसुन बाहेर पाहत होतो. रस्ता शांत, सुनसान वाटत होता. थकले भागलेले जिव रात्रीच्या कुशीत विसावा घेत होते. दुरवरुन गाण्याचे सुर ऐकु येत होते. मध्येच एखाद्या वाहनाचा आवाज ऐकू येई. दुरवर शिवमंदिराचा कळस सोनेरी प्रकाशाने चमकताना दिसत होता. आकाशात ताऱ्यांनी दाटी केली होती, त्यातले काही तारे लख्ख चमकत होते, तर काही अगदीच मंद भासत होते. ते पाहता पाहता मनात विचार येत होते. माणसाचंही असचं असतं का? माणुस दूरच्या गोष्टी मिळवण्याच्या मागे लागतो, आणि जवळच्या गोष्टींना, आनंदांना मुकत असतो. ते क्षण असेच त्या ताऱ्यांप्रमाणे लखलखत आपली जाणीव करुन देण्याचा प्रयत्न करत असतात. असाच विचार करता करता मला झोप आली.
डोळे उघडले, तेव्हा उजाडले होते. सदाशिवराव केव्हाच जागे झाले होते. देशमुख मात्र झोपेत होता. मी त्याला झोपेतून जागे केले. सदाशिवराव माझ्या जवळ आले. मी विचारले.
"सदाशिवराव, आईची तब्येत....?"
"बरी आहे. डॉक्टर आज डिसचार्ज देणार आहेत."
मला व देशमुखला आनंद झाला.
"आम्ही आईंना भेटु शकतो ना?" सदाशिवराव आम्हाला तिच्याजवळ घेऊन गेले. सकाळी ठिक ११.०० वाजता आईंना डिसचार्ज देण्यात आला. आम्ही घरी आलो, तोपर्यंत दुपारचे १२.०० वाजले होते. आजचा आमचा गावातला सहावा दिवस होता.
सदाशिवराव त्या दिवशी कुठेच गेले नाहीत.
"डॉक्टर नी कोणतेही जड काम करु नको म्हटलयं."
मी ऐकत असता बोललो.
"आईंना अचानक असं काय झालं?"
"डॉक्टर म्हणतात तिला श्वसनाचा धक्का बसला. यापूर्वी तर तिला असा त्रास नव्हता. चालायचंच. माणसाचं आयुष्य नाहीतर असचं असतं म्हणायचं, पण आपण काय आपलं कर्तव्य पार पाडायचं."
सदाशिवरावांनी स्वतः जेवण बनवले, भाऊ आणि त्याच्या बायकोनेही मदत केली. मला आणि देशमुखला मात्र त्यांनी काही मदत करायला नकार दिला.
"अहो तुम्ही आमचे पाहुणे आहात, आम्ही केलेलं तुम्ही खाल्ले तर ती खरी मदत असेल आमची."
सदाशिवराव मिश्कीलपणे म्हणाले. बऱ्याच वेळानंतर जेवण झालं , सदाशिवरावांनी आईंना जेवण दिलं नंतर आम्ही जेवलो. संध्याकाळी आईची तब्येत बरी पाहून मी देशमुखला घेऊन एकटाच गावातले धरण पाहायला बाहेर पडलो. सदाशिवरावांना मी याची कल्पना देऊन ठेवली. गावातून जात असता वाटेत महादेव मिळाला.
"काय साहेब आज कुणीकडे दौरा?" त्याने हसतच विचारले. मी त्याच्या हाताला धरुन त्याला माझ्यासोबत ओढत नेत बोललो.
"बरं झालं महादेव, तु भेटलास. आता चल माझ्या बरोबर."
"अहो पण....." मी त्याचे काही ऐकून न घेता झपझप चालत होतो. महादेव कधी मला तर कधी देशमुखला विचारत होता. हिरव्या पायवाटेने आम्ही गावाच्या वेशीकडे आलो. तिथुन अनेक शेततळी दिसत होती. महादेवला काहीतरी समजल्यासारखे झाले.
"अच्छा म्हणजे धरणावर जायचयं हो तुम्हाला?"
"महादेव त्याच धरणात तुमच्या गावातील काहींनी आत्महत्या केल्या होत्या , त्यात तुझे वडील पण होते ना?"
महादेव दचकून पाहु लागला.
"हे तुम्हाला कसं समजल? सदाशिवरावांनी तर काही...."
"नाही महादेव अरे मी या गावचा कोणी नाही पण आपल्या माणसाची दुःखे लपुन राहत नाहीत."
महादेव हताशपणे पाहत बोलतो.
"काय सांगु साहेब तुम्हाला? तुम्ही मला आपलं मानलतं म्हणून सांगतो. माझ्या बा ने शेतीत काही मिळकत नाही म्हणून एका सावकाराला जमिन विकुन टाकली, पण या व्यवहारात खोट आली. चांगला पैसा मिळाला नाही. सरकारकडूनही शेतमालाला चांगला भाव मिळाला नाही. सगळं नशीबचं खोटं म्हणुन एक दिवस....."
महादेव खिन्न होऊन दुरवर पाहत होता. तोच पुढे बोलु लागला.
"साहेब शहराप्रमाणे गावातही माणसचं राहतात. पण थोडीफार मदत केली म्हणजे गावे सुधारली, लोकांच्या गरजा भागल्या अस तर होत नाही. शेवटी एकजुट होत आम्हीच गावचं नशीब बदलायचं ठरवलं. दाखवुन दिलं सगळ्यांना की थोड्या प्रयत्नाने आपली परिस्थिती बदलता येऊ शकते."
मी ,महादेव व देशमुख धरणाजवळ पोहोचलो. समुद्राच्या गाजेसारखा पाण्याच्या प्रपाताचा घोंघावणारा आवाज घुमत होता. समोर पांढऱ्या फेसाळणाऱ्या लाटांप्रमाणे वाटणारा विशाल जलसागर. धरणाला एकुण सहा दरवाजे होते. उंच डोंगरकपाऱ्यातील पवनचक्क्या दिसत होत्या. तिथेच मोठमोठे सोलर पैनेल बसवलेले दिसत होते. सोलर उर्जा वापरुन विद्युत निर्मिती केली जाई, वाहनेही या सोलर उर्जेचा वापर करुन चालत असत. धरणाचा विस्तार मोठा होता, तिथे जवळ जाऊन धरण पाहता येणार नव्हते. चौफेर विद्युतभारित तारांचे उंचच उंच कुंपण होते. तसेच लोखंडी पिलर्स नी तो एरिया सुरक्षित करण्यात आला होता. धरणाच्या पाण्यात आततायीपणे अनेजण दगावले होते. शिवाय पुर्वी त्या धरणात आत्महत्या ही झाल्या होत्या. पण आता सगळी स्वच्छता, डागडुजी करुन ते धरण अव्याहतपणे आपले काम करत होते.
देशमुख आणि महादेव उभं राहून आपसात मजेत काहीतरी बोलत होते. मी एकटाच एका खडकावर बसुन समोर कोसळणारा जलप्रपात पाहत होतो. तेवढ्यात एका सर्पगरुडाने एका छोट्या सर्पावर झडप घालुन त्याचा चट्टामट्टा केल्याचे मी पाहिले. माझ्या मनात विचारांचे तरंग उठू लागले. माणसाचही असचं असतं का? माणुस म्हणजे तो छोटा सर्प आणि तो गरुड म्हणजे आपला काळ. तो काळ असाच झडप घालत असतो आपल्यावर हवा तसा निडर होऊन. पण त्या काळाची शिकार होऊन संपुन जावे की काळाचा प्रतिकार करुन सुंदर आयुष्य जगावे हे तर ज्याच्या त्याच्या हातात असते.
मी तो प्रपात पाहत होतो. माझा मी राहिलो नव्हतो. कोण होतो मी? महानगरपालिकेत अधिकारी, एक माणुस? नाही मी केवळ प्रवासी होतो. काळाच्या प्रवाहात प्रवास करणारा. तेवढ्यात त्या प्रवाहातुन असंख्य मुडदे जिवंत होऊन ओरडु लागले. त्यात गावातले सुशिक्षित बेकार होते, शेतमजूर होते, कर्जबाजारी शेतकरी विद्यार्थी होते. एकाएकी ते भेसुर आवाजात कानाचा पडदा फाटेपर्यंत ओरडू लागले.
"आम्ही पण माणसं आहोत. गावातील असलो म्हणुन काय झालं? आम्हालाही जगायचं होतं.....आम्हालाही जगायचं होतं."
अचानक आजुबाजुचा गोंधळ वाढु लागला, आणि मी कानांवर हात धरले. महादेव हात लावुन मला हलवत होता. अचानक भानावर आल्यासारखे मी बाजुला पाहिले. मेंढ्यांचा एक कळप कलकलाट करत चालला होता.
"काय साहेब, कुठं हरवला होता?" महादेव विचारत होता.
"काही नाही, काही नाही."
"चला तर मग खुप संध्याकाळ झाली, निघुया."
मी उठलो व धरणाकडे नजर टाकून महादेव व देशमुखच्या मागोमाग चालु लागलो. शेतावरुन शेतकरी परतत होते. दुरवर महादेवाच्या व लक्ष्मी मंदिरातील आरत्यांचा आवाज, चर्चमधील घंटानाद, व मशिदीतील कुरान वाचन यांचे संमिश्र आवाज येत होते. दिवेलागणीची वेळ होऊन गेली होती. आम्ही घरी पोहोचलो, महादेवही सोबत होता. सदाशिवरावांनी विचारायला सुरवात केली.
"आज बराच उशीर झाला. तरी गावात विचारलं तर समजल महादेव सोबत आहे. काय रे महादेवा, काय झालं?"
"काही नाही सदाशिवराव. साहेब बराच वेळ तिथेच बसुन राहिले. आम्ही हाक मारली तरी ओ देत नव्हते."
सदाशिवराव हसतात.
"काय साहेब, कुठे हरवला होता?"
मी मान खाली घालत हळुच बोललो.
" काही नाही सहजच. आईची तब्येत कशी आहे?"
"एकदम चांगली. आत देवघरात 'रामरक्षा' वाचतेय."
मी व देशमुखने हातपाय धुतले. महादेव सांजवेळी आला होता, म्हणुन निघताना सदाशिवरावांनी त्याच्या हातावर दही घातले. महादेव निरोप घेऊन जात असता सदाशिवराव बोलले.
"महादेवा आजचा रात्रीचा बेत माहीत आहे ना?"
मी चकित होऊन पाहिले.
"आमच्या गावात येणाऱ्या पाहुण्यांना काहीतरी भेटवस्तू द्यायची पध्दत आहे."
"पण असे तर बरेच असतील?"
"हो असतात ना. परदेशी पर्यटकही येतात. पण काहीना काही भेट या गावाकडून आम्ही देत असतो. तुम्ही तर खास पाहुणे. या सहा-सात दिवसात किती स्नेही झालेत तुमचे. त्यामुळे प्रत्येक जण वैयक्तिक तुम्हाला भेट देणार आहेत."
" माझं भाग्य म्हणायचं. पण काय हो सदाशिवराव. परदेशी पर्यटक म्हणजे एका अर्थी तुमचं गाव ग्लोबल टूरिस्ट डेस्टिनेशन झालं म्हणायचं."
"ते एकच नको आहे या गावाला. अहो प्रसिद्धी मिळाली, गाव ग्लोबल झालं की शहरीकरण होणार, गर्दी वाढणार. त्या गर्दीत आमचं गाव हरवुन जाणार कायमचं. म्हणुन पर्यटकांना आमची विनंती असते की आमच्या गावात अशा सुविधा आहेत. पाहण्यासारखी काही ठिकाणे आहेत ते सांगत जाऊ नका."
"हे बाकी कठिण आहे सगळं."
"काही कठीण नाही साहेब. असं नाही केलं तर गावाचे शहर व्हायला वेळ नाही लागायचा. मग कालांतराने इथे मॉल उभे राहतील. चंगळवाद वाढेल. गावाला तेच नको आहे. त्यांना स्वतंत्र मोकळा श्वास हवा आहे आपल्या हक्काचा आणि ओळखीचा."
सदाशिवरावांच्या बोलण्यात तथ्यच होते. मी मग विषय बदलून विचारले.
"मग कोणकोण येणार आहेत भेटायला?"
सदाशिवराव हसत हसत बोलतात.
"ते समजेल तुम्हाला रात्री."
आम्ही सामानाची आवराआवर करेपर्यंत रात्रीचे ९.०० वाजले. एक एक करत जो तो येऊ लागला. पहिलाच खंडो सुतार आला. त्याने खास बुंदीचे लाडु आणले होते. मग महादेव, नथीबाई आणि विशेष म्हणजे बनकेही येऊन गेला. नथीबाईंंनी खास मेथीचे ठेपले केले होते. तिच्या नवऱ्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालु होते. महादेवने एक सुंदर चादर आम्हाला भेट दिली. बनके माफी मागत म्हणाला.
"मला माफ करा साहेब. मी बरचं काही बोललो तुम्हाला."
मी बनकेचा हात हातात धरुन बोललो.
"अहो तुम्ही आमचीच माणसं, माफी कशाला मागता?"
बनकेला ओशाळल्यागत झाले. त्याने बदाम अक्रोड घालुन खास रबडी व गणेशाची सुंदर मुर्ती आम्हाला भेट दिली. बरीच रात्र झाली होती. उद्या सकाळीच बाहेर पडावे लागणार होते. गावच्या आठवणींनी व लोकांच्या प्रेमाने मन उद्गविग्न झाले.
७.
आज त्या गावातील आमचा शेवटचा दिवस होता. पाय उचलवत नव्हते, पावले अडखळत होती. निरोपाची वेळ समीप आली होती. ते गाव ,सहा - सात दिवसात लोकांचा मिळालेला स्नेह सोडून चाललो होतो. आम्ही बाहेर पडलो, क्षणभर गोठ्याकडे पावले रखडली. ढवळ्याचे डुरकणे चालु होते. मी गोठ्यात गेलो. ते मुके जनावर अनिमिष नेत्रांनी मला पाहत होते. मी त्याला हाताने हलकेच थोपटले. देशमुखही गहिवरला. आईंनी सदाशिवराव नको नको म्हणत असताना स्वतःच्या हातीने गव्हाची खिर आम्हाला बनवून दिली होती. आईकडे लक्ष द्यायला कोणी नव्हते, म्हणून मीच सदाशिवरावांना घरी थांबायला सांगितले होते. आमच्या सोबत स्टेशनवर सोडायला दुसरा एक माणूस येणार होता.
दाटलेल्या भावनांना बांध घालत मी सदाशिवरावांचा निरोप घेतला. ९.०० ची ट्रेन होती. आम्ही गावातून जात होतो. अशोक, कदंब, खैर, साग अशा वनराजीतुन पुढे आलो. पिंपळाचा पार आला. मला पुस्तक चावडीची आठवण झाली. अद्याप तिथे कुणी आले नव्हते. आम्ही गावाचे मुख्य प्रवेशद्वार ओलांडले. मागे वळुन मी त्या उंचच उंच नक्षीदार कमानींकडे पाहिले. आता परत कधी यायला मिळणार होते? काहीसा विचार करत आम्ही स्टेशनवर जाण्यासाठी निघालो.
प्रवासातही त्या गावाच्या स्मृती समोर दिसत होत्या. मुंबई ला पोहोचल्यावर सदाशिवरावांशी माझे फोनवर बोलणे असायचे. पत्रव्यवहार ही व्हायचा. त्यात कळले की नथीबाईंच्या नवऱ्याचे निधन झाले होते. आई तर आता एकदम चुस्त तंदुरुस्त आहेत. आमच्या प्रयत्नामुळे म्युझियम चे कामही पुर्ण झाले होते. हळूहळू कामाच्या व्यापामुळे तिकडे फोन करणे शक्य होत नव्हते. पण ते गावाचे रस्ते, पाणवठे, वनराजी, शेतात केलेली धमाल सगळं काही जशास तसं आठवत होतं. एक गाव.....नवेगाव.
"अहो, अहो ऐकलात का?" आवाज ऐकून मी वर पाहिले. मालिनी दारात उभी राहून हाक मारत होती.
"चैताली आलीय. चला खाली."
माझी मुलगी चैताली. केवढ्या वर्षांनी अमेरिकेतुन आली होती.
"चला" म्हणत मी मालिनीचा आधार घेत हळूहळू खाली उतरु लागलो.
चैतालीने मला पाहताच पाय शिवले.
"अरे वा माझी चैतु आता पुरती भारतीय झाली."
"ओ नो पापा. विमानतळावरुन इथे येईपर्यंत ते ट्रेफिक, ती घाण उफ. त्याबाबतीत मात्र आमचं अमेरिका बेस्ट."
"चला गोष्टी नंतर करा, चैतु आधी हातपाय धु चल." मालिनी ओरडली. चैतालीचे शेवटचे शब्द मला टोचल्यागत झाले. उगाच नवेगाव समोर दिसू लागले.
वार्धक्य आणि तो पैरेलिसिसचा झटका माझ्या आयुष्यात बरीच उलथापालथ घडवुन गेला. देशमुखही आजारपणाने जर्जर झाला होता. पण त्या अनोख्या गावात परत जाण्याची इच्छा मात्र दांडगी होती.
अमेरिकेतुन चैतालीने आम्हा दोघांसाठी बरीच गिफ्ट्स आणली होती. प्रत्येक वेळी बोलताना ती अमेरिकेचं कौतुक करत होती.
"बाबा, आणि तिथले गाव तर मार्वलस. इथे तसली गावं कुठं असणार. कुठल्याशा पुस्तकात लेखकाने वर्णन केल्यासारखी जुनी पुराणी तंबाखू मळणारी लोकं , तो पिंपळाचा पार आणि त्या चकाट्या पिटणारी लोकं, रिडिक्युलस."
मी काही बोलणारच होतो, त्याआधी ती उठली होती.
दुसऱ्या दिवशी मात्र स्वतः येत तिने मला एक आश्चर्याचा धक्का दिला.
"बाबा, खरचं असं गाव आहे?"
"असं म्हणजे कसं?"
तिने माझी डायरी उघडून मला दाखवली. क्षणभर मन भुतकाळात हरवले, आणि गावाचे चित्र नजरेसमोर उभे राहताच डोळे पाणावले.
"बाबा आपण जाऊया ना तेथे?"
तेवढ्यात मालिनी येते.
"कुठे जायची प्लैनिंग चाललीय?"
"आई नवेगावला."
मालिनी क्षणभर माझ्या कडे पाहत बोलते.
"त्यांची इच्छा आहे ग तेथे परत जाण्याची, पण आता या अवस्थेत......"
"आई अगं मी आलीय ना आता. डोंट वरी."
मालिनी मला पाहते.
"मालिनी, जमेल मला प्रवास. तु नको काळजी करूस."
"आई तु पण चल ना आमच्यासोबत."
"नको नको मी इथे ठिक आहे."
ती रात्र मंतरल्यागत गेली. मी व माझी मुलगी दुसऱ्याच दिवशी निघालो. त्यावेळी देशमुख होता आणि आता माझी मुलगी. त्याच गावात चांगला मुलगा मिळाला तर......मी मनातच हसलो. आम्ही स्टेशनवर आलो. आमची ट्रेन चुकली तो क्षण आठवला. समोर नवेगाव मनःपटलावर दिसत होते. मी शहारत होतो, की तेवढ्यातच ट्रेन आली. विचारांच्या तंद्रीत ट्रेन मध्ये चढता चढता पाय लचकला, पण चैतालीने माझा हात धरला. मी तिच्याकडे हसरी नजर टाकली.
आणि तेवढ्यातच ट्रेन सुरू झाली.
...................................समाप्त..................................
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा