अंधश्रद्धा

     


    रितेश चं काव्याशी नुकतंच लग्न झालं होतं. काव्या दिसायला सुंदर, स्वभावाने चांगली होती. रितेश चिडचिडा होता, पण काव्यावर मनापासून प्रेम करणारा होता.  

     काव्याची सासु देवभोळी होती. बुवाबाजी, तंज्ञमंञ, चमत्कार असल्या भाकड गोष्टींवर तिचा विश्वास होता. लग्नानंतर काही दिवसांनी एकदा काव्याच्या पोटात दुखु लागले, तिला मासिक पाळीचा ञास होत होता. रितेशला काय यातलं माहिती नव्हतं. तो काय करणार? सासु म्हणजे रितेशची आई बडबडायला लागली.

"आमच्या घराण्यात असा ञास कोणाला नाही बघ." रितेश डॉक्टर बोलवायला जात होता, तिने थांबवलं.

"अरे थांब हिला बाबांकडे घेऊन जाऊया." 

"कोण बाबा? कुणाचे?" 

"अरे कुणाचे बाबा काय? हे आपले कुडाळ मठात आहेत ते." 

"अगं तुझं काय डोकं फिरलयं का? मी डॉक्टरला बोलवतो." 

    काव्याची सासु रितेशला तशीच उठवते, पोट दुखत असताना आणि रितेशचं काही न ऐकता तिला रिक्षातून घेऊन जाते. रितेश गडबडीने बाहेर पडुन तिच्या मागोमाग जाऊ लागतो दुसऱ्या रिक्षेने. 

      बाबांचा मठ. बरेच शिष्यगण जमलेत. बऱ्याच लोकांची गर्दी, पाहणाऱ्याला वाटावे बाबा म्हणजे खरंच सिध्दपुरुष आहेत. सासुबाई ने सुनेच्या दंडाला धरून तिला ओढतच नेले. एका ठिकाणी बऱ्याच बायका आणि काही पुरुषही अंगात आल्यासारखे घुमत होते. बाबांचे गण त्यांच्यावर झाडा घालुन मंञ म्हणत होते. कसले मंञ काय माहित?

    सासुबाई ने विव्हळणाऱ्या काव्याला  त्या गणांसमोर बसवले.

"अरे महाराज आले.महाराज आले." जणु एखाद्या देशाचा असावा अशा थाटात त्या तंज्ञमंञ वाल्या जगदिश बाबाने प्रवेश केला. अगदी बाबा म्हणावा तसाच होता तो. हातात कवटी, नक्की कोणाची माहित नाही. दुसऱ्या हातात हाड आणि पुटपुटत त्या बायकांसमोरुन फिरत होता. समोरच होमहवन मांडलेला. लोक त्याच्या पाया पडत होती.

"बाबा ही बघा ना कालपासून कशी करतेय. बाबा हिला भुतानं घेरलयं. " कोणीतरी एक रडत रडत पाया पडुन बाबाला विनवत होता.

"पाहतो पाहतो. मी आलोय ना आता. सगळी भुते पळवुन लावीन." बाबाने जवळ पडलेल्या ताटातील राख त्या बाईच्या अंगावर फुंकली, तशी ती बाई अजुनच जोरात घुमु लागली. अहाहा काय वेडेपणा चालला होता. बाबा आणि गण त्या भोळ्याभाबड्या लोकांना उल्लु बनवत होते. लोक आनंदाने उल्लु बनत होते. शेवटी वेडी आशा प्रत्येकाला असतेच. 

    सासुबाई नी सुध्दा मोठ्या भक्तिभावाने काव्याला बाबाच्या पायावर टाकले.

"बाबा........" सिनेमात दाखवतात तशी डोळ्यांना पदर लावत ती ओरडली. बाबा दचकले, काव्याला पाहु लागले. मुळातच ती सुंदर, उठावदार. बाबांनी तिच्या अंगाला हात लावला. एवढ्यात रितेश आला.

"थांबवा हे सगळं." तिडकीने तो ओरडला. बाबा पाहतायेत, लोक पाहताहेत. सासुबाई पाहतायेत. कोणाशी काही न बोलणारा हा आज असा पॉपकॉर्न सारखा फुलला का? 

"कसली बुवाबाजी करताय? हे हे काय आहे?" रितेश अगदी थयथय नाचत तिथे पडलेल्या कवट्या, गंडेदोरे, लिंबे हातात घेऊन दाखवु लागला.

"हे असलं करुन कोणी कधी बरं झालंय काय? निव्वळ अंधश्रद्धा आहे ही." बाबा,त्यांचे गण आणि भक्त सगळ्यांचे रक्त सळसळत होते. 

"तुला काय माहित रे? आमचे बाबा सिध्दपुरुष आहेत सिध्दपुरुष." बाबांचा गणोबा तडतडतो.

"हो काय. मग त्यांनीं या पेटत्या आगीत हात घालुन दाखवावा. सिध्द पुरूष म्हणे." हाताची घडी घालून तो काव्याला पाहत बोलत होता. सासुबाई माञ थरथरत होती.

"अपमान घोर अपमान. माझ्या सिध्दीचा अपमान." म्हणत जगदीश बाबा उठला. हा आता काय दिवे लावतोय म्हणून सगळे पाहत राहिले. भक्तांच्या डोळ्यांच्या बाहुल्या भक्तिभावाने पाहु लागल्या.

   बाबांनी आपल्या नेहमीच्या जागेवरील आगीत हात घातला.

"बघा बघा मला काय झालं काय." बाबा एकदम उसळ्या खात बोलला.

"त्या नाही या इकडच्या आगीत." रितेश इशारा करत होता. बाबांचे डोळे पांढरे झाले. पण भक्त पाहतच होते भक्तिभावाने. तो उठला आणि काही विचार न करता त्या खऱ्या आगीत हात घातला. 

 "आय आय....." बाबांचा हात पोळला. बाबांचे गण धावले. 

"बघितलात, काय तर म्हणे बुवाबाजी, गंडेदोरे, ही लिंबे. हे सगळं करुन माणसं बरी झाली असती तर जगात डॉक्टर काय तेल लावत फिरले असते?" भक्तांची मान खाली गेली. रितेशने काव्याला उठवलं, ती विव्हळतच होती. आई कडे न पाहता तो सरळ तिला घेऊन रिक्षातून  डॉक्टर कडे गेला.

    आईला प्रथमच बुवाबाजी, तंज्ञमंञ कसे खोटे हे तिच्या मुलाने सिध्द करुन दाखवले. देवीनेच तिच्या बुध्दीचे बंद दार उघडले.

-----------------------------------





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिशक्ती

द डायरी ऑफ लोस्ट व्हिलेज

क्रुपासिंधु