माझी केरळ भ्रमंती 2016
देवाला पडलेले एक सुंदर स्वप्न म्हणजे केरळ. माडांची वने आणि हिरवीगार
शेती यांनी सजलेले मळे अशी वेगळी ओळख आहे या राज्याची. अशा या निसर्गरम्य
परिसराला या वर्षीच्या जानेवारी महिन्यात भेट दिली. मी माझी पत्नी व मुलगा
असे तिघेचजण मंगला एक्सप्रेस ने कणकवलीतून एर्नाकुलम जंक्शनला पोहोचलो.
तब्बल
16 तासांचा प्रवास, एक वेगळी अनुभुती देऊन गेला. थोडासा कंटाळा, थोडासा
उत्साह अशातच शेवटी केरळमध्ये पोहोचलो, त्यावेळी सकाळचे जवळजवळ 11.00 वाजले
होते. एर्नाकुलम स्टेशन बरेच मोठे आहे, तेथल्या पाय-या उतरताना समजले की
एर्नाकुलम टाऊन हे मागचे स्टेशन होते, कारण आम्ही बुक केलेली खोली तिकडेच
होती. मग तिथून थोडेसे चालत चालत आम्ही आमच्या ईप्सित स्थळी ए.व्ही
रेसिडन्सी मध्ये पोहोचलो.
हॉटेलमधील
सोय तर काय वर्णावी. अगदी सुंदर रुम, शिवाय वाय फायची सोय आणि जवळच केरळी
रेस्टॉरंट, तिकडे केरळी पदार्थांचा आस्वाद घेतला, आणि तिथले शाकाहारी जेवण
तर लाजवाब. दाळ, भात वर ताकाची कढी, रस्सा भाजी खरचं खुपच आनंद आला.
पहिल्या दिवशी आम्ही तिथूनच जवळ असलेल्या कोचीन मरिन ड्राईव्हवर
फिरण्यासाठी गेलो. सकाळचा सुंदर वारा आणि त्यात निळाशार समुद्र. जागोजागी
केरळी भाषेतील बोर्ड तिथल्या वास्तव्याची जाणीव करुन देत होते.
दुस-या
दिवशी आम्ही कोचीनमधीलच चायनिज फिशिंग नेटला भेट दिली. येथे खूप मस्त
स्पॉट आहे. येथे एक खूप मोठे नेट म्हणजे जाळे आहे. जे पोतुर्गिजांच्या
काळातील आहे, त्यामुळेच या जागेला चायनिज फिशिंग नेट स्पॉट म्हणतात. तेथे
फिरताना थोडी खरेदी केली, आणि मोठमोठे मासे, पापलेट, कोळंबी इत्यादी पाहून
आम्हां मत्सयप्रेमींचे मन भारावून गेले. तेथूनच आम्ही कोची शहरात फिरता
फिरता कथकल्लीच्या प्रयोगासाठी गेलो, हा एक न विसरण्यासारखा अनुभव म्हणावा
लागेल. पहिल्या दोन ठिकाणी शो एकदम हाऊसफुल्ल. शेवटी एका ठिकाणी तिकिट
मिळाले, आणि आम्ही अगदी आवडीने कथकल्ली चा शो पाहिला.
केरळच्या पाहुणचाराने आणि आदरातिथ्याने मन काहीसे भारावून गेले. तिस-या दिवशी नेत्रावती एक्सप्रेस ने परतीच्या प्रवासाला लागलो.
|

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा