लॅपटॉप-शोध मनाचा

 

 

 

(पडदयावरील पात्रे- तात्या,शांताक्का, पोस्टमन,जेनी, हरी, जेन (छोटा मुलगा))

---------------------------------------------------------------------------------------------------------

                                         पहिला अंक

       (पडदा उघडतो, उजेडामध्ये स्टेजच्या मध्यभागी एक मध्यमवयीन गृहस्थ हातात पेन व डायरी घेऊन बाकडयावर बसलेला आहे. काहीतरी आठवून तो डायरीमध्ये लिहित आहे. दूरवरुन कुठेतरी सू सू असा वारा वाहण्याचा आवाज ऐकू येत आहे.)

(स्वगत) मला आठवते, ती संध्याकाळ, जेव्हा तात्या नेहमी आम्हांला देवांच्या, क्रांतीकारकांच्या साहसांच्या, पराक्रमी पुरुषांच्या कथा सांगायचे. तात्या, माझे वडिल. स्वच्छ धोतर, वर बनियन घालुन डोक्यावर सदैव पांढरी टोपी तिरकी घालणारे. मला आजही आठवतोय तो घराचा व्हरांडा, आणि तो झोपाळा. ज्याच्यावर बसून तात्या आयुष्याचे तत्वज्ञान अगदी समजेल अशा भाषेत सांगत असत. कायम हसतमुख, सगळयांशी ओळख. नेहमी समोरच्याला मदत करण्याची तयारी. ते नेहमी म्हणायचे," अरे हयो कोकण म्हणजे आमचो स्वर्ग आसा स्वर्ग. आम्ही सगळे त्येचे राखणदार. हया जा आपला आयुष्य आसा ना ता कसा रंगीत टिव्ही सारख्या असा होया. रंगीबेरंगी. तेच्यात कधी हसण्याचे रंग असा होये तर कधी रुसण्याचे, कधी रागाचे. पण याक मात्र नक्की की हया टिव्हीचो रिमोट मात्र त्या विधात्याच्या हातात असा होयो. त्येनी नुसता म्हटला की टिव्ही बंद करुया तर आयुष्याच्या रिमोटाचा एकच बटण दाबला  की आपलो खेळ खल्लास, म्हणान म्हणतयं अरे हया आयुष्य म्हणजे नुसता लॅपटॉप सारखा नाय, की तेच्या की बोर्डवरच्या बटणात आपला आयुष्य अडकवन ठेव होया. हया आयुष्य म्हणजे रंगीत टिव्ही आसा, टीव्ही."

         तात्या खरचं आज तुम्ही हवे होतात, तुम्ही हवे होतात.

(पडदा पडतो, आणि कुठूनतरी पक्ष्यांचा गोड मंजूळ ध्वनी ऐकायला सुरवात होते. हळूहळू पडदा वर उचलतो, आणि समोर विहिरीचे दृश्य दिसते, काही बायका तिथे पाणी भरायला आल्या आहेत.)

एक महिला:- अगे शांताक्का, बरेच दिस झाले, तुझ्या झिलाची काय खबरबात? केव्हा येतलो म्हणता?

दुसरी महिला:- अगो तेका खयं इचारतय? पाच वर्सा झाली तेका जावनं. तो तेव्हा येवक नाय, आणि कसली  

                   खुशाली कळवक नाय. तो आता येतलो?  शांताक्के तुझो झिल म्हणजे पक्को फॉरेनर आसा  बघ."

(दोघी हसायला लागतात. त्या दोघांचे बोलणे शांताक्काच्या जिव्हारी लागते. पदराने तोंड दाबत डोळयांतले पाणी लपवत शांताक्का हंडा उचलून घरी परतते. व्हरांडयात झोपाळयावर बसून पेपर वाचण्यात गर्क असलेले तात्या हळूच आपल्या काडयांचा चष्मा वर उचलून तिच्याकडे पाहतात)

 

तात्या:-(शांताक्काला पाहून) अगो शांते काय झाला? रडतयं कित्याक तिया?

शांताक्का:- नाय काय नाय. डोळयात कचरो गेलो, म्हणान पाणी इला असताला.

तात्या:- तर गे बाय. डोळयांत कचरो गेलो म्हणान पाणी इला. सरळ सांग मगो आता विहिरीर हरीचो विषय इलो

           म्हणान तुका रडाक इला मा?

(कमरेवरील हंडा खाली ठेवत शांताक्का तशीच रडत तात्यांजवळ येते.)

शांताक्का:- होय ओ. हरीची खुप आठवण येता.

तात्या:- अगो हरीची माका आठवण नाय येना असा म्हणतयं काय? तेका किती फोन लायले. त्येनी केव्हा

            एकदातरी फोन करुन आपली खुशाली कळयल्यानं. अगो, हया जा आपला आयुष्य म्हणजे कसा रंगीत

            टिव्ही सारख्या असता. तेच्यात हे सगळे रंग कसे मिक्स झालेले असतत. आपण सुखाचो रंग निवडान

            चलाचा असता. कळला?

शांताक्का:- तुमचा म्हणणा बरोबर आसा, पण हरी माझो झिल आसा ओ. माका तेच्या शिवाय आताशी चैन

                 पडना नाय.

(तात्या शांताक्केच्या पाठीवर हात ठेवतात . तात्यांच्या घटट मिटलेल्या नेत्रकडा पाणावतात. काही वेळ एक शांतता पसरते, आणि थोडया वेळाने त्यांच्या गावातील सदु नावाचा माणूस एक निरोप घेऊन येतो.)

सदु:- ओ तात्यांनो चला बेगीन. त्या परश्याची आजी बघा कशी करता हां ती? माका वाटता आता तिचा काय

       खरा नाय.

तात्या:- शिरा पडली ती तुझ्या तोंडार. मेल्या बरां बोल केव्हातरी. खरा नाय काय? चल बगया मिया येतय.

शांता:- ओ मियापण येतय तुमच्याबरोबर.

तात्या:- अगो तिया कशाक? भायर पावस बघ कसो पडतां तो. उगाच तुका त्रास कित्याक?

शांता:- नाय वो. त्रास कसलो. म्हातारी खुप बरी आसा. मागच्या वर्षाक त्येचो थोरलो झिल दुबईक गेलो, तो काय

          परत येवक नाय. बिचारी तेची अशीच आठवण काढत असता.

तात्या:- अगो असा कित्याक बोलतसं तिया? म्हातारीचा काय वाईट जावचा नाय. चल बेगीन चल जावन येवया.

(डोक्यावरची टोपी सारखी ठेवत कोप-यात ठेवलेली मोठया दांडयाची छत्री घेऊन पायात कोल्हापूरी चप्पला घालून तात्या शांताक्का सह भर पावसातून परश्याच्या घरी जायला बाहेर पडले. शांताक्का त्यांच्यासोबत पदर सावरत चालत होती. रातकिडयांचा आणि चिखलाचा सर्र सर्र आवाज ऐकतच ते परश्याच्या घरी पोहोचले.)

                                                     2.

  (पडदा उघडतो. स्टेजच्या मध्यभागी 4-5 माणसे व 4 बायका अशी घोळका करुन बसलेली आहेत. आणि समोरच्या एका खाटेवर परश्याची आजी तोंडातून सारखा माधव, माधव असा नामजप करीत पडली आहे. तात्या तिच्याजवळ पोहोचतात.)

तात्या:- म्हातारे, काय गे? काय होता तुका?

घोळक्यातील एक माणूस:- तिका तिच्या झिलाची आठवण येता आहा, म्हणान तिचो प्रेशर उतारलो. डॉक्टर

                                     येवन तपासून गेले, आणि औषधा गोळये लिहून दिल्यानी.

तात्या:-(म्हातारीकडे पाहत) अगे म्हातारे. काय अवस्था करुन घेतलसं हयती? अशी काय करतयं?

म्हातारी:- तात्या, इलयं रे बाबा. बरां केलयं इलसं तो. अरे तिया तरी माधवाक सांगून माझ्याकडे घेवन ये. खूप

              आठवण येता रे तेची.  

तात्या:- म्हातारे, गप रव. अगे जेका येवचाच नाय आसा त्येच्यासाठी रडान काय फायदो. आता आमचो हरी गेलो

           आहा अमेरिकेक, तो थयसलोच जावन रवलो. पण मीया बघ आजून धडधाकट आसयं की नाय?

शांता:- होय गे म्हातारे. अगे हरीची आठवण आमकाय खुप येता. तुझो माधव येतलो केव्हातरी तुझ्याकडे. पोरा

          मोठी झाली म्हणान काय शापयं आवशी-बापाशीक वा-यार सोडूची नाय.

(म्हातारी"माझो माधव येतलो, येतलो" अशी सारखी म्हणत राहते. तात्या तिला समजावत असतात, शांताक्काही त्यात सामिल झालेली असते. बाकीचे लोक म्हातारीकडे पाहून हळहळत असतात. अचानक म्हातारीची मान कलंडते, खेळ संपलेला असतो. बाहेर पडणा-या पावसाचे थेंब पन्हाळावरुन ओघळत खालच्या पाण्यात पडत असतात, त्यांचा टपटप असा आवाज ऐकू येत असतो. जमलेले लोक म्हातारीची तिरडी बांधतात. तात्या हतबुध्द होत त्या निष्प्राण कलेवराकडे पाहत राहतात.)

शांताक्का:-(थोडीशी बाजूला येत तात्यांशी बोलते) अवो............

तात्या:- हां काय?

शांताक्का:- आपलो हरी येतलो मा आमका भेटाक? नायतर आमची अवस्था सुध्दा या म्हातारीसारखी......

(शांताक्का पुढे काही बोलायच्या आत तात्या तिला गप्प करतात)

तात्या:- शांते, शांते माझ्याकडे बघ. तुका माझ्यार विश्वास आसा मा? अगो कोण नसलो तरी मी समर्थ आसयं.

            तुझ्यासाठी मिया आणि माझ्यासाठी तिया. अगो तो रवळनाथ इतको निष्ठुर नाय आसा गो. त्येच्या

            घडयाळातले काटे एका सेकंदान जरी पुढे गेले तरी येणारो काळ असो पटक्यात बदालता. आपला

            आयुष्य हया सुध्दा असा सरळ नाय आसा, ता कोकणातल्या रस्त्यांसारखा नागमोडी असता.

शांत्ताका:- तात्या खूप बरा वाटतां हो तुमचा बोलणा ऐकान. असा वाटता की ऐकत रवाचा.  

तात्या:- (मिश्किलपणे हसत)असा काय गो? मगे चल आता घराकडे जावया. थय गेलसं काय ऐकत बसं.

(तात्या आणि शांताक्का परश्याच्या घरातून बाहेर पडून आपल्या घरी जातात.)

                                                      3.

(तात्या झोपाळयावर बसलेले आहेत. शांताक्का ओसरीवरच थपकल मारुन बसलेली आहे. तात्या आकाशाच्या निळया पोकळीकडे पाहत आहेत, तेवढयात ती शांतता भंग पावते)

शांताक्का:- अहो...........

तात्या:-(वळून तिच्याकडे पाहत) आं....काय? काय म्हणतसं?

शांताक्का:- अहो आमचो हरी येतलो मा भेटाक आमका कधीतरी. नायतर आमची सुध्दा अशीच परश्याच्य

                आजीसारखी अवस्था जायत.

तात्या:- कायय काय बोलतय? माझ्याकडे बघ. अगो कोण नसला तरी मिया आसय मा? मगे तिया कित्याक

            भियातय? अगो तो देवळात बसलो तो रवळनाथ इतको निष्ठुर नाय आसा गो. त्येच्या घडयाळातले काटे

            एका सेकंदान जरी पुढे गेले तरी येणारो काळ अस्सो बदालतलो. आपला आयुष्य पण असाच असता

            गो, वळणावळणाचा. ता सरळ कधीच जावचा नाय. आणि वळणा असल्याशिवाय मजापण येवची नाय.

            ती वळणा पार करीतच आपणाक पुढे पुढे जावचा असता.

शांताक्का:- तुम्ही बोलता ता खुप चांगला वाटता ओ ऐकाक, पण माका उमागना नाय काय ता.

तात्या:- (हसत)अस्सा. ता बरा उमागना नाय तुका. असेच पोफळीच्या बागेत चक्कर मारुन येवया. सगळा

           उमागतला.

(शांताक्का हसते, आणि तेवढयातच पोस्टमन एक पत्र घेऊन येतो.)

तात्या:-अरे सदाशिवा, आज रे काय हाडलयं?

पो.सदाशिव:- तात्यांनु तुमका तर माहिती आसा, मिया म्हणजे फिरतो वारो. आज हय तर उदया थय.

तात्या:- असा...असा तुका लगाम घालुक होयो एक दिस तुझा लगीन लावन दिवन.

पो.सदाशिव:-(लाजत) छया तात्या काहीतरीच काय.

तात्या:- बरां. ता रवांदे. काय हाडलंस ता दी तरी.

पो.सदाशिव:- अरे हो रवला बगा. हया फॉरेनसुन तुमका पत्र इलेला आसा, माका वाटता हरीचा असतला.

तात्या:- (मिश्किल हावभाव करीत) अं......इलो मोठो सांगणारो, हरीचा पत्र असतला म्हणान. तेका पत्र लिवक

           येळ तरी असा होयो.

पो.सदाशिव:- तात्यानु. हया पत्र घेया. मिया निघतय. खालच्या अवाटात पण खुप पत्रा दिवची आसत.

शांत्ताक्का:- चहा पिवक ये रे केव्हातरी.

पो.सदाशिव:- होय होय.

(पोस्टमन सदाशिव निघून जातो. शांत्ताक्का अधीर झालेली असते.)

शांत्ताक्का:- अहो बेगीन बघा तरी कोणाचा पत्र आसा ता. नक्कीच हरीचा पत्र आसा ता. बघा तरी काय म्हणता

                 तो?

तात्या:- अगो होय होय खेका घाय करतयं?

(तात्या पत्र उघडून वाचायला लागतात. वाचता वाचता एकदम गंभीर बनतात, आणि त्यांच्या तोंडून पटकन," अरे देवा" असे उदगार बाहेर पडतात, तशी शांत्ताक्का घाबरते.)

शांत्ताक्का:- काय हो, काय झालां? इतके दचाकलात से?

तात्या:- अगो हरीचा........

शांत्ताक्का:- हरीचा काय?

तात्या:- अगो हरी पुढच्या आठवडयात भारतात येता आसा.

(शांत्ताक्काचा जीव भांडयात पडतो. बळेबळे रागवत ती तात्यांना बोलते.)

शांत्ताक्का:- अवो ही आनंदाची बातमी अशी दिवची असता काय?माझो आता जीव जातलो असतो.

तात्या:- (मिश्किलपणे हसत) आं.......झिलाचा पत्र इल्यार बघ कशी खुश झाली माझी बाय. तेचा बरा कौतुक

           मगो. आता तो इलो काय बरे वडे-सागोती करुन घाल तेका.

(तात्या व शांत्ताक्का दोघेही हसत हसत घरात जातात.)

                                                    4.

(स्टेजच्या मध्यभागी उभे राहून तात्या हरीची वाट पाहत आहेत. तेवढयात प्रवेशदवारातून हरी तेथे प्रवेश करतो. सोबतच एक फौरेन तरुणी व एक छोटा मुलगा असतो.)

तात्या:-(हरीला पाहून आनंदित होतात) हरी इलय तु? बरां केलय बाबा. तुझी आवस डोळयात प्राण आणून तुझी

           वाट बघता आसा. प्रवास बरो झालो मा? आणि बरोबर हया पोरग्या आणि हयो गोब-या गालाचो पोरगो

            कोण रे?

हरी:- तात्या, ही माझी मैत्रिण जेनी, आणि हा आम्ही दत्तक घेतलेला मुलगा जेन.

तात्या:- म्हणजे लगीन मिगीन केलसं की काय अमेरिकेक जावन.

हरी:- तसं काही नाही तात्या. आम्ही तिकडे फक्त लिव्ह-इन मध्ये राहत होतो.

तात्या:-(आश्चर्य व्यक्त करीत) आं.खयं रवा होतात?

हरी:- लिव्ह-इन म्हणजे लग्न न करताही एकत्र राहणं.

तात्या:- अस्सा होय. पण हयं तसा चलना नाय हां. तुमका रितसर लग्न करुचा पडताला.

हरी:- तात्या. आता या गोष्टी बोलायची वेळ आहे का? घरी चला. आई वाट पाहत असेल?

तात्या:- होय रे होय इसारलयं. तुझी आवस कधीपासून वडे-सागोती करुन तुझी वाट बघत बसली आहा.

                                                  5.

(स्टेजच्या एका कोप-यातुन शांत्ताक्कांचा प्रवेश होतो. तेवढयात हरीला घेऊन तात्या तिथे येतात. हरीला पाहून शांताक्काचे डोळे डबडबतात.)

शांताक्का:- बेटा हरी. इलयं रे? कसो आसयं रे तु? इतके दिस तुका माझी आठवण येवक नाय कशी रे?

तात्या:- अगो तेका आधी घरात तरी येवंदे. बरे वडे-सागोती खावक घाल तेका.

हरी:- आई, माझं चुकलं गं. मी यायला पाहिजे होतं अगोदरच.

शांत्ताक्का:- असांदे. चुक समाजली मा, मगे झाला. आणि हया रे कोण पोरग्या आणि पोरगो?

तात्या:-(शांत्ताक्काला मध्येच थांबवत) सांगतय सगळा सांगतय. आधी तेंका आत येवन जेवनी. अगो वडे-

            सागोतीच्या वासानं माझ्या पोटातली कालवाकालव वाढत चललेली आसा.

शांत्ताक्का:- होय रे होय. येया आत. जेवन घेया चला.

(सर्वजण आतमध्ये जातात.)

(घराच्या आतले दृश्य-)

        स्टेजच्या मध्यभागी सर्व मंडळी बसली आहेत. शेणाने सारवलेल्या जमिनीवर बसायला हरी का कु करीत आहे. तात्यांच्या ही गोष्ट लक्षात येते.

तात्या:- अरे हरी असो आखडानं खेका बसलयं. सारखो बसान जेय.

हरी:- अं.काही नाही तात्या. मला ते जमिनीवर बसून नीट जेवायला येत नाही ना. जरा खुर्ची असेल तर दयाल

        का? आणि ही जमिनही शेणाने सारवलेली आहे.

तात्या:- आं खुर्ची? ती रे कित्याक होयी आता. अरे जमिनीर बसाची सवय करुन घेवक होयी. आता तु अमेरिकेत

            नाय तर भारतात आसय, लक्षात ठेय. अरे जमिनीवर बसान जेयला ना तर अन्नाचो आदर राखलो जाता.

            आणि रवला शेणाची जमिन असाचा. तर लक्षात ठेय, शेणानं जमिन सारयली की थंड रवता, आणि

            पाली, झुरळा असे किडे-किटक येनत नाय.

शांताक्का:- अहो जेयताना कित्याक किलेस करतात. तेका खुर्चीर बसान जेवचा आसा तर जेवने.

हरी:- राहू दे आई. मी खालीच बसून जेवतो.

(हरी खाली बसून काही न बोलता जेवू लागतो. सर्वांची जेवणे आटोपतात. तात्या बाहेर येऊन झोपाळयावर बसतात, तेवढयात शांत्ताक्का त्यांच्याजवळ जाते.)

शांताक्का:- अवो, झिल इतक्या वर्षांनी घराक इलो आसा. तुम्ही पण खयसलेय गोष्टी खयय काढतास.

तात्या:- असे कशे खयसलेय गोष्टी खयय काढतयं म्हणतसं? बरा तां रवांदे. हरीबरोबर ता पोरग्या इला आणि तो

            पोरगो इलो आसा तेंची व्यवस्थित सोय झाली मा?

शांताक्का:- होय सगळी सोय केलेली आसा तेंची, मिया वायच जावन बघून येतय हां तेंका.

(शांताक्का उठून आत जाते, तात्या झोपाळयावर बसून बाहेर पडणा-या पावसाकडे पाहत असतात.)

                                              

 

 

                                                     6.

 

(सकाळची वेळ असते. स्टेजच्या मध्यभागी झोपाळयावर तात्या बसलेले आहेत. बाहेर मुसळधार पाऊस पडत आहे. तेवढयातच हरीबरोबरची तरुण मुलगी जेनी तेथे येते. )

तात्या:-(जेनीकडे पाहत) अगो बाय तु? अगो बरा केलंस इलस तां. इल्यापासून तुझ्याबददल कायच इचारुक नाय

           मिया.

 जेनी:- तात्या. आय एम जेनी. आय मिन....आय मिन.

तात्या:- अगो तो मीन जावंदे पाण्यात. माका समजाता हां इंग्लिश. विश्वास नाय? तर हया बघ हां.

            टेल मी टु युवर नेम ॲण्ड डोंट फिअर. अगो मराठी काय आणि इंग्रजी काय भाषा कशी मनाक स्पर्शान

            जाव होयी. आमची मराठी भाषा बघ कशी गोड आसा ती.

जेनी:- ओह. तात्या आय एम रिअली सरप्राईज. तुम्हांला एवढे चांगले इंग्रजी बोलता येत?

तात्या:- तर गो. आणि तिया मराठीतुसन बोलतसं मगो. तुका मराठी येता हया सांगूक नाय.

जेनी:- सॉरी तात्या. मी लपवलं तुमच्यापासून.

तात्या:- आसांदे आसांदे. अगो एक लक्षात घे. देश कुठलोय असांदे, धर्म कुठलोय असांदे माणसाक आपल्या

           भाषेचो आदर असाकच होयो.

जेनी:- तात्या मी ही इकडे भारतीय भाषा व संस्कृती यावर अभ्यास करायलाच आली आहे.

तात्या:- अरे वा वा. कर कर. अगो आमच्या देशाच्या संस्कृतीचो अभ्यास तुम्हां फॉरेनरांका करुच्या सारखो

            वाटता. हया आमच्या देशाचा भाग्य आसा म्हणा होया. नायतर आमच्याच भारतातल्या लोकांका

             आमचीच संस्कृती आवडेनाशी झाली आसा.

जेनी:- आय रिअलाईज तात्या.

तात्या:- बरां ता जावंदे. हयो हरी तुका खय भेटलो?

जेनी:- ज्या विदयापीठात मी ग्रॅज्युऐशन करत होते तिथेच याच्याशी ओळख झाली. तुम्हांला खर सांगू तात्या. ही

          इज अ गुड गाय.

तात्या:- अगो गाय नाय बैल आसा तो बैल. अमेरिकेत जावन तेका शिंगा फुटली आसत.

जेनी:- व्हॉट? काय म्हणालात तुम्ही तात्या?

तात्या:- काय नाय, काय नाय. मीया आपला सहज म्हटलयं ता. बरा आज संध्याकाळी दशावतारी नाटक बघुक

           येतलयं मा?

जेनी:- काय? दशावतारी नाटक?

(तेवढयात हरीचा तेथे प्रवेश होतो, आणि त्या दोघांचे संभाषण मध्येच तुटते.)

हरी:- जेनी कुठे होतीस तु? कुठे कुठे शोधतोय मी तुला?

तात्या:- अरे थांब थांब. अरे बाबा ता इकडे माझ्याबरोबर बोलत होता मघापासून. तेनी माझ्याबरोबर दोन शब्द

           बोलताय नये असा काय आसा तर सांग. काय अमेरिकेतय बायकांनी पुरुषांचाच ऐकाचा असो नियम

            केलेलो आसा?

हरी:- तात्या तुमच्याशी बोलणे म्हणजे डबल एनर्जी खर्च करण्यासारखं आहे.

(हरी आत जातो, मागोमाग जेनीही आत जाते. तात्या पुन्हा आपले झोपाळयावर बसतात.)

                                          

 

                                                  7.

(पडदयावर काळोख पसरला आहे. थोडया वेळानंतर मंद दिव्यांचा उजेड सर्वत्र पसरतो. स्टेजच्या मध्यभागी तात्या, शांताक्का, हरी ,जेनी व जोन बसलेले आहेत. दशावतारी नाटकाचा प्रयोग सुरु असतो. )

तात्या:- बघ बघ आता. थोडया वेळानं नाटक सुरु होताला.

हरी:- ओ स्टुपिड थिंग. मी का तुमचं म्हणणं ऐकून इथे नाटक बघायला आलो काय माहित.

तात्या:- बोललास?वाटलालाच माका अजून तिया बोलाक नाय कसो. अरे मेल्या न्हान असताना राजाची एंट्री

            झाल्यार हातात तलवार नसताना राजाची ॲक्शन करुन दाखय मरे, आणि आता तुका ती स्टुपिड थिंग  

            वाटाक लागली. अरे हयो दशावतार म्हणजे आमची कोकणची शान आसा. अरे दशावतारी नाटकातसून

            आम्ही पौराणिक कथा दाखयतो, आणि आमच्या संस्कृतिक जिवंत ठेयतो. उगाच तेका नावा ठेव नको,

            समाजला?

जेनी:- तात्या कुणाला काहीही वाटू दे. पण मला मात्र दशावतारी नाटक बघायला आवडेल.

तात्या:- हां बघच तिया. हया हरीकडे लक्ष दिव नको हां.

(आणि तेवढयात स्टेजवर गणपतीचा प्रवेश होतो. नाटकास सुरवात होते. नाटक ऐन रंगात आलेले असताना अचानक हरी थोडा बाजूला जाऊन मोबाईलवर बोलत असतो, त्याला तसे पाहून शांत्ताक्काची चिंता वाढते.)

शांताक्का:- काय हो? हया हरीचा काय झाला? कोणाबरोबर बोलता इतक्या रात्री?

तात्या:- मिया बघतयं काय तां. तुम्ही नाटक बघा.

(तात्या उठून हरीजवळ येतात. हरी मागे वळून तात्यांना पाहून दचकतो.)

तात्या:- काय रे काय झाला. दचाकलसं सो एवढो? हयं खेका उभो रवलंस?

हरी:- काही नाही तात्या. बस सहजच मित्राचा फोन आला होता.

तात्या:- अरे काय नाय कसा. हया बघं पोरा. माझा बोलणा मनात घालुन घेव नको. मनार घे. बाकी काय म्हणना

          नाय माझा. अरे कसलीही समस्या असली तर ती दुस-याबरोबर शेअर करुची असता तरच ती कमी

          होतली.

हरी:- तात्या. मला तुम्हांला खुप महत्वाचं सांगायचं आहे. मी आता अमेरिकेतलं शिक्षण पुर्ण केलेले आहे, आणि

        आता कायमचा भारतातच राहणार आहे. तेव्हा मला आता इथे कामाचंही बघावं लागेलच.

तात्या:- बरा बघ तिया. पण आता हय तेचो काय संबंध?

हरी:- तात्या मला पुण्यातील एका मल्टिनॅशनल कंपनीतुन जॉबची ऑफर आलीये. तेव्हा मला तिकडे जायला हवं

तात्या:- अरे वा. मग तर बरा झाला मरे. मगे तिया इतको टेन्शनात कित्याक?

हरी:- तात्या. मी आता पुण्याला जाणार, तेव्हा शांत्ताक्का काही बोलणार नाही ना?

तात्या:- अरे तिया कित्याक टेन्शन घेतस, मिया समजातय तेका. तु निश्चिंतपणान जा तुझ्या कामाक.

हरी:- थँक यु. थँक यु तात्या.

(तात्या अशा रितीने हरीला आश्वासन देतात. त्यांच्या आश्वासनाने खुश होत हरी पुन्हा नाटक बघायला बसतो. पण त्याला आपण कधी घरी परततो, असे वाटत असते.)

                                       8.

(पहाटेची वेळ. जागरणामुळे सर्वजण झोपलेले असतात. पण तात्यांना मात्र लवकर जाग येते. येरझारा घालत ते बाहेर आलेले असतात. तेवढयात हरी बाहेर येऊन त्यांच्याकडे उभा राहतो. त्याच्या हातात मोठी बॅग असते.)

तात्या:- अरे हरी इतक्या बेगीन खयं चललयं? अरे शांत्ताक्काक उठांदे. ती उठली काय नाश्तो पाणी करुन मग

           भायर पड.

हरी:- तात्या. मला उशीर होईल. खुप महत्वाचा इंटरव्हियु आहे हो हा. ही सर्व मंडळी उठायच्या आधीच मला

        बाहेर पडायला पाहिजे. नाहीतर शांत्ताक्काला समजावण्यात माझा बराच वेळ खर्ची व्हायचा.

तात्या:- बरां. जा तिया.

(हरी तिथून बाहेर पडतो. तात्या हरीच्या पाठमो-या आकृतीकडे पाहत राहतात. फाटक उघडून तो स्टॅण्डकडे जाणा-या रस्त्यावर येतो.   तेवढयात बाहेरची कुजबुज ऐकून शांत्ताक्का उठून तात्यांजवळ येते.)

शांताक्का:- काय हो. बेगीन उठान हयं काय करतास? आणि हरी खय आसा. दिसना नाय तो?

तात्या:- अगो तिया बेगीन कशाक उठलयं? जा आत जा बघया.

शांत्ताक्का:- अहो वोगीच विषय बदलू नकात. हरी खय आसा ता सांगूक नाय माका.

तात्या:- सांगतय. सांगतय सगळा सांगतय. अगो हरी पुण्याक गेलो आसा इंटरव्हियु देवक.

शांत्ताक्का:- आं. असो न सांगता गेलो. अवो दोनच दिवस झालेत तेका हयं येवन, आणि लगेच पुण्याक गेलो?

               माका कितके गजाली मारुचे होते तेच्याबरोबर.

तात्या:- अगो तो इंटरव्हियु दिवन झाला काय येतलो. मगे बस गजाली मारीत. आपण कोणाच्या आवडीक कधी

           लगाम घालता नये.

शांत्ताक्का:- माका तुमचा काय समाजना नाय. हरी असो न सांगता गेलो म्हणजे? बरां जावंदे गेलो तर. त्येचा काम

                ब-यापैकी पुरा झाल्या पुरे.

तात्या:- अगो ता नक्की होतला. चल आता आत जावन विश्रांती घे.

(तात्या शांताक्कासोबत आत निघून जातात.)

                                           9.

(पडदा उघडतो. शेतमळयाचे दृश्य आहे. तात्या एका मोठया आंब्याच्या झाडाखाली उभे आहेत, दुपारची वेळ असते आणि तेवढयातच तेथे जेनी येते.)

जेनी:-(तात्यांकडे पाहत) काय पाहत आहात तुम्ही तात्या?

तात्या:- अगो बाय तु कित्याक इलय? अगो आमची आमराई बघी होतय. बघ कशी डवारली आहा ती. अगो हये 

           आंबे, काजु, जांभळा, करवंदा म्हणजे कोकणचो मेवो आसा मेवो. आमच्या न्हानपणी आम्ही चोरुन

           कोणाचे कच्चे आंबे, पेरु, काजी, आवळे-चिंचा, चितरे खाल्लेले आसत.हयो हरीसुध्दा काय कमी नाय

           होतो. पण तेव्हासारखी मजा आता नाय. तेव्हा शाळेत असताना 1 रुपयाचा लाल हाईस्फ्रोट मिळाचा, ता

           होया म्हणान हरी हया भोकांड पसरी. शाळेतसून येताना हसोळणीची फळा घेवन येय. तेव्हा शांत्ताक्का

            त्येच्यार खुप चिडा, म्हणायची पोरगो अगदी बापाशीर गेलो आसा. पण आता बघतयं तर काय सगळेच

            आठवणी रवले नुसते. त्या आठवणींचे कितके इमारती उभे रवले आणि कोसळले सुध्दा.

जेनी:- तात्या. होईल सगळं ठिक. हरी तुमचाच मुलगा आहे.  तुम्ही तर ऑलवेज ग्रेट आहात.

तात्या:- अगो मिया कसलो ग्रेट? हया हरीक मोठी करणारी शांत्ताक्का ग्रेट. या देशाची, या कोकणाची संस्कृती

           ग्रेट. तुका हयसर खुप काय काय शिकाक मिळतला बघ.

जेनी:- नक्कीच तात्या. कालचे दशावतारी नाटक पण खुप मस्त होते.

तात्या:- वा. आवडाला मा? मगे अगो दशावतार म्हणजे कोकणी माणसाचो थाट.तो आवडाकच होयो.

जेनी:- ओ खरच तात्या.

तात्या:- बरां ता जांवदे. आमचो हरी आवाडता मा तुका? मगे लग्नाचा बघतलसं की नाय?

जेनी:- नो तात्या. आमच्यात लिव्ह इन रिलेशन जसं आहे तसंच राहावं असं मला वाटतं.

तात्या:- अगो बरोबर आसा. काय हरकत नाय. पण पोरा नात्याक लग्नाशिवाय ना मजा नसता बघ.

जेनी:- पण मी जिथून आले तिथे या नात्याला गुलामी मानले जाते तात्या.

तात्या:- खरा गो खरा. आजकाल लग्न म्हणजे गुलामी, बेडी असाच मानला जाता. पण येक लक्षात ठेय.

           आमच्या भारताच्या संस्कृतीत लग्न खूप महत्वाचा मानलेला आसा. अगो लग्न म्हणजे दोन जिवांचा

           मिलन, दोन जिवांचा आपापसातला प्रेम. हां आता धर्माच्या, संस्कृतीच्या नावाखाली लग्न असल्याने

           काही लोकांका ती एक गुलामगिरी, बेडी वाटणा स्वाभाविक आहा. अगो आपली ही व्यवस्था

           पुरुषप्रधान आसा. तेच्यामुळे पुरुषांची एकाधिकारशाही संसारात चलता. बायकांनी फक्त घर आणि मुला

          सांभाळुची असा मानला जाता. बायको म्हणजे पुरुषांच्या दृष्टीने फक्त एक गुलाम असते, अशी समजूत

          पहिल्यापासून चलत इली आसा. बायकांनी उपास-तपास करुचे, पुरुषांसाठी मंगळसुत्र घालुचा,

          व्रतवैकल्या धरुची, पुरुषांनी मात्र काहीच करता नये. बायका आपला घरदार सोडून नव-याच्या घरात

          रवाक जातत, पण तेचा कौतुक कोणाक नसता बघ. आज थोडी फार परिस्थिती बदालता आसा. आजची

          बाईमाणुस मुंबई-पुण्याक जावन नोकरी धंदो करता. पुरुषांच्या खांदयाक खांदो लावन संसार चलयता.

          कदाचित आता तरी ही पुरुषी मानसिकता बदलात असा वाटता.

जेनी:- नक्की बदलणार तात्या. ही मानसिकता नक्की बदलणार. पण एक सांगु तात्या, तुम्ही खुप चांगलं बोलता

         हो, खर तर तुम्ही लेखक असायला पाहिजे होतं.

तात्या:-(मिश्किल हासत) अस्सा होय. अगो मिया आसयचं लेखक. जास्त शिकाक नसलयं म्हणान काय झाला.

          पण शिकाची खुप इच्छा आसा बघ.

जेनी:- तात्या काळजी करु नका. मी शिकवीन तुम्हांला सगळं.

तात्या:- बरा चल आता घराक. बरोच काळोख झालो आसा. शांत्ताक्का वाट बघत असतली.

(तात्या आणि जेनी उठून भरभर पावले टाकीत घराच्या दिशेने जातात.)

                                           दुसरा अंक

                                               1.

(पडदा उघडतो. स्टेजच्या मध्यभागी झोपाळयावर तात्या बसलेले आहेत. तात्या शांतपणे बाहेर पाहत आहेत, आणि तेवढयात शांत्ताक्का त्यांच्याजवळ येते.)

शांताक्का:- अहो दोन दिवस झाले मवो हरीक पुण्याक जावन. काय झाला, तेका नोकरी गावली काय नाय कायच

                समजाक मार्ग नाय. बरां तेचो फोनय लागना नाय.

तात्या:- अगो येतलो तो. तेका येळ मिळाक नसतलो फोन करुक. जा माझ्या खिशातलो फोन घेवन ये, मिया फोन

           लावन बघतयं.

(तेवढयात फाटकाचा दरवाजा उघडल्याचा आवाज येतो. पाठोपाठ हरी आत प्रवेश करतो.)

तात्या:-(हरीकडे पाहत) अरे हयो काय हरी ईलो. अरे फोन तरी करुचो हरी, मिया नेवक इलयं असतयं तुका

          स्टँडार.

हरी/-(काहीसा उदास चेह-याने) नाही नको तात्या. त्याची काही गरज नाही.

(हरी तसाच उदास चेह-याने आतमध्ये जातो)

तात्या:- आता हयेचा काय झाला?

शांताक्का:-(जागेवरुन उठत) मिया बघतयं काय झाला आहा तां.

तात्या:- नको तिया हय बसं मिया जावन बघतयं काय ता. 

(तात्या आत जातात. हरी भिंतीकडे तोंड करुन उदास चेह-याने उभा असतो.)

तात्या:- अरे हरी काय झाला? असो भिंतीकडे तोंड करुन कशाक रवलयं?

हरी:- (तात्यांकडे वळून पाहत) तात्या ज्याच्या आयुष्यात नोकरी मिळायची नसेल तर त्याने इंटरव्हियु तरी का

         दयावा?

(तात्या हरीजवळ जात त्याच्या पाठीवर हात ठेवतात)

तात्या:- काय झालां हरी नोकरी गावाक नाय?

हरी:- ते म्हणतात, तुम्ही शिकलेले, फॉरेन रिटर्न. उदया आमची कंपनी मध्येच सोडून गेलात तर?

तात्या:- अरे अरे अरे. असा म्हटला तेंच्यानी. काय पण लोका असतत ही, अरे एखादयाची मेहनत, तेचो

           प्रामाणिकपणा बघुच्या पेक्षा हयेंका फक्त आपली कंपनी बंद पडतली हयेची चिंता आसा.

हरी:-(हताश होत) सांगा तात्या, मी काय करु आता?

तात्या:- अरे ही काय एकच संधी आसा तुझ्याकडे. माणसान कसा आशावादी रवाचा असता, मगे शेवटपर्यंत

            पिक्चर व्यवस्थित चलतलो.

हरी:- तात्या तुम्हीच उपाय सुचवा हो काहीतरी.

तात्या:-(काही क्षण विचार करत) हरी तुझा शिक्षण झाला अमेरिकेत. ता सुध्दा एम टेक. अरे आमच्या काजु

          युनिटात तुझ्या तंत्रज्ञानाची खुप मदत होतली. आणि तुका पैशाबरोबरच मान सन्मानय कमवक मिळतलो.

हरी:- तात्या म्हणजे मी इथे राहून काम करु का?

तात्या:- तर काय झाला बाळा. अरे तु हयं रवान काम कर, नायतर शहरात जावन. पैसो महत्वाचो आसा, तसा

            तुझा ज्ञानय महत्वाचा आसा. तुका हय कोण जोत धरुक सांगना नाय. फक्त तुझा ज्ञान हयसर उपयोगी

            पडतला आणि एक चांगली संधी लोकांका गावतली म्हणान मिया म्हणा होतयं. अरे तुमच्यासारखे तरुण

             शिकान बाहेरच्या देशातल्यांचो फायदो करुन देतात, आमच्या देशाक मात्र इसारतास हां. 

हरी:- ठिक आहे तात्या. मी इथे काजु युनिटमध्ये राहून काम करायला तयार आहे, पण कधीतरी मला बाहेरगावी

        जावचं लागेल.

तात्या:- अरे ता नंतर बघया. आणि आता भायर चल, वायच जरा हसरो चेहरो घेवन चल. उगाचच पडलेलो चेहरो

            घेवन गेलसं, तर शांत्ताक्काक वाईट वाटताला.

(तात्यांच्या आश्वासनपुर्वक बोलण्याने हरी गावात राहून काम करायला तयार होतो.)

                                              2.

(स्टेजवर एका कोप-यात ठेवलेल्या खुर्चीवर शांत्ताका जपाची माळ हात घेऊन बसलेली आहे. तिचा जप चालु आहे. तेवढयातच तिथे तात्या येतात)

तात्या:-(शांत्ताक्काला पाहत) अगो शांत्ताका. ऐकलस?  जेनी बरोबरचो तो पोरगो आसा ना जॉन मोठो गोड

         आसा गो. माका गजाली सांगी होतो अमेरिकेतले. लबाड कुठलो.

(शांत्ताक्का काहीच बोलत नाही.)

तात्या:- अगो काय झाला? माझ्याबरोबर बोलनय नाय कित्याक, राग इलो?

शांत्ताक्का:- अवो तुमचो राग कसलो? हरी किती वर्षांनी घराक इलो आसा. तेव्हा माझ्या मनात होता, की तेच्या

                हातसून सत्यनारायणाची पुजा घालुन घेवची.

तात्या:- अरे वा . चांगला आसा मगे. पण तिया उदास खेका बसलयं?

शांताक्का:- अवो माका हरी ऐकात असा वाटना नाय. नाय म्हणजे मॉर्डन तो, तेका असला काय पसंद नाय

                 पडाचा.

तात्या:-(हसत) अगो हया तिया करतय ता तुझ्या समाधानासाठी आणि तेका सुख मिळा होया या भावनेनं करतय

            मा? मगे तो खेका ऐकाचो नाय?

शांत्ताका:- होय ओ होय. ऐकतलो माझो हरी. तेका समजावा तुम्ही.

तात्या:- होय होय समजतयं. आता बोलाचा बंद नाय मा करुचयं?

(शांत्ताक्का खुदकन हसते. तात्याही खुश होतात.)

                                   3.

(बाहेरचा व्हरांडा. लाकडी बाकडा ठेवलेला आहे. त्यावर बसुन जेनी हरीसोबत संभाषण करत आहे.)

जेनी:- हरी खरं सांगु तुला. तात्या इज रियली ग्रेट ॲण्ड ऑनेस्ट मॅन.

हरी:- रियली? अगं त्यांचा बोलण्यात कोणी हात धरु शकणार नाही. समजलं?

जेनी:- पण काहीही म्हण हरी ते बोलतात ते खुपच मिनिंगफुल असते, त्यांनी तर स्वत:ची संस्था सुरु केली पाहिजे.

हरी:- (मोठयाने हसत) हा हा हा हा. जेनी यु बिलिव्ह इट. अगं हा इंडिया आहे, आणि त्यातही हे कोकण आहे.

        आपल्या इकडे मराठी माणसांची ख्याती आहे, की तो दुस-या मराठी माणसाची प्रगती पाहु शकत नाही,

        त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतो. आपण आपल्या कंट्री मध्ये करियर, इकॉनॉमी, एज्युकेशन 

       याबददल चर्चा करतो. तर इथे या देशात बाष्फळ चर्चा कधी राजकारणावर, तो अमका काय बोलला, तो

       तमका काय बोलला. नाहीतर जमिनीच्या वाटण्या आणि मारामारी अशा गोष्टींवर चर्चा चालते. अगं 

      देवदेवस्की, तंत्र मंत्र असल्या गोष्टीत रममाण होणारी माणसे आहेत ही.

जेनी:- ओह. हरी आय नो इट. पण तात्या या कशातही मोडणारे नाहीयेत. शेवटी प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव

         वेगवेगळा असतो.

(तेवढयात तात्या आलेले पाहून जेनी आपले बोलणे थांबवते, हरी वळून पाहतो.)

तात्या:- (जेनी कडे पाहत) सॉरी सॉरी हां. काय महत्वाचा बोलणा चालु असात तर‍ मिया मगेन येतय.

हरी:- नाही तात्या. तसे काही नाही.

तात्या:- हां मगं ठिक आसा.

हरी:- तात्या, काय बोलायचं होत तुम्हांला?

तात्या:- अरे तिया अमेरिकेक गेलसं, आणि थयसलोच झालयं, वाट बघून बघून आमचे डोळे सुजले, तेव्हा

           इतक्या वर्षानंतर तिया परत इलय.

हरी:-तात्या, प्लीज मुददयांच बोला.

तात्या:- ओ येस. तुम्ही अमेरिकेतले. तुमका सरळ मुददयाक हात घालुची सवय. तर माझा म्हणणा असा होता,

           की तुझ्या हातसुन सत्यनारायण करुन घेवचो आसा.

हरी:- काय? तात्या तुम्हांला तर माहित आहे, माझा असल्या गोष्टींवर विश्वास नाही ते.

तात्या:- ए अमेरिकना. अरे तिया भारतात जन्माक इलसं हया इतक्यातच इसारलास की काय? अरे लहान

           असताना तर कधी माका म्हणाक नाय की माझो हया असल्या गोष्टींच्यार विश्वास नाय म्हणान. तेव्हा

            गणपती हाडुचो असात, नायतर विसर्जन करुचो तेच्यात तुझो नंबर असायचो, आणि माका आता हयता

            सांगतय. हया बघ हरी एक समजानं घे, हयो देश संतांचो, देवांचो आसा. कितीतरी थोर महात्मे, युगपुरुष

            या मातीत जन्मलेले आसत. अरे देव-दानव हया जरी पुराणातला असला तरी आपल्यावर एक अज्ञात

            शक्ती आहे, तेचा स्मरण करुचा हया हेतुन ही मंदिरा उभी रवली,हे पुजा केले जातत. त्येच्यात आपली

            त्या अज्ञात देवार असलेली श्रध्दा असता. अरे देव काय शेवटी सगळीकडेच असता. आमच्या हिंदु

            धर्मात गणपती, शंकर, विष्णु अशा रुपात मुसलमानांच्यात अल्लाच्या रुपात तर ख्रिश्चनांच्यात येशुच्या

            रुपात. हयो धर्म, ही जातीची लेबला माणसांन तयार केलेली आसत. देव म्हणना नाय माझी पुजा करा,

            पण असाय म्हणना नाय की तुम्ही माका इसरा. अरे हया देवाक इसारणा म्हणजे आपल्या चांगल्या

             कर्मांका इसारणा, स्वत:चा मोठेपण दाखयणा. कळलां?

हरी:-   मला समजतयं तात्या. देव शेवटी श्रध्देला पावतो, पण श्रध्दा ही डोळस असायला पाहिजे. आपल्याकडे

         अंधश्रध्देच्या नावाखाली बरेच प्रकार केले जातात, त्याला जबाबदार कोण? देवाची पुजा केली की सगळं

          मिळणार. देवाला नैवेदय दाखवला तर देव हवं ते देणार. देवाच्या पुढयात देवाला प्रसन्न करण्यासाठी त्या

          मुक्या कोंबडे बक-यांना कापले जाते. भटजींकडून अमकी पुजा, तमकी पुजा करुन्‍ घेतली जाते. त्याच्या

         नावाने भटजी बरीच दक्षिणा उधळत असतात. हे सर्व प्रकार देवाच्या नावाखाली केले जातात. मृत्‍ व्यक्तीचे

          पिंडदान करताना कावळाच शिवावा म्हणून प्रसंगी त्या कावळयाला कुठेही असला तरी घेऊन येतात. जो

          माणूस मृत व्यक्तीला अग्नि देतो, त्याचे धर्माच्या नावाखाली मुंडन केले जाते, वारेमाप खर्च करुन म्हाळ

          घातले जातात. इतर सण साजरे केले जातात, लग्ने केली जातात. या सर्वांना जबाबदार कोण आहे तात्या?

तात्या:- वां बरा बोललयं तिया. अरे हयसर रवाक नसान पण बराचं काय काय कळलां तुका. मगे ऐक तर. देवाक

श्रध्देनं पाया पडा होया, तो माणसाच्या मनातलो भाव असता. अंधश्रध्दांबददल बोलाचा तर मी मुळाच

म्हणाचयं नाय की जा पटना नाय ता पाळूकच होया. पूर्वजांनी आपल्या समजूतीप्रमाणे व त्या काळाची

गरज म्हणान काही गोष्ट बनयले, तेका अंधश्रध्देचा रुप दिला गेला. अरे देव हयो भक्तीचो भुकेलो असता

रे, तो कधी माका कोंबडी बक-यांचो नैवेदय दि म्हणान म्हणना नाय. देवाक नैवेदय दाखवक होयो, तो

शुध्द शाकाहारी असाचो असा माझा मत आसा, आणि तु म्हणतसं नैवेदय कशाक दाखवचो, तो काय

खातलो हां. तर बाळा लक्षात घे, आता तुझ्या घरात कोणी पाहुणो इलो तर तिया तेका उपाशी

ठेयतलसं?मगे तसाच आसा तां. देवाक नैवेदय दाखवन घरातल्यांनी तो खावचो असता, कारण घरात सुख

शांतता येता तेच्यामुळे. शेवटी माणूस थोडोसो स्वार्थी असता म्हणान तेका वाटता की देवाक नैवेदय

दाखयलो, देवाक खुश केला म्हणजे देव पावतलो, पण देव प्रयत्न करणा-या माणसाच्या पाठीमागे असता,

हया तेंका समजना नाय. भटजींचा म्हणशीत की ते अमकी पुजा करु होयी, तमके ग्रह शांत करु होये

म्हणान सांगून दक्षिणा घेतत, पण तो श्रध्देचो भाग आसा. पुजेच्या नावाखाली दक्षिणा उकळणा आणि ती

पुजा नायतर ग्रहशांती केली म्हणान सगळा होतला असा मानणा म्हणजे अंधश्रध्दा आसता. पण आपण

श्रध्दा महत्वाची मानूची असता, आपल्या घरात, कुटुंबात प्रसन्न वातावरण रवा होया म्हणान असे पुजा

करुचे असतत, पण ते श्रध्देनं. आणि हां तेच्यात गुरफटान मात्र रवता नये. उगाचच हया बाबांचे दोरे घाल,

लॉकेटा घाल असला मात्र काय करता नये. अजून एक सांगतय, अरे पिंड दान करणा हया आमच्या

संस्कृतीची शिकवण आसा, अरे माणुस 84 लक्ष योनीतसून फिरल्यानंतर तेका हयो मनुष्यजन्म मिळता.

त्यामुळे तेनी जितेपणी जा काय आपल्यासाठी बरावाईट केलेला आसा तेची एक आठवण म्हणान हया

पिंडदान करुचा असता. आता रवलो प्रश्न पिंड कोणी शिवाचो तो, तर तो कावळयानचं शिवा होयो असा

काय नाय आसा. पण ती आपली समजूत आसा, की मेल्यानंतर माणसाक कावळयाचो जन्म गावता

म्हणान असा केला जाता.

     बाळा मीया सगळीच शास्त्रा, सगळेच प्रथा चुकीचे आसत, वाईट आसत असा म्हणनय नाय, आणि

सगळीच बरोबर आसत असाय म्हणनय नाय. तु बोलतयं ताय माका पटता, उगाचच देवाच्या

नावाखाली चलणारे अंधश्रध्दा, कोणी मृत व्यक्तीला अग्नि दिल्यानंतर त्याचे मुंडन करणा हे असले गोष्टी

मियापण बरोबर म्हणनय नाय. पण येक आसा, देवाची ख-या श्रध्देनं पुजा करणा हयेच्यात चुकीचा

काय नाय, समाजला?

(एव्हाना हरी दिड:मुढ अवस्थेत जेनीच्या तोंडाकडे पाहत स्तब्ध उभा राहतो. तात्यांच्या बोलण्याचा त्याच्या मनावर परिणाम झालेला असतो.)

हरी:- ओके तात्या. तुम्ही म्हणत असाल तर आणि फक्त श्रध्देने म्हणून मी पुजेस बसायला तयार आहे.

(त्या दोघांचे संभाषण दरवाजाआडून ऐकणारी शांत्ताक्का समाधानाने सुस्कारा सोडते, आणि घरात निघून जाते.)

                                                  4.

(पडदयावर जंगलाचा देखावा असतो, जेनी आणि जोन कोकणातल्या मातीत रुळलेले असतात, तात्यांनी त्यांना निसर्गावर प्रेम करायला शिकवलेले असते, ते त्यासाठीच फिरत फिरत जंगलात आलेले असतात. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत असतो.)

तात्या:-(जेनीकडे पाहत) ऐक. ऐकलयं? हे पक्षी बघ कसे सुरात ओरडतत. अगो हयेंचा गाणा म्हणजे परमेश्वरान

           दिलेली साद. हया निसर्गाचा संगीत ऐकला काय नाय, की पैशाच्या पाठसून धावणारी ही यंत्रवत माणसा

           आणि हया जग इसरान जावच्या सारख्या वाटता बघ. अगो फेसबुक, टिवटर, इन्स्टाग्राम, व्हॉटसअप

          हयेच्यार बरेच लाईक्स आणि कमेंटस येतीत.पण परमेश्वरानं बहाल केलेलो हयो निसर्ग आणि तेचा सौंदर्य

           हयेच्यासमोर हया सगळा कमीच आसा. हया पक्ष्यांचा संगीत ऐकलसं. हयेंचो सुर बघ कसो गोड वाटता.

          अगो हया सगळयांचा आपल्या आयुष्यात खुप मोठा स्थान असता हया आजच्या माणसाक समाजना

          नाय. आजच्या माणसांन स्वार्थापोटी जंगलतोड केली, पर्यावरणाची हानी केली. मुक्या प्राण्यांका

          मारल्यानी तेंका निसर्ग कसो काय चांगलो राखतलो? हे सगळे रोग, महारोग सगळा काय ना त्या निसर्गाचो

          कोप आसा कोप.

जेनी:- आय नो तात्या. पण तुम्हांला हे फेसबुक, टिवटर, इन्स्टाग्राम बददल तिथल्या लाईक्स कमेंटसबददल

         कोणी सांगितलं?

तात्या:- हां मगे? अगो माका असो तसो समझा नको. अगो माझी गावात सगळयांशी खास ओळख आसा.

           तेच्यात तो सुम्या गेलो सुनलो, तेनीच माका दाखयल्यान फेसबुक, टिवटर आणि इन्स्टाग्राम.

जेनी:-ओ ग्रेट. भेटल पाहिजे तुमच्या या अवलियाला. पण तात्या  सोशल मिडियावर सगळचं काही वाईट नसतं.

         धिस इज बेस्ट प्लॅटफॉर्म टु शेअर एनीवन. 

तात्या:- ता काय माका नाय माहिती. अगो तंत्रज्ञान जसा चांगला, तसा वाईट असता. मिया काय सुधारणेच्या,

           तंत्रज्ञानाच्या विरोधात नाय आसय. अगो कृषि पर्यटन या विषयार सुनल्याक सांगान यु-टयुबार

           व्हिडीओपण शेअर केलयं. गावातल्या सगळया लोकांनी तो व्हिडीओ बघल्यानी, शेअर केल्यानी, आणि लाईकपण केल्यानी. जवळजवळ 12 हजार व्हियुज मिळाले. पण अदयापपर्यंत कृषि पर्यटन काय हयसर येवक नाय.

जेनी:- होईल तात्या, तुमचं कृषि पर्यटनाचं स्वप्नही नक्की पुर्ण होईल.

तात्या:- अगो ता स्वप्न नक्की पुर्ण होतला. आमचा शासन चांगले चांगले उपक्रम राबयता. योजना राबयता. तेका लोकांचो चांगलो पाठिंबो मिळाक होयो. उगाचच राजकारण होता नये, तरच आमच्या कोकणचो कॅलिफोर्निया होवक येळ लागाचो नाय. हां आता प्रशासनात एखादा काम होवच्यासाठी हेलपाटे घालुचे लागतत, रस्ते खराब आसत, चांगले वैदयकिय सोयी मिळनत नाय हया जरी खरा असला तरी प्रशासन गतिमान होता आसा. नक्कीच आमच्या प्रशासनात तो सुदिन येतलो जेव्हा सगळा कसा एकदम स्वच्छ असतला. कोणाक कसली काळजी नसतली. पण एक सांगु जेनी, अगो ता जुन्या काळात कोकण होता, तेची सर काय नाय आजच्या काळातल्या कोकणाक, गावांका नाय बघ. तो वडाचो पार, तो सुरपारंब्यांचो खेळ, ती फणसाच्या गरांची भाजी खाण्यातली मजा. हया सगळा खयंतरी हरवल्यासारखा वाटता बघ. शेवटी शहरा मोठी झाली, ती सुध्दा गावाच्या जिवार मोठी झाली. अगो आपलो भारत देश खेडयात रवता, म्हणान तर महात्मा गांधींनी खेडयाकडे चला असो संदेश दिलो होतो. माझ्या हरीक शहरात जावन काम करुचा आसा, तेका माझो विरोध नाय गो. पण तेनी हयो देश सोडता नये. हया मातीसाठी तेनी कायतरी करु होया.

जेनी:- काळजी करु नका तात्या. हरीला मी चांगलचं ओळखते, तो आता इथुन कुठेही जाणार नाही, आणि एक दिवस तुमचं स्वप्नही पुर्ण करणार.

(तात्या व जेनी मावळतीच्या सुर्याकडे पाहत पाहत आपल्या घरी जातात.)

                                                 5.

(पडदा उघडतो. स्टेजच्या मध्यभागी तात्या उभे आहेत. 15 ऑगस्टचा दिवस. झेंडावंदन होत आहे. बिगुल वाजलेला आहे. तात्या आपल्या मन:चक्षुसमोर तो क्षण आणत आहेत. नकळत झेंडयाची प्रतिमा डोळयांसमोर आणत ते सॅल्युट करतात. तेवढयात किचनमधुन बाहेर येत शांत्ताक्का त्यांना पाहते.)

शांताक्का:- (तात्यांकडे अभिमानाने पाहत) इतकी वर्षा झाली, पण तुमचो नेम काय चुकलो नाय. 15 ऑगस्ट,

                26 जानेवारीक झेंडावंदनाक जावक नाय गावला तरी खयय असलात तरी सॅल्युट मारतात.

तात्या:- मगे, अगो तो आपल्या देशाचो झेंडो आसा. त्या झेंडयासाठी किती लोकांनी आपले प्राण पणाक लायलेले आसत. आमच्यासाठी काय हयो 15 ऑगस्ट, 26 जानेवारी म्हणजे काय तर सरकारी सुटटी आणि मौजमजा. अगो हया झेंडयासाठी हया देशासाठी कित्येक स्वातंत्रयसैनिकांनी हौतात्मय पत्करला. पण आता काय दिसता, तर निव्वळ राजकारण. झय जावचा थय राजकारण. अगो राजकारण वाईट नाय, पण ता करणा वाईट असता. राजकारणाचा समाजकारण करण्याची किमया जेका जमली ना, तो खरो संत म्हणा होयो बघ. आपले ए.पी.जे अब्दुल कलाम, पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, डॉ.राजेंद्रप्रसाद, डॉ.आंबेडकर हया असामींनी राजकारण करुक नाय, राजकारणात रवान समाजकारण केला. पण आज काय दिसता, तेंच्यांनी दिलेली शिकवण धुळ खायत पडलेली आसा. आरक्षण हयो हक्क म्हणान आंबेडकरांनी संविधानात तरतुद केली, पण तेचो विपर्यास करत आज सगळीकडे प्रत्येक मागण्यांसाठी आंदोलना, आरक्षणाच्या मुददयावरुन गदारोळ, भ्रष्टाचार हया सगळा चललेला आसा. लोकांचो जीव महत्वाचो नाय, स्वत:ची तुंबडी भरण्याची प्रवृत्ती वाढत चलली आसा. वाटणीवरसुन भांडणा, अमको काय बोललो, तमक्यान देशासाठी काय करुक नाय म्हणान चिखलफेक असला सगळा बघुचा लागता. प्रत्येक गोष्टीचा भांडवल केला जाता. वर लोकशाहीचो चौथो स्तंभ तयारच असता, अशा लहानसहान गोष्टींचा भांडवल करुक. अरे हय गरीब मरतत पुरामुळे, अपघातात, उभीच्या उभी घरा कोसळतत, पण त्येंका मदत दिवची सोडून तेचापण राजकारण केला जाता.

(शांताक्का सगळं शांतपणे ऐकत असते. शेवटी कंटाळून ती बोलते.)

शांताक्का:- अहो हयता तुमचा तत्वज्ञान माका बुवा काय समाजना नाय. मिया तुमका काय सांगुक इल्लय. हां.

                 आठावला. अहो नारळ लागलेले आसत, ते काढूक कोणतरी माणुस बोलवचो लागतलो. ते काढून

                  वायच हरीक घेवन बाजारात इकुन येवचे म्हणतय.

तात्या:- अच्छा, हया सांगुचा होता, ता मिया बघतयं. गजो येतलो तिया काळजी करु नको. बरा आज जेवणात

           काय केलसं? सुको बांगडो काय गोलम्याची चटणी?

शांत्ताक्का:- चला तुमचा आपला कायतरीच असता केव्हाय. हरीपेक्षा न्हान जातात केव्हातरी.

तात्या:- मगे कायतरीच कसा. अगो प्रत्येक माणसात एक न्हान मुल दडलेला असता.

शांताक्का:-(गालातल्या गालात हसते) चला गॅशीर कढी ठेयलयं, उकाळली असतली मिया बंद करुन येतय.

(शांताक्का पुन्हा आत जाते. तात्या झोपाळयावर पेपर वाचत बसतात. तेवढयात फाटकाचा दरवाजा उघडुन हरी आत येतो.)

तात्या:-(हरीला पाहतात) अरे हरी. ये ये बरा झालां तिया इलय तो.

हरी:- (वैतागत) का?काही सांगायच होतं का तात्या?

तात्या:- अरे काय झाला, वैतागतयं कित्याक. आणि मिया काय सांगतलयं तुका? तिया सांगु होया मिया ऐका

           होया. तुझा काम बरा चलला मां? आणि आज बेगीन सो इलयं? तब्येत वगैरे बरी आसा मा तुझी?

हरी:- माझी तब्येत बरी आहे तात्या. मला तुमच्याशी महत्वाच बोलायचं आहे.

तात्या:-(पुढे सरसावतात) आं. काय महत्वाचां बोलाचा आसा. हय ये आणि बसान बोल. अरे हल्ली

           आपल्यातला संभाषणय कमी झाला बघ. हयेच्यामुळे काय झाला आमच्या पिढीत आणि तुमच्या पिढीत

          काय ती कम्युनिकेशन गॅप वाढत चललेली आसा. (मोठयाने हसतात)

हरी:-(तात्यांच्या नजरेत नजर मिळवत बोलतो) तात्या, मला अमेरीकेला परत जायचं आहे.

(हे शब्द कानी पडताच आतुन पाण्याचा तांब्या घेऊन येणा-या शांत्ताक्कांच्या हातातील तांब्या खाली पडतो.)

तात्या:- आं. अरे असो अचानक? अरे काय झाला, असो अचानक तिया इतको मोठो निर्णय कित्याक घेतलस?

             तिया तर सगळा थससला सोडून हय कायमचो रवाक इल्लय मरे?

हरी:-हो आलो होतो मी कायमचा इथे राहण्यासाठी. पण येथे येऊन वाटु लागलं, की मी अमेरिकेत खुप खुश होतो

(तात्या निशब्द बनतात. तेवढयात हुंदके अनावर न झाल्याने मोठयाने रडत शांत्ताक्का बाहेर येते. ती उंब-याला धरुन मटकन खाली बसते.)

तात्या:- अरे काय झाला काय पण?

हरी:- तात्या मला नाही वाटतं मी इथे राहून काही करु शकणार. अहो इथे रिकामटेकडेपणा करणारी, लावालावी

       करणारी, राजकारणावर वायफळ चर्चा करणारी आणि कायम सोशल मिडीयावर आपलं मोठेपण

       दाखवण्याची धडपड करणारी माणसं आहेत. सरकारी दप्तरात एका कागदासाठी सतराशे साठ वेळा हेलपाटे

      घालावे लागतात. तिथेही कुठले काम व्हायचे असेल तर लाच मागितली जाते. गरीब, अडाणी अशीच

      माणसे इथे भरलेली आहेत. काहीजण रस्त्याने जाताना पान खाऊन कुठेही थुंकतात, तर काहीजण सार्वजनिक

      ठिकाणं आहेत हे माहिती असुनही तिथे थुंकत असतात. पावसाळयात तर नाले, गटारे नुसती तुंबुन वाहतात.

      मुंबईत तर कायम पाणी भरलेले असते. तुमच्या कंपन्यांमध्ये स्फोट होतात. जीर्ण जुनी मशिनरी वर्षानुवर्षे

      तशीच चालु असते, त्यामुळे कित्येक लोकांचे जिवही जाऊ शकतात. धंदा करायचा झाला, तर किती  

      सोपस्कार पुर्ण करावे लागतात. आज इकडे इमारत कोसळली, उदया तिकडे शेतक-यांनी आत्महत्या केली

      याचे आकडे मात्र जाहीर केले जातात. आपली अर्थव्यवस्थाही दारुवर चाललेली आहे, असे वाटते.

     हॉस्पीटल्सच्या सोयी चांगल्या नाहीत. चांगल्या सोयी असलेली हॉस्पीटल्स रुग्णांची लुट करतात. पैसा नसेल

     तर रुग्ण मेला तरी चालेल, काही सोयरसुतक नसते. दुष्काळ, अवकाळी पाऊस यांमुळे उभ्या पिकांची हानी

    होते, पण सरकार दरबारी काय मदत मिळते, तात्या? नुकसानीची पाहणी करण्यासाठी हे लोक A/C गाडयांतुन

    जातात, पण पायांना चिखल लागू नये याची काळजी घेऊन वावरतात. असे लोक काय करणार आहेत? आणि

    लोकही यांच्या नेतृत्वाखाली कुठवर प्रगती करणार आहेत. कोणत्याही छोटया मोठया गोष्टीचे राजकारण केले

    जाते. मिडिया कुठल्याही फालतु विषयाची न्युज करुन TRP  मिळवण्याचा प्रयत्न करत असते. जिकडे तिकडे

    काळाबाजार, साठेबाजी चालु आहे. सर्वसामान्यांचे कंबरडे महागाईने मोडून गेले आहे, अशा या देशात का

    राहु मी तात्या तुम्हीच सांगा? जिथे जन्मापासून बाळाला जात जोडली जाते, धर्म जोडला जातो, तु पुरुष-तु स्त्री

   असा भेद केला जातो, तिथे मी का राहु?

(एवढा वेळ तात्या शांतपणे त्याचे बोलणे ऐकत असतात. नंतर ते उठून पाय-या उतरुन सरळ अब्दुल कलामांच्या फोटोसमोर जाऊन उभे राहतात.)

तात्या:- (फोटोकडे पाहत) तुका माहिती आसा हरी, हे ए.पी.जे अब्दुल कलाम, आमचे राष्ट्रपती होते. हे सगळे

         राष्ट्रपुरुष, संत हयेंचे फोटो मिया हय घरात खेका लायलय माहिती आसा तुका? अरे कारण तेंचो आदर्श  

        डोळयासमोर ठेवन काम करुचा आसा. अरे त्येंच्या काळातय असेच समस्या होते, पण तेंच्यानी त्येच्यार

         मात करत नवीन इतिहास घडयलो. अरे हे कलाम मोठे शास्त्रज्ञ होते. त्येंच्यानी हयो देश संरक्षणात पुढे जाव

         होयो म्हणान किती प्रयत्न केले असतीत हया तुका नाय समजाचा. म्हणानच तेंका आपण मिसाईल मॅन  

        म्हणान ओळखतो. हे स्वातंत्रयवीर सावरकर, अरे देशासाठी तेंच्यांनी काळया पाण्याची शिक्षा भोगली. हे  

        गाडगेबाबा आयुष्यभर स्वच्छतेचो मंत्र जपलो हयेंच्यानी. स्वामी विवेकानंद अरे तुमच्या अमेरिकनांनी

        नुसता तेंच्यांनी माय ब्रदर्स ॲण्ड सिस्टर्स हया शब्दांच्यार टाळयांचो नुसतो पाऊस पाडलेलो, माहिती

       आसा. आणि हे आमचे राजे शिवछत्रपती. हयेंच्यार शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हयो वेगळो विषय शिकयलो

       जाता तुमच्या अमेरिकेत, ता तरी मान्य आसा मा? अरे हे आपल्या देशातच जन्माक इले, ते काय सगळी

       सुखा भोगत होते, असा नाय. तेंच्यांनी स्वकष्टातसुन आपली ओळख तयार केली.

               अरे तिया जा आता माका सांगलस ना ता बरोबर नाय असा माझा म्हणणा नाय आसा. पण प्रत्येक ब-

       या कामाची सुरवात आपण आपल्यापासुन करुची असता. प्रत्येकवेळी दुस-याक दोष दिवन चलना नाय.अरे  

       प्रगत म्हटल्या जाणा-या तुमच्या अमेरिकेतसुध्दा काळो-गोरो असो भेद केलो जाता मा? होय हया खरा

      आसा की आमच्या देशात फॅक्टरीत जुनी जीर्ण मशिनरी अजुनय वापरली जाता. इमारती कोसाळतत,

      लोकांचे जीवय जातत. सगळा खरा आसा, पण त्येच्यामागे प्रत्येक लहान मोठो घटक जबाबदार आसा. अरे

      हया सगळा होता ता बदलुची धमक तुमच्यासारख्या शिकल्या सवरलेल्या तरुण लोकांकडे आसा. अरे

      संघटित जावन स्वत:च्या हक्कासाठी आवाज उठव होयो. तरच हया चित्र सुधारतला आसा.

            माझ्या बालपणी"असावा सुंदर चॉकलेटचा बंगला" हे गाणे किती आवडीने म्हणत असू. "मामाच्या

      गावाला जाऊया" म्हणत धुराच्या ट्रेनचे चित्र डोळयासमोर येत असायचा. पण आता तो चॉकलेटचो बंगलो

      पण नाय, आणि ती धुराचे रेषा काढणारी ट्रेनपण नाय. खय गेली कळाक मार्ग नाय.आता मेट्रो इली, प्रगती

      झाली. चॉकलेटचो बंगलो गेलो, आणि काही धनदांडग्यांनी सोन्यान मढयलेलो सोन्याचो बंगलो इलो. थय

      सगळाच सोन्याचा, अगदी बाथरुमपण सोन्याचा.

         हरी बेटा अरे हया जग म्हणजे एक रंगीत टिव्ही आसा. जेच्यात किती रंग सामावलेले आसत. आपलो हयो

       देशसुध्दा तसोच आसा. हयेच्यात कधी कोणाचे सुखाचे रंग असतत, तर कधी कोणाचे दु:खाचे रंग असतत.

       प्रेमाचे रंग असतत, भावनेचे रंग असतत, तर कधी जवानांच्या रक्ताचे रंगपण असतत, आणि हया रंगांची

       उधळण असली तरच टिव्हीवरचा चित्र बरा होता, बरोबर मा? आता हया रंगीत टिव्हीची क्लिॲरिटी HD

       ठेवची, साधी ठेवची काय एकदम 4K बनवची ता आपल्या हातात असता बघ. हया माझा सांगणा

      तुमच्यासारख्या Whatsupp बघुन नायतर फेसबुक, टिवटर वरसुन मिळालेला नाय आसा, हयेंच्यापेक्षा मिया

      जे मित्र जोडलयं ना तेंच्याकडसून हे बरेच गोष्टी समजले आसत. बेटा तुका अमेरिकेक जावचा आसा तर

      खुशाल जा, पण लक्षात ठेय अरे नुसतो मशिन बनान चलना नाय, माणुस बनान काम करुचा आसता, तरच

      तुका हया देशाचा, जगाचा चित्र खुप ब्राईट करुक येतला.

जेनी:- होईल तात्या. नक्की ब्राईट होईल जगाचं चित्र.

हरी:- ओह. काय म्हणतेयस तु जेनी? तु ही यांच्या हो त हो मिळवतेयस? अगं येथे राहून भिका-यासारखे

        जगण्यापेक्षा अमेरिकेत जाऊन भरपुर पैसा कमवून आरामात राहता येईल. अगं येथे राहून काय करायचं

       आहे? येथे सगळयाच गोष्टींचे राजकारण होते. हुशार लोकांची इथे कुणालाच किंमत नाही. माझा निर्णय ठाम

      आहे, मी जाणार अमेरिकेला. तु येणार असशील तर ये.

(हरी तसाच तडक आत जातो. शांताक्का डोक्याला हात लावून खाली बसते. तात्या मात्र बराच वेळ ए.पी.जे अब्दुल कलामांच्या फोटोकडे पाहत राहते.)

                                            6.

(पडदयावर काही काळ अंधार. नंतर उजेड पसरतो. उजेडात हरी व जेनी उभे आहेत. कुठुनतरी संगीताचे सुर ऐकू येत आहेत.)

                     ने मजसी ने परत मातृभुमीला, सागरा प्राण तळमळला

                     तळमळला, सागरा...........सागरा.

जेनी:- हरी यु रियली वॉन्ट टु गो बॅक इन अमेरिका?

हरी:- येस जेनी. मला कंटाळा आलाय भारतात राहण्याचा. अगं हा देश गरिबांचा आहे. प्रत्येक गोष्टीसाठी वाट       

        पाहावी लागते इथे. किती कमावू शकतो मी इथे लाख-दोन लाख. फार फार तर 4-5 लाख बस? आणि

        त्यासाठी किती कागद रंगवावे लागणार आहेत. एवढे तर मी अमेरिकेत सहज कमवू शकतो, बसल्या

        जागेवरुन, आणि ते मी करु शकतो.

जेनी:- माझा विश्वास आहे हरी. पण जे या देशात राहून देशासाठी तुला करता येणारे आहे. ते अमेरिकेत जाऊन

        करणे शक्य नाही. अरे तुझ्या ज्ञानाची, तंत्रज्ञान कौशल्याची येथे खरी गरज आहे. या मातीला, इथल्या

        लोकांना. प्लीज समजून घे.

हरी:- ओ रियली? आणि इथल्या लोकांची मानसिकता? ती कोण बदलणार आहे? अगं इथले लोक टेक्नोलोजी

        साठी जपान, अमेरिकेसारख्या देशांवर अवलंबुन राहतात. हे तुझ, हे माझं करण्यात वेळ घालवतात.

        एकमेकांशी स्पर्धा करण्यात वेळ घालवतात. कंपन्यांमध्ये, औदयोगिक वसाहतीमध्ये घडणारे स्फोट,

       आंदोलने. बलात्कार, खुन या बददलच्या बातम्या पेपरमध्ये व टिव्हीवर झळकत असतात. काही दिवस

       यांची चर्चा होते, आणि नंतर पुनश्च हरीओम. खुन केलेला माणूस काही दिवसात सुटून येतो. रेपची केस

       वर्षानुवर्षे चालत राहते. अगं काय करु या देशात राहून मी? येथे ना रस्ते चांगले आहेत, ना कुठल्या सोयी

      आहेत. कुठल्याही कामासाठी तासंतास रेंगाळावं लागतं. येथे महागाई तर आकाशाला गवसणी घालत आहे,

      त्यामानाने हातात येणारा पैसा कमी आहे. पेट्रोल डिझेलला सोन्याचा भाव आलाय. रुग्णांना/गरीबांना मात्र

      आवश्यक वस्तु वेळेत मिळत नाहीत. येथे दारु स्वस्त आहे, पण जीवनावश्यक वस्तु मात्र महाग झाल्यात.

      येथे फक्त कारकुन तयार केले जातात, आमच्या अमेरिकेत चांगले तज्ञ, नोबेल मिळवणारे हुशार लोक तयार  

      होतात.  नाही नाही जेनी माझा निर्णय ठाम आहे. आय वॉन्ट टु गो बॅक.

जेनी:- हरी तुला माझ्या प्रेमाचंही काही वाटत नाही का? अरे जगाचा विचार करतोस ना तु. पण या देशाची

        परिस्थिती बदलणे तुझ्यासारख्या सुशिक्षित तरुणाच्या हातात आहे. प्लीज जाऊ नकोस.

हरी:-(जेनीपासून दूर होत) आय लव्ह यु जेनी. पण माझा निर्णय मी बदलणार नाही. तुझं माझ्यावर प्रेम आहे, तर तु

       पण ये अमेरिकेला. अगं काय करणार इथे राहून?

(जेनी काही काळ शांत राहते. नंतर भावुक होत हरीला पाहते. कुठुनतरी वा-याचा एक प्रवाह आज येतो, जमिनीवरची धुळ आकाशात उडते.)

जेनी:- नाही हरी. मी हा देश सोडून व तात्यांना सोडून कुठेही जाणार नाही, आणि जोनही तुझ्यासोबत येणार नाही.

        माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण  प्रेम व स्वातंत्रय यांत गफलत होऊ देणार नाही मी.

हरी:- अच्छा म्हणजे तुला आता माझे प्रेम म्हणजे गुलामी वाटु लागलीये. माझा कंटाळा आलाय, असचं बोल ना

        स्पष्ट. तुला स्वातंत्रय पाहिजे ना? मग तु इथेच राहा. तु पण या देशात आल्यानंतर यांच्यासारखीच वागू

        लागलीस. अगं या लोकांना स्वातंत्रयाचा अर्थ तरी माहिती आहे का? इंग्रज आले, या लोकांनी त्यांचे

   अनुकरण करायला सुरवात केली. साहेबी पध्दती आली, शिक्षण पदधतीसुध्दा इंग्रजांच्या काळातीलच चालु   

   आहे. वर विदयापिठांमधुन, महाविदयालयातुन बेकारांचे तांडेच्या तांडे बाहेर पडतायेत. विदेशी लोकांचे

   अनुकरण करताना आपण त्यांच्या फॅशन, कपडयांचे अनुकरण केले. रेव्ह पार्टी करुन धिंगाणा घालणे, पब- बार

   मध्ये दारु पिणे, बिभत्सपणा, रॅगींग अशासारख्या गोष्टी येथे चालु झाल्या. फॅशनच्या नावाखाली भिका-या 

   सारखे कपडे घातले जाऊ लागले. या लोकांनी फक्त्‍ विदेशी लोकांची फॅशन कॉपी केली, बाकी त्या

   देशातील बुध्दिमत्ता, कष्ट करण्याची तयारी, त्यांचे कायदे, शिक्षणव्यवस्था इ. काही कॉपी करता आले नाही.

   जेनी मी तुला समजावत बसणार नाही. कधीतरी कोणीतरी या देशात क्रांतीची मशाल पुन्हा पेटवून आता

  असणा-या समस्या दुर करेल या भरवशावर मी राहणार नाही. बाय बाय.

(हरी कपाटातील आपले कपडे काढून बॅगेत भरतो, आणि जेनी कडे वळूनही न पाहता तडक बाहेर पडतो. बाहेर तात्या आणि शांताक्का हतबध्द उभे असतात, हरी तसाच बाहेर पडतो, आणि एयरपोर्टला जातो.)

                                          तिसरा अंक

                                                   1.

(पडदा उघडतो. स्टेजवरच्या प्रकाशात अमेरिकेतील एक मल्टिनॅशनल कंपनी दिसत आहे. हरी त्या कंपनीत प्रवेश करतो, आत ऑफिसमध्ये दरवाजावर टकटक करुन तो आत जातो. खुर्चीवर त्याचा बॉस बसलेला असतो.)

हरी:- मे आय कम इन सर?

बॉस:- ओह. हरी कम इन,कम इन.

हरी:-(समोर येत खुर्चीवर बसतो.)सर मी मला समजलयं की इथे राहून मी जे कमावू शकतो, ते भारतात शक्य

       नाही.         

बॉस:- वेल मि.हरी. तुम्ही खुप उशीर केलात. आता या कंपनीला तुमची काही गरज नाही. मी तुमच्या जागी एक

         वेल टॅलेंटेड माणसाची नियुक्ती केलेली आहे.                

हरी:- बट सर. प्लीज ट्राय टु अंडरस्टँड. माझे शिक्षण येथेच हॉवर्ड युनिव्हर्सिटीतुन पुर्ण झालेय, आणि या

        कंपनीसाठी मी माझी 4 वर्षे दिली आहेत.          

बॉस:-(हसत मोठयाने बोलतो) ओ रियली मि.हरी. तुम्ही इंडियन्स, शिक्षणासाठी/तंत्रज्ञानासाठी अमेरिका, जपान,

        चायना सारख्या देशांवर अवलंबुन राहता. तुमच्याकडे स्वत:चे तंत्रज्ञान नाही, तुमची एज्युकेशन सिस्टिम

        जुनाट आहे. उच्च शिक्षणासाठीही तुम्ही आमच्यावर अवलंबुन राहता. आम्हांला टॅलेंटची कदर आहे,
        म्हणून आम्ही तुमच्या देशातल्या हयुमन रिसॉर्सचा वापर करतो, आमच्या देशाची प्रगती करण्यासाठी.

       आम्ही सर्व अमेरिकन्स आहोत, आणि अमेरिकेच्या प्रगतीसाठी प्रत्येकजण रात्रंदिवस झटत असतो. तुमच्या

       देशात काय आहे?  कोणी महाराष्ट्रीय, कुणी मणिपूरी, कुणी आसामी, कुणी तामिळ. टेल मी यात इंडियन्स

      कुठे आहेत? म्हणूनच तुमच्यावर कोणीही राज्य करु शकतं. ब्रिटीश आले 150 वर्षे राज्य केले. डिव्हायड

      ॲण्ड रुलचा वापर करुन त्यांनी तुम्हांला आपल्या बोटांवर नाचवलं. त्या ब्रिटीशांचेच कायदे, साहेबी पध्दती

     आजही तुम्ही अभिमानाने मिरवता. पण आज अमेरिका तुमच्या टॅलेंटचा वापर करुन फक्त काही वर्षातच या

     जगाचा शहेनशहा बनलयं. तुम्ही इंडियन्स तर पैशासाठी अख्खा देशही विकायला मागे पुढे पाहणार नाही.

     तुम्ही फक्त गुलाम आहात आमच्यासारख्या प्रगत देशाचे, फक्त गुलाम.

हरी:-(खुर्चीवरुन संतापाने उठतो) प्लीज माईंड युवर टंग सर. एवढी वर्षे तुमच्या कंपनीला माझ्या ज्ञानाचा फायदा

       झाला, आणि आज तुम्ही असं बोलताय आमच्या देशाबददल? तुम्ही आम्हां भारतीयांना गुलाम म्हणुन

       हिणवता, पण लक्षात ठेवा याच आमच्या देशात भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राजगुरु सारखे क्रांतीकारक.

      महात्मा फुले, डॉ.आंबेडकरांसारखे युगपुरुष आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखे युगप्रवर्तक निर्माण झाले.

     शुन्याचा शोध सर्वप्रथम आमच्या देशात लागला. क्रांतीच्या ज्योती आमच्या देशात प्रजल्वित झाल्या,

     त्याबददल तुम्हांला बोलण्याचा अधिकार नाही सर. मला तुमच्या या कंपनीत जॉबच नको, पण मी येथेच

     राहून एक भारतीय म्हणूनच स्वत:ला सिध्द करुन दाखवेन, बाय...बाय.

बॉस:-(खवळत) गेट आऊट.

(हरी तसाच तिरमिरत बाहेर पडतो. त्यानंतर स्वत:ला सिध्द करण्यासाठी तो अमेरिकेतल्या मोठमोठया कंपन्यांशी संपर्क साधतो. त्यांच्याकडे चांगले बिझनेस प्लॅन तयार करुन पाठवतो. पण तरीही त्या परिस्थितीत त्याला आपल्या देशाची आठवण सतावत राहते, तात्यांचे शब्द त्याला आठवत असतात.)

                                                     2.

(स्टेजवर मधोमध शेताचे दृश्य आहे. हरीला घेऊन तात्या तिथे उभे आहेत. शिवारातुन जात असताना तात्या तिथली माती उचलतात.)

तात्या:- बघं हरी, ही माती बघलयं? अरे ही नुसती माती नाय आसा. हया मातयेत अनेकांचे कष्ट आसत, अपेक्षा

           आसत, प्रेम आसा, संघर्ष आसा.  म्हणानच हया मातयेत रुजता ता फक्त पिक नसता तर त्या पिकाच्या

           रुपात कष्ट, प्रेम, संस्कार आणि संघर्ष करुची जिदद हयापण रुजान येता. ता तरारुन बहारता. आणि हयाच

            धान्य खावन आमच्या लोकांत संस्कार, माणुसकी, कष्ट करण्याची तयारी असे गुण रुजान इलेले आसत.

            अरे आम्ही जगाच्या दृष्टीनं कसेही असलो ना तरी एकजुट होवन या देशासाठी केव्हाय काहीही करायची

            तयारी आसा आमची. बुध्दांचो प्रेम दया आणि प्रेम घ्या हयो संदेश आमका चांगलो कळता. फक्त     

             हि-याक जशी लकाकी दिवची लागता, तशी इथल्या लोकांका थोडी लकाकी दिवची गरज आसा,

            आणि हया काम तुमच्यासारखे सुशिक्षीत तरुणच करुक शकतत.

(हरीला ते शब्द आठवत असतात, राहून राहून त्याला तात्यांची आठवण येत असते, आणि त्याचे डोळे पाणावतात. आता त्याला पुन्हा भारतात जायचे आहे. एक नवीन ज्ञानाचा प्रकाश घेऊन उजळण्यासाठी)

                                                   3.

(पडदयावर अंधार. स्टेजच्या मध्यभागी एका खुर्चीवर हरी बसला आहे. हातात डायरी व पेन घेऊन तो काहीतरी लिहित आहे, त्याची लेखणी जणु त्याच्या भावनांना मोकळी वाट करुन देत आहे.)

                          "अनोळखी या वाटांवरती, आठवतात त्या पाऊलखुणा"

                            माग काढत जाताना, कुठे दिसतो मृगजळाचा झरा

                            नसते ते वास्तव, तरीही वाहवत जातो त्या झ-याकडे

                            पण आयुष्याच्या या वाळवंटात असते ते अवास्तव

                            कुठे चाललो मी? कसा शोधु किनारा?

                             फिरुनी पुन्हा गाठतो, तोच मृगजळाचा झरा

                             पण तो झरा असतो फक्त एक भास

                             भागवत नाही तहान, लांबुनच दिसतो छान

                             अतरंगी या मनाला वाटे बेभान होऊन जावे, आणि ज्ञानाचे कवडसे लेवून

                             सप्तरंग नभी उधळावे.........सप्तरंग नभी उधळावे.

          तात्या, खरचं तुम्ही सांगितलेल्या दिशेला मी गेलो नाही, आणि चुकलो. तुमच्या स्वप्नातला देश, त्या देशाचे चित्र नक्कीच खुप ब्राईट होईल, मी पुर्ण करणार ते. हरी तसाच उठत काचेच्या भिंतीतुन बाहेर पाहत असतो. त्याचवेळी त्याला आठवत असते, ती कोकिळेची मंजुळ साद, मोराचे ते केकारव, ती झुळुझुळु वाहणारी नदी आणि ते निसर्गरम्य जंगल. डायरीचे पान उलगडत तो गावाबददलच्या गोष्टी वाचत असतो, आसवांनी ती पाने चिंब झालेली असतात.

                                                    4.

(स्टेजवर मध्यभागी झोपाळयावर बसुन तात्या पेपर वाचत आहेत. तेवढयात जेनी तेथे येते.)

जेनी:- तात्या, चहा हवायं तुम्हांला?

तात्या:-(तिच्याकडे पाहत) हां दी वायचं. अगो कधीपासुन तलफ इली होती.

जेनी:-(त्यांच्यासमोर बसत) तात्या एक विचारु? वाईट वाटुन घेऊ नका.

तात्या:- अगो भियातय कित्याक? माका माहिती आसा तुका काय ईचारुचा आसा ता?

जेनी:-(चकित होत) काय?

तात्या:- तर मगे? माका हरीची आठवण येता काय नाय? हयाच विचारुचा होता मा तुका?

जेनी:-(काहीशी खाली पाहत) होय तात्या. हरी आपल्या निणर्यावर ठाम राहिला, आणि तुम्हांला सोडून निघुन

        गेला.

तात्या:- गो बाय. सोडून गेलो कित्याक म्हणतसं? अगो मीया आसयं, शांत्ताक्का आसा. हयो आख्खो देश आसा.

           अगो निर्णय घेवचे, ते पुढचो मागचो विचार करुन घेवचे. माझो हरीच्या निर्णयाक विरोध नाय होतो. तो

          आपल्या टॅलेंटार अमेरिका खेका अख्ख्या जगात नाव करीत, पण तेनी आपल्या देशासाठी कायतरी करु

           होया असा मात्र माका वाटता.

(तेवढयात फाटकाचा दरवाजा उघडून कोणीतरी आत येते.)

तात्या:- बघ गो जेनी कोण इला आसा ता?

(जेनी उठून फाटकाजवळ जाते. समोर हरीला पाहून तिला धक्का बसतो.)

तात्या:-(झोपाळयावरुन उठत) गो चेडवा, अगो कोण इलो आहा?

(तसा हरी पुढे येतो. तात्या त्याला निट निरखुन पाहत न ओळखल्यासारखे करत झोपाळयावर बसतात)

तात्या:-(जेनीकडे पाहत) कोण गो हयो? मिया नाय ओळाखनय हयेका.

(हरी धावत जाऊन तात्यांच्या पाया पडतो.)

हरी:- तात्या, मला माफ करा. मी चुकलो. माझ्या ज्ञानाचा मी उगाचच गर्व केला, आणि अमेरिकेला निघून गेलो. पण मला आता समजलयं की मला येथे राहूनच काम करायचे आहे. तिथेही मला फक्त तुमचेच शब्द आठवत होते तात्या, फक्त तुमचेच शब्द आठवत होते.

(हरी भावुक होतो. पायावर डोकं ठेवून तो अश्रुंचे सिंचन करतो. तात्या त्याला तसं पाहून अलगद हाताने वर उठवतात.)

तात्या:- चेडवा, अगो झिल सुधारलो माझो, असांदे. ता म्हणतत ना"सुबह का भुला शाम को घर आये तो उसे

           भुला नही कहते."(मोठयाने हसतात) आं.चेडवा जमता मगो माका हिंदी बोलाक.

(सर्वजण खळखळुन हसतात.)

तात्या:- अरे तुका माहिती आसा, माका जास्त्‍ येळ मनात राग धरुन रवाक येना नाय. आणि कोणी कधी मनात

            राग, असुया, व्देष धरुन रवता नये. त्येच्यामुळे माणुस सैतान बनता. अरे चुकलेल्याची माफी मागणा,

            आणि तेका माफ करणा हयेच्यात लाज बाळगता नये. तर आता परत अमेरिकेक जावचो विचार नाय

            आसा मा?

हरी:- (तात्यांकडे पाहत) तात्या कशाला उगाच मला लाजवता?

तात्या:- (बोलत बोलत आत जात) अरे गंमत केलयं रे. चल आत जावया, चेडवा चल तियाय चल. आज माझो

             झिल खरोखरचो परत इलो.

 

                                                  5.

(पडदा उघडतो. हरी, जेनी, तात्या व शांत्ताका मध्यभागी बसलेले आहेत. तात्यांच्या मांडीवर छोटा मुलगा जोन बसलेला आहे. तात्यांनी जोनला स्वातंत्रयवीर सावरकरांचे आत्मचरित्र माझी जन्मठेप वाचायला दिलं आहे.)

तात्या:-(जोनकडे पाहत) पाहिलसं जेनी. अगं हे स्वातंत्रयवीर सावरकरांचे चरित्र प्रत्येकाने वाचायलाच पाहिजे असे आहे.  

जेनी:-(आश्चर्याने तात्यांकडे पाहत) तात्या, तुम्ही तर अस्लिखित मराठीत बोलताय?

तात्या:- अगो असा बघतयं काय? अरे भाषा म्हणजे देवानं दिलेली देणगी असता. आमच्या देशात, देशात खेका? राज्यात वेगवेगळी भाषा असता. ज्येका तेका आपल्या भाषेचो अभिमान असाकच होयो. पण तो अभिमान सांभाळताना दुस-याच्याय भाषेक कमी लेखता नये. अरे आमच्या मराठी भाषेबददल ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलाच आसा.

" माझा मराठीचा बोलु कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके"

       खराच आपली ही मराठी भाषा समृध्द आासा. अनेक चांगले चांगले साहित्यिक, नाटककार, लेखक या मातीत घडले. पण येक खरा आसा भाषा कसलीय असली तरी ती जपान वापरुची असता. कारण याच भाषेतसुन चांगले विचार मांडले जातत, आणि वाईट अपसमज पसरवले जातत. कधी भाषेन समोरचो माणुस वश होता, तर त्याच भाषेनं तो तुटापण शकता.

जेनी:- बरोबर आहे तात्या. भाषा ही व्यक्त होण्याचे चांगले माध्यम असायला हवे. बरं तात्या. तुम्हांला मी ती इंग्रजी अल्फाबेटस शिकवली होती, ती माहिती आहेत ना?

तात्या:- अगो बरा शिकलयं हां माका इंग्रजी. आणि हरी सुनबाईंमुळे माझा बीजगणित, इतिहास, भुगोल हयापण सुधारला हां.

हरी:- तात्या, अहो आमचं लग्न व्हायचंय अजुन.

तात्या:- अरे ता होतला. तुमची इच्छा लवकर पुर्ण होतली. बरा जेनी तु माका इंग्रजी अल्फाबेटस शिकलयं ना तेच्यात मी माझा वायच नॉलेज ॲड केलय.

जेनी:-(चकित होत बोलते) म्हणजे तात्या?

तात्या:- अगो ती एक गंमत आसा. ऐक. तुमच्यात कसा ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल असा म्हणतत. तसा मिया काय केलयं, ताच ए फॉर अब्दुल कलाम, बी फॉर बाबु गेनु, सी फॉर चंद्रशेखर आझाद. म्हणजे काय होतला हया देशासाठी काम केलेल्या थोर पुरुषांची/स्त्रियांची नावां तरी पाठ होतीत.

हरी:- ओ इटस ग्रेट तात्या. यातुन मुलांना नवीननवीन शिकण्याची आवड निर्माण होईल, त्यांच्यावर चांगले संस्कारही होतील, आणि त्यांचे इंग्रजीचे ज्ञानही पक्क बनेल.

तात्या:- मग जेनी. आसय काय नाय मीया ग्रेट?

(तेवढयात छोटा जोन उठून वारक-यासारखा टाळ चिपळया वाजवल्याचा अभिनय करत नाचु लागतो. )

जोन:- ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानदेव माऊली तुकाराम.

(सगळेजण ते ध्यान पाहून मोठयाने हसू लागतात.)

तात्या:- अगो इसारलयं. सगळया जगाक मानवतेचो संदेश देणारे आणि धर्माची शिकवण देणारे हया मराठी मातीत जन्माक येवन धनाची अपेक्षा न बाळगता काम करणारे संतच खरे ग्रेट नाय?

(सगळेजण त्यांच्या बोलण्यावर मान डोलावतात.)

अगो ते संत होते. जेंच्यांनी जात-पात, धर्म-अधर्म सगळा बाजूक थेवन माणसांका माणसांच्यार प्रेम करुक शिकयला. प्राण्यांच्यार दया करुक शिकयली. चांगले ग्रंथ लिहू ज्ञानाचो प्रसार केलो. पण आताच्या घडीक काय दिसता. लोक असे ग्रंथ असो, चांगली पुस्तका असो वाचुच्याकडे दुर्लक्ष करतत. सगळीकडे आता नुसतो मोबाईल, टीव्ही आणि टाईमपास सुरु आसा. सगळेजण चंगळवादाकडे जात आसत. अगो जेंच्यांनी हया देशाचा चरित्र घडवक मदत केली अशा संतांका, राष्ट्रपुरुषांका  आपण इसारलो. फक्त जयंती/पुण्यतिथी साजरी करुन चलाचा नाय गो. त्येंच्यासारख्या मनय असाचा लागता.

     अगो हया देशातले कष्टकरी, मजूर, शेतकरी, गरीब लोक हिमतीन सगळया संकटांचो सामनो करतत. मग ता संकट कसला आसांदे. त्येंच्यानी आपल्या कष्टातलो एक वाटो देणा म्हणजे सुध्दा मोठेपण असता. काही लोकांकडे भरपुर पैसो असता, पण तो हातसुन सुटना नाय. काही लोक फक्त पब्लिसिटी करतत. मीया जा अनुभवलयं ता तुमका सांगतय, समाजला?

हरी:- तुमचं बोलणं नेहमी अर्थपुर्ण असतं तात्या. आपली ही भुमी संतांची, थोर राष्ट्रपुरुषांची आहे. जवानांनी, शेतक-यांनी आपल्या समपर्णाने या भुमीचे नाव मोठे केले आहे. खरचं मी या युगपुरुषांचा, संतांचा आदर्श घेऊन या देशासाठी काहीतरी करणार आहे.

(तात्या, जेनी व शांताक्का हरीकडे अभिमानाने पाहतात. संध्यासमयीची किरणे फाटकातुन आत येत पाय-यांना स्पर्शंत असतात. आपल्या उदरात नवीन पहाट घेऊन दिवस मावळलेला असतो.)

                                                 6.

(पडदयावरील अंधार हळूहळू दूर होतो. मध्यभागी तात्या उभे आहेत. बागेत ते फुलांना पाणी देत आहेत. दूरवरुन कुठेतरी विं.दा करंदीकर यांच्या कवितेच्या ओळी ऐकू येत आहेत. )

                असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावून अत्तर

                नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला दयावे उत्तर

                नको गुलामी नक्षत्रांची, भिती आंधळी ता-यांची

                आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची

                असे दांडगी इच्छा ज्यांची, मार्ग तयाला मिळती सत्तर

                नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला दयावे उत्तर, आयुष्याला दयावे उत्तर...................

तात्या:- (स्वत:शी गुणगुणत फुलांकडे पाहत) माझ्या लाडक्या मुलांनो तुम्ही असेच हसत राहा. तुम्हांला हसताना पाहिलं ना की दिवस कसा आनंदाचा जातो. वाटतं आपणंही असंच फुलपाखरासारख स्वच्छंद असावं, वा-यावर स्वार व्हाव. ता-यांमध्ये स्वत:चा शोध घ्यावा. मुलांनो आपल्या या जगाच्या टिव्हीचे चित्र ना पहिलं खुपच कमी क्वालिटीचे होते, पण आता हरी ते बदलणार आहे, आणि ते होणार आहे अजुन ब्राईट, खुप ब्राईट.

(तेवढयात तेथे शांताक्का, जेनी व जोन येतात.)

शांताक्का:- काय हो, स्वत:शीच काय बोलताय?

तात्या:- अगो मिया हया माझ्या मुलांबरोबर बोलतय? हया फुलांबरोबर बोलतयं,समाजला?

जेनी:- तात्या, आज एक वर्ष झालं. किती बदल झाला बघा तुमच्यात, हरीमध्ये आणि शांताक्कामध्ये. पण खरं

         सांगु तुम्हांला मला ते जुनेच तात्या बरे वाटतात, हो की नाही गं शांताक्का?

शांताक्का:-(मिश्किल हास्य करत) हो ग हो. काय दिसायचं ते ध्यान. झोपाळयावर बसून पेपर वाचणारे, आणि

               डोक्यावर तिरकी टोपी घालणारे.

(शांताक्का व जेनी हसायला लागतात. तेवढयात फाटकाचा दरवाजा उघडून पोष्टमन पत्र घेऊन आत येतो. पत्र अमेरिकेतून आलेले असते.)

जेनी:-(आनंदातिशयाने पाहत) तात्या अमेरिकेतून पत्र? लवकर उघडा आणि वाचा पाहू.

(तात्या पत्र उघडून वाचायला सुरवात करतात, आणि एकदम आनंदाने डोलू लागतात.)

जेनी:- तात्या, काय झालं? काय लिहलयं त्या पत्रात? आणि तुम्ही एवढे खुश का झालात?

तात्या:- अगो काय झाला म्हणान काय इचारतस? अगो अमेरिकेक आमच्या हरीनं विकसीत केलेलं भारतीय तंत्रज्ञान आवडलेल आहे, आणि खास व्हाईट हाऊसमध्ये अध्यक्षांमार्फत त्याचा सत्कार होणार आहे. खरचं हरी सारख्या प्रत्येक तरुणाने शिकून फक्त परदेशात जाण्याचं स्वप्न न पाहता या देशासाठी या मातीसाठी काहीतरी केलं ना तर आपण या जगात मानाने एक आत्मनिर्भर राष्ट्र म्हणून राहू शकु.

शांताक्का:- देव त्याला असंच यश देवू दे रे देवा.

(जेनी, तात्या, शांताक्का खुप खुश होतात, आणि अमेरिकेला जाण्याचे स्वप्न पाहू लागतात.)         

                                             7.

(पडदा उघडतो. स्टेजच्या मध्यभागी तात्या व शांताक्का उभे आहेत. )

शांताक्का:- अवो बघलात? आमका आता अमेरिकेक जावक गावतला. बरा मी कोणती साडी घालु?

तात्या:- अगो तु खयसलीय साडी नेस. माणसाच्या पेहरावापेक्षा त्याच्या व्यक्तिमत्वाक महत्व असता.

शांताक्का:- आणि विमानात ते एअर होस्टेस पण असतत मा?

तात्या:- त्येचा काय? माका काय होकाल बघुक जावची आसा की काय?

शांताक्का:- छया हो. तुमचा आपला काहीतरीच. विमानात आपली सगळी खावची पिवची सोय असता,  

                तेच्याबददल बोला होतय मी.

तात्या:- हां ते होय, ते असतत पण घरातल्या जेवणाची चव त्या जेवणाक खय?

शांताक्का:- ता पण खरा आसा.

तात्या:-बाकी कायय म्हण शांते. माणसान कसा हसत खेळत जगा होया. सगळो ताण तणाव कसो चटकन दूर

          होता बघ.

शांताक्का:- होय ओ होय. तुमचा आयुष्य खुप वाढाने हीच माझी इच्छा.

तात्या:- (गंभीर होत) शांते, अगो आयुष्य हया असा उधळूच्यासाठी नसता गो. एका एका जिवाची किंमत अमुल्य

           असता. तुम्हा बायकांची मने श्रध्दाळू असतत, सगळी कुटुंबाची जबाबदारी स्वतार घेता. आम्ही पुरुष

           आकाशाच्या उंचीकडे बघतो, जगाकडे बघतो, पण तुम्ही तुमच्या घराकच कुटुंब मानता, विश्व मानता,

           आणि आता तर घराबरोबर जगाचो व्यापपण सांभाळतास.

शांताक्का:- किती समजुतदारपणे बोलता हो तुम्ही? हरीक तेच्या मनाचो शोध तुमच्याच बोलण्यान मिळालो,

                म्हणानच तेनी आज ही भरारी घेतलेली आसा.

तात्या:- वा माझ्या संगतीत तुपण तयार झालसं मगो.

(तितक्यात तेथे हरी व जेनी जोन येतात)

हरी:- चला तात्या, आपल्याला निघायला हवं.

तात्या:- होय रे होय. चल. पण हरी तुका एक इचारुचा होता?

हरी:- काय तात्या?

तात्या:- विमानात प्रवास करताना फणसाचे गरे, भाजलेले काजी, कुवल्याची भाजी, सुको बांगडो असला काय मिळाचा नाय?

हरी:- होय होय आता विमान कंपन्यांना सांगुया कोकणातले पदार्थ पण ठेवा म्हणून.

तात्या:- तर तर. अरे आमचे कोकणातले पदार्थ जगाक दाखयले तर हये बाहेरचे फॉरेनर, चीन वाले झुरळा, पाली, बेडुक असला कायतरी खावचे इसारतले. अरे आमचो शाकाहार आणि मांसाहार सुध्दा शुध्दच असता.

हरी:- बरं चला तात्या. तुमचं ऐकत बसलो तर आमचं विमान उडून जाईल.

(सगळेजण खळखळून हसू लागतात, आता त्यांचा प्रवास अमेरिकेच्या दिशेने सुरु होतो.)

                                           8.

(पडदा उघडतो. स्टेजवर अमेरिकेच्या व्हाईट हाऊसचे चित्र आहे. हरीच्या सत्कारासाठी बरीच गर्दी जमलेली आहे. हरी, तात्या शांताक्का व जेनी तेथे पोहोचतात. तात्यांना राहून राहून आपला देश, आपला कोकण आठवत असतो. तेवढयात शोचा प्रमुख उभा राहून बोलायला सुरवात करतो.)

प्रमुख:- लेडीज अँड जेंटलमेन प्लीज वेलकम मि.हरी फ्रॉम इंडिया. ही वॉज इनव्हेंटेड वन ऑफ द फॅब्युलस टेक्नोलॉजी. विच इज नाऊ युझ्ड ॲक्रॉस द वर्ल्ड. आय रिक्वेस्ट टु मि.हरी. प्लीज कम ऑन द स्टेज.

(हरी आनंदाने उठून उभा राहतो. तात्यांकडे पाहत तो स्टेजवर जातो. शोचे प्रमुख त्याला दोन शब्द बोलण्याची विनंती करतात.)

हरी:- गुड इव्हनिंग एव्हरीवन. थॅक्स टु गिव्हींग मी अ बिग चान्स टु टॉक. बट नाऊ आय डोंट टॉक इन इंग्लिश. बीकॉज समवन टेल मी अवर लॅग्वेंज इज अवर प्राऊड. (हरी दुभाषकाची मागणी करतो, व मराठीत बोलायला सुरवात करतो.)  कोणीतरी मला सांगितलं होतं, भाषा कोणतीही असू दे थेट काळजाला भिडली पाहिजे. आपली भाषा, आपली माणसं याविषयी आपल्याला अभिमान पाहिजे, मग तो आपल्या देशात असो, वा बाहेर. कोणीतरी मला सांगितलयं मराठी भाषेत जी गोडी आहे ती कशातच नाही. माझा मराठीचा बोलु कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके. त्यांनी मला जे शिकवलं ते जगाच्या कोणत्याही लायब्ररीत वाचायला मिळणार नाही. त्यांनी मला माझ्या मनाचा शोध घ्यायला शिकवलं. पाण्याच्या प्रवाहासोबत पोहणं सोपं असतं,पण पाण्याच्या प्रवाहाविरुध्द पोहणं ते मात्र कठीण. विदवता, ज्ञान आपल्या माणसांसाठी उपयोगी पडलं, तरच त्याची किंमत. शेवाळासारखं एका डबक्यात साचुन राहणं यापेक्षा सतत प्रवाही असणं ते महत्वाचे मानतात. आयुष्य म्हणजे एक रंगीत टिव्ही आहे, आणि या टिव्हीचा रिमोट कंट्रोल त्या वर बसलेल्या जगनियंत्याकडे आहे. तेच माझे तात्या.

(सर्वजण तात्यांकडे पाहतात, तात्यांच्या डोळयांत पाणी तरारलेले असते. हरी बोलणे थांबवतो, तसा शोचा प्रमुख तात्यांना आदरपुर्वक वंदन करुन स्टेजवर बोलवतो. शांताक्का व जेनी कडे पाहत तात्या हरीचा आधार घेऊन स्टेजवर जातात.)

तात्या:-(मुददामहुन इंग्लिशमध्ये) गुड इव्हनिंग बॉयफ्रेंडस ॲण्ड देअर गर्लफ्रेंडस.

           (सगळीकडे हशा पिकतो, तात्या बोलत असतात, दुभाषक त्याचा अनुवाद करत असतो.)

          हां आता कस? मंडळी यालाच तर आयुष्य म्हणतात. हसणं आणि दुस-याला हसवणं. पण ते हसणं निर्भेळ असलं पाहिजे. परिस्थितीने गंजलेले मात्र असु नये, कुणाचे व्यंग त्यात असु नये. असो, तुम्ही या म्हाता-याला स्टेजवर बोलावून जो हा मान दिला तो मी कधीच विसरणार नाही.

(आप्पांचे डोळे पाणावतात, हरी त्यांच्याकडे धाव घेतो, परंतु त्याला हातानेच खाली बसवत तात्या पुढे बोलायला सुरवात करतात.)

माझ्या मित्र मैत्रिणींनो हा देश काय, आणि माझा देश काय. माणसाने माणसाच्या मनाशी संवाद साधला पाहिजे. प्रत्येकाला आपल्या देशाचा, तिथल्या संस्कृतीचा अभिमान असतो, तो असायलाच हवा. आमच्या कोकणात तर निसर्गला देव मानुन पुजा केली जाते. फुलांचा तो सुगंध, निसर्गाची नवलाई मन मोहरुन नेते. स्वर्गाचे सारे वैभव सामावले आहे त्यात. हरीने आपल्या बुध्दीने आणि ज्ञानाने आज खुप चांगले तंत्राज्ञान विकसित केलं आहे, आणि याचा जगाला खुप उपयोग होईल. मित्रांनो, प्रत्येकाने आपल्याशी एकरुप होणे गरजेचे आहे. मनाचा शोध घेणे गरजेचे आहे. आयुष्यातली अवघड वळणे न भिता, न घाबरता सर करुन आपल्या उददेशाला समोर ठेवून चाललं ना की स्वत:चा मार्ग आपोआप तयार होतो.

(तेवढयात शोचा प्रमुख तात्यांना थांबवतो, दुभाषकामार्फत ते त्यांच्या कानात काहीतरी पुटपुटतात.)

           वा बरं केलत. दोस्तांनो माझ्या कोकणी भाषेत तुम्ही माका बोलाक सांगलात. खराच अभिमान वाटता माका तुमचो आणि माझ्या कोकणी भाषेचो. माझी कोकणी भाषा म्हणजे फणसासारखी आसा. वरसुन टणक, आतसुन मात्र गोड. किती कलाकार, साहित्यिक घडले आसत या कोकणच्या मातीत. आमच्या देशाच्या मातीत किती विरांनी जन्म घेतलो, त्याच मातीत माझो जन्म झालो, हया माझा भाग्य आसा. मच्छिंद्र कांबळींनी तर आमच्या कोकणाचा नाव सातासमुद्रापार पोहोचयल्यानी. फक्त्‍ येकच मागणा आसा देवाकडे, हरीसारख्या प्रत्येक तरुणान शिकान या देशासाठी, या कोकणासाठी कायतरी करुंदे. क्रांतीची मशाल पेटान उठांदे. मगेच व्यवस्था बदलातली, समाज सुधारतलो. तंत्रज्ञानात आणि सगळयातच आपण ख-या अर्थान एक नंबराक येतलो. हया बोलण्यार माका एक कविता आठवता,

   आयुष्य असता हया रंगीत टिव्हीसारख्या, आयुष्य असता हया रंगीत टिव्हीसारख्या

   मनाचो शोध घेवन पुढे पुढे जात रवणारा, मनाचो शोध घेवन पुढे पुढे जात रवणारा

   येतत कधी वळणा नागमोडी, तर कधी असता सरळ रस्तो

    पण आपणच बनवचो असता आपलो हमरस्तो

आव्हानांचा धनुष्य पेलुन, बाण चलवचो असता इच्छेचो, आव्हानांचा धनुष्य पेलुन बाण चलवतो असता इच्छेचो

    मग तो बाणय भेदून जाता सगळी क्षितीजा, आणि पार करता आव्हानांचो डोंगर, पार करता आव्हानोंचो डोंगर

          (सगळेजण टाळया वाजवतात, तात्यांच्या छातीत दुखत असते, तरी ते चेह-यावर काही न दाखवता पुढे बोलायला सुरवात करतात.)

          मित्रांनो फक्त येक लक्षात ठेया. हयो जो आयुष्याचो रिमोट आसा ना तो त्या वर बसलेल्या देवाकडे आसा. तो सगळा बघता, फक्त एक संधी मिळाली काय...................

(तेवढयात काही समजायच्या आत एक किंकाळी फोडत तात्या स्टेजवर खाली कोसळतात. सर्वजण त्यांच्याकडे धाव घेतात. तात्यांचा श्वास वरखाली होत असतो. त्यांची शुध्द हरपत असते, पण चेह-यावर मात्र समाधान असते. मच्छिंद्र कांबळी तात्यांकडे पाहून हसत असतात, म्हणत असतात, " चल तात्या, मीया एकटोच रवान कंटाळलयं, तियापण ये वरते." हळूहळू बाकीच्यांचा आवाज मंद मंद होत जातो, आणि तात्या कायमचे डोळे मिटतात. स्टेजवरच तात्यांना पाहून शांताक्का, हरी व जेनी मोठयाने हंबरडा फोडतात. उपस्थित सगळयांच्याच डोळयांत पाणी येते. हे अचानक काय झाले, तेच कुणाला समजत नाही. पण चंद्रासारखे चांदणे शिंपुन तात्या अनंताच्या प्रवासाला निघून गेलेले असतात, आकाशातला चंद्र तात्यांच्या चंद्रप्रकाशाने प्रेरित होऊन हसत असतो.)

 --------------------------------------------समाप्त----------------------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ये रिश्ता क्या कहलाता है!

अवंतिका एक छोटीशी प्रेमकथा