भारत देश एक रुप अनेक
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. या देशात सर्व धर्माचे, सर्व भाषेचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला असा हा देश आहे. सुजलाम, सुफलाम अशी आपली भुमी आहे. देशातील बहुतांश जनता ही खेडयात राहणारी आहे, आणि त्यांचा शेतीवर उदरनिर्वाह चालु आहे. देशाच्या सिमेवरील जवानांमुळे आणि शेतात राबणा-या किसानांमुळे आपला देश इतिहासात महान आहे.
आपल्या देशावर किती संकटे आली, पण त्याचा सामना आपण यशस्वीपणे करुन दाखविलेला आहे. कोरोना महामारीच्या व अशा प्रकारच्या साथरोगांच्या काळात आपले ऐक्य दिसून आलेले आहे. कोरोना काळात आपण राखलेला संयम, स्वच्छता, शांतता यापुढेही टिकवून ठेवणे ही आपली जबाबदारी असणार आहे.
लॉकडाऊनच्या नियमांचे आपण पालन केलेलेच आहे, परंतु अपवादात्मक परिस्थितीत काहींनी नियम धाब्यावर बसवून मोदींनी केलेल्या आवाहनाची गंमत उडवली. प्रधानमंत्री मोदींजीनी गच्चीमध्ये, दरवाजाच्या उंब-यावर उभे राहून टाळया वाजवणेस, थाळया वाजवणेस सांगितले, पण त्यामागचा शुध्द हेतु काहीजणांनी लक्षात घेतला नाही.
आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे, देशातील अंतर्गत प्रशासकीय व सामाजिक तसेच जातीयतेवर आधारीत यंत्रणा. प्रशासकीय यंत्रणेला सरसकट नावे देणा-यांना हे ही कळायला पाहिजे, की कोरोना महामारीच्या काळात सरकारी यंत्रणेनेच प्रभावशाली काम केलेले आहे. परंतु काही अंशी आपल्या प्रशासकीय यंत्रणेत भ्रष्टाचाराचा शिरकाव झालेला आहे, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा खिळखिळी झाली आहे. त्यावर कायदेशीर उपाय योजून, चर्चा करुन आपण ही कारणे दूर केली पाहिजेत. महागाई सतत वाढत आहे त्यामुळे देशातील एकंदर मागणीचा व परिस्थितीचा विचार करुन आपण व सरकारने काही ठोस पावले उचलली पाहिजेत.
आपल्या समाजात जातीयता, धार्मिकता या गोष्टी मोठया प्रमाणावर आहेत. धर्माच्या नावावर केले जाणारे दंगे, आरक्षणाचे मुददे व मिडीयादवारे त्याची केली जाणारी व्यापक प्रसिध्दी असे बरेच मुददे आहेत, ज्यावर एकत्रित येऊन चर्चा होणे गरजेचे आहे. केवळ कठोर कायदे करुन या गोष्टी किंवा स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबणार नाहीत, त्यासाठी पुरुषी मानसिकता कशी बदलेल ते बघितले गेले पाहिजे. स्त्रियांवर लादलेली अतिरिक्त बंधने कमी केली पाहिजेत, किंवा ती पुरुषांवरही बंधनकारक करणे गरजेचे आहे. विवाहानंतर जी बंधने स्त्रियांनी पाळायची आहेत, ती पुरुषांनाही लागू करणे आवश्यक आहे. कालांतराने आपोआपच स्त्रियांबददलचा आदर वाढू शकतो. कदाचित सदयस्थितीत महिला आरक्षण किंवा कठोर कायदे यासारखे उपाय योजावे लागणार नाहीत. डावी व उजवी विचारसरणी अशी व्यवस्था असल्याने आपण आपली प्रगती करु पाहत नाही. आरक्षण हा मुददा घेऊन लहानसहान कारणांसाठी उपोषण करणे, मोर्चे काढणे व आंदोलन करणे यासारखे प्रकार घडून येत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे आपला आपल्या प्रशासनावर, सरकारवर विश्वास काही अंशी ढासळत चालला आहे.
आरक्षण, जातीयता, धार्मिकता यासारख्या बेडया आपण वेळीच तोडल्या पाहिजेत. अंधश्रध्देला खतपाणी घालणा-या कोणत्याही अनिष्ट गोष्टींचे समर्थन थांबवले पाहिजे. आपली संस्कृती सभ्य आहे. आपला इतिहास सोनेरी आहे. कितीतरी स्वातंत्रयसैनिक, जवानांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलेले आहे. आपले अनुकरण पाश्चात्य देश करतात, परंतु आपण मात्र पाश्चात्यांचे केवळ कपडे, फॅशन यांचे अनुकरण करतो, असे अंधानुकरण हे आपल्यासाठी आपल्या देशासाठी खुप घातक आहे. त्यामुळे आपल्या प्रगतीला खिळ बसत आहे.
शेवटी हेच सांगायचे आहे, की आपण जगात खूप चांगले आहोत, चांगले राहणार आहोत, पण समाजातला प्रत्येक घटक जेव्हा याचा विचार करुन काम करेल ना तेव्हा आपण जगाच्या अग्रस्थानी मानाने चमकत राहू.
----------------------------------------------समाप्त------------------------------------------------------

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा