टाईम स्टोरी




     "अरे अर्णव, चल ना त्या गुहेकडे परत जाऊ!"      

      "असीम ती गुहा काय भयानक आहे बघितलंय ना?"

       "अरे पण एकदाच जाऊया, तिथे काहीतरी नक्कीच सापडेल बघ."
        अर्णव व असीम माऊंट आबुच्या एका विशालकाय गुहेत शिरले होते, पण घाबरुन त्यांच्या चड्ड्या ओल्या झाल्या होत्या. अर्णव ला माञ वाटत होतं, की तिथे नक्कीच काहीतरी सापडेल.
गुप्त धन, खजाना किंवा आणखी काही!😲
              दोघे पुन्हा एकदा मोठ्या कष्टाने त्या गुहे जवळ गेले.
"यार असीम चल मागे फिरुया मला जाम भिती वाटते अशा गुहेची."
"अरे दिवसाउजेडी कसला भितोस? चल आत." असीम चा उत्साह दांडगा होता. त्याने अक्षरक्षः अर्णव ला आत ढकलले. गुहेतील वटवाघळे त्या दोघांच्या डोक्यावरनं गेली.
"मम्मी मम्मी..." अर्णव ने असीमच्या कुशीत उडी घेतली.
"अरे वटवाघळे आहेत ती! ड्रॅक्युला नाहीत.😆"
            असीम व अर्णव पुढे पुढे जातात.
"अरे येथुन पुढे तर काहीच दिसत नाहीये." चाचपडत असीम बोलतो. अर्णव त्याच्या खिशातून टॉर्च बाहेर काढतो, आणि असीमच्या डोक्यावर टपली मारतो.
"ही टॉर्च काय शोभेला ठेवलीयस?"
"सॉरी सॉरी." टॉर्च च्या उजेडात ते एकदम पुढे येतात.
"अरे अर्णव हे काय आहे बघ." अर्णव पाहु लागतो.
"काय आहे रे हे , कसलातरी जुन्या काळातला कॉम्प्युटर वगैरे असेल."
"अरे पण या गुहेत कॉम्प्युटर कोण वापरणार? वटवाघळं? 😲"
        असीम व अर्णव ती विचित्र वस्तु बाहेर काढतात.
"ए तो बघ रिमोटपण आहे त्याच्यासोबत. चला टिव्ही लावुन पाहुया." म्हणत अर्णव ने रिमोटचं बटण दाबलं आणि काय आश्चर्य! 😱 तो कॉम्प्युटर मल्टिप्लेक्स थिएटर झाला.
"ओह माय गॉड! अरे असीम काय आहे रे हे?"
"मल्टिप्लेक्स थिएटर?"
"वा वा चल तर पाहुया आत काय आहे ते." दोघेही हातात हात धरून त्या स्क्रीन मधुन आत जातात.
        आतमध्ये सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारची बटणे असतात.
"अरे हे काय आहे अर्णव?" असीम आश्चर्याने विचारतो.
"नवीन इन्वेन्शन. धिस इज टाईम मशिन." असीम चित्कारतो.
"काय? टा.....टा....टाईम मशिन. "
"अरे हे बघ इकडे काहीतरी आकडे आहेत. चल कोणत्या युगात जायचयं तुला?"
"आपण स्वातंञ्यपुर्व काळात जाऊया." अर्णव बोलला.
"नाही. महाभारतात..."
        दोघेही झटापट करतात आणि आकडे दाबले जातात. काय होत आहे ते दोघांनाही समजत नाही.
"अरे गरगरायला होतंय, काय झालं?😲" असीम ओरडतो. दोघेही क्षणात अद्रुश्य होतात.
            जेव्हा त्यांचे डोळे उघडतात, टाईम मशीन गायब झालेली असते.
"आयला असीम टाईम मशीन कुठे गायब झाली? आता परत कसं जाणार?😔"
"डोन्ट वरी रिमोट तर आहे ना."
         तेवढ्यात त्या दोघांना रथाच्या खडखडण्याचा आवाज ऐकू येतो.
"अरे अर्णव, कोणीतरी येतयं, लप." दोघेही एका मोठ्या खडकामागे लपतात. रथ समोरच येऊन थांबतो.
"कोण आहे तिकडे? समोर या नाहीतर या कर्णाच्या बाणांपासुन तुम्हाला कोणी वाचवु शकणार नाही. सत्यसेन जा आणि कोण आहेत ते बघ."
        असीम व अर्णव समोर येतात भिञ्या सशासारखे.
आपल्या विजय धनुष्याची प्रत्यंचा ताणत कर्ण बोलला.
"कोण आहात तुम्ही? इथे काय करताय?"
"म.......महाराज. मी अर्णव आणि हा असीम. आम्ही भविष्यातुन आलो आहोत." कर्ण दोघांकडे चमत्कारिक नजरेने पाहतो.
"त्याच्या म्हणण्याचा अर्थ आम्ही कलियुगातुन आलो आहोत." असीम बोलला.
"काय? कलियुगातुन आला आहात? तुम्ही खोटं तर बोलत नाही ना?"
"नाही, नाही सर. आय मिन महाराज. आम्ही खरंच भविष्यातुन आलो आहोत. कसं आणि कायं घडलं तुम्हाला कसं सांगु.😔. तुमच्या कवच कुंडलांची शप्पथ."
      कर्ण धनुष्य खाली घेतो. अर्णव व असीम सुटकेचा निःश्वास सोडतात.
"पण तुम्ही येथे का आलात? "
"आम्ही माऊंट अबुच्या गुहेत गेलो होतो...." अर्णव घडलेली हकिकत कर्णाला सांगतो.
"हं असं घडलं तर?"
"होय महाराज." असीम हात जोडत बोलला.
"मी कोणी महाराज नाहीये. अंगराज कर्ण आहे. विनाकारण महाराज म्हणणं बंद करा."
"क्ष.....क्ष....क्षमा अंगराज कर्ण." असीम व अर्णव हात जोडत बोलतात.
"तुमचा निर्णय दुर्योधन घेईल. आमच्यासोबत चला."
"म......म्हणजे आम्हाला पांडव, द्रौपदी यांनाही पाहायला मिळेल." दोघेही खुश होत बोलले.
"नाही. दुर्योधनाने त्यांना द्युतात हरवले आहे, म्हणुन वारणावतात गेले आहेत ते."
"पण एक सांगू अंगराज. आम्ही महाभारतात वाचलं आहे, त्यानुसार द्युतावेळी तुम्ही असं करायला नको होतं." हिंमत करत असीम बोलला.
"जे व्हायचं ते घडुन गेलं . जे घडणार ते बदलणेही आपल्या हातात नाही." कर्ण हताशपणे बोलला. सगळे एकञच हस्तिनापुरात आले.
"अबब! केवढा मोठा वाडा!😱" अर्णव चे डोळे विस्फारले.
"अरे कर्णा एवढ्या सत्वर अंगदेशातुन आलास? सर्व क्षेम आहे ना? अश्वत्थामा जवळ येत विचारु लागला.
"सर्व क्षेम आहे अश्वत्थामा. "अश्वत्थामा ने भुवया उंचावत अर्णव व असीम कडे पाहिले.
"हे अतिथी कोण आहेत?"
"माहित नाही. परंतु हे स्वतः ला भविष्यातुन आलो आहोत असे सांगतायेत."
"भविष्यातुन?" अश्वत्थामा च्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटते.
"अश्वत्थामा मी सत्वर येतो. तोवर यांना महालाच्या अतिथीगृहात घेऊन जा." म्हणत कर्ण रथातुन निघून गेला. अश्वत्थामा ने त्यांना महालाच्या अतिथीग्रुहाकडे आणुन सोडले.
"तुम्ही भविष्यवासी आहात, हे सत्य पटत नाही."
"पण आम्ही खरंच भविष्यातुन कलियुगातुन आलो आहोत." अर्णव काकुळतीने बोलला.
"काळाची चक्रे कधी कोणाला उलटी फिरवता आली आहेत काय? पण असो तुम्ही माझ्या मिञ कर्णाचे अतिथी आहात. चला." अश्वत्थामा त्यांना अतिथीगृहात सोडून निघून जातो.
"तुझ्यामुळे झालं हे सर्व?" अर्णव बोलला.
"मी काय केलं?" असीम वैतागला.
"काय तर म्हणे महाभारतात जाऊया. आता आलो आणि फसलो ना इथे."
        तेवढ्यात अतिथीगृहात एक भारदस्त राज वस्ञातील, धिप्पाड देहयष्टी असलेला तरुण प्रवेश करतो. त्याच्या चालीत ऐट असते. घारे डोळे गरगर फिरवत तो येत असतो. मिशांचे आकडे वक्राकार असतात.
"माझ्या मिञाने संदेश पाठवला, आपण भविष्यातुन आला आहात म्हणुन! " आपल्या उत्तरीयाला झटके देत तो बोलला.
"हो.....होय महाराज. आम्ही चुकुन या युगात आलो आहोत कलियुगातुन." असीम बोलला.
"अशक्य... आजवर कालचक्र कधीच उलट फिरलेले नाही. तुम्ही पांडवांचे कोणी गुप्तहेर तर नाहीत ना?" त्याने आपल्या भुवया वक्र केल्या.
        तेवढ्यात दमदार चालत कर्ण आत आला. त्याची कुंडले लयीत हालत होती.
"थांब दुर्योधना. अरे यांच्या वस्ञांवरुन आणि एकंदर देहबोलीतून वाटतयं की हे खरंच सांगत असतील."
"पण हे येथे आलेत कसे? आणि का?" दुर्योधनाने कडक भाषेत विचारले.
"म........महाराज...." अर्णवचा घसा सुकला.
"मिञा, ते का आले कसे आले ते जाणून काय करायचं आहे. आपल्याला यांच्यापासून काही ञास नाही. " कर्णाने हसत असीम व अर्णव कडे पाहिले.
"ठिक आहे मिञा. तु म्हणतोस म्हणुन." दुर्योधनाने टाळी वाजवताच सेवक हजर झाला.
"प्रभंजन यांच्या भोजनाची व्यवस्था कर." दुर्योधन आणि कर्ण निघुन जातात.  प्रभंजन तेथेच राहतो.
"अरे मला जोराची लागलीय रे." अर्णव असीमच्या कानात पुटपुटला.
"लागली? काय लागली?"
"अरे अं..." अर्णव ने करंगळी दाखवली.
"मग आता?"
"विचार की त्यांना बाथरुम कुठे आहे म्हणून."
        असीम प्रभंजन कडे पाहतो. प्रभंजन असीम कडे पाहतो.
"एक्सक्युज मी." प्रभंजन च्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह.
"बाथरुम कुठे आहे?" प्रभंजन मठ्ठा सारखा तसाच पाहत उभा राहतो.
"अरे आपण कुठे आहोत. बाथरुम काय विचारतोयस."
"मग तुच म्हणालास ना बाथरुम विचार म्हणुन."
"अरे म्हणालो पण त्यांच्या भाषेत विचार ना."
"आता त्यांची कसली भाषा?" असीम बोलला.
"राहु दे मीच विचारतो." अर्णव पोट पकडत प्रभंजन समोर आला.
"महाराज.." प्रभंजन दचकुन मागे पाहतो.
"तुम्ही तुम्ही. " प्रभंजन समोर पाहु लागला.
"ते मलमुञ विसर्जन कुठे करतात ती जागा......"
"चला." प्रभंजन ला इशारा समजतो. अर्णव सुटकेचा निःश्वास सोडतो.
"बघितलस? असं बोलायचं असतं. बाथरुम म्हणे." अर्णव हसतो. दोघेही प्रभंजना पाठोपाठ बाहेर जातात. प्रभंजन दुरवर त्यांना दाखवतो.
"बापरे! एवढ्या लांब. तिथे जाईपर्यंत पॅंटीतच होईल की रे." अर्णव पोट दाबत बोलला. दोघेही घाईघाईने जाऊ लागले. तेवढ्यात समोरुन एक अतिशय व्रुध्द पण उंच देवदार व्रुक्षासारखा व्यक्ती येताना दिसला. घाईघाईत जाताना अर्णव चा धक्का त्यांना लागला.
"सॉरी." म्हणत अर्णव जातच होता.
"थांबा. " अर्णव व असीम जागेवरच थांबले.
"तुम्ही कोण? या महालात काय करताय?"
"आता हे सांगण्याची वेळ नाहीये इमर्जन्सी आहे.😲" अर्णव पोट दाबत बोलला.
"तुम्ही कोणासमोर उभे आहात त्याचं भान आहे का? "
"कोण आपण? आम्हाला जाऊ द्या ना. सगळं नंतर सांगतो." अर्णव हात जोडत बोलला.
"नाही. या हस्तिनापुराची जबाबदारी या देवव्रत भिष्मावर आहे. खरं काय ते सांगा."
"भिष्म? पितामह!" असीम झुकुन पाया पडतो. अर्णव माञ कसाबसा वाकतो.
"आता बोला."
"अरे लवकर सांग, कुठल्याही क्षणी बॉम्ब स्फोट होईल." अर्णव तळमळत होता. असीम पटापट सगळं सांगतो. त्यातलं भिष्मांना काय समजते त्यांनाच माहीत, पण ते त्या दोघांना जाण्याची परवानगी देतात.
"माझं लक्ष असेल तुमच्यावर." म्हणत भिष्म तरतरत निघून गेले.
"झालं....." अर्णव सुटकेने बोलतो.
       असीम नाक दाबतो.
"अरे काय आहे, कसं बाहेर पडायचं इथुन काही विचार केलास का?" एके दिवशी अतिथीगृहात बसुन असीम अर्णव ला विचारत होता. तेवढ्यात दरवाजापाशी खटखट झाली. दोघेही ऊठुन बाहेर जात पाहु लागले. एक मल्लासारखा काळा सावळा तरुण भक्कम पाय टाकत राजदरबाराकडे जात होता.
"अरे हा बहुतेक दु:शासन असेल." अर्णव पुटपुटतो.
"अरे यानेच ना ते द्रौपदीच वस्ञहरण केलं होतं, आणि भिमाने त्याला ठार केलं." असीम पुटपुटत होता. तेवढ्यात दु:शासनच समोर उभा राहिला.
"हं.......काय बोलत होता तुम्ही?"
"कु.....कु....कुठे काय? काहीच नाही.😆 अर्णव ततपप करु लागला.
"दु:शासन.." दुर्योधनाने हाक मारताच दु:शासन वळला.
"हे आपले हस्तिनापुराचे अतिथी आहेत. यांच्याशी नीट वाग." दुर्योधन घारे डोळे फिरवत बोलला.
       दु: शासनाने एकदा रागाने अर्णव व असीम कडे पाहिले व दुर्योधनाला वंदन करून तो निघून गेला. तो जाताच दुर्योधन ही राजदरबारात निघुन गेला.
"अरे बापरे! काय यमासारख होता रे हा." अर्णव बोलला.
"बोलु नको इथे नाहीतर यमसदनी पाठवेल तुला तो.😆" दोघेही आत गेले.
"अरे पण आता आपण आपल्या दुनियेत कसं परत जाणार रे."
"शीट हा रिमोट पण काम करत नाहीये. " असीम रिमोट फेकुन देतो.
"मेलो फसलो आपण असीम. आता बहुतेक महाभारताच्या युध्दात दुर्योधन व्हायचा आपला." अर्णव बोलला. एवढ्यात टाईम मशीन स्क्रीन समोर आली.
"अरे ए ते बघ आली आपली टाईम मशीन. चल." खुशीने उड्या मारत असीम आत शिरला. अर्णव ही आत शिरला.
"चल लवकर दाब." अर्णव ने स्क्रीन वर २०२२ टाईप केले. पण मशिन रिप्लाय देईना.
"अरे हे मशीन बंद पडलं की काय?😲" अर्णव ओरडला.
       स्क्रीन वर मेसेज धडकला. जोपर्यंत त्या युगातील कोणी परवानगी देत नाही तोपर्यंत त्यांना त्यांच्या आजच्या युगात जाता येणार नाही."
"ओ गॉड." दोघेही तिथेच खाली बसतात.
"अरे आपल्याला आपल्या युगात, आजच्या काळात जाता येणार नाही, पण आपण या मागच्या युगात तर जाऊ शकतो." असीमचे डोळे चमकले.
"काय? काय बोलतोयस? आणि तिथे जाऊन तिथेही अडकलो तर? मग काय करणार आहेस?" अर्णव बोलला.
"अरे ते पाहता येईल पण इथुन तर निसटु. चल."
"आता आपण रामायणात जाऊया. मला प्रभु रामाला तर पाहता येईल." असीम काहीतरी आकडे टाईप करतो. पुन्हा मशीन गरगरायला सुरवात होते.
"अरे पकड मला.." अर्णव ओरडतो.
"आयला सगळंच गरगरतय." असीम ओरडतो. थोड्याच वेळात दोघेही गायब होतात. तेवढ्यात अतिथीगृहात कर्ण येतो.
"अरे हे भविष्यवासी गेलेत कुठे?" तो आश्चर्याने पाहु लागतो.
        अर्णव व असीम प्रकट होतात. सगळीकडे पर्वतप्राय प्रदेश. जंगले.
"अरे रामायणात आलो वाटतं?" अर्णव बोलला.
"अरे पण इथे कुठे महाल वगैरे दिसतच नाहीये.😲"
         तेवढ्यात काही राक्षससैनिक तिथे आले.
"वाचवा वाचवा हेल्प हेल्प. श्री रामा ये वाचव मला." अर्णव ओरडु लागला. राक्षस सैनिक एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले.
"अरे कोण आहात तुम्ही? आणि हा राम कोण आहे?" एक सैनिक बोलला.
"तुम्हाला राम माहिती नाही?😈 अरे ञेतायुगातील महान राजा मर्यादा पुरुषोत्तम राम." मोठ्या अभिमानाने अर्णव बोलला. राक्षस सैनिक एकमेकांकडे परत पाहु लागले.
"हे बघ, तु जो कोणी राम म्हणतोस तो येथे नाही. "
"मग हे कोणतं युग आहे तर?😲" असीम ने विचारले.
          तेवढ्यात एक अतिशय उंच, पर्वताप्रमाणे धिप्पाड, भारदस्त छाती असलेला व मोठे भेदक डोळे, भारदस्त कल्लेदार मिशा असलेला, डोक्यावर भव्य मुकुट आणि त्यावर रेड्याच्या शिंगांसारखी शिंगे असलेला राक्षस समोर आला. तो समोर येतानाही त्याचे प्रचंड बळकट स्नायु दिसत होते.
"युग आमचंच आहे या महिषासुराचं. हा हा हा हा हा." तो प्रचंड गडगडाटी हसतो.
"महिषासुर? म्हणजे ज्याला देवी दुर्गेने ठार केलं तो?😲"
      महिषासुर मोठ्या क्रोधाने ओरडला.
"मला या अजेय,अमर महिषासुराला कोण ठार करेल? आणि ही कोण आहे देवी दुर्गा?"
     अर्णव ज्ञान पाजळायला जाणार तेवढ्यात असीम त्याला रोकतो आणि पटकन महिषासुराच्या पायावर लोळण घेतो.
"वा वा किती इच्छा होती मनात, तुमचं दर्शन व्हावं म्हणून. आज मी धन्य झालो." असीमने हात जोडले. महिषासुर गोंधळला.
"मला भेटायचं होतं? पण तुम्ही कोण? मनुष्य दिसत आहात, पण या युगातले वाटत नाहीत." तो मिशांवर पिळ देत बोलला.
"हो हो महाराज. आम्ही भविष्यातुन आलो आहोत." अर्णव बोलला.
"हो कलियुगातुन."
"पण आता थोड्या वेळापूर्वी व्दापार युगातुन." अर्णव गोंधळत म्हणाला.
"गप्प बसा. तुम्ही काय बोलताय? एकदा सांगताय कलियुगातुन आलात, एकदा सांगताय व्दापार युगातुन? खरं काय ते बोला. तुम्ही भविष्यातुन या लोकात कसे आलात?" मोठ्या भसाड्या आवाजात महिषासुराने विचारलं. असीमने जे सुचेल ते पटापटा सांगितले.😔
"अं......एकंदर तुमच्या बोलण्यावरुन वाटतयं की तुम्ही खोटं बोलत आहात."
"नाही नाही महाराज. अहो आमच्या कलियुगात आजच्या काळात आम्ही तर चंद्रावर जाऊन पोहोचलो आहोत.😱 मग हे तर काहीच नाही." असीम हसत बोलला.
"अं.......म्हणजे मग मलाही तुमच्या युगात येता येईल."
"आमच्या युगात? पण का?" घाबरत असीमने विचारलं.
"जशा आमच्या लोकात सुंदर सुंदर स्ञिया आहेत, तशा तुमच्या युगातही असतीलच."
        अर्णव व असीम मान डोलवत हसतात.
"हे काय आहे?" महिषासुराची नजर असीमच्या पाकिटावर जाते. असीम त्याला पाकिट देतो. तो ते उल्टेपाल्टे करतो. आतमध्ये एका सुंदर मुलीचा फोटो असतो.
"वा! अतिसुंदर! ही मुलगी कोण आहे?" महिषासुर असीमला विचारतो.
"ही नेहा मा.......माझी बायको."
"नेहा........." महिषासुर हसतो. महिषासुर अर्णव चेही पाकिट पाहतो. त्यातही एका सुंदर कन्येचा फोटो असतो.
"ही माझी बायको रेश्मा." अर्णव हसतो.
"वा! वा! नेहा,रेश्मा. आता मी तुमच्या युगात येऊन या दोन कन्यांसोबत लग्न करणार. बरोबरच अजुनही सुंदर स्ञिया असतीलच."
"हो हो महाराज, अवश्य." अर्णव व असीम हसत बोलतात.
"शेवटी तुमच्या सारख्या पराक्रमी पुरुषासोबत कोणतीही स्ञी शोभुन दिसेल." महिषासुर खुश होतो.
"महाराज,महाराज........." एक असुर सैनिक जखमी होत विव्हळत धावत येतो.
"महाराज ती स्ञी....." काही बोलायच्या आत तो खाली कोसळतो. समोरुन सिंहावर बसलेली देवी दुर्गा हातात आयुधे धारण करुन येत असते. महिषासुर तिला पाहतच राहतो.
"देवी दुर्गा........." अर्णव व असीम हात जोडून तिच्यासमोर धाव घेतात. देवी दुर्गा क्रोधाने त्या दोघांच्या छातीवर लाथ मारते. दोघे कळवळत खाली कोसळतात.
"आह....माते...." अर्णव व असीम विव्हळतात.
"गप्प बसा. आता तुम्हाला माता आठवली? अरे हा असुर जेव्हा तुमच्या युगात तुमच्या बायकांशी लग्न करण्याच्या गोष्टी करतो तेव्हा पुरुष म्हणुन काहीच कसं वाटत नाही? शी! शेवटी पुरुष ते पुरुषच. " देवी पुन्हा अर्णव व असीमला पायाखाली रगडते.
"क्षमा माते, क्षमा."
"अरे युग कोणतेही असो स्ञी ही प्रत्येक युगात महत्वाची असते. कधी ती कोणाची माता, कुणाची पत्नी, कुणाची मुलगी असते. तुम्हा पुरुषांच्या पायाची दासी असत नाही, तिला कमी लेखु नका."
"ए सुंदरी. अगं स्ञी ही कायम पुरुषाच्या सोबत शय्येतच शोभते. अगं बघ मी महिषासुर तिन्ही लोकांचा स्वामी. माझ्याशी विवाह कर, राणी बनुन राहशील."
      देवी दुर्गेने सिंहावर उभी राहुन महिषासुराच्या छातीवर लाथ मारली. धडपडत तो खाली पडला.
"नीचा, माझ्याशी विवाह करायचा असेल तर माझ्याशी युध्दात जिंकुन दाखव." महिषासुर उभा राहतो. अर्णव व असीम थरथरत उभे राहतात. महिषासुर आपले सैन्य बोलवतो. त्या दोघांमध्ये घमासान युध्दाला सुरवात होते.
"चला आता या दोघांमधलं युध्द काही ९ दिवस संपणार नाही." अर्णव हताश होतो.
"आय आय आय. पण खरंच असीम आमच्या एवढ्या सुंदर बायका या महिषासुराला सोपवायला कसे तयार झालो रे आपण."
"अरे त्या एवढ्या धिप्पाड, पर्वता सारख्या महिषासुरासमोर टरकली होती आमची, मग त्याच्या हो त हो करावं लागलं."
"पण देवी दुर्गेने माञ आमच्या अपराधाची आम्हाला जाणीव करुन दिली. आपल्या युगात अजुनही स्ञियांना पुरुषा बरोबरचा दर्जा दिला जात नाही. त्यांना किती कमी लेखतो रे आपण!"
       अर्णव काही न बोलता युद्ध पाहु लागला.
"अरे त्या टाईम मशिनने पुन्हा जाऊया ना महाभारतात, चल."
"अरे पण तसं जाता येणार नाही असं त्या मशिनमध्येच लिहलं होतं ना?"
"मग आता?"
"आता काय? युध्द संपायची वाट पाहायची. देवीच काही तरी रस्ता दाखवेल." दोघेही हात जोडतात. देवी दुर्गा व महिषासुरामधले युध्द संपते. देवी महिषासुराच्या कित्येक सैनिक, सेनानायकांचा नाश करते. सरतेशेवटी देवी महिषासुराच्या छातीवर पाय देऊन छाती चिरडते. रक्ताच्या चिळकांड्या उडु लागतात. महिषासुर हात जोडुन गयावया करु लागतो.
"माझ्याशी विवाह करायचा आहे? अरे उद्दाम राक्षसा आठव तुझी कुकर्मे आणि हो मरणाला सिध्द." देवीने क्रोधाने दिव्य ञिशुल त्याच्या छातीत खुपसला. देवीच्या सिंहाने महिषासुराच्या रेड्याचे आतडे बाहेर काढले. तडफडत महिषासुर ठार झाला. अर्णव व असीम थरथर कापतच देवीसमोर आले.
"मा.....मा....माते. चुक झाली आमची." दोघेही एकाच वेळी म्हणाले. देवीचा राग मावळला.
"हे लक्षात ठेवा. स्ञी ही जेवढी शांत असते, तेवढीच ती शक्तीचं रुपी असते, ती वेगवेगळ्या भुमिका बजावत असते. पती पत्नीच्या नात्यात पत्नीवर अन्याय होताना, कुणी तिच्याबद्दल असभ्य बोलताना तो कितीही शक्तीशाली असो प्रत्येक पुरुषाचे कर्तव्य आहे की त्याने तिचे, तिच्या शिलाचे रक्षण करावे. विसरू नका प्रत्येक स्त्री त माझाच अंश आहे."
       देवी असीम, अर्णव कडे पाहु लागली.
"असीम, अर्णव तुम्ही कलियुगातुन आला आहात हे मी जाणते. तुम्ही कसे आलात ते ही मला ज्ञात आहे. परंतु एक लक्षात ठेवा हे रहस्य रहस्य राहु द्या. कारण कलियुगात अशा व्रुत्तीची लोकं आहेत ज्या प्रत्येकात दानव लपलेला आहे, ती त्याचा दुरुपयोग करु शकतील."  असीम व अर्णव विनम्रपणे हात जोडतात. देवी त्यांना आशीर्वाद देते तसे ते गायब होतात, आणि पुन्हा हस्तिनापुरात येऊन पोहोचतात.
            अतिथी ग्रुहाच्या बाहेर दुर्योधनाचा सेवक उभा असतो. त्या दोघांना पुन्हा तेथे पाहताच तो धावत दुर्योधनाला वर्दी देतो. दुर्योधन, दुःशासन, कर्ण तिथे पोहचतात.
"तुमच्या कडे कोणती मायावी विद्या तर नाही?" दुर्योधन बोलतो.
"नाही महाराज. आम्ही त्याच मशिनने अगदी मागच्या युगात गेलो होतो." असीम सविस्तर वर्णन करुन सांगतो.
"त्या युगात जिथे महादेव आणि पार्वती असायचे?"
      अर्णव व असीम मान डोलवतात.
"हं. तुम्ही सांगाल आणि आम्ही विश्वास ठेवायचा. काय पुरावा आहे तुमच्याकडे?" हिसका देत दु:शासन बोलला.
         अर्णव पटकन खिशात ठेवलेली छोटी पेटी उघडतो. त्यात देवीचा आशीर्वाद म्हणुन पाचुचे पान असते.
      कर्ण बारकाईने पाहतो.
"हे पाचुचे पान पाहता ते या युगातले असणं शक्य नाही."
"म्हणजे हे खरचं त्या समययंञाने या युगात आले आहेत?" दुर्योधन चमकतो.
"हो, असंच असेल."
"अहो असेल नाही आहे." असीम मध्येच बोलतो.
"अरे वाह! मग या अशा यंञाने आपण आपल्या भविष्यात जाऊन त्या गोष्टीही बदलु शकतो." दुर्योधन हसत बोलला.
"दुर्योधना अरे माणसाचा भुतकाळ जसा बदलता येत नाही तसा भविष्यकाळ ही बदलता येत नाही. बदलता येतो तो फक्त वर्तमान."कर्ण बोलला. असीम- अर्णव कर्णाच्या व्यक्तिमत्वाने व बोलण्याने भारावले होते. एवढा सदग्रुहस्थ या पाताळयंत्री दुर्योधनाच्या बाजुने? मग त्या दोघांना महाभारत आठवते. तो आखाडा, भिमाने केलेला कर्णाचा अपमान, दुर्योधनाने केलेला राज्याभिषेक, द्रौपदी स्वयंवरातील त्याचा अपमान सगळं .
"अंगराज कर्ण खरंच तुम्ही खुप ग्रेट......आय मिन खुप सद्गुणी व्यक्ती आहात. खुप सहन केलतं तुम्ही." अर्णव बोलतो.
"हं........मी सद्गुणी! माझं भाग्य माझ्याशी कायमच खेळत आले आहे. अंगात क्षमता असुनही आजपर्यंत केवळ हिन म्हणुनच वागणूक मिळाली आहे मला." कर्ण हताश झाला.
"अहो हे आमच्या आजच्या युगातही घडतेच आहे. तो महार, तो मूस्लिम. तो खालच्या जातीतला, तो उच्च. फरक एवढाच की आता आरक्षणे आलीत, कायदे आलेत. पण म्हणावी तशी परिस्थिती बदललेली नाही."
"म्हणजे हिनांनी जगुच नये असं म्हणतो का हा समाज? भविष्यातही यात बदल होत नसतील तर समाजरचनेची केलेली रचनाच डळमळीत आहे असंच म्हणावं लागेल." कर्ण उदास झाला. असीम व अर्णव शांत बसले.
"अंगराज, महाराज दुर्योधन आणि दु:शासन . खरं सांगायचं तर या हस्तिनापुरात येण्याचा योग लाभेल असं कधीच वाटलं नव्हतं. फक्त एकच विनंती आहे तुम्हाला, श्री क्रुष्णाचं दर्शन व्हावं." असीम बोलला.
       दुर्योधनाच्या कपाळावर आठ्या पडल्या.
"महालात एवढ्या चांगल्या सोयी सुविधा असताना तुम्हाला त्या काळ्या चेटक्या गवळ्याचं दर्शन घ्यायचं आहे?"
"दुर्योधना......" कर्ण ओरडला. असीम व अर्णव घाबरले.
"आपण घाबरु नका. श्री क्रुष्णाचं दर्शन तुम्हाला नक्कीच होईल. आपण उद्या निघु." कर्ण, दुर्योधन, दुःशासन निघून गेले.
"अरे वा अर्णव. आपल्याला श्री क्रुष्णाचं दर्शन होणार आहे." असीम आनंदाने बोलतो, अर्णव ही खुश होतो.
        तेवढ्यात युवराज्ञी भानुमती सह दासी येते. चिकाच्या पडद्याआड राहुन ती खाकरते.
"अतिथीगण सरबत प्राशन करावे." भानुमती दासीला आदेश देते.
"आपण असे पडद्याआडून का बोलताय?" सरबताचा स्विकार करत अर्णवने विचारलं.
"राजस्ञिया परपुरुषांसमोर येत नाहीत."
"असं आहे होय." अर्णवच्या मनात नकळत आजच्या काळातल्या मॉर्डन मुलींचा विचार येतो.
"कसं झालं आहे सरबत?"
"वा! सुरेख!" असीम - अर्णव एकदमच बोलतात. एकदम त्या दोघांना आपल्या बायकांची आठवण येते.
"धन्यवाद!" भानुमती बोलते.
"खरं सांगायचं का, तर यावेळी आम्हा दोघांना आमच्या बायकोची खुप आठवण येतेय." अर्णव बोलला.
"मग त्यांनाही घेऊन यायचं सोबत."
"नाही, त्या नाही आल्या." अर्णव बोलला.
"हं.......तुम्हा पुरुषांना कुठे जायचं असलं तर बायको लागत नाही. एरवी माञ तिच्याशिवाय करमत नाही." युवराज्ञी भानुमती हसते. सरबताचे ग्लास घेऊन युवराज्ञी दासी सोबत निघुन जाते.
              अर्णव व असीम हळुहळु निद्रेच्या अधीन होतात.
         प्रातः काळी गायञी मंञाच्या धीरगंभीर आवाजांनी ते दोघे जागे झाले.
"अरे वाजलेत किती?"
"पहाटेचे चार वाजलेत. एवढ्या पहाटे हे गायञी मंञ कोण म्हणत आहे?" अर्णव आणि असीम बाहेर जातात. गायञी मंञांचा आवाज अजुनच स्पष्ट होत जातो. ते तसेच चालत एका कक्षाकडे येतात. तेथे ध्यान लावुन पितामह भीष्म बसलेले असतात. तेच गायञी मंञ म्हणत असतात.
"भिष्म पितामह? एवढ्या पहाटे!.😲 " तेवढ्यात भिष्म आपले डोळे उघडतात.
"कोण आहे ते?" अर्णव व असीम घाबरतच आत येतात.
"तुम्ही?"
"हो पितामह. गायञी मंञांच्या आवाजाने आम्हाला जाग आली, आणि आम्ही येथे आलो. क्षमा." अर्णव हात जोडत बोलला.
"मग त्यात क्षमा कसली मागायची?" भिष्म उठत समोर येतात.
"अरे तुम्ही तरुण लोकांनी पहाटे ब्रह्म मुहूर्तावर उठायचं असतं. नित्य योग करायचे असतात. चांगली प्रक्रुती त्याच्यामुळेच तर लाभते." भिष्म हसतात.
" पितामह, तुमच्याबद्दल खुप ऐकलं होतं. या ठिकाणी तुम्ही आणि अजुन दोन व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाने आम्ही भारावलो आहोत."
"अजुन दोन कोण?"
"महाराज दुर्योधन आणि अंगराज कर्ण." असीम शांतपणे बोलला.
       भिष्मांच्या कपाळावर आठ्या पडल्या, पण शांतपणे ते बोलु लागले.
"कधी कधी जे आपल्या नजरेला दिसतं ते खरं मानायची चुक आपण करतो."
"म्हणजे? " अर्णव ने आश्चर्याने विचारलं.
"काही नाही. तुम्हा भविष्यवासींना कदाचित हे युग ज्ञात असेल. अरे पण माणसांची दुःख तर प्रत्येक युगात तीच राहतात." भिष्म थोडेसे भावुक झाले.
"पितामह, तुमच्या सारख्या वीर माणसाच्या डोळ्यात आसु?" अर्णवने विचारले.
"अरे हो मी जरी वीर असलो, या हस्तिनापुराची खरी धुरा माझ्यावर असली, तरी मीही एक माणुसच आहे. एक जेष्ठ आहे. ज्येष्ठांना कनिष्ठांना बोलण्याचा, त्यांना चार समजुतीच्या गोष्टी सांगण्याचाही अधिकार नाही. कारण कनिष्ठांचा मान दुखावला जातो. कनिष्ठ जे करतील ते पाहण्याशिवाय हा भिष्म काय करु शकेल?"
          अर्णव व असीमला आपल्या आई-वडिलांची आठवण येते. त्यांनीही बरेचवेळा या दोघांना समजुतीच्या गोष्टी सांगितल्या होत्या पण तारुण्याच्या नादात त्यांनी त्या उडवुन लावल्या होत्या.
"असो. भविष्यात तरी तुम्ही कनिष्ठ जेष्ठांची आज्ञा डावलणार नाहीत."
"पितामह, आपल्याला अजुन एक सांगायचं होतं." भिष्म नजर वर करत पाहतात.
"आज आम्ही श्री कृष्णाच्या दर्शनासाठी जाणार आहोत व्दारकेला अंगराज कर्णासोबत." असीम बोलतो. भिष्मांचा चेहरा खुलतो, मनोमन ते क्रुष्णाला वंदन करतात.
"ही तर खुप शुभ वार्ता आहे. जा निश्चिंतपणे जा. त्याची संगत थोडा वेळ जरी लाभली तरी आयुष्यभराचे पुण्य मिळेल." भिष्म दोघांना आशिर्वाद देतात. दोघेही आनंदाने त्यांच्या कक्षातून बाहेर येतात.
       कर्ण अतिथीगृहात येतो.
"चला. सगळी तयारी झाली आहे."
"अंगराज, खरंच खुप उपकार झाले तुमचे." भावूक होत असीम बोलला.
"खरंतर उपकार तुम्हा भविष्य मानवांचे मानायला हवे. कसे का होईना तुमच्यामुळे मला आज श्री क्रुष्णाचं दर्शन घ्यायला मिळणार आहे." अर्णव व असीम बाहेर पडतात.
         सत्यसेन, शोण आणि कर्णासोबत अर्णव व असीम व्दारका नगरीत पोहोचतात. 
"एवढी भव्य नगरी!" अर्णव व असीम पाहत जात असतात. कर्णाने अमात्यां करवी अगोदरच श्री क्रुष्णाला भेटीचे आमंत्रण पाठवलेले असते. उंच उंच प्रासाद, सगळी सोन्याने मढवलेली रम्य व्दारका पाहुन त्यांना हस्तिनापुराचा विसर पडतो. क्षण दोन क्षण आपल्याला आपल्या कलियुगात परतायचे आहे, याचाही विसर पडतो.
          कर्णा सोबत ते श्री क्रुष्णाच्या महालात प्रवेश करतात. उंच उंच गोपुरे, त्यावरील नक्षीदार सजावट, मोरपिसांनी सुशोभित केलेल्या भिंती अर्णव - असीम मंञमुग्ध होतात. तेवढ्यात पलीकडून श्री कृष्ण आत प्रवेश करतो. निल वर्ण, सुकुमार देहयष्टी, डोक्यावर सुवर्ण मुकुट आणि त्यात शोभणारे मोरपिस. हसतच तो कर्ण आणि अर्णव- असीमचे स्वागत करतो, आणि आपल्या आसनावर बसतो. अर्णव - असीम भारावुन क्रुष्णाला पाहत राहतात.
"केशवा, अरे हे......." कर्ण काही सांगणार तोच हाताचा इशारा करत क्रुष्ण त्याला थांबवतो.

"मला ज्ञात आहे अंगराज. हे अर्णव व असीम कलियुगातुन आजच्या युगात आले आहेत समययंञाच्या सहाय्याने." श्री कृष्ण मोहक हास्य करतो.
"देवा......" म्हणत भावुक होत अर्णव व असीम क्रुष्णाच्या पायांवर लोटांगण घालतात.
"अर्णव -असीम उठा." दोघेही उभे राहतात.
"या युगात येण्याचा मोह धरुन समय यंञाने तुम्ही येथे आलात, त्याच समययंञाने तुम्ही माता दुर्गेचंही दर्शन घेऊन आलात. "
"होय देवा. अरे पण आज साक्षात तुला समोर पाहून आमची दोघांची मने भरुन आली बघ."
"असीम -अर्णव अरे समय यंञाने तुम्ही येथे आलात. पण लक्षात ठेवा हे समययंञाचे रहस्य कोणालाही समजता कामा नये."
"होय देवा." अर्णव व असीम हात जोडतात.
"कर्णा, यांना आवडलं की नाही हस्तिनापुर?" कर्ण मोहक हास्य करतो.
"देवा आम्हाला अजुन एक विनंती करायची होती." श्री क्रुष्ण मान डोलवतो.
"आम्हाला प्रभु रामाचेही दर्शन घ्यायचे आहे."
"अवश्य. अरे पण तुम्हा दोघांना तुमच्या ग्रुही जाण्यास विलंब नाही का होणार? अरे तुमच्या पत्न्या वाट पाहत असतील. अरे मी एवढा व्दारकाधीश पण रुक्मिणी समोर असली की मलाही काय बोलावं ते सुचत नाही बरं." सगळे हसतात.
"देवा, फक्त एकदा....." अर्णव व असीम श्रद्धापुर्वक बोलतात. श्री क्रुष्ण त्या दोघांच्या मस्तकावर हात ठेवतो, तसे दोघेही गायब होतात.
        जेव्हा त्या दोघांचे डोळे उघडतात तेव्हा ते पाहतात. एक निसर्गरम्य परिसर.
"अरे आपण नक्की रामायणातच आलोयत ना?🤔 नाही कारण रामानंद सागरांच्या रामायणासारखं काही दिसत नाही येथे." असीम सभोवताली पाहु लागतो.
      तेवढ्यात,
"सेतु बांधा रे बांधा सागरी" अशा आरोळ्यांचा आवाज ऐकु येतो. अर्णव व असीम पुढे पुढे जातात. एके ठिकाणी बरेच मनुष्य मोठमोठ्या काळ्या शिळा खांद्यावर घेऊन जात असतात. ते मनुष्य नसुन रामाचे वानरसैनिक असतात. शिळा नेताना एकामागोमाग एक जाताना ते" सेतु बांधा रे बांधा रे सागरी" अशा आरोळ्या मारत काम करत असतात. त्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. एक भल्या मोठ्या अस्वलासारखा दिसणारा मनुष्य शिळांवर" श्री राम" लिहीत असतो. तो जांबुवंत असतो.
"अरे आपण रामायणातच आलो आहोत अर्णव." खुश होत असीम बोलतो. अर्णव व असीम अजुन पुढे जातात. तेवढ्यात वानरसेनेत चुळबुळ वाढते. सगळे जयजयकार करु लागतात.
"प्रभु श्रीरामांचा विजय असो, प्रभु श्रीरामांचा विजय असो." सगळे वानरसैनिक उभे राहुन राम व लक्ष्मणासमोर मान तुकवतात. अर्णव व असीमला प्रभु रामांचे दर्शन होते.
"अर्णव - असीम समोर या." प्रभु श्रीराम दुरुनच बोलतात. दोघेही दचकत श्री रामाच्या समोर जातात. क्रुष्णासारखाच निळा रंग, पण अनुपम सुंदरता असलेला श्री राम मोहक हास्य करत उभा असतो. लक्ष्मण माञ साशंकतेने पाहत असतो.
"व्दारकेतुन येथे येताना काही ञास तर नाही झाला ना तुम्हाला?"
     अर्णव व असीम नकारार्थी मान हलवतात.
"हे कोण आहेत भैय्या?"
"हे कलियुगातील मानव आहेत लक्ष्मणा. समययंञाने इथे येऊन पोहोचले आहेत. " अर्णव व असीम रामाच्या रुपाकडे पाहत राहतात.
"आम्ही धन्य झालो प्रभु." दोघेही रामाच्या पायांवर लोळण घेतात.
"उठा, अर्णव -असीम. आता तुम्हाला जायला हवं. आम्हाला ही हा सेतु पार करुन जायचं आहे. " श्री राम बोलतात. अर्णव - असीम ऊठुन उभे राहतात. समुद्राकडे पाहत असतानाच श्री राम त्यांच्या कपाळाला हात लावतात.
       दोघेही जेव्हा डोळे उघडुन पाहतात तो समोर आसनावर बसलेला श्री कृष्ण त्यांना दिसतो. ही सगळी त्याचीच लिला असते. जागेवरुनच त्या दोघांना रामाचे दर्शन झालेले असते. कर्ण, शोण आश्चर्याने पाहत असतात.
"प्रभु रामचंद्राचे दर्शन झाले ना अर्णव?"
"देवा म्हणजे ही सगळी तुझी लिला होती तर?" अर्णव बोलतो.
"अरे ही संपुर्ण स्रुष्टी म्हणजे माझीच लीला आहे. स्रुष्टीतला प्रत्येक जीव मग तो सजीव वा निर्जीव माझाच तर अंश आहे, पण येणाऱ्या युगाची स्थिती पाहुन मन विदीर्ण होते.कलियुगात आज सर्वत्र पापाचार वाढला आहे. नात्या नात्यात पराकोटीचे वाद होतायत. आई-बहिण, भाऊ कोणी कोणी एकमेकांना विचारत नाही. स्वार्थासाठी सगळे बरबटत वाहवत चालले आहेत. अशात मी जो आदर्श घालून देण्याचा प्रयत्न करतोय तो पुर्ण कसा होईल? म्हणुनच माणसाने माणसाशी माणसासारखे वागण्यातच प्रत्येक युगाचा मानवधर्म सामावलेला आहे."
      अर्णव व असीम भक्तिभावाने श्री क्रुष्णाचं बोलणं ऐकत राहतात. कर्ण,शोण ही मंञमुग्ध होतात.
"अरे चला, जायचं नाही का आपल्या स्वग्रुही?" श्री कृष्ण हसतो. श्री क्रुष्णाच्या इशाऱ्याने समययंञ प्रकट होते.  श्रध्देने श्री क्रुष्णाला वंदन करत कर्ण व शोणाकडे पाहत ते समययंञात प्रवेश करतात. टाईम मशीन गरगरत गायब होते.
        दोघेही पुन्हा प्रकट होतात.
"चला फायनली आपण आलोत आपल्या घरी. अरे पण आजुबाजुला सगळं कसं शांत शांत का आहे? ही घरे अशी का आहेत?" अर्णव विचार करत बोलतो.
"सॉरी अर्णव. अरे घोळ झाला."
"आं... आता कसला घोळ पुन्हा?" 😲 अर्णव विचारात पडला.
"नाही श्री कृष्ण.."
"श्री कृष्णाने घोळ घातला....."
"अरे बाबा ऐक तरी.🤨 टाईम मशिन जेव्हा गरगर फिरत होती ना."
"हां, मग?😐😐😐"
"त्यावेळी चुकुन मला जोराची शिंक आली आणि.... आणि...."
"आणि काय?🧐"
"टाईम चुकला."
       अर्णव असीमला मारु लागला.
"कायम हे असे घोळ तुझ्यामुळेच होतात. पहिलं तर त्या गुहेत जाऊया नको म्हटलं तरी गेलो तु तुझ्या बायकोला काही सांगितलं नाही, मी माझ्या बायकोला. गेलो ते गेलो आणि काय शोधलं टाईम मशिन. आणि तुझ्यामुळेच ते मशिन वापरुन महाभारतात पोहोचलो थेट कर्णासमोर!😯"
"अरे पण आपल्याला नवीन शोध तर लागला ना? शेवटी याचं क्रेडिट तरी मलाच द्यावं लागेल तुला.🤗"
"हा हा हा हा काय तर म्हणे क्रेडिट. अरे हे रहस्य रहस्य ठेवायचं म्हणुन माता दुर्गा आणि श्री क्रुष्णाने बजावलय, विसरलास?"
"अरे ते जाऊ दे, पण हे आत्ता कुठे आलो आपण?😯😯" असीम बोलला.
"एकंदरीत ही घरे वगैरे पाहून तर वाटतयं की आपण दुसऱ्या कोणत्या युगात तर नाही पोहोचलो. "
"थैंक गॉड, म्हणजे निदान आपण कुठेतरी जवळपास तरी आहोत."😇 अरे पण हा आवाज कसला?"
         एका ठिकाणाहुन बऱ्याच खादी कपड्यातील कार्यकर्त्यांचा मोर्चा येत असतो.
"भारतमाता की जय"
"सत्यमेव जयते!"
      अशा घोषणा देत सगळे येत असतात. एक पंचा व धोतर नेसलेला व्यक्ती हातातील काठीच्या आधाराने व काही कार्यकर्त्यांच्या सोबतीने येत असतो. तरुणांनाही लाजवेल असा त्यांचा उत्साह असतो. मोर्चात सामील होणारे त्यांना वंदन करुन मोर्चात सामील होत असतात.
"स्वदेशी वापरा, खादी वापरा." म्हणत मोर्चा पुढे जात असतो.
"बापु." अर्णव बोलतो.
"कोण बापु? कुणाचे बापु?🤔" असीम.
"अरे मुर्खा बापु. आपल्या देशाचे बापु. राष्ट्रपिता महात्मा गांधी."
"अरे म्हणजे आपण स्वातंत्र्य पुर्व काळात आलो आहोत." 😯
        तेवढ्यात एक कार्यकर्ता त्या दोघांसमोर येतो.
"बापुंची शिकवण आहे स्वदेशी वापरा, खादी वापरा." अर्णव व असीम आपल्या कपड्यांकडे पाहतात. तेवढ्यात बापु तिथे येतात. प्रेमपुर्ण नजरेने ते अर्णव व असीम कडे पाहतात.
"सेवालाल, माझी शिकवण विसरलास तु. अरे आपण अहिंसेच्या मार्गाने जातोय. कुणावरही जोर जबरदस्ती करुन आपली गोष्ट समोरच्या व्यक्तीला पटवुन देणं ही आपली शिकवण आहे का?" अर्णव व असीम बापुंसमोर झुकले. थरथरत्या हातांनी बापुंनी त्यांना आशीर्वाद दिला.
"बापु खरंच आजचा दिवस खुप पविञ म्हणायला हवा. साक्षात तुमचं दर्शन झालं." अर्णव बोलला.
     बापु हसतात.
"अरे मुलांनो दर्शन द्यायला मी कोणी देव नाही. फक्त त्या देवाने दाखविलेल्या मार्गावर चालणारा एक साधा सैनिक आहे. "
"तुम्ही साधे नाहीत बापु. तुम्ही खुप महान आहात." असीम बोलतो. बापु असीमच्या केसांवरून हात फिरवतात.
"बाळा, अरे हे सत्याग्रहाचे, अहिंसेचे तप मी महान बनण्यासाठी  नाही करत. अहिंसेच्या मार्गाने सत्याचा विजय होत असतो, हे समजावे म्हणुन हा मार्ग चालत आहे. स्वदेशी खादी वापरण्याचा माझा नारा यासाठीच आहे की आपण आपल्या देशाची सभ्यता येणाऱ्या काळातही जपली पाहिजे. " बापु बोलतात.
"पण बापु. हे बंधु आमच्यातले नाही वाटत." एक कार्यकर्ता प्रश्न उपस्थित करतो.
"हो...... आम्ही २०२२ मधुन आलो आहोत. पण हे कुठले वर्ष आहे?" अर्णव आश्चर्याने विचारतो.
"सन १९४२. पण तुम्ही लोक म्हणताय की तुम्ही आजपासून तब्बल ८० वर्षानंतरच्या काळातुन आलाय. हे कसं शक्य आहे?"
        अर्णव व असीमला काय उत्तर द्यावे कळेना. गुपित उघड होऊ नये यासाठी दोघे शांत बसले.
"हे कोणत्याही काळातील का असो, पण आपले देशवासी तर आहेत." बापु हसत बोलतात.
"असं असेल तर सांगा बापुंनी सुरु केलेला सत्य, अहिंसा व स्वदेशीचा लढा यशस्वी झाला की नाही ते?" एक कार्यकर्ता बोलला.
     अर्णव व असीमची मान खाली जाते. सगळा मोर्चा शांत होतो. तेवढ्यात बापु बोलायला सुरुवात करतात.
"आपला देश पारतंत्र्यात आहे. ब्रिटिशांची गुलामी करतोय. या मातेला पारतंञ्यातुन मोकळं करण्यासाठी कितीजणांनी आपल्या जिवाची आहुती दिली. आपला देश यातुन स्वतंत्र होईलच. पण भविष्यात जर सत्य, अहिंसा, स्वदेशीचा हा लढा जर अपयशी होत असेल तर मी दाखविलेला मार्ग चुकीचा ठरला असं म्हणावं लागेल." काहीसे कठोर होत बापु बोलले.
"बापु. आजच्या काळात जो तो आपमतलबी बनला आहे. सगळीकडे खोटेपणा चालु आहे. जो तो स्वतः चं मोठेपण गातोय. अहिंसा बासनात गुंडाळून ठेवली आहे. विदेशी सभ्यतेचे अनुकरण करुन लोक स्वतःला आधुनिक समजु लागले आहेत." असीम तिडकीने बोलला.
"हे राम!" गांधीजींनी आकाशाकडे पाहिले.
"पण बापु. आम्ही नक्कीच येथुन गेल्यावर सगळ्यांना सत्य, अहिंसा, स्वदेशी याचं पालन नक्की करायला लावु." असीम बोलतो.
"बाळांनो पुन्हा चुकताय तुम्ही. जबरदस्तीने कुठलीही गोष्ट पालन करणे म्हणजे हिंसा असते. लोकांना एवढं प्रेम द्या की ते तुमचा सन्मार्ग आपणहुन स्विकारतील." बापु पुन्हा काठीचा आधार घेतात. नारेबाजी करत मोर्चा जाऊ लागतो. अर्णव व असीम भावुकपणे पाहत राहतात. मोर्चा जाताच ते रडतच एकमेकांना मिठी मारतात.😪
"खरचं अर्णव आपण बापुंची शिकवण विसरलो आहोत रे."
        असीम रिमोटचं बटण दाबतो. टाईम मशीन समोर येते. जाणाऱ्या मोर्चा कडे आणि बापुंच्या पाठमोऱ्या आक्रुतीकडे पाहत दोघे आत प्रवेश करतात. टाईम मशीन गरगरु लागते, आणि गायब होते.
           एकदम ते प्रकट होते. ते पाहतात की ते दोघे एका गडाच्या पायथ्याशी आहेत.
"अरे आता आपण कुठे आलोत?" अर्णव बोलतो. तेवढ्यात दुरवरुन एक नजरबाज त्यांना पाहतो आणि लगबगीने निघून जातो.
"अरे हा कोणता गड आहे? आणि किती उंच, सुसज्ज." असीम पाहत जात असतो, तेवढ्यात काही सैनिक त्यांचेवर तलवारी रोखतात.
"मम्मा 😯" अर्णव घाबरुन उडी मारतो.
"आपण पुन्हा महिषासुराच्या काळात......" असीम बोलत असतो.
"काय रं, कोण आहात तुम्ही? इथं गडाकडं काय करताय?" एक फेटा बांधलेला कल्लेदार मिशीवाला माणुस पालथी मुठ मिशांवर फिरवत बोलतो.
"आ.... आम्ही भविष्यातुन आलोत. मी अर्णव आणि हा असीम."
"आं......भविष्यातुन?" सगळे हसु लागतात.
"तुमचा फैसला राजचं करतील."
"राजं, म्हणजे......?"
"आरं आमचं राजं शिवबा राजं."
"मग तुम्ही.....?" अर्णव चाचरतो.
"बहिर्जी नाईक म्हणतात मला." बहिर्जी मिशीवरुन पालथी मुठ फिरवतात.
"आरं राजं आलं राजं आलं." कोणीतरी सैनिक ओरडतो. सगळे अदबीने ऊभे राहतात. अतिशय तेजस्वी चेहऱ्याचे, अंगावर सफेद अंगरखा, पायात सफेद विजार, मस्तकी सफेद शिरपेच आणि गळ्यात पांढऱ्या कवड्यांची माळा घातलेले राजे येत असतात. त्रीक्ष्ण डोळे, कपाळी शिवगंध, कल्लेदार दाढी-मिशा. राजांचे ते रुप पाहून क्षणभर अर्णव -असीम स्तब्ध झाले. सगळ्यांनी मुजरे केले.
"राजं हे दोघे या गडाच्या पायथ्याशी फिरत होते. इचारलं तर सांगत्यात आम्ही भविष्यातुन आलोत." पुन्हा हशा पिकतो.
      महाराज त्या दोघांकडे रोखुन पाहतात. त्यांचा एक हात सुवर्णमंडित म्यान असलेल्या तलवारीवर असतो.
"राजं त्या अफझला नं तर धाडलं नसेल ना जासुद म्हणून?" बहिर्जी बोलतात.
"नाही बहिर्जी. माझ्या अनुभवावरून मी सांगतो ही शञुची माणसं नाहीयेत. आम्ही तुमच्या तोंडुन सर्व ऐकु इच्छितो." राजे म्हणाले.
           अर्णव ने शक्य तेवढ्या चांगल्या प्रकारे सगळं सविस्तर सांगितले. महाराज ऐकत होते, बाकीचे ही ऐकत होते.
"राजं काय बी बोलता...." राजे हाताने थांबायची खुण करतात.
"असं यंञ आजच्या काळात नसेलही बहिर्जी, पण येणाऱ्या काळात तर असु शकेल ना." महाराज उभे राहतात.
"असीम अर्णव तुम्ही गडावर सुरक्षित आहात. इथे इकडे तिकडे फिरु नका. शञु सावध होईल. बहिर्जी."
"जी राजं" बहिर्जी मुजरा करत बोलले.
"यांना सुरक्षित गडावर पोहोचवा, आणि पंताजी काकांना संदेश पाठवा आमची सदरेवर भेट घ्यावी. " महाराज भारदस्त पावले टाकत निघुन जातात. मागोमाग सैनिकही. बहिर्जी सोबत अर्णव व असीम प्रतापगडावर जात असतात.
"बापरे! अरे चक्क महाराजांचं दर्शन झालं आपल्याला." असीम बोलतो.
"हो ना रे जणु श्री रामाची परत भेट झाल्यासारखे वाटले." अर्णव बोलतो.
          असीम - अर्णव गडावर पोहोचतात. सदरेवर महाराज बसलेले असतात. एक सेवक वर्दी देतो.
"महाराज पंताजी गोपीनाथ आले आहेत." एक तेजस्वी चेहऱ्याचा, हुशार डोक्यावर पुणेरी पगडी असलेला काहीसा स्थुल पण धुर्त व्यक्ती आत येतो. मागोमाग मोरोपंत येतात.
"मुजरा राजे." पंताजी मुजरा करतात.
        महाराज त्यांना जवळ बोलवत समोर बसवतात, आणि त्यांना खाजगीत काही सांगतात. हसतच मान हलवत पंताजी बाहेर पडतात.  तेवढ्यात बहिर्जी आत जातात. त्यांच्या नजरबाजाने एक महत्वाची बातमी दिलेली असते. काही वेळाने बहिर्जी निघून जातात. असीम व अर्णव एका ठिकाणाहून हे सर्व पाहत असतात, त्यांना काही समजत नसते. सदरेत काय चाललंय दिसत नसते, पण एवढं माहित असतं की अफजलखानाच्या वधाची तयारी चालली आहे.
         काही वेळातच पंताजी येतात. मुजरा करत सदरेत जातात. काही वेळानंतर स्मितहास्य करत महाराज सदरे बाहेर येतात.
"खुप मोठी कामगिरी पार पाडलीत तुम्ही काका. आता आई भवानीच्या आशिर्वादाने आम्ही नक्कीच विजयी होवु." पंताजी निघुन जातात. महाराज सेवकाला बोलावतात.
"संभाजी कावजी आणि जिवा महालाला सदरेवर यायला सांगा." निरोप घेऊन सेवक जातो. तेवढ्यात बाहेर गेलेले मोरोपंत महाराजांसमोर येत मुजरा करतात.
"पंत अखेर खानाने आमची अट मान्य केली. तो एकटा आम्हाला भेटायला वाईला येणार आहे. सोबत सय्यद बंडा या त्याच्या एकाच विश्वासु अंगरक्षकाला घेणार आहे." महाराज हसतात.
"महाराज मग आपण......."
"खानाने बोलवलं तर जायला हवंच."
"पण राजे तिथे तुमच्या जिवाला धोका आहे."
"मोरोपंत प्रत्येक मोठ्या मोहिमेत धोका हा असतोच. हे राज्य श्रीं चं आहे, ते जपण्यासाठी खानाचा बंदोबस्त व्हायलाच हवा." तेवढ्यात संभाजी कावजी व जिवा महाला आत येतात व मुजरा करतात.
           महाराज सदरेत जातात आणि त्या दोघांना काहीतरी सांगतात. ते दोघे निघुन जातात.
"मोरोपंत आम्ही खानाचे भेटीस जाणार तेव्हा हा खान दगाफटका केल्याशिवाय राहणार नाही." मोरोपंत पाहत राहतात.
"मोरोपंत आम्हाला अशा शस्ञाची गरज आहे जे सहजी कुणाला दिसणार नाही, आणि कळणारही नाही. जा आमच्या शस्ञागार प्रमुखाला बोलवा." मोरोपंत मुजरा करुन निघुन जातात.
"आता महाराज त्याला वाघनखं बनवायला सांगतील." अर्णव बोलतो.
"अरे मग आपण सांगुया की त्यांना.😯😯"
"गप रे काय सांगणार आहेस तु? उगाच इतिहासात लुडबुड करु नकोस."
       काही वेळाने क्रुश अंगलटीचा शस्ञागार प्रमुख येत मुजरा करतो. सदरेवर महाराजांशी त्याची गुप्त चर्चा होते, तो निघून जातो.
      अर्णव व असीम महाराजांसमोर येतात.
"अर्णव -असीम काय झालं?"
"महाराज या मोहिमेला आम्हाला ही घेऊन चला ना."
"मोहीम! तुम्हाला काय माहित?" राजे आश्चर्याने उद्गारले.
"महाराज मघाशी बहिर्जी काकांनी म्हटलं होतं ते अफझलखान..." अर्णव बोलतो.
"अं....... आम्ही मोहीमेवर जाणार आहोत हे निश्चित, पण अजुनतरी त्या खानाचा बिमोड कसा करावा याची तरकीब मिळालेली नाही."
"महाराज वा....." अर्णव असीमच्या तोंडावर हात ठेवतो.
"तरकीब सापडेल महाराज, आणि तुमच्या हातुन त्या अफझलखानाचा वधही होणारच."
"आई भवानीच्या क्रुपेने ते ही होईल. पण मी तुम्हाला तिकडे नेऊ नाही शकत."
"महाराज....." अर्णव बोलतो.
"अजुन या भेटीदरम्यान काय होईल? खान काय करेल हे माहित नाही. त्यात तुमच्या जिवाला काही झालेलं मला चालणार नाही."
"पण महाराज......" दोघे अगतिक होत बोलतात.
"ठिक आहे, पण तुम्ही कुठेही मोकळ्या जागी यायचं नाही. आमच्या सैनिकांसोबतच राहायचं, कबुल?"
         दोघे मान डोलवतात. सकाळची संध्याकाळ होते. महाराज बैचेन होऊन सदरेवर फिरत असतात. आपल्या वडिलांना साखळदंडाने बांधुन त्यांची धिंड काढणाऱ्या, तुळजाभवानी -पंढरपुराच्या देवांच्या मूर्ती भग्न करणाऱ्या आणि स्वतः च्या ६३ बायकांना ठार करणाऱ्या अशा त्या सैतानाचा अंत कसा करावा याचे कोडे महाराजांना उलगडत नव्हते. तेवढ्यात धावतच मोरोपंत आणि खासे मंडळी आत आली.
"महाराज एक आनंदाची बातमी आहे." महाराजांची मुद्रा उजळते.
"महाराज आमच्या शस्ञागार प्रमुखाने एक नामी हत्यार शोधुन काढले आहे. " मोरोपंत शस्ञागार प्रमुखाला बोलावतात. ती वाघनखे असतात. मुठ बंद केली की कुणालाही वाटावे की त्या नुसत्या चमचमणाऱ्या अंगठ्या आहेत, पण मुठ उघडली की त्रीक्ष्ण वाघनखे.
"महाराज आम्ही पडताळणी केलीय खुप नामी हत्यार आहे हे."
      महाराज वाघनखे बोटात चढवतात त्याची धार अगदी त्रीक्ष्ण असते. महाराज हसतच आपली मुठ बंद करतात. खुशीत येत आपल्या गळ्यातील कंठा शस्ञागार प्रमुखावर फेकतात.
"वा सुरेख. मोरोपंत आता खानाचा अंत दुर नाही."
       पहाट होते. सगळीकडे धुक्याची चादर पसरते. नगारे वाजु लागतात, आज स्वराज्याच्या परिक्षेचा दिवस असतो. महाराज स्नानसंध्या आटोपतात. महाराजांची खासे मंडळी जमा होतात. सैनिकांना सर्व सुचना दिल्या गेलेल्या असतात. इशारतीची तोफ झाली की खानाच्या सैन्यावर तुटून पडायचे असते. अर्णव व असीमही तयार होऊन सैनिकांसोबत जातात.
"जगदंब." महाराज छातीवर हात ठेवत स्मरण करतात. महालात जाऊन मनोहारी त्यांना राजवस्ञे देते. महाराज अंगावर चिलखत त्यावर साधा पायघोळ अंगरखा व पायजमा असा पोशाख घालून तयार होतात. वाघनखे मुठीत लपवतात. मनोहारी कडे पाहुन हसत तिची पाठ थोपटत बाहेर जातात. सदरेवर खाशा मंडळीं सोबत ते उभे राहतात.
"आई भवानीच्या आशिर्वादाने खानास धुळीस मिळवुनच येऊ. हर हर......"
"महादेव......." गर्जंनांचा आवाज घुमतो. तेवढ्यात जिजामाता साहेब खाली उतरतात.
"माँसाहेब मुजरा....." म्हणत राजे व सोबत सगळे मुजरा करतात.
"राजे जा यशस्वी होऊन या. स्वारींना साखळदंडाने बांधणाऱ्या, माझ्या भवानी आई आणि विठुरायावर प्रहार करणाऱ्या त्या मदांधाचे डोके ठेचा. जा विजयी भव!" जिजामाता साहेबांच्या बोलण्याने सगळ्यांना स्फुरण चढते. वार्धक्याने सुरकतलेल्या असल्या तरी तरुणालाईला लाजवेल असाच जिजामातेंचा उत्साह असतो.
         पालखी आणली जाते. राजे पालखीत बसतात. शामियान्यापासुन काही अंतरावर पालखी थांबवुन महाराज पायी जाणार होते संभाजी कावजी, जिवा महाला व पंतोजी गोपीनाथ सोबत. सगळे सैनिक चालत जातात. शामियाना जवळ दिसु लागताच सैनिक दबा धरुन लपुन बसतात.
"अर्णव - असीम मी सांगितलेलं लक्षात ठेवा. मोकळ्या जागी येऊ नका. जा." महाराज आपली मुठ उघडतात, वाघनखे चमकतात. महाराज मुठ बंद करतात. अर्णव व असीम सैनिकांच्या मागे लपुन राहतात. खानही पालखीतुन आलेला असतो. शामियान्यापासुन काही अंतरावर भोई उभे असतात. खाली पालखी ठेवलेली असते. तेवढ्यात खानाचा वकिल क्रुष्णाजी भास्कर येतो.
"अहो महाराज किती उशिर? खानसाहेब खोळंबलेत." महाराज हसतात आणि संभाजी कावजी व जिवा सोबत जाऊ लागतात. शामियान्यात त्यांना खानासोबत कोणीतरी असल्यासारखे वाटते.
"आत खानसाहेबांसोबत कोण आहे?"
"सय्यद बंडा......."
"खानसाहेबांना म्हणावं आम्हाला तुमची आणि तुमच्या सय्यद बंडाचीही भिती वाटते. त्यांना म्हणावं आपण वडिल, तेव्हा मनात किंतु धरु नये." खानाचा वकील आत जात निरोप देतो. तिरमिरत सय्यद बंडा बाहेर येऊन उभा राहतो.
"चला राजे." राजे एकटेच क्रुष्णाजीसोबत आत जातात. संभाजी कावजी व जिवा बाहेर उभे राहतात.
       काहीवेळ होतो आणि एकदम भांडे पडल्याचा आणि मागोमाग 'या अल्लाह...." असा आवाज घुमतो. आवाज ऐकुन सय्यद बंडा आत धावतो, मागोमाग जिवा महाला आत जातो. जखमी खान विव्हळत पोटाला धरत बाहेर येतो. जवळजवळ सात आठ फुट उंच अक्राळविक्राळ धिप्पाड देहाचा अफझलखान झोकांड्या खात असतो. मस्तकावर किमॉष असतो. झोकांडताना तो खाली पडतो. अफझलखान पालखी जवळ जात आत बसतो. तेवढ्यात संभाजी तलवार घेऊन धावत येतो. भोयांचे पाय तोडतो. अफझलखान ला बाहेर ओढतो.
"अफझल्या.........." संतापाने तो सरकन त्याचा शिरच्छेद करतो. तडफडत खानाचे प्रचंड धुड खाली कोसळते. संभाजी खानाचे मुंडके हातात पकडतो. महाराज सय्यद बंडा व काही सैनिकांशी लढत बाहेर निघतात. खानाची छावणी सावध होते. राजांचा अंगरखा मागुन फाटलेला असतो.
"चला" म्हणत महाराज जिवा व संभाजी सह प्रतापगडाकडे धाव घेतात.
"तोफाची इशारत द्या लवकर." महाराज धापा टाकतानाच बोलत असतात. इशारत होते. मराठा सैनिक खानाच्या छावणीची, सैन्याची धुळधाण उडवतात.
        प्रतापगडाच्या दरवाजाशी मनोहारी उभी असते. राजांचा अंगरखा रक्ताने भिजलेला पाहुन तिच्या हातातील छोटी आरतीची थाळी खाली पडते.
"घाबरु नकोस मनु. हे रक्त गनिमाचे आहे. आपली मोहीम फत्ते झाली." राजे हसत आत जातात.
         सैनिकांसोबत अर्णव - असीम प्रतापगडावर येतात. सगळे जमलेले असतात. जो तो आनंदी असतो. खानाचे मुंडके मधोमध ठेवलेले असते. तेवढ्यात जिजामाता साहेब बाहेर येतात. संथ पावलांनी चालत त्या मुंडक्याजवळ जातात.
"हाच.....हाच तो मदांध. ज्याने स्वारींच्या हाता पायात साखळदंड अडकवुन त्यांची धिंड काढली. हाच ज्याने माझ्या भवानी आई वर व विठुरायावर प्रहार केला. " संतापाने त्या बोलत होत्या.
"पळुन जातं होतं बेणं........" संभाजी कावजी हसत बोलला.
" हा संभाजी. हा नीच होता मदांध होता, पण होता एक आदिलशाही चा शुर सेनापतीच ना? या सेनापतीचं मस्तक याच गडाच्या पायथ्याशी गाडुन त्याची समाधी उभारा. जी कायम आठवण देईल, की मराठ्यांना कोणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर काय होते." जिजामाता साहेब महाराजांकडे नजर फिरवतात.
"शिवबा........" भावुक होत बोलतात.
"मा साहेब........"
"शिवबा अरे आई भवानीच्या क्रुपेने तुम्ही हे दिव्य पार पाडणार याची खाञी होती, पण........"
"पण काय माँसाहेब?"
"ज्या अफझलखानाने तुमच्या वडिलांना ठार केले, माझ्या पोटच्या पोराला ठारं केलं, त्या....... त्या अफझलने तुम्हाला काही केलं असतं तर....."
"माँसाहेब........" महाराज ही भावुक होतात.
"बरं शिवबा अरे हे दोघे कोण आहेत?" अर्णव - असीम कडे बोट दाखवत जिजामाता विचारतात.
"माँसाहेब हे अर्णव आणि असीम आहेत. हे भविष्यातुन आले आहेत."
"काय?" चकित होत जिजामाता बोलतात.
         अर्णव व असीम समोर येतात. असीम आपली हकीकत सांगतो.
"भविष्य कुणाला माहीत आहे, पण आज या दोघांना पाहुन पुढचा काळ खुप चांगला असावा असेच वाटते."
"होय माँसाहेब. काळ तर सुधारलाच आहे. महाराजांचा मोठा नावलौकिक आहे. महाराजांचे गड किल्ले माञ काहीसे दुर्लक्षित झालेत, पण महाराजांचं चरित्र माञ सर्वांपर्यंत पोहोचले आहे. अगदी विदेशात म्हणजे अमेरिकेत सुध्दा शिवाजी द मैनेजमेंट गुरु विषय शिकवला जातो." अर्णव उत्साहाने भारावुन बोलतो.
"असीम - अर्णव हे गड, हे किल्ले ही सगळी श्रीं ची संपत्ती. पुढच्या पिढीने या स्वराज्यदौलतीचं रक्षण करायलाच हवं. माझ्या एकट्यामुळे हे स्वराज्य उभं राहणार नाही, त्यासाठी कित्येकांनी आपले प्राणांचे बलिदान दिले आहे. फक्त पोवाडे गाऊन, चरित्र वाचुन हे होणार नाही. त्यासाठी स्वराज्याचा अभिमान अंगी बाणवावा लागतो." महाराज बोलतात. असीम -अर्णव महाराज व जिजामातेंच्या पाया पडतात आणि सगळ्यांचा निरोप घेतात.  एके निर्जन ठिकाणी समययंञ प्रकटते. ते गरगरते आणि पुन्हा प्रकट होते.
"अरे हे कोणते बरे युग आहे?"🤔🤔 अर्णव बोलतो.
"अरे हे तर माझ्या फ्लॅटसारखे घर दिसतेय. म्हणजे त्या युगातही फ्लॅट होते....?😲😲😲😲
      दोघेही चालत चालत पुढे येतात. असीम खिडकीतून डोकावतो.
"अरे हे काय?"
"काय रे काय झालं?" 😯
"अरे आतमध्ये सोफ्यावर एक सुंदर तरुणी बसली आहे, जी हुबेहूब माझ्या बायको सारखी दिसतेय."
"काय?" अर्णव दचकुन दरवाजा ठोठावतो.
"आणि त्या तरुणी समोर अजुन एक सुंदर मुलगी बसली आहे." अर्णव दरवाजा ठोठावतो. दरवाजा उघडला जातो.
         समोर असीमची बायको नेहा आणि अर्णवची बायको रेश्मा उभी असते. पहिले तर दोघीही अर्णव -असीमला पाहुन खुश होतात, पण नंतर त्यांचा रागाचा पारा चढतो.🤨🤨
"या आलात?😠" रेश्मा अर्णव ला विचारते.
"अगं रेश्मा तु येथे?" हसत हसत अर्णव बोलतो. रेश्मा दोन्ही हात कमरेवर ठेवून रागाने पाहत राहते.
"अरे नेहा पण इथंच आहे." अर्णव बोलतो.
"तुम्ही आत या. मग दाखवतो आम्ही कुठे आहोत ते." नेहा रागाने असीम कडे पाहत बोलते.
"अगं तुम्हाला सांगणारच होतो..." असीम टाईम मशीन ची स्टोरी सांगतो.
"टाईम मशिन.....😠" रेश्मा विचारते.
"हो. म्हणुन तर वेळ लागला ना दोघांना इकडे यायला काय रे अर्णव?"
"हो हो." अर्णव मान डोलवतो.
"नेहा यांना खरतर आता आपण टाईम दाखवायला पाहिजे." रेश्मा मनगट वर करत बांगड्या सरकवते, नेहाही तसेच करते. त्या दोघी दुर्गा बनुन अर्णव व असीमला आत ओढून घेतात, व दरवाजा बंद करतात. काही वेळाने कपडे धुण्यासारखे जोरजोरात आवाज, मागोमाग अर्णव - असीमचे विव्हळणे, ओरडणे ऐकु येते. मध्येच टराटरा कपडे फाडल्याचाही आवाज येतो. दरवाजा उघडतो. मार खाऊन सुजलेले अर्णव व असीम बाहेर येतात. नेहा व रेश्मा एकमेकांना टाळी देतात.
"बापरे! सगळी युगं आठवली रे अर्णव."
"हो ना! त्या टाईम मशिनपेक्षा सध्याचा आपला टाईम जपलेला महत्वाचा. आह....." असीम कण्हत बोलतो. नेहा व रेश्मा हसु लागतात.
-------------------------समाप्त------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिशक्ती

द डायरी ऑफ लोस्ट व्हिलेज

क्रुपासिंधु