आयुष्य जगायचं राहून गेलं....

                

 


                                                     आयुष्य जगायचं राहुन गेलं........

          अनिरुद्ध देशमुख व सविता देशमुख एक सुखवस्तु कुटुंब. मोठा मुलगा अविनाश अमेरिकेत तर धाकटा रवि बी. कॉम च्या पहिल्या वर्षाला. मुलगी माधवी अकरावी सायन्सला. अनिरुद्ध देशमुख एका कंपनीत अकांऊंटट आहेत, तर सविताबाई ग्रुहिणी.
          आज त्यांच्या लग्नाला २० वर्षे पुर्ण झालेली असतात. या २० वर्षात अनिरुद्ध व सविताबाईंनी चांगल्या रितीने घराच्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या असतात. मुलांचे आजारपण, त्यांचे शिक्षण, त्यांच्या इच्छा आकांक्षा, घरातील आर्थिक गणिते या सर्वांमुळे त्यांना स्वतः साठी असा वेळच मिळालेला नसतो.
         आजही फक्त मुलांच्या इच्छेखातर ते दोघे वाढदिवसा साठी तयार झालेले असतात. पण अनिरुध्दरावांच्या मनात मात्र भन्नाट विचार घोळत असतात, आज त्यांना दोघांसाठी मोकळा वेळ द्यायचा असतो. आयुष्य पुन्हा जगायचं असतं.
         बराच वेळ किचनमध्ये सविताबाई काहीतरी खुडबुड करत असतात, तसे अनिरुद्ध हाक मारतात.
"सविता ए सविता. अगं बाहेर ये. काय करतेयस किचनमध्ये?"
      सविताबाई लगबगीने बाहेर येतात.
"अहो शिरा करत होते मुलांसाठी. त्यांनी काहीतरी गोडधोडाचं म्हटल होत सकाळी."
       सविताबाई जायला वळणार तेवढ्यात तिचा हात पकडून अनिरुद्ध सोफ्यावर बसवतात.
"अगं जाऊ दे गं. काय ते सारखं सारखं किचनमध्ये. हे कर,ते कर."
       सविताबाई अनिरुद्ध च्या कपाळाला हात लावत बोलते.
"अहो, तब्येत वगैरे बरी आहे ना तुमची?"
"अगं हो गं. माझ्या तब्येतीला काय झालं. सवे अगं २० वर्षे झाली आपल्या लग्नाला. पाहता पाहता मुले मोठी झाली, त्यांचे शिक्षण, आजारपण, माझं ऑफिस , तुझं घर सांभाळणं, आर्थिक गणिते सांभाळून संसार करणे या सर्व तारेवरच्या कसरती करताना, आपण स्वतः साठी केव्हा वेळ दिला?"
      सविताबाई हसतात.
"अहो ही मुलेच तर आपले आयुष्य आहे, मग ती सुखी तर आपण सुखी."
     अनिरुद्ध सोफ्यावरुन उठत बोलतात.
"चुकतेस तु सवे. अगं मुले स्वतः चं आयुष्य जगत असतात, आपण फक्त त्यांचे इच्छा पुर्ण करणारे मणी असतो बघ. अगं हे आयुष्य एकदाच मिळते, त्यात अर्धे आयुष्य बालपणात शिकण्यात जाते. निम्मे आयुष्य कुटुंबाची ओझी वाहण्यात व तारेवरच्या कसरती करण्यात जातो. आयुष्यात आपण फक्त दुसऱ्यासाठी जळत असतो गं, तेव्हा एकदा फक्त एकदा आयुष्य जगुन बघ."
      सविताबाई चकित होत अनिरुद्ध ना पाहते.
"अहो काय झालयं, आज एकदम असे का बोलताय?"
"सवे, काही झालं नाही. अगं या रोजच्या चाकोरीबाहेर जगायचं ठरवलं ना की आपल्याला जमत नाही, सवय नसते ना. पण कधीतरी ही सवय करायला हवी. आयुष्याची खरी मजा अनुभवायला हवी."
"बरं मगं काय करायचं म्हणताय?"
   अनिरुद्ध सविताबाईंच्या कानात आपली योजना सांगतात. तेव्हा सविताबाई खुदकन हसत बोलतात.
"इश्श. अहो हे काय वय आहे का आपलं?"
"सवे. अगं आयुष्यात वयाला महत्व नसते. जगण्याचे क्षण पुन्हा पुन्हा येत नाहीत."
"पण मुलांना काय सांगणार?"
       अनिरुद्ध विचार करत बोलतात.
"सांगायचं काहीतरी, काय?"
         ठरल्याप्रमाणे तयारी होते. मुले येतात, तसे सोफ्यावर बसलेले अनिरुद्ध हळुच उठुन मोठ्या आवाजात बोलतात.
"सवे, अगं मी बाहेर चाललो गं."
      तेवढ्यात रवि त्यांना विचारतो.
"बाबा, आता कुठे चाललात, वाढदिवस करायचा आहे ना?"
"अरे ते माझ्या मित्राने पार्टी ठेवलीये आज खास माझ्यासाठी. तिकडे चाललोय."
"पण बाबा आता..?"
"अरे बाळा, मी ही जाणार नव्हतो पण तो माझा खुप खास मित्र आहे रे जायला हवं."
      पुन्हा एकदा किचनमध्ये ऐकु जाईल अशा  मोठ्या आवाजात अनिरुद्ध बोलतात.
"येतो गं जाऊन बाहेर, ऐकलसं का?"
       आणि मागे वळुनही न पाहता घराबाहेर पडतात. किचनमध्ये सविताबाई गालातल्या गालात हसत असतात.
  माधवी रवि कडे पाहत बोलते.
"अरे यार रवि, आता काय करायचं?"
    रवि हसत हसत सोफ्यावर बसतो.
"आता काय? बाबा येईपर्यंत नाश्ता करायचा, आई अगं नाश्ता घेऊन ये."
      तशा सविताबाई सुंदर साडीत बाहेर येतात, तिला तसं पाहून रवि अवाक होतो, माधवीही पाहत राहते.
"अगं आई, तु कुठे चाललीस तयार होऊन? प्लीज कुठे जाऊ नकोस. आम्हांला नाश्ता दे. बाबा येतील बाहेरुन थोड्यावेळात.
  सविताबाई काहीशा हळव्या बनतात, पण स्वतः साठी वेळ द्यायला हवा, हे अनिरुद्ध चे विचार तिला पटतात.
"अरे ती माझी मला मैत्रिण आहे ना निशा, तिचा आज साखरपुडा आहे. अरे नाही गेलं तर खुप वाईट वाटेल तिला."
     रवि व माधवी एकमेकांना पाहतात, रवि बोलतो.
"अग पण आई......."
"मी येते हं चल बाय बाय."
        त्या दोघांकडे न पाहता सविताबाई बाहेर पडतात, व चुपचाप मागच्या बाजुला येतात. मागे अनिरुद्ध तिचीच वाट पाहत असतात. ती आल्यावर ते दोघे अनिरुद्ध च्या खास मित्राने पाठवलेल्या कारमध्ये बसतात.
         काही वेळातच ते एका सुंदर अशा ठिकाणी येतात. कारमधुन उतरत सविताबाई पाहतात, तो एक रिसॉर्ट असतो. सविताबाई हसत हसत अनिरुद्ध ला पाहतात. अनिरुद्ध बोलतात.
"काय आवडलं की नाही, माझं स्पेशल गिफ्ट."
     सविताबाई हसतात, तेवढ्यात हार्मोनियम वर संगीत चालु होते. सविताबाई भारावल्यागत जात असते, अनिरुद्ध ही तिच्या मागुन मंत्रमुग्ध होत जात असतात. आतमध्ये जाताना त्यां दोघांवर पुष्पवृष्टी होत असते. सविताबाईंना हा एक सुखद धक्का असतो.
         अनिरुद्ध व सविताबाई हॉलमध्ये पोहोचतात. हॉलमध्ये मोठा केक ठेवलेला असतो व बरेच जण जमलेले असतात, ते पाहून सविताबाई अनिरुद्ध ला पाहत बोलतात.
"अहो या सगळ्यांची काय गरज? किती खर्च झाला असेल."
     तेवढ्यात अनिरुद्ध चा मित्र हसत हसत समोर येतो.
"डोंट वरी वहिनी. सगळा खर्च मी केलाय. तुम्ही एन्जॉय करा."
        अनिरुद्ध बोलत असतात.
"सवे, अगं आजवर आपण फक्त दुसऱ्यांसाठी जगलो, कुटुंबाच्या, मुलांच्या सुखासाठी पोटाला चिमटा काढून राहिलो. या जबाबदाऱ्या, या पैशाच्या काळज्या, मुलांच्या काळज्या यात निम्म्या पेक्षा जास्त आयुष्य गेलं. अगं काय करणार हे असं संकुचित जगुन. कधीतरी सगळं विसरुन जगुन पाहुया, बेधुंद पणे आयुष्याच्या लाटेवर स्वार होऊया."
     सविताबाई खाली पाहुन स्मितहास्य करतात. अनिरुद्ध सविताबाईंना घेऊन रिसॉर्ट च्या एका ठिकाणी येतात, तेथे रेन डान्सची सोय असते. अनिरुद्ध हसुन बोलतात.
"काय पार्टनर, करायचा का रेन डान्स?"
    सविताबाई लाजतात, आणि ते दोघेही रेन डान्स चा आनंद घेतात. ते दोघे पाण्यात चिंब भिजत असतात, आणि त्यांची मने आयुष्यातल्या गवसलेल्या वेगळ्या सुखाने चिंब भिजत असतात.
(समाप्त)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ये रिश्ता क्या कहलाता है!

अवंतिका एक छोटीशी प्रेमकथा